भीती (कविता) – प्रमोद तिवारी

विचित्र शब्द आहे भीती

निसरडा आणि चकवा

खूप घाबरायचो मी

साप, विंचू आणि पालीलाही

अजून आठवतं

पाल पकडायला धावणारा

तीन वर्षाचा लहान भाऊ

आणि खाटेवर चढून

थरथर कापत

माझं त्याला रागावणं

आता प्राण्यांची भीती नाही वाटत

पण

समजदार होणं

म्हणजे

भीतीचे नवे पडदे उघडणं असावं

आमच्या गावचा तगडा जवान रामा

ज्यानं

एका मोठ्या गुंडाला मरणाचं मारलेलं

काल

मरतुकडया सावकाराचे जोडे खात होता

त्याचा बाप म्हणाला,

आता अक्कल आली रामड्याला

आता काय भीती नाय

ही भीती बहुरूपी आहे

आधी घाबरवायचे

गोवर, कॅन्सर आणि प्लेग

आता

मरण्यावरही भारी बेरोजगारी

खूप भीती वाटते

‘पाहिजेत’ कॉलम वाचणाऱ्या

सेवानिवृत्त बापाच्या डोळ्यांची…

आज

काहीही घाबरवू शकतं तुम्हाला

कपाळावरचा टिळा

टोपी

दाढी

एवढंच नाही तर

साध्या एखाद्या रंगानंही

फुटू शकतो घाम…

खरं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं

पण खरंय

मला भीती वाटते…

मला भीती वाटते

मुलीच्या सुंदर चेहऱ्याची…

आणि हो

तिच्या गोऱ्या रंगाचीही…

कोणीतरी म्हणालेलं

भीतीपासून वाचायचंय

तर

दुसऱ्याला घाबरव

पण

बघितला एक घाबरवणारा

ज्यानं गोळी घातली प्रेमिकेला

भीतीपोटी…

सांगताही येत नाही

पण

जेव्हा एकटा असतो

खूप घाबरतो

स्वत:लाच….

एक दिवस

आपलाच गळा दाबून बघितला

हेही बघितलं

की माझीच बोटं

माझे डोळे फोडू शकतात की नाही

आणि

त्या दिवशी

आपल्याच हातांवरून विश्वास उडाला माझा

श्वास माझ्याच विरुद्ध रचतात षडयंत्र

कितीही प्रयत्न केले

तरी

पाय अडखळतात दगडांना…

आता

मी कोणत्याही इमारतीच्या छतावर

किंवा पुलाच्या काठाजवळ जात नाही

माझ्या आत लपलेलं कोणीतरी

मला उडी मारायला सांगत असतं

तेव्हा मी जोरजोराने बडबडतो

किंवा

कोणालाही पकडून बोलत बसतो

काहीबाही…

पण

काय माहीत

एखाद्या दिवशी

सांगण्याऐवजी धक्काच दिला तर…

एक दिवस

मी स्वत:लाच

विचारलं,

घाबरतो कशाला नेमका??

मार खाण्याला?

भुकेला??

मरणाला??

कशाची वाटते भीती????

काही काळ शांततेनंतर

एक खोलवर आवाज आला

मला भीती वाटते

भीतीची…

मूळ हिंदी कविता- प्रमोद तिवारी

मराठी अनुवाद- परेश जयश्री मनोहर

paresh.jm@gmail.com

9822914751