बाळ काही खातच नाही (उत्तरार्ध)


डॉ. सुहास नेने
बाळाच्या न खाण्यासंबंधीच्या तक्रारींमागे आईने (या ठिकाणी आई / बाबा / आजी /
आजोबा / अन्य वडीलधारे माणूस असा अर्थ अपेक्षित आहे. या सर्वांची प्रतिनिधी
म्हणून आई असा उल्लेख केला आहे) त्याच्या सतत मागे लागून खाण्यासाठी केली
जाणारी सक्ती, धाकदपटशा हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे कारण असते. खायला
नकार द्यावा असे बाळाला का वाटते ते बघू.
‘मी’पणाची चाहूल
आपले नखरे किंवा अधिकार दाखवण्यासाठी जेवणाची वेळ ही सुसंधी आहे हे
बाळाला नक्की समजते. हो, कारण या वेळात त्याला सर्वांचे लक्ष वेधून घेता येते.
प्रत्येक बाळाच्या बाबतीत तपशील थोडाफार वेगळा असेल; पण एक विशिष्ट
प्रकारचे खाणे जसे दूध, खीर, पातळ वरण-भात, दुधात कुस्करलेली पोळी, खिमट,
उपमा, शिरा यासाठीच आई अडून बसलेली असते आणि बाळ अगदी ठरवून तेच
खायला नकारघंटा वाजवते. घास थुंकूनच देते किंवा चावणारच नाही किंवा तोंडाच्या
कोपर्‍यात घास तासन्तास धरूनच बसणार; आईची मस्त मजा बघत!
बाळाचे स्तनपानाचे प्रमाण कमी करण्याची वेळ आली म्हणजे वाढीसाठी आणि
विकासासाठी पूरक म्हणून बाहेरचे अन्न देण्याची आवश्यकता असते. आईच्या
दुधातील घटक बाळाच्या वाढत्या गरजा पुरवण्यास असमर्थ असतात. या वेळी
हळूहळू आपण बाळाला सोसेल, पचतील अशा स्वरूपात बाहेरचे घन अन्नपदार्थ
देण्याची सुरुवात करतो. या प्रकारास आपल्याकडे ‘उष्टावण विधी’ असे सुरेख नाव
आहे. एकेकाळी हा एक वाजतगाजत होणारा समारंभ असायचा. त्यावरून त्याचे
महत्त्व लक्षात यावे. काही बाळे स्तनपान सोडण्यास किंवा दुर्दैवाने बाटलीने दूध पीत
असतील तर ती सोडण्यास खूपच खळखळ करतात. त्यांना चमच्याने किंवा कपाने
काही दिले, तरच खायचे असते. वरचे अन्न सुरू करण्यास जेवढा जास्त उशीर
होईल, तेवढा बाळाचा अवखळपणा वाढतो आणि पातळशा अन्नाकडून घट्टसर

जेवणाला त्यांचा नकार वाढत जातो. हे सारे बाळाचा अडेलतट्टूपणा आणि स्वत्वाची
जाणीव वाढल्यामुळे होत असते. बाळ खायला काचकूच करते याची जाहिरात
आईबाबा चारचौघांसमोर करत असतील तर झालं! बाळाने त्याचा पूर्ण फायदा
घेतलाच म्हणून समजा! जिथे बाळाला खरेच भूक लागलेली असते, मनापासून
खायचेही असते (न खाऊन खरे तर चालणारही नसते), तिथे बाळ आईबाबांना
अक्षरशः नाचवते, घोडा घोडा काय करायला लावते, गाणी काय गायला लावते
आणि न जाणो आणि काय काय करून घेते.
रमतगमत खाणे, रेंगाळत खाणे
खरे तर नऊ महिन्यांपासून अगदी दोन-अडीच वर्षांपर्यंतसुद्धा थोड्याफार प्रमाणात
प्रत्येक बाळ रमतगमत, टंगळमंगळ करत, अन्न चिवडत खातच असते. असे करणे
त्याला फार आवडते. कमीजास्त प्रमाणात तुम्ही-मीपण हेच केले आहे. ही क्लृप्ती
प्रत्येक बाळ कशी आत्मसात करते माहीत नाही. पण आईच ती! ही करामत तिच्या
लवकरच लक्षात येते. तिला तिची कामे उरकायची असतात. हा बाळाने केलेला
वेळेचा अपव्यय तिला अजिबात आवडत नाही. ती चक्क त्याच्या तोंडात अन्न
कोंबायला लागते. झाले, हे बाळाला आवडत नाही, मानवत नाही, त्याचा ‘इगो’
दुखावतो!
डोळ्यासमोर चित्र आणून बघा. मस्तपैकी डायनिंग टेबलवर किंवा खुर्चीवर किंवा
पाटावर बाळ बसले आहे. ताटलीत छान भात, वरण, तूप, लिंबू, मीठ असा आईने
कालवून ठेवलेला मेनू आहे. आई बाळाला घास भरवण्याचा विचार करते आहे, तशी
सुरुवातही करते. अचानक बाळ चमचा हिसकावून घेते, भातात घालून ढवऴते,
हाताने भात खाण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात अन्न ताटलीच्या बाहेर सांडते,
अंगावर उडते, केसांना लागते, सगळा चेहरापण भरतो. बाळाला आनंदाच्या उकळ्या
फुटत असतात आणि भात जिथे जायला पाहिजे तिथे न जाता इतर सगळीकडे
जातो. बाळाला घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करायची नसल्याने कसलीच घाई
नसते. त्याला वेळेचे भान नसते आणि हे सारे करण्यात त्याला खूप आनंदही
मिळत असतो. सहसा जेवणाच्या वेळेच्या सुरुवातीच्या खाण्यामध्ये रेंगाळायला
बाळाला खूप आवडते. परत एकदा आई हे विसरते, की थोड्याफार प्रमाणात

सगळीच बाळे असे करतात. तिला वाटते, की बाळाला भूक नाही किंवा ते नीट
जेवत नाही. मग ती बाळाचे मन वळवायच्या मागे लागते (आठवा : मागील
लेखातील पहिली पायरी – मनपरिवर्तन). आईचेही अगदी खरे असते. तिला भांडी
आवरायची असतात, टेबल पुसायचे असते, झाकपाक करायची असते, आणि काय
काय! आईच्या मागची कामाची यादी तिला घाई करायला लावते. येथेच गणित
चुकते! रेंगाळत खाण्याची मग सवयच लागते. बाळ मुद्दाम तसे करायला शिकते.
स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची त्याला एक सुसंधी मिळते.
येनकेनप्रकारेण (पुन्हा आठवा : साम, दाम, दंड, भेद) खायला लावण्याचा बाळाला
इतका त्रास होतो, की
जेवायची वेळ ही त्याच्यासाठी घाबरवणारी ठरते. अन्न,
जेवण याचा विचारही त्याला नकोसा होतो. वर या प्रकरणात त्याला धपाटेही
खायला (!) लागत असतील तर मग सारेच संपले! जेवणाचा भाग म्हणून
स्वयंपाकघरातून ताटलीचा आवाज यायला लागला, तरी ते कावरेबावरे होते,
अस्वस्थ होते.
बाळाची ठेवण
बाळाची चण कशी आहे, यावर ते किती खाईल हे अवलंबून असते. सहसा अपुर्‍या
दिवसांची, जन्मतःच हृदयाचा त्रास किंवा काही शारीरिक व्यंग घेऊन जन्मलेली
बाळे (उदाहरणार्थ, टाळू अभंग नसणे, ओठ फाटलेला असणे किंवा अन्ननलिकेचे,
श्वासनलिकेचे काही आजार), गर्भारपणात आईची आबाळ झाल्याने जन्मतःच कमी
वजनाची बाळे या सार्‍यांचाच, खरे सांगू, ‘जीव’च छोटा असतो. ती फार खाऊ
शकत नाहीत. पण आई हे समजून न घेता, प्रेमापोटी जबरदस्ती करत राहते आणि
सारेच ओमफस होते!
बाळाची आवडनिवड
तुमच्या माझ्यासारख्याच बाळाच्याही आवडीनिवडी असू शकतात! कितीही मोठे
झाले तरी तुम्ही नाही का, हक्काने, नको असलेली एखादी गोष्ट पुढे आली की तोंड
वेंगाडत! (शेपूची भाजी म्हणा, दोडका, दुधी भोपळा म्हणा, कढीलिंबाच्या पानांची
चटणी म्हणा प्रत्येकाची नावडणारी गोष्ट निराळी) बाळाला पण वास, रंग पाहून

नाही एखादी गोष्ट आवडत! का मागे लागता त्याच्या? एखाद्या बाळाला एका
विशिष्ट आकाराच्या, रंगाच्या ताटलीतून किंवा वेगळ्या प्रकारच्या मग किंवा
कपातूनच खायचे किंवा प्यायचे असते. त्यात काही बदल झाला किंवा केला तर
त्याची चांगलीच सटकते. ते चक्क असहकार पुकारते. अन्न कशाप्रकारे पुढे आले
आहे याचाही त्याच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो. पोळीवर भाजी सांडली आहे,
कोशिंबिरीच्या रसात पोळी भिजली आहे, भातात मीठ जास्त पडले आहे… नाही
त्याला आवडत! त्याच त्याच पालेभाज्यांचे सूप त्याला रोज रोज दिले तर नाही ना
आवडणार! कधी टोमॅटो सूप, कधी स्वीटकॉर्न सूप, कधी क्लिअर सूप… बदल,
व्हरायटी हवीच ना! त्याच त्याच चवीचा, वासाचासुद्धा अतिरेक नको. कधी पोळी,
कधी भाकरी, कधी धिरडी असे बदल करा ना. पोहे, सांजा, शिरा, उपीट, थालीपीठ,
उकड, खिचडी, अप्पम, डोसा, इडली… किती विविधता आहे आपल्याकडे. शेवटी
बाळ तुमचेच छोटे रूप आहे हे लक्षात ठेवा; म्हणजे मग तुमच्यासारखेच(!) ते
खाण्याच्या बाबतीत नाठाळ आहे असे समजायला तुम्हाला त्रास होणार नाही.
समोर आलेले अन्न स्वतःच्या हाताने किंवा चमच्याने खावे, कप पकडावा, ताटली
धरावी असे बाळाला वाटले, तर त्यात काही चूक नाही. 5-6 महिन्यांच्या बाळाला
वस्तू
हाताने पकडता येते, 9 ते 12 महिन्यांपर्यंत बाळाला चमचा धरता येतो. आणि हे
एकदा त्यांना स्वतःला समजले, की ती स्वतंत्र होतात. स्वतःची काळजी घ्यायला
समर्थ होतात. दुसर्‍याने, अगदी आईने हात लावला, तरी त्यांचा अपमान होतो.
स्वतः खाताना अन्न पडू दे ना अंगावर, जाऊ दे ताटलीबाहेर, उडू दे कानात,
केसात. अन्न जमिनीवर सांडू नये म्हणून छान प्लास्टिकच्या सतरंजीवर किंवा
चादरीवर बसू दे बाळाला. करू दे प्रयत्न दोन-चार दिवस. पटकन शिकेल ते.
त्याच्या माकडचेष्टांची हसून थट्टा मात्र करू नका. तेवढे कळते त्याला. तुम्ही
हसलात की तो त्या वेळेला मुद्दाम करेल. पुढच्या वेळी तुमच्या डोक्यावर अन्न
टाकायला, उडवायलापण कमी करणार नाही.
प्रत्येकाची भूक वेगळी

काही बाळे पटापटा खातात, काहींना खरेच भूक कमी लागते; पण तरी
सर्वसाधारणपणे त्या दोघांचेही वजन सारखेच वाढते. हा प्रकृती-प्रकृतीमधला फरक
आहे. नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे, रात्रीचे जेवण, यातल्या प्रत्येक
वेळेला वेगवेगळी भूक लागलेली असू शकते. दर वेळी, दर दिवशी तेवढीच भूक
लागायला पाहिजे असे नाही. पहिले मोठे मूल खात होते म्हणून दुसर्‍या मुलानेही
तेवढेच खाल्ले पाहिजे असेही नाही. आईने एवढे लक्षात ठेवले तरी बास, मग ती
बाळाच्या खाण्यासाठी अडून बसणार नाही, खूप आग्रही राहणार नाही.
मानसिक परिस्थिती
असुरक्षितता किंवा आईवडिलांकडून डावलले जाणे, दुजाभाव, आईवडिलांमधील
भांडणे ह्या गोष्टींचे बाळाच्या मनावर नक्कीच पडसाद उमटतात. अशा परिस्थितीत
बाळाला अन्न न जाणे स्वाभाविक आहे. कोंदट जागा, घरात खूप लोकांचा वावर,
गडबडगोंधळ, मोठाले आवाज, आरोग्यदायी नसणारे वातावरण या सार्‍यांमुळे त्याचे
जेवणातले लक्ष उडू शकते. नैराश्याने ग्रासलेली बाळेसुद्धा जेवणावरून नजर काढून
घेतात.
पालकांचा दृष्टिकोन
बाळाच्या वाढीच्या तक्त्यामध्ये लिहिलेले प्रत्येक महिन्याच्या वजनाचे आकडे हे
समजण्यासाठी म्हणून, अंदाज यावा म्हणून असतात. प्रत्येक बाळाचा वाढीचा वेग
वेगळा असतो आणि असायलाच पाहिजे. अगदी तिथल्या आकड्याप्रमाणे बाळाचे
वजन असणारच नाही. वजन कमी आहे म्हणजे बाळाला काहीतरी झालेच आहे,
काही
आजार झाला आहे असे अजिबात नाही. पहिल्या वर्षात बाळाचे वजन जेवढे वाढते
तेवढेच प्रत्येक वर्षी वाढत
राहिले तर काही खरे नाही. विचार करून बघा केवढी होतील ती! अपुर्‍या दिवसांची,
जन्मतः कमी वजनाची आणि आजारातून उठलेली मुले यांच्याबाबतीत आया खूपच
हळव्या असतात. या नाजूकपणामुळे बाळाचे वजन कधी एकदा
वाढते असे त्यांना झालेले असते. अशा परिस्थितीमध्ये
त्या जबरदस्तीने मुलांच्या मागे लागतात आणि गडबडीला सुरुवात होते.

आहाराविषयीच्या गैरसमजुती
अमुक वाजता, घड्याळाच्या काट्यानुसार बाळाला अमुकअमुक वजनाचे अन्न अगदी
ठरवून देणे आणि तेही सक्तीने घ्यायला लावणे यासारखा त्रासदायक प्रकार कधीही
करू नये. बाळाला खायला देण्याची वेळ आणि देण्याचे माप याबद्दल खूप
गैरसमजुती असतात. तक्त्यात सांगितल्याप्रमाणे अन्न / दूध बाळाने घेतले नाही,
तर काहीतरी चुकीचे होईल अशा समजुतीने बाळ झोपी गेले तरी त्याला ते अन्न
भरविण्याचा नव्हे कोंबण्याचा प्रयत्न केला जातो. बाळाने जेवढे खाणे अपेक्षित आहे
त्यापेक्षा आईने जास्त अपेक्षा ठेवलेली असल्यामुळे बरेच वेळेला गोंधळ उडतो.
सतत मागे लागणे, धारेवर धरणे
जेवताना अन्न ताटलीबाहेर सांडणे, स्वतःच्या आणि प्रसंगी दुसर्‍याच्याही अंगावर
उडवणे, पाणी पिण्याच्या भांड्यात भाताची शिते टाकणे, पाणी सांडणे, उष्टा हात
दुसर्‍या ताटलीत घालणे, आरडाओरडा, खदाखदा हसणे, रडणे यांसारख्या
मोठ्यांमध्ये शिष्टसंमत नसणार्‍या गोष्टी तिसर्‍या वर्षापर्यंत बाळ करणारच
असते. त्यासाठी शिस्तीच्या नावाखाली ‘बॅड मॅनर्स’ म्हणत बाळाला ऊठसूट रागवणे
चांगले नाही. यासाठी थोडीशी सबुरीची, शांतपणे घेण्याची आवश्यकता असते. कारण
बाळ जसजसे मोठे होते तसतसे त्याचे अशा प्रकारचे वागणे कमी होत जाते.
आईवडिलांची प्रत्येक इच्छा हा कायदा होऊ शकत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द ‘बाबा
वाक्यम् प्रमाणम्’ म्हणत मुलाने झेललाच पाहिजे अशी धारणा चांगली नाही.
सांगितलेला प्रत्येक शब्द मुलाने पाळलाच पाहिजे, नाहीतर तो बिघडेल अशी
समजूत चुकीची आहे.
आईची प्रमाणाबाहेर ओसंडणारी माया
बाळाद्दलची प्रमाणाबाहेरची अनावश्यक काळजी आणि ममतेपोटी आलेली नको
एवढे गोंजारत राहण्याची, अभेद्य कवचासारखी वागण्याची रीत यामुळे बाळाला
गरज नसताना अन्न बळजबरीने देण्याची शक्यता वाढते. बाळाच्या आवडीचा पदार्थ
करताना आईने खूप त्रास घेतलेला असतो. मग तो पदार्थ खायला बाळाने नकार
दिला तर तिला राग येणे स्वाभाविक आहे. या रागाच्या भरात ती हात उचलते
आणि चिडून बाळाला तो पदार्थ खायला भाग पाडते. अन्न नाकारण्याची सुरुवात ही

अशी होते. बाळ 6 ते 18 महिन्याचे होईपर्यंत त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध
लागायला सुरुवात झालेली असते आणि म्हणूनच कुणी वरचढपणा दाखवायला
लागले, तर त्याचा प्रतिकार करायला ते आपसूक शिकते.
थोडक्यात काय, तर प्रत्येक बाळ त्याच्या गरजेप्रमाणे त्याचा भुकेचा वाटा (कोटा)
स्वतःच ठरवते. त्या बाळासाठी तो तसा पुरेसा असतो. बाळालाही आवडीनिवडी असू
शकतात याचा विचार मनात सदैव आला पाहिजे. असे मोठ्यांनी स्वतःच्या मनाशी
बिंबवले तर बाळाला कारण नसताना जबरदस्तीने खायला लावणे किंवा त्याचे मन
वळवणे यासारख्या चुकीच्या गोष्टी होणार नाहीत.
उपाययोजना
पालकांच्या बाजूने बाळाला देण्याच्या खाण्यापिण्यात काही चुकलेले नाही किंवा बाळ
आपोआप खायला लागेल असे म्हणणे या दोन्ही गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत.
कारण हे दोन्हीही खरे नाही. काहीतरी नक्कीच चुकलेले आहे आणि जे चुकले आहे
ते फक्त आईबाबांनी चुकीची कार्यपद्धत अवलंबल्यामुळे. शक्तिवर्धक औषधे, भूक
लागण्याची औषधे यांचा खरे तर काहीच उपयोग नाही. उपयोगी पडणारी असते,
काम करणार असते ती फक्त जाणीवपूर्वक केलेली कुशल हाताळणी. ‘खात नाही
म्हणजे काय, खाल्लेच पाहिजे’ असे म्हणून बळाचा वापर करून काहीही करून
खायलाच लावणे यासारखी घोडचूक दुसरी कोणतीच नसेल.
पालकांचा, विशेषकरून आईचा, एक आवडता प्रश्न असतो. बाळाने काहीच खाल्ले
नाही तर काय करायचे? मग त्याचे कसे होईल? ते गळून जाईल, अशक्त होईल.
त्याच्यावर उत्तर आहे, की भुकेच्या पुढच्या वेळेपर्यंत काहीच करायचे नाही. आईचेच
हृदय ते! लगेच तिचा पुढचा प्रश्न असतो, की त्याहीवेळी नाही खाल्ले तर? शांत
राहा. भूक लागली की बाळ शरण येणार आहेच. कोणतेही बाळ कुठल्याही
परिस्थितीत उपाशी राहत नाही, राहणार नाही याबद्दल खात्री बाळगा. कोणत्याही
परिस्थितीत मनधरणी करू नका, गोंजारू नका, लाडीगोडी लावू नका, लाच म्हणून
काहीतरी खाऊ, बक्षीस देण्याचे आमिष दाखवू नका, घाबरवू नका, भीती दाखवू
नका आणि खाल्ले नाही तर शिक्षा देण्याचा विचारही मनात आणू नका. बाळाने
खायला हवे म्हणून कुठल्याही प्रकारच्या युक्त्यांचा वापर करणे पूर्णपणे थांबवा.

हातात ताटली धरून त्याच्या मागेमागे खोलीभर फिरायचे नाही, कुणीही घोडा-घोडा
करायचा नाही, त्याच्या भरल्या ताटाकडे ‘कधी एकदा खातोय’ असे गंभीरपणे बघत
बसायचे नाही. तुम्ही वाढलेले त्याने खाल्ले म्हणून त्याचे वारेमाप कौतुकही करायचे
नाही. बाळाने काही खाल्ले नाही, मग शिक्षा म्हणून त्याला जे करावेसे वाटते ते
करू द्यायचे नाही हेही चुकीचे आहे. हे सारे झाले काय करायचे नाही; पण…
नक्की करायचे काय?
जेवणाच्या दोन मुख्य वेळांच्यामध्ये त्याला शक्यतो काही खायला द्यायचे नाही
(एखादेवेळी दूध किंवा फळ द्यायला हरकत नाही). जेवणाच्या टेबलावरती त्याला
बसू दे. त्याच्यासमोर ताटलीत अन्न वाढून द्या; त्याला काय पाहिजे ते तो नक्की
खाईल. त्याने नाही खाल्ले, तर त्याला धमकावयालाही नको आणि आणि त्याच्या
द्वाडपणाबद्दल फार मोठी चर्चाही करायला नको. कुठला तरी एखादा विशिष्ट
अन्नपदार्थ त्याने खायला पाहिजे म्हणून त्याच्यावर दडपण नको. वरणभात, पोळी,
गोड पदार्थ अशा क्रमानेच खायला पाहिजे अशी सक्ती नको. बाळाने हा क्रम बदलून
खाल्ले तर काय झाले? त्यात काय त्रास! पदार्थ असे पुढे-मागे खाल्ले म्हणजे ही
वाईट सवय आहे असे नाही. अन्न कुठल्या क्रमाने खायचे हे मुले काही दिवसात
शिकतातच.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बाळाची आवड आणि नावड समजू शकतो; पण याचा अर्थ
काय खायचे हे संपूर्णपणे त्याने ठरवायचे नाही. आईला ठणकावून सांगता यायला
पाहिजे, की जे खायचे आहे ते समोर ताटलीत दिलेले आहे. आणि हे खायचे नसेल,
तर कितीही रडलेभेकले तरी याच्या बदल्यात दुसरे काहीही मिळणार नाही. बाळाला
रंगीत पदार्थ खूप आवडतात. ताटात असे पदार्थ नक्की वाढा. तुम्हाला वाटते तेवढे
त्याने खावे यासाठी ताटलीत आधीपासून खूप अन्न देऊ नका, त्यापेक्षा त्याला थोडे
वाढून द्या आणि ‘आवडले का तुला, मग परत घालते’ असे म्हणा. तेच तेच, त्याच
रंगाचे, त्याच वासाचे अन्न बाळासमोर आले तर त्याला कंटाळा येणार. तेव्हा
वेगवेगळ्या चविष्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करा. घन अन्नपदार्थ खात नाही म्हणून
त्याऐवजी दूध किंवा फळांचा रस असले काही देऊ नका, कारण जी काही
उरलीसुरली भूक आहे तीपण याने मरून जाईल. घरात असलेल्या सर्वांनी शक्यतो

एकाचवेळी जेवायला बसलेले चांगले. जेवणाच्या वेळेस वादावादी, भांडणे टाळावीत.
आनंदी वातावरणात सर्व जणांनी जेवावे. ज्या क्षणी बाळाला समजते, की त्याला
फाजील महत्त्व मिळत नाही आणि त्याच्या स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या
चलाखीला फारसे कुणी भीक घालत नाही, त्या क्षणाला खायला नको असे
सांगण्याचे बाळ आपणहून थांबवते.
जेवणाची वेळ ही बाळासाठी दुःखद न ठरता आनंद वाटून घेण्याची संधी ठरली, तर
बाळाचे अन्नावरचे लक्ष कशाला उडून जाईल?


डॉ. सुहास नेने
doctorsuhasnene@gmail.com
लेखक गेली 40 वर्षे वैद्यकीय व्यवसायात असून ते इंडियन मेडिकल असोसिएशन,
पुणे तसेच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे या संघटनांचे अध्यक्ष होते. त्यांनी
20 वर्षे वैद्यकीय नियतकालिकाचे संपादन केले आहे. ललितलेख, व्यक्तिचित्रण
तसेच सामाजिक प्रबोधनात्मक वैद्यकीय लेखांच्या माध्यमातून ते साहित्य-क्षेत्रात
सक्रिय आहेत.