माझे भारतवाचन

मी वाचायला लागल्यापासून माझ्या खोलीतले कपाट असेच खालून वरपर्यंत पुस्तकांनी भरलेले असल्याचे मला आठवते. पुस्तके वेळोवेळी बदलत राहिली; पण कपाट भरलेलेच आहे.

सहाव्या वाढदिवशी भेट मिळालेले इनिड ब्लायटनचे ‘द मॅजिक फार अवे ट्री’, पाठोपाठ आलेले ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, बाबा मला रात्री झोपताना वाचून दाखवायचे ते पुस्तक, आम्ही दोघे मिळून ज्या कविता गायचो ते पुस्तक, मी माझे सर्वात चांगले अक्षर काढून लिहिलेले सुविचार, सर्वात बोअरिंग पार्ट्यांच्या वेळी मला जिवाभावाची सोबत करू लागलेला हॅरी पॉटर… सगळे काही इथे आहे.

जगभरातले साहित्य मला सुरुवातीलाच वाचायला मिळाले होते; पण मी जिथे जन्मले, वाढले त्या देशातले काहीच नव्हते. आपल्या देशात हत्ती, ‘योगा’, स्थळे पाहून ठरवले जाणारे विवाह यांच्यापलीकडे बरेच काही आहे… असे मला माहीत होते; पण वेगवेगळ्या ठिकाणच्या परंपरा, भाषा, खाणेपिणे यांची फक्त झलक तेवढी मी प्रवासात अनुभवली होती. ‘भारतात विविधता आहे’ म्हणजे काय – ते खरोखरी जाणून घ्यायला हवे असे मला वाटले. काहीही समजावून घ्यायचे असेल, तर आधी पुस्तकातून वाचायचे अशी माझी पद्धत आहे, त्यामुळे मी पुस्तकांचाच आधार घेतला.

भारतातल्या प्रत्येक राज्यातून एकेक पुस्तक निवडायचे अन् वाचून काढायचे, असे मी ठरवले. अर्थातच याला वेळ लागणार होता; पण त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणचे लोक, त्यांच्या नवनवीन कहाण्या, त्यांचे विविध परिस्थितीतले जीवन याबद्दल मला कसे समजणार? माझ्या या उपक्रमाला मी नाव दिले – ‘माझ्या पुस्तक-संग्रहातला भारत’ – ’खपवळर जप चू इेेज्ञीहशश्रष.’ माझ्या सोळाव्या वर्षी सुरू झालेले हे वाचन दोन वर्षांत अर्धेअधिक झाले आहे.

सुरुवात करताना मात्र मला लाखो प्रश्न पडले होते… पुस्तक निवडणार कसे, भाषांतर कसे मिळणार, कुठून आणायचे, ते मला आवडले नाही तर काय, मग त्याबद्दल लिहिणार कसे… शेवटी मनातली ही सगळी जळमटे झाडून टाकावी लागली. त्याहून कठीण काम करावे लागले ते – सगळी आवडती आनंददायी पुस्तके बांधून नजरेआड करावी लागली. तरच ‘भारता’ला जागा मिळणार होती.

या प्रवासात सगळ्यात कठीण होते ते सुयोग्य पुस्तक निवडणे!

विवेक शानबागांचे‘घाचर घोचर’ हे पुस्तक माझ्या मनात भरले, कारण त्याच्यावरच्या मुंग्यांचे चित्र. त्या मुंग्या जणू मुखपृष्ठावरून उठून माझ्या हातावर चढत होत्या.

मला काश्मीरचा इतिहास वाचायचा होता. मानवी व्यथा-वेदना याच पार्श्वभूमीवर जाणून घ्याव्यात. ‘अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स’ हे राहूल पंडीतांचे आणि ‘कोलॅबोरेटर’ हे वाहीद मिर्झांचे (याचे मुखपृष्ठ फार सुंदर आहे हा अनपेक्षित लाभ म्हणायला हवा), अशी दोन पुस्तके मला सापडली.

मी वृत्तपत्रातून जे काही वाचत आले होते, ते खरोखर डोळ्यासमोर आले. ती सारी दुःखे जिवंत झाली. भारत – पाकिस्तान यांच्यात सतत चालू असलेला झगडा थेट सामोरा आला. असे जाणवले, की काश्मीरमधल्या प्रत्येक घटनेला एक भारतीय आणि एक पाकिस्तानी चेहरा आहे. संघर्षाच्या वेगवेगळ्या बाजू मला समजू लागल्या. तीव्र मतभेद आणि कठोर सीमा असल्या की सर्वांनाच कसा त्रास होतो, ते मला या पुस्तकांनी दाखवले.

कवितांचे विश्लेषण करणे नको, म्हणून मी त्यांची भाषांतरे बाजूला सारली. आत्मचरित्रे नकोत असे ठरवले. हे बरोबरच होते का नाही… पण मी ठरवले खरे. शिवाय वाचत होते ते आवडत गेल्यामुळे हा उपक्रम चालू राहिला. त्या-त्या प्रादेशिक भाषेत लिहिलेल्याच पुस्तकांची भाषांतरे मी निवडली. ती जास्त रुजलेली असतील अशा अपेक्षेने. गुजराथी आणि उडियातील पुस्तके मला त्यांच्या देशात घेऊनच गेली…

इला अरब मेहता यांच्या ‘वाड’ (कुंपण) या पुस्तकाचे रीटा कोठारींनी केलेले ओघवते भाषांतर मला फातिमासोबत घेऊन गेले. तिने निरक्षरतेचे कुंपण ओलांडले, त्याचबरोबर धर्म-जाती-लिंगभाव यांच्या मर्यादाही पार केल्या. तरीही फातिमा ही फातिमाच राहिली.

19व्या शतकातल्या  ब्रिटिश भारतातल्या जमीनदारीबद्दल  सांगणाऱ्या फकीर मोहन सेनापती यांच्या ‘सिक्स एकर्स अँड अ थर्ड’ या पुस्तकाने खेड्यातले सत्ताकारण, सामाजिक पक्षपात आणि तिथले संघर्ष दाखवले.

हरिशंकर परसाई यांनी ‘चंद्रावर इन्स्पेक्टर मातादीन’मध्ये सरकार आणि राजकीय पक्ष यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. 54 ते 70 सालादरम्यान आजच्यापेक्षा जास्त उच्चारस्वातंत्र्य होते की काय? विचित्र शीर्षक, धाडसी कल्पना आणि आपल्याला हसवणाऱ्या, रडवणाऱ्या गोष्टी… मस्त!

आता अर्धे-अधिक वाचून झाले आहे, आत्तापर्यंत मला इतके नवे अनुभव, वेगवेगळे काळ, विविध कल्पना सामोरे आलेत. माझ्या काही समजुती पक्क्या झाल्या तर काहींनी नवे पैलू दाखवले, नवे प्रश्न उभे केले, काहींनी तर मला असे जग दाखवले, की आपण इतके दिवस ‘बोराच्या बी’मध्येच राहत होतो असे वाटले.

स्त्रीवादी भिंगातून पुन्हा एकदा रामायण सांगणाऱ्या व्होल्गाने ‘सीतामुक्ती -द लिबरेशन ऑफ सीता’मधून माझ्या मनात रुंजी घातली. पुरुषप्रधान समाजातही एखाद्या स्त्रीचे असे कणखर व्यक्तिमत्त्व असणे मला भावले. स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया हा दृष्टिकोनच महत्त्वाचा आहे. मुक्ती, लिंगभाव, स्वतःची ओळख या सगळ्याचा शोध आपला आपणच घ्यायला हवा.

माझी पणजी फाळणीच्या काळात तिथेच होती. आमचे छान जमायचे, गप्पागोष्टी, पत्ते… पण तिने आयुष्यात काय गमावले होते हे मला ‘पिंजर’ वाचल्यावरच कळले. ऐतिहासिक काळातली व्यक्तिगत सुखदुःखे मला तिथे समजली. ही फाळणी दोन देशांची झाली होती; पण तिथल्या दोन्ही धर्मांच्या माणसांची आयुष्ये इतकी एकत्र गुंफलेली होती, ती फाळणीने तोडली….

‘पिंजर’ – अमृता प्रीतम (इंग्रजी अनुवाद : खुशवंत सिंग)

तेरेसा रहमान ह्यांचे ‘मदर्स ऑफ मणिपूर’वाचून माझे डोळेच उघडले. आंदोलनांची ताकद, मणिपूरमधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती मला समजली. राजकीयसामाजिक परिस्थिती, अन्यायाबद्दल कोणी काही विधान करावे, ती बदलण्यासाठी कोणी प्रयत्न करावेत… असे प्रश्न मला पडले; ‘कोणीही करावेत’ असे उत्तरही मिळाले.

शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘अक्करमाशा’ या पुस्तकाने मला माझ्या बुडबुड्याबाहेर आणले. उपासमार, कष्ट, हेटाळणी, जातीवरून शिव्या याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. हे पुस्तक मध्ये-मध्ये ठेवून द्यावे लागते… सलग वाचूच शकत नाही आपण. प्रत्येक पुस्तक आपल्याला आनंद देण्यासाठी नसते. त्रासदायक परिस्थिती, अवघड विषय आपल्यापुढे आणणारी पुस्तकेही वाचायलाच लागतात, ते कठीण असले तरी! ‘मातादीनची शेवटची गोष्ट’ अशीच वेगळी आहे. लेखक म्हणतो, कधीकधी आपण स्वतः हरवून जाऊ नये यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठीसुद्धा लिहावे लागते. खरे तर माझा हा वाचनाचा प्रवासही असाच आहे, स्वतःला जाणून घेण्याचा. भारत वाचता-वाचता मी विचार करायला लागले. ‘भारतीय असणे’ म्हणजे काय हे मला दिसू लागले. मला सगळ्यात त्रासदायक वाटतो तो आपला जातीधर्मावरून विभागलेला समाज. आपण हे काय करून ठेवले आहे? आपल्या श्रद्धा आणि कृती तपासून बघायला नकोत का?

अजूनही समजून घेण्यासारखे इतके दिसते आहे! पण मला वाटले, जे समजले आहे ते सगळ्यांना सांगायला हवे. आपल्या संपर्कात न येणाऱ्या समाजाबद्दल आपल्याला काहीही माहीत नसते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांबद्दल आपल्याला ओ की ठो समजत नाही. पुस्तकांबद्दल लिहून मला माझ्या वयाच्या बऱ्याच जणांशी संवाद साधता आला. आपणही इन्स्टाग्रामवरचे माझे लिखाण वाचा. कदाचित आपल्यालाही असाच भारत वाचावासा वाटेल.

AnokhiPicture

अनोखी मेहरा 

बुकवर्मच्या ‘टॉर्चलाईट‘ ह्या इ-मासिकातून साभार. (source: https://journal.bookwormgoa.in/india-on-my-book-shelf/)

अनोखीच्या कपाटातली वाचून झालेली पुस्तके

 1. Mizoram – Zorami: A Redemption Song by Malsawmi Jacob
 2. Maharashtra – The Outcaste (Akkarmashi) by Sharankumar Limbale/Translated from Marathi by Santosh Bhoomkar
 3. Kerala -The Small Town Sea by Anees Salim
 4. Karnataka – GhacharGhochar by Vivek Shanbhag/ Translated from Kannada by Srinath Perur
 5. Orissa – Six Acres and a Third (Chha Mana Atha Guntha) by Fakir MohnSenapati/Translated by Rabi Shankar Mishra, Satya P. Mohanty, Jatindra K. Nayak& Paul St-Pierre
 6. Madhya Pradesh – Inspector Matadeen on the Moon by Harishankar Parsai/ Translated from Hindi by C.M. Naim
 7. Nagaland – When the River Sleeps by Easterine Kire
 8. Gujarat – Fence (Vaad) by Ila Arab Mehta/Translated from Gujarati by Rita Kothari
 9. Manipur – The Mothers of Manipur by Teresa Rehman
 10. Sikkim – The King’s Harvest by Chetan Raj Shrestha
 11. Jammu & Kashmir – The Collaborator by Mirza Waheed & The Moon has Blood Clots by Rahul Pandita
 12. Uttarakhand – The Night Train at Deoli and other stories by Ruskin Bond
 13. Punjab – Pinjar by Amrita Pritam/Translated from Punjabi by Khushwant Singh
 14. Andhra Pradesh – The Liberation of Sita by “Volga” (PopuriLalitaKumari)/Translated from Telegu by T. Vijakumar and C. Vijaysree
 15. Goa- Teresa’s man and other stories by Damodar Mauzo, translated from Konkani by Xavier Cota
 16. Uttar Pradesh- Raag Darbari by Shrilal Shukla, translated from Hindi by Giligam Wright

वाचनाच्या प्रतीक्षेत कपाटात असलेली पुस्तके –

 1. Tripura – Tales and Tunes of Tripura: ¬n anthology of Kokborok folk songs, myths and tales, proverbs and riddles. Compiled by Chandrakanta Murasingh
 2. Rajasthan – New Life by Vijai Dan Detha Bijjii/Translated from Rajasthani by MridulBhasin, KailashKabeerVandana R. Singh
 3. ¬runachal Pradesh – The Legends of Pensam by Mamang Dai
 4. ¬ssam – Written in Tears by ¬rupa Patangia Kalita/ Translated from ¬ssamese by RanjitaBiswas

अजूनही शोध जारी आहे –

 1. West Bengal, Meghalaya, Bihar, Haryana, Chhattisgarh, Himachal Pradesh, Jharkhand, Tamil Nadu, Telangana