बालसंगोपनातील वडिलांची भूमिका

माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन यांवर त्याच्या बालपणातील अनुभवांचा खूप प्रभाव असतो हे आता सर्वमान्य आहे. विशेषतः पालक आणि पाल्य यांच्यातील संबंधांची तर माणसाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. तरीसुद्धा, कायम असंच मानलं गेलं आहे की पालकत्वात सर्वात महत्त्वाचा वाटा आईचा असतो, आणि असला पाहिजे; वडिलांच्या भूमिकेला दुय्यम स्थान असतं. त्यामुळे आई आणि मुलांच्या नात्याबद्दल, मुलांच्या निरोगी आणि सर्वांगीण विकासामधल्या आईच्या भूमिकेबद्दल अनेको चर्चा, लेख, संशोधनं उपलब्ध आहेत. वडिलांची नेमकी काय भूमिका असावी याबद्दल फारसं भाष्य केलेलं आढळत नाही. या लेखात याच असंतुलनावर भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मुलांच्या संगोपनात वडिलांनी निभावलेल्या भूमिका स्थळ, काळ आणि संस्कृतीनुसार नुसार बदलल्या आहेत. अनादी काळापासून, बहुतेक सर्व औद्योगिक क्रांती-पूर्व संस्कृतींमध्ये ‘इट टेक्स ए व्हिलेज टू रेझ अ चाईल्ड’ अर्थात, एक मूल वाढवायला अख्ख्या गावाची मदत लागते, असं मानलं जायचं. मुलं एकत्र कुटुंबांत वाढायची. शेजारी-पाजारी, गावकरी यांची देखरेख असेच. याची पाळंमुळं अगदी खोल पिढ्यानुपिढ्या गेलेली दिसतात. वडिलांची भूमिका कुटुंबप्रमुखाची असे. कुटुंबप्रमुख या शब्दाची व्युत्पत्ती ‘कुटुंबावर राज्य करणारा – म्होरक्या’ अशी आहे. कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी आपल्या कुटुंबाचं रक्षण आणि संवर्धन एवढीच नसे तर मुलांवर योग्य संस्कार होत आहेत, त्यांची वाटचाल जबाबदार नागरिक बनण्याच्या दिशेनं होत आहे याची शहानिशा करणंही असे.

पुढच्या काळात झालेल्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं. परिणामी एकत्र कुटुंबं विभक्त झाली. कुटुंबासाठी कमवून आणणं ही वडिलांची प्राथमिक जबाबदारी झाली. पिता हा कुटुंबाचा आर्थिक आधारस्तंभ मानला जाऊ लागला. आणि इतरांचा आधार कमी होऊन किंवा अजिबात न राहून घर आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवरच येऊन पडली.

विसाव्या शतकात दोन महायुद्धं झाली आणि त्यापाठोपाठ आलेल्या महामंदीनंतर वडील पुरुषत्वाचे आदर्श मानले जाऊ लागले. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये तर मुलग्यांना पौरुषत्वाचे धडे देणं हे वडिलांचं कर्तव्य समजलं जाऊ लागलं.

मागील काही दशकांमध्ये मात्र स्त्रिया आर्थिक अडचणींमुळे किंवा स्वेच्छेनं मोठ्या प्रमाणावर कामासाठी घराबाहेर पडू लागल्या. परिणामी वडिलांकडून मुलांप्रती असलेल्या अपेक्षा परत बदलू लागल्या आहेत. मुलांच्या विकासातला पित्याचा वाटा या विषयावर फारसं संशोधन झालेलं नसलं तरी उपलब्ध माहितीतून बरेच मुद्दे गवसतात. आजकालचे वडील मुलांच्या आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण आणि मार्मिक भूमिका बजावतात. उदाहरणार्थ ज्यांना छोटी बाळं आहेत असे वडील त्यांच्या बाळाशी खेळतात, संवाद साधतात, त्याला शिकवतात आणि शिकायला प्रोत्साहन देतात – अगदी त्यांच्या आयांसारखंच. पुढे पुढे वडिलांशी निर्माण झालेल्या या हळुवार नात्याचा मुलाच्या भाषाकौशल्यावर आणि त्याच्या एकूणच आकलनावर चांगला परिणाम जाणवतो. वडिलांशिवाय वाढणाऱ्या मुलांना, विशेषतः मुलग्यांना, पुढील आयुष्यात आपला लिंगभाव ओळखणं, शालेय कामगिरी, मानसिक-सामाजिक समायोजन, स्वतःच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवणं अशा गोष्टींत अडचण येऊ शकते असं मोठ्या मुलांसंदर्भातलं संशोधन सांगतं. याउलट ज्या मुलांच्या वाढीत त्यांच्या पित्याचा क्रियाशील सहभाग असतो ती मुलं आकलनक्षमता, इतरांप्रती आस्था, स्वनियंत्रण याबाबतीत सरस आणि लैंगिक ठोकताळ्याबरहुकूम आचारविचार नसणारी आढळतात.

याच्या मागच्या कारणांचा अंदाज बांधणं फारसं अवघड नाही. आईवडील दोघंही आपापल्या पारंपरिक भूमिकांना घट्ट चिकटलेले नसतील तर त्यांची मुलंही मोकळ्या विचारांची होतात. एकेकट्या पालकांपेक्षा मुलांना वाढवण्याच्या, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असणाऱ्या आईवडिलांचा मुलांच्या भाषिक आणि एकंदरच बौद्धिक क्षमतांवर सकारात्मक प्रभाव पडलेला दिसून येतो.

एकल पालक असलेल्या घरांमध्ये या गोष्टीची उणीव भासू शकते आणि त्यामुळे घराच्या एकंदरीत वातावरणावर आणि मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो. मात्र मुलांच्या संगोपनात आईवडील दोघंही आनंदानं सहभागी असतील तरच मुलांची सकारात्मक घडणूक होते हे लक्षात घ्यायला हवं. जेव्हा वडील नाईलाजानं मुलांचं संगोपन करतात. या परिस्थितीत आई-वडिलांमधील, नाराजी, चिडचिड इत्यादींमुळे घरातील वातावरण बिघडून मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.

या विषयावर समाजशास्त्रज्ञांचं खूप संशोधन प्रसिद्ध झालंय; पण म्हणून गेल्या काही दशकांमध्ये बालसंगोपनातील वडिलांचा सहभाग वाढलाय असं काही दिसत नाही. यामागची कारणं जाणून घेणं आवश्यक आहे.

वडिलांच्या पालकत्वातील सहभागावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो: मानसिक (वडिलांची मुलांना सांभाळण्याची इच्छा, क्षमता, कौशल्य आणि आत्मविश्वास), सामाजिक (शेजारीपाजारी काय म्हणतील, हे बायकी काम आहे का?), सांस्कृतिक घटक तसेच सार्वजनिक धोरण, कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी( ऑफिसमध्ये पाळणाघराची सुविधा आहे का? पितृत्वाची रजा मिळते का? इ.), मुलांचा स्वभाव आणि जेंडर , इ. म्हणजे बघा, पहिलटकर बाबांना छोटं बाळ सांभाळताना खूप गोंधळायला होतं. आपण खूप अडाणी किंवा वेंधळे असल्यासारखं वाटतं, आणि यापेक्षा बाळाच्या आई-आज्जी यांचं जे चाललंय त्यात आपण लुडबूड न केलेली बरी अशी त्यांची साधारण भूमिका बनत जाते.

Role_of_fatherवडिलांचा पालकत्वातील सहभाग वाढावा यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. बरेचदा स्त्रिया मुलांचं करता-करता थकून जातात; पण तरीही नवऱ्याचं सहकार्य घ्यायला त्या राजी नसतात असं एक संशोधन सांगतं. घरासाठी कमवून आणणं हेच पुरुषांचं काम आहे असं मनावर बिंबलेलं असल्यानं ‘जैसे थे’ परिस्थिती चालवून घेतली जाते. नवऱ्याला मूल सांभाळणं जमेल का याबद्दलही त्या साशंक असू शकतात. कुटुंबाचा समतोल बिघडण्याची भीतीही नाकारता येत नाही. घर आणि मुलं सांभाळणं हे स्त्रियांचं कार्यक्षेत्र मानलं गेलंय. त्यासंबंधीचे सर्व निर्णय आजवर घरातली बाईच घेत आलीय. नवऱ्याकडून मदत मिळवण्याच्या मोहापायी ते अधिकार गमावणं नको असाही विचार त्यामागे असू शकतो.

आजकालच्या वडिलांना अनेक भूमिका वठवाव्या लागतात हे नक्की – चांगला जोडीदार असणं, बाळांची काळजी घेणं, कुटुंबाचं रक्षण करणं, मुलांना अभ्यासच नव्हे तर नीतिमत्तासुद्धा शिकवणं, आणि घरखर्च चालवणं. असंही सिद्ध झालेलं आहे की वडिलांच्या वाढत्या सहभागाचा मुलांना प्रत्यक्ष ( मुलांची भाषिक आणि बौद्धिक क्षमता वाढते) आणि अप्रत्यक्ष (मुलांच्या आयांना मानसिक आणि शारीरिक आधार मिळतो, जेणेकरून घरातील वातावरण अधिक प्रसन्न, मोकळं आणि आश्वासक बनतं) फायदा होतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास अधिक उत्तम पद्धतीनं होतो.

इथं हे नमूद करणं जरुरीचं आहे की वडील किती वेळ मुलांसोबत असतात यापेक्षा तो वेळ ते कसा घालवतात, मुलांशी त्यांचं नातं किती दृढ आणि खोल आहे, त्या नात्यामुळं वडिलांना आणि पूर्ण कुटुंबालाच किती समाधान मिळतं हे महत्त्वाचं आहे. तसंच वडिलांना पितृत्वाचे अनेक कंगोरे अनुभवताना येणारे अडथळे आणि त्यांच्यावरचे उपाय यांवरही लक्ष दिलं गेलं पाहिजे.

संदर्भ: द रोल ऑफ द फादर इन चाइल्ड डेव्हलपमेंट (पाचवी आवृत्ती), संपादक – मायकेल इ. लॅम्ब, प्रकाशक – जॉन विली अँड सन्स.

अविनाश कुमार

avinash.kumar@apu.edu.in

लेखक विप्रो कंपनीच्या कोर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ‘विप्रो अप्लायिंग थॉट इन स्कूल्स’ (WATIS) या समाजाभिमुख उपक्रमात काम करतात. WATIS तर्फे भारतभरातल्या शिक्षणकर्मी संस्थांना शिक्षणाचा दर्जा उंचावायला मदत केली जाते.

अनुवाद – अमृता भावे