बालभवनच्या शोभाताई

शोभाताईंचं शरीररूपानं आपल्यात नसणं हे मन अजूनही स्वीकारत नाहीये. मात्र प्रेरणास्रोत बनून आपल्याबरोबर त्या नेहमीच असणारेत हे नक्की.

बालभवन म्हणजे शोभाताई आणि शोभाताई म्हणजे त्यांची कार्यपद्धत, जगण्याची पद्धत! शोभाताईंचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. उत्तुंग होतं. त्यामुळे बालभवन या रंजनकेंद्राचा विस्तार आणि कामाची खोली त्या वाढवू शकल्या. आणि बालभवन ही एक मुलांसाठीची चळवळ झाली. 

मुलांच्या जगाचा विचार करताना, त्याला आकार देताना शोभाताईंनी बालभवनला अनेक उत्तम माणसांबरोबर, त्यांच्या कार्याबरोबर, उपक्रमांबरोबर जोडून घेतलं. या सगळ्या देवाणघेवाणीतून बालभवनचं वातावरण समृद्ध होतं गेलं.

शोभाताईंचं नेतृत्व वेगळंच होतं. त्यांनी स्वतःला जगाशी जोडलेलं होतं आणि इथल्या मातीशी त्यांचं घट्ट नातं होतं. म्हणून त्यांची दृष्टी विशाल होती आणि पाय जमिनीवर होते. त्या कधीच ‘विशेष’ म्हणून वावरल्या नाहीत. त्यांच्या सगळ्या करण्यात एक सहजता होती. त्या सर्वांच्या होत्या. साधं, सरळ, सोपं बोलायच्या, प्रत्येकाची आस्थेनं विचारपूस करायच्या. प्रत्येकाचा ‘सन्मान’ जपणं महत्त्वाचं मानायच्या. बालभवन हे सर्वांना आपलं वाटलं पाहिजे म्हणून बालभवनचं ‘सामान्य’ असणं त्यांनी टिकवलं.

शोभाताईंच्या सहवासातच आम्हा तायांचंही शिकणं झालं. मुलांबरोबरच्या कामाची आमची समज वाढली. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नकळत शिस्तीचे, साधेपणाचे संस्कार होत गेले. नवीन शिकण्याची तयारी, वेळेच्या आधी हजर असणं, समयसूचकता, कोणतीही मदत, सहकार्य करण्याची तयारी हे सगळं आम्ही त्यांच्यात वेळोवेळी बघितलंय. त्या खूप हौशी, उत्साही होत्या, मनात कोणतेही भेद नसायचे. ताईच्या एखादया गोष्टीत बदल सुचवायचा असेल, तर सौम्य आणि नेमक्या शब्दांत तिचं मन न दुखावता सांगू शकायच्या. त्यामुळे बालभवनाशी, शोभाताईंशी जोडलेला माणूस पुढेही जोडलेलाच राहायचा. दमले, कंटाळा आलाय हे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हतेच.

बालभवनातली ताई उत्तम माणूस व्हावी, असा त्यांचा ध्यास असे. कोणताही आविर्भाव त्यात नसायचा. मनानं खूप उदार होत्या. जे जे त्यांना कळलं ते ते सर्वांपर्यंत पोचवायच्या. त्या नेहमी म्हणायच्या, ‘‘बालभवनात प्रत्येक ताईला काम करण्याचं स्वातंत्र्य आहे; पण काम न करण्याचं नाही!’’

त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक ‘स्थिरता’ होती. ठहराव होता. अगदी ‘कंपोझ्ड’ होत्या त्या. कोणतंही संकट, अडचण समोर आली, तरी धीरानं सामना करायच्या. परिस्थितीचा समग्रतेनं विचार करायच्या. अशा कोणत्याही प्रसंगी त्या डगमगल्या नाहीत. त्यांचं वागणं, भाषा, भाव नेहमीच संयत असायचे. तेव्हा पक्कं जाणवायचं, की मृदुभाषी, सौम्य, प्रेमळ शोभाताई आतून विलक्षण कणखर आहेत!

त्यांचं लिहिणं ही बघण्यासारखी गोष्ट होती. झरझर, एकटाकी लिहायच्या. खाडाखोड नाही. इतकी विचारांची छान स्पष्टता! काय सांगायचंय ते साध्या, ओघवत्या भाषेत. त्यांनी लिहिलेले प्रसंग, निरीक्षणं वाचली, की वाटायचं, आपल्याला का नाही असं दिसत? कृत्रिमपणा, नाटकीपणा याचा त्यांना तिटकारा होता. त्या ज्ञानपिपासू, अभ्यासू होत्या. उत्तम स्वयंपाक करायच्या. त्यांचं अगत्य आणि आतिथ्य अनुभवलं नाही असा कोणी सापडणार नाही. त्यामागे सर्वांविषयी जिव्हाळा, प्रेम होतं हेच म्हणता येईल.

लॉकडाऊननंतर त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. तरीही नेहमी हसतमुख! आणि ‘मी छान आहे’ हेच उत्तर. उत्साह पूर्वीचाच होता; पण शरीर काम करू द्यायचं नाही. काही दिवसांपूर्वी मग शोभाताईंच्या पद्धतीनं त्यांनी धाडसी निर्णय घेतला – ‘आता औषधं नकोत, हॉस्पिटल नको’… 

 आणि 12-15 दिवसांतच शांतपणे हळूहळू त्या मृत्यूला सामोऱ्या गेल्या. खूप सोशीक होत्या.

सर्व परिस्थितीत आनंदी कसं जगायचं हेच शिकवून गेल्या. प्रार्थनेत त्या लिहितात ना ‘हे नाही ते नाही म्हणणार नाही. दुःखावरही प्रेमच करू’; अगदी तसंच जगल्या – कोणाविषयी तक्रार नाही! कृतार्थ जगल्या. त्यांचं जगणं हीच आपल्यासाठी मोठी शिकवण आहे. त्यांच्याप्रति खूप कृतज्ञता! त्यांनी त्यांच्या जगण्यातून आपल्याला दिलेली ‘शिदोरी’ अशीच पुढच्या पिढीपर्यंत निष्ठेनं पोचवू हीच त्यांना आम्हा सर्वांकडून श्रद्धांजली!

कल्पना संचेती

kalpanasancheti@gmail.com

गेली 25 वर्षे बालभवनबरोबर तसेच अक्षरनंदन शाळेबरोबर काम करतात. ‘मानव्य’ संस्थेच्या विश्वस्त.