भाषेच्या महत्तेची रुजवण

करणारी ‘अनंत अक्षरे’…

सुजाता शेणई

औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहजशिक्षण हे शिक्षणाचे तीन स्रोत आहेत. औपचारिक शिक्षणातून गवसतं ते विषयज्ञान, अनौपचारिक शिक्षणातून हाती येतं ते व्यवहारज्ञान आणि सहजशिक्षणातून सापडतं ते पारंपरिक मूल्यज्ञान! या सर्व शिक्षणाचा समान धागा आहे भाषा. या धाग्याकडे मात्र आपण सजगतेनं पाहत नाही, त्यामुळे त्याचं महत्त्वही अधोरेखित होत नाही. ते व्हायला हवं आणि भाषेकडे चिकित्सक दृष्टीनं पाहायला हवं यासाठी गेली तीन दशकं अविरत प्रयत्नशील असणार्‍या भाषेच्या अभ्यासक नीती बडवे यांनी ‘अनंत अक्षर’ ही पुस्तकमाला लिहिली आहे. भाषेसाठी अत्यंत तळमळीनं कार्य करणार्‍या नीती बडवे यांचं या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 

‘भाषेकडे बघताना…’ हा त्यातला पहिला भाग. लहानपणी सहज ‘परिचित’ झालेली भाषा, पुढे ‘मला भाषा येते’ अशी स्वतःची समजूत करून ‘गृहीत’ धरलेली भाषा, शिक्षण-व्यवसायाच्या निमित्तानं ‘वापरलेली भाषा’ – अशी ही भाषा आपण कधी डोळसपणे पाहिली आहे का, भाषा हा चिंतनाचा नाही पण निदान आपल्या आकलनाचा तरी विषय ठरला आहे का, भाषेत वापरतो ते शब्द कसे, कुठून आले हे जाणून घेण्याची उत्सुकता आपण दाखवली आहे का – असे आणि यासारखे किती तरी प्रश्न या छोट्याशा पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्या मनात उभे राहतात. असे प्रश्न मनात निर्माण होण्यासाठी लागणारी विचारांची खोली या पुस्तकानं दिली, यातच त्याचं महत्त्व अधोरेखित होतं. 

भाषा बोलणारा प्रत्येक जण डोळ्यासमोर ठेवून ‘भाषेकडे बघताना…’ या पुस्तकात प्रयोजनांची मांडणी केलेली आहे. भाषेची ओळख व्हावी, भाषेकडे बघता यावं आणि भाषेचा आनंद घेता यावा ही ती प्रयोजनं. अजूनही, म्हणजे आमची मराठी किमान नऊशे ते हजार वर्षांची होऊनही, या तिन्ही प्रयोजनांकडे आपण सजगतेनं पाहत नाहीय, हे लेखिका इथे नमूद करू इच्छिते. ही सजगता वाढीस लागावी, जागतिकीकरणामुळे होत असलेली भाषेची हेळसांड थांबावी आणि भाषिक कौशल्यं वृद्धिंगत व्हावीत ही यामागची भूमिका आहे. 

सहा भागांत या पुस्तकाची मांडणी केलेली असून पहिल्या चार भागांत ‘भाषा’ ह्या विषयाची आणि ‘भाषे’ची ओळख करून दिलेली आहे, तर उरलेल्या दोन भागांत भाषिक कौशल्यांची अपरिहार्यता आणि ती आत्मसात करण्याची महती विशद केलेली आहे. भाषेच्या गमती सांगणारे हलकेफुलके लेख, भाषेची जडणघडण, स्वभाषा – इतर भाषा यांचा सहजसंबंध, भाषा आणि व्यक्तिमत्त्व-विकास व वाचन-कौशल्य यांवर आधारित विचारपूर्वक लेखन लेखिकेनं केलेलं आहे. प्रत्येक प्रकरणानंतर कृतियुक्त स्वाध्याय देऊन स्वयं-अध्ययनावर भर दिलेला आहे. 

भाषा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तिच्याशी आपली नाळ जन्मापासूनच जोडली जाते. वय आणि अनुभव यानुसार शब्दसंपत्ती वाढत जाते. ही वाढलेली शब्दसंपत्ती कुठे, कशी वापरावी व संदर्भानुसार त्याची अर्थच्छटा कशी बदलते हे नीती बडवे सोदाहरण दाखवून देतात. या दृष्टीनं मराठीतली ‘लागालागी’ आणि ‘लावालावी’ हा लेख वाचनीय आहे. ‘साकव’ हा शब्द समजावून देण्यासाठी पुस्तकात संवादलेखन आहे. जिवंतपणा हे संवादाचं प्रधान अंग असून त्यात मांडलेला विचार हा संवादशैलीतून ओघवता ठेवणं आणि शेवट परिणामकारक करणं हे संवादलेखनाचं कौशल्य या पुस्तकात दिसून येतं. भाषेत शब्दांची भरही पडत असते आणि ते लुप्तही होत असतात. या दोन्हींसाठी समाज जबाबदार असतो. मायबोलीतून साधलेल्या संवादात उत्कटता आणि सहजता आपसूक येते. 

शाळा किंवा महाविद्यालयात मराठी, हिंदी किंवा अन्य भाषा असोत, वा इतिहास, भूगोलसारखे विषय; ते ‘विषय’ म्हणूनच शिकवले जातात. प्रश्न-उत्तरं, त्यावर आधारित गुण (आणि त्यावर ठरणारी समाजमान्य हुशारी!) इतक्या मर्यादित चौकटीत अध्ययन-अध्यापन केलं जातं. मराठी किंवा अन्य भाषा हे विषय म्हणून नाही, तर भाषा म्हणून शिकवले गेले पाहिजेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचं या दृष्टीनं प्रबोधन होणं गरजेचं आहे. हे प्रबोधन अप्रत्यक्षरित्या या पुस्तकातून होतं. स्वमत आणि अभिव्यक्ती-लेखन हे मराठी ‘विषय’ म्हणून शिकून लिहिता येणार नाही, तर ‘भाषा’ म्हणून शिकून येणार आहे, हे समजणं आवश्यक आहे. भाषा हे संदेशवहनाचं एक प्रभावी माध्यम आहे, हे नीट आकलन झाल्याशिवाय त्यातील कौशल्यं कशी विकसित होणार? श्रवण, वाचन, भाषण आणि संभाषण ही कौशल्यं विकसित व्हावीत ह्यासाठी पुस्तकात ‘संवाद आणि संभाषण’, ‘भाषिक कौशल्य आणि संधी’, ‘वाचन कौशल्य : तंत्र आणि मंत्र’ ही प्रकरणं आहेत. ‘भाषेचं परिस्थितीला अनुरूप योग्य उपयोजन करणं’ म्हणजे ‘भाषा येणं’ असतं, हे नीती बडवे समर्पक उदाहरणांनी पटवून देतात. 

‘भाषा आणि संस्कृती’, ‘स्वभाषा आणि इतर भाषा’, ‘भाषा आणि व्यक्तिमत्त्वविकास’, ‘भाषा आणि अस्मिता’ हे चिंतन आणि संशोधनातून मांडले जाणारे विषय आहेत. लेखिकेनं त्यांना ओझरता स्पर्श करून ठेवला आहे. भाषा या घटकाचा विचार किती अंगांनी करावा लागेल याची त्यामुळे जाणीव होते. लेखिका जर्मन भाषेच्या अभ्यासक आणि प्राध्यापक असल्यानं जर्मन लेखक गोलो मान, पीटर बिक्सेल यांची भाषाविषयक मतं मांडून त्यांनी भाषेचा व्यापक अवकाश दाखवला आहे. लेखक आणि राजकारणी ग.प्र.प्रधान यांच्या ‘राजकारण आणि भाषा’ या खुसखुशीत लेखात राजकीय डावपेचांची भाषा वाचायला मिळते. एकूण तेवीस छोटेखानी पण विचारगर्भ असे भाषाविषयक लेख वाचताना भाषा-अभ्यासकांना आनंद, विद्यार्थ्यांना अभ्यासदृष्टी, पालकांना भाषिक सजगता आणि एकंदरच सगळ्यांना भाषेतील गोडवा जाणवेल हे निःसंशय. हेच या पुस्तकमालेचं वेगळेपण आणि वैशिष्ट्यही म्हणावं. या मालेमुळे नीती बडवे यांची भाषाविषयक धडपड आणि तळमळही फलश्रुत होण्यास हातभार लागेल.

‘विषयाला घट्ट धरून ठेवा, म्हणजे शब्द आपणहून त्याला अनुसरतील’ या गोलो मानच्या विधानाला पुष्टी देत म्हणावंसं वाटतं, ‘आपल्या मातृभाषेला नीट घट्ट धरून ठेवा म्हणजे इतर भाषा आपणहून अनुसरतील’. ‘लोकल ते ग्लोबल’ हा प्रवास करायचा असेल, तर ‘भाषा’ हा ज्ञानसंपादनाचा पाया पक्का असायला हवा. हा पक्का असल्यावर कोणत्याही क्षेत्रात कळस गाठणं अशक्य नाही. 

सुजाता शेणई

sujata.shenai@gmail.com

लेखक मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. उपयोजित मराठी व पद्माक्षरे ही पुस्तके त्यांनी संपादित केलेली आहेत.