भारतातील शिक्षणाचं वास्तव

शिक्षणाचा चुकीचा आकृतिबंध, पालकांच्या महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्पर्धा आणि यशाची भीती वाटायला लावणारी व्याख्या भारतातल्या तरुण मनांचा पार चोळामोळा करत सुटले आहेत. सर्जनशीलतेचा गळा घोटणार्‍या ह्या व्यवस्थेत कुणीही खर्‍या अर्थानं जेता ठरत नाही.

बोर्डाच्या परीक्षा… वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा… मग महाविद्यालयातील प्रवेश – तरुणाई कुठे चालली आहे? यशाचा उन्माद आणि अपयशाचं लांछन ह्या दोहोंमध्ये मोठं व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायला हवं? शाळेची हडेलहप्पी आणि समाजाची बाजारू दृष्टी ह्यानुसार वागण्याचा अनुभव काय असतो?

लेखाच्या सुरुवातीला तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगतो. बराच काळ मी त्याच्या संपर्कात होतो. हो, बरोबर ओळखलंत. तो विज्ञानशाखेचा विद्यार्थी आहे. हल्लीच्या भाषेत म्हणजे पीसीएम (फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स). तोच त्याचा धर्म आहे आणि कदाचित, तोच, महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गाच्या दृष्टीनं यशाचा राजमार्ग किंवा आयुष्याला स्थैर्य मिळवून देणारी गोष्ट.

खाजगी शिक्षक, शिकवणी वर्ग आणि एकापाठोपाठ एक परीक्षांचा ससेमिरा, त्या 17 वर्षांच्या कोवळ्या पोराच्या आयुष्यात फुरसतीचा क्षण कसा तो नाहीच. तो अस्वस्थ असतो आणि त्याचे पालक काळजीत. कित्येकदा मला वाटतं, त्याच्याशी जरा काव्य-शास्त्र-चित्रपट-प्रवासवर्णनं यांवर बोलावं; पण त्याला तर ते सगळं व्यर्थ वाटतंच, त्याच्या पालकांनाही अशा ‘फुसक्या’ बाबींमध्ये रस वाटत नाही. यश मिळवण्यासाठी क्षणन्क्षण वापरला गेला पाहिजे अशी त्यांची विचारसरणीच घडवली गेली आहे.

समाजशास्त्रीय जाणिवांतून बघताना मला दिसतंय, की हा काही एकटा नाही. आजच्या सामाजिक स्थितीचं तो प्रतीक आहे. चुकीची शिक्षणव्यवस्था, पालकांची महत्त्वाकांक्षा, उपलब्ध असलेली मर्यादित संधी आणि अतीप्रचंड लोकसंख्येमुळे त्या संधींसाठी असलेले प्रचंड दावेदार, सामाजिक विषमता अशा अन्याय्य वास्तवाला त्याला सामोरं जावं लागतंय. तरुण मनांतील नैसर्गिक सहजता दडपणारी ही व्याधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

मुळात यशानं त्यांना अपयशी केलंय. ते हात धुवून मागे लागले आहेत, त्या यश नावाच्या दंतकथेचं नेमकं स्वरूप काय आहे?

पहिली गोष्ट म्हणजे, आत्ताच्या फायदा-तोटा आणि उपयोगितेच्या जमान्यात यश हे अभ्यासक्रमांमधील उतरंडीवर आधारलेलं आहे. ह्या उतरंडीत विज्ञान किंवा वाणिज्य शाखा वरचं स्थान पटकावून आहेत. ह्या शाखा अधिक व्यावहारिक आणि किफायतशीर मानल्या जातात, तर कला आणि मानव्यशास्त्राकडे नकारात्मक चष्म्यातून पाहिलं जातं. ह्या बायकी शाखांना काहीही भविष्य नसून ‘हुश्शार’ विद्यार्थ्यांनी त्या निवडणं अपेक्षित नाही. मुलांचा कल असो किंवा नसो, त्यांनी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेकडेच वळावं म्हणून पालक आणि शिक्षक त्यांच्यावर कसा आणि किती दबाव आणतात, ते भारतातील शालेय शिक्षणाबद्दल जाणून असणार्‍यांना चांगलंच माहीत असतं.

खरं तर, त्यांच्यातल्या कित्येकांना, स्वतःला काय हवं आहे किंवा आपला नैसर्गिक कल, वैशिष्ट्यं काय आहेत, हे जाणून घेण्याएवढाही अवकाश मिळालेला नसतो. मुलाची नैसर्गिक जगण्याला दुरावण्याची ही सुरुवात असते. पुढे सामाजिक दबावाखाली त्यांच्या कल्पनाशक्तीला खीळ बसते आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा व्यवसाय व्यवस्थापन ह्यापैकी काही शिक्षण घेतलं नाही, तर जणू त्यांच्या पुढील आयुष्यात अंधकार ठरलेलाच, असंही त्यांच्या मनावर ठसवलं जातं. आणि हे ‘यश’ मिळवण्याच्या कुतरओढीत ती जगण्याचा आनंद गमावून बसतात. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात ना हास्य-विनोदाला जागा असते, ना तिथून मिळालेल्या पुस्तकांत सर्जकतेला वाव. त्यांचा ‘यशाचा मंत्र’ अक्षरशः लष्करी डावपेचांसारखा असतो. शिकण्यातला आनंद बाजूला पडतो आणि त्याची जागा घेते ‘टॉपर’ ठरण्याची जीवघेणी ईर्षा.

दुसरं असं, की समाजात व्यवसायांच्या प्रतिष्ठेची एक उतरंड मानलेली आहे, यशाची व्याख्या त्याभोवती केंद्रित झालेली बघायला मिळते. ही उतरंड ठरवण्यात पैसा, तंत्रज्ञानातून येणारा चकचकीतपणा आणि राजकीय शक्ती कळीची भूमिका बजावतात. आयआयटी, आयआयएममधून येणार्‍या सर्वोच्च सन्मानाच्या कहाण्या समजून घ्यायच्या, तर लक्षात घ्यायला हवं, की पैसा आणि तांत्रिक तत्परता ह्यामुळे कॉर्पोरेट व्यवसायात उच्च पगार मिळवणारे विद्यार्थी हे तिथलं उत्पादन ठरतात.

खरं पाहता, कुठल्याही समाजात आज ‘प्लेसमेंट’ हाच यशाचा मापदंड झाला आहे (एखाद्या मोठ्ठ्याश्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणं हेच आज तुमचं भागधेय झालं आहे). त्यामुळे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी बंगळुरूला बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत काम करणारा आणि प्रतिष्ठित परिसरात राहणारा तरुण हा मुंबईच्या उपनगरात राहणार्‍या आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिणार्‍या एखाद्या पन्नाशीच्या प्राध्यापकापेक्षा अधिक यशस्वी मानला जातो. आणि त्याहीपेक्षा जास्त वलय सरकारी अधिकार्‍याच्या नोकरीभोवती असलेलं पाहायला मिळतं. त्यातून सरंजामशाहीची पाळंमुळं अधिक बळकट होतात. युपीएससीचा करिष्मा दुसरं काय सांगतो! जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा आयकर अधिकारी ही पदं (त्यांचे बंगले, लाल दिव्याच्या सरकारी गाड्या आणि सलाम ठोकणारा पोलिसांचा ताफा आठवून बघा) विशेषतः छोट्या शहरांतल्या तरुणांना भुरळ पाडतात.

आयआयटी/आयआयएमच्या प्रवेशपरीक्षांप्रमाणे नागरी सेवा आयोगाच्या(युपीएससी) परीक्षा ही देखील महत्त्वाची राष्ट्रीय घटना ठरतेय; एखाद्याच्या आयुष्याची यशस्विता मोजण्याचा सर्वात मोठा मापदंड. मात्र ह्या यशाला एक काळी किनार आहे, असं माझं म्हणणं आहे. बहुतेकांसाठी तो आयुष्याला पारखं करणारा अनुभव आहे; माणसाची सर्जनशीलता मारून टाकणारा, जगणं एकांगी करून टाकणारा आणि त्याच्या विधायक ऊर्जेवर डाका घालणारा. प्रशिक्षण केंद्रांनी अव्याहत चालवलेल्या चाचण्या, किंवा कुठलीही माहिती, भले ती ऑलिम्पिक खेळांबद्दल असो, अणुभट्टीच्या उभारणीबाबत असो किंवा पर्यावरण बदलावरची आंतरराष्ट्रीय परिषद असो; सगळ्या गोष्टींकडे सामान्य अध्ययन पेपरसाठीची सामग्री म्हणून बघणं हा काही जगणं समृद्ध करणारा अनुभव असू शकत नाही.

राजस्थानातील कोट्याच्या दिशेनं कूच करणारा विद्यार्थ्यांचा जथ्था बघा. एकाचवेळी अपेक्षांचा डोलारा आणि चक्काचूर झालेली स्वप्नं ह्यासाठी कुप्रसिद्ध असलेलं असं हे ठिकाण. किंवा दिल्लीतील मुखर्जीनगर आणि कटवारिया सराय भागातील अरुंद गल्ल्यांतील लहानलहान खोल्यांतून जाऊन बघा. बिहार, ओडिशा आणि उत्तरप्रदेशातून आलेली आणि ‘राव आयएएस नोट्स’ पकडून झुंजणारी आणि थकूनभागून गेलेली मुलं तुम्हाला भेटतील. ह्या प्रकारचं ‘यश’ मिळवण्याच्या कुतरओढीत माणूस आपल्यातली सर्जनशीलता कशी गमावून बसतो, हे तुमच्या लक्षात येईल. ह्या ‘यश प्राप्त करून देणार्‍या’ यंत्रांमध्ये भ्रष्टाचाराची मुळं दडलेली असतात ह्यात आश्चर्य ते काय! आधी कोचिंग क्लासेसची भरमसाठ फी, मग वैद्यकीय /अभियांत्रिकी / व्यवस्थापन महाविद्यालयांची अव्वाच्यासव्वा फी आणि त्याउप्पर द्याव्या लागणार्‍या अफाट देणग्या – एवढा ओतलेला पैसा भरून काढणार कुठून? लग्नाच्या वेळी द्याव्या लागणार्‍या आणि दिवसेंदिवस फुगत चाललेल्या हुंड्याचं इंगित हेच असेल का? आपल्या पितृसत्ताक संस्कृतीतून म्हणूनच हुंड्याची प्रथा हद्दपार होऊ शकली नसावी. किंवा सर्रास बघायला मिळणारी लाचखोरी किंवा इतर अवैध धंदे ह्यातूनच उद्भवत असतील? म्हणजे अगदी इस्पितळं ते बांधकाम चालू असलेली ठिकाणं, गटविकास कार्यालय ते पोलीस स्टेशन? ह्या स्पर्धेच्या यंत्रणेत तुमचं यश हे दुसर्‍या कुणाच्या अपयशावर बेतलेलं असतं. वास्तवात ह्या शर्यतीत बहुतांश उमेदवार अयशस्वी ठरतात. ही व्यवस्था दरवर्षी असे किती ‘अपयशी’ निर्माण करते बघा. ह्यातून त्यांची आत्मप्रतिमा मलीन होते, काहीतरी गमावल्याची न भरून येणारी जखम त्यांचं आयुष्य व्यापून टाकते.

आणि शेवटचं म्हणजे, ह्या व्यवस्थेत विजय कुणाचाच होत नाही, सगळेच पराभूत ठरतात. मागे पडल्याची भावना सगळ्यांना व्यापून टाकते. हल्ली बघा, समजा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत 90% मिळाले, तरी तुमच्या मित्राचे 95% तुमचा आनंद झाकोळून टाकतात. श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून अर्थशास्त्र न शिकता हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्र शिकणं हे तुमचं अपयश मानलं जातं. किंवा तुम्ही अगदी आयआयटीचे विद्यार्थी असा; पण तुम्ही पुढे अमेरिकेचा रस्ता नाही पकडू शकलात, तर तुमचं आयुष्य व्यर्थ समजा. एका अर्थानं यशानंच त्यांना अपयशी केलंय.

जीवनाची हाक ऐकणं

ह्या जाळ्यातून बाहेर पडणं सोपं नाही. बेरोजगारीची अतितीव्र चिंता किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या फसव्या कल्पना जोवर तरुणांची आणि त्यांच्या मातापित्यांची पाठ सोडत नाहीत, तोवर अर्थपूर्ण शिक्षणाचा पाठपुरावा करणं कठीण आहे.

मात्र तरीही मी ठामपणे म्हणेन, की माणसाच्या निर्मितीक्षम चेतनेशिवाय सामाजिक कायापालट शक्य नाही. आणि अगदी कठीण परिस्थितीतही तरुणांना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करायला हवा. ह्या संदर्भात मी इथे तीन मुद्दे मांडू इच्छितो. पहिला, आंतरिक समाधानापेक्षा आयुष्यात काहीही मोठं नसतं हे एक शिक्षक / वडीलधारं माणूस म्हणून आपण त्यांना सांगितलं पाहिजे. यशाची कुठलीही मोजपट्टी नसते – आयुष्यात खर्‍या अर्थानं यशस्वी होणं म्हणजे आपण जे करू त्यातून आनंद मिळणं आणि ते अर्थपूर्ण वाटणं; मग ते शेतीकाम असेल, नर्सिंग किंवा अध्यापन. दुसर्‍या कुणासारखं होण्याची किंवा खूप मोठ्ठं आणि भव्यदिव्यच होण्याची गरज नाही. तू जसा आहेस तसाच राहा – साधासुधा, सच्चा आणि निवडलेल्या मार्गाबद्दल समाधानी. दुसरं, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी वेगवेगळी कौशल्यं / बुद्धिमत्ता / संवेदनशीलता मान्य करणं आवश्यक आहे. प्रत्येकानं उठून आयआयटीला जाण्याचा विचार करण्याची काहीच गरज नाही, विज्ञान शाखेच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आयटीमध्ये शिरण्याचा विचार का करावा? सगळ्यांना सामावून घेणं हे परिपक्व समाजाचं लक्षण आहे – अभियंता तसेच चित्रकर्मी, डॉक्टर, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, कला समीक्षक – अगदी सगळे. मुलाला त्याच्या / तिच्या क्षमतांची जाणीव करून देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे.

तिसरं, भीतीवर मात करायला हवी. मुलांना वेगळा विचार करायला, जोखीम उचलायला आणि आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहायला प्रोत्साहन द्यायला हवं. प्रवाहासोबत वाहण्याच्या आणि सुरक्षित/निर्विघ्न/निर्धोक मार्ग निवडण्याच्या सततच्या दबावामुळे आयुष्यात अर्थपूर्ण असं काही घडणं शक्य होत नाही. अर्थपूर्ण जगणं म्हणजे आयुष्यातली कोड्यात टाकणारी आणि कलाटणी देणारी वळणं जाणून घेणं. कार्ल मार्क्स हा काही कुण्या कंपनीतला ‘सन्माननीय कर्मचारी’ म्हणून जगला नाही, महात्मा गांधी वकील म्हणून आपली ओळख मागे ठेवून गेले नाहीत, आर्थिक ओढगस्त असूनही गजानन माधव मुक्तीबोधांनी आपलं कवित्व सोडलं नाही आणि मेधा पाटकरांनी काही कुठल्या विद्यापीठात समाजकार्याच्या प्राध्यापक म्हणून कधी काम केलं नाही. आपल्या मुलांना वडीलधारे म्हणून आपण काही सकारात्मकता देऊ शकणार नसू, फ्रांझ काफ्काच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’ ह्या लघुकथेत दर्शवल्याप्रमाणे त्यांचं रूपांतर ऑफिसच्या चार भिंतींमध्ये वळवळणार्‍या किड्यांमध्ये करणार असू, तर आपण त्यांचा विश्वासघातच करत आहोत.

Avijit_Pathak

अविजित पाठक  | avijit@mail.jnu.ac.in

लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

अनुवाद : पालकनीती गट

Source: https://thewire.in/education/the-true-face-of-indias-education-system