रंगुनि रंगात सार्‍या….

आभा भागवत

Magazine Cover

आभा भागवत या तरुण चित्रकार आईनं ५ ते १० वयोगटातल्या मुलांसाठी नुकतंच एक शिबीर घेतलं. त्यात सुरुवातीला ‘गरवारे बालभवन’च्या भारतीताईचं ओरिगामी आणि नंतर इतर कलाकारीचे उपक्रम घेण्यात आले. चित्रकला, कलाकुसरीचे जे अनुभव वर्गांमध्ये दिले जात नाहीत, ते देण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला. मुलांनी तर याचा मनमुराद आनंद लुटलाच. पण पालकांनाही वाटलं, ‘खरं तर मुलं आणि पालक असं दोघांसाठी मिळूनच हे शिबीर हवं होतं !’

रंगात हात बुडवण्याची धम्माल वेगळीच असते. कपडे घाण होतील, जमीन खराब होईल, बेसिन आणि मोरी हात धुताना रंगीत होईल, जमिनीवर रंग सांडेल आणि शेवटी हे सगळं साफ करताना माझा पिट्ट्या पडेल या विचारांनी घाबरून न जाता मुलांना रंगात मनसोक्त हात बुडवू द्यायचे असं मी ठरवलं आणि असेच अनेक उपक्रम या शिबिरासाठी आखले.

यातला एक होता. पोस्टर कलर काढून त्यात पाणी घालायचं आणि हाताच्या तळव्याला ब्रशनं ओला रंग लावून त्याचा पांढर्याय कागदावर ठसा घ्यायचा. तो वाळला की त्याच्या बाजूंनी आणि मध्यभागी आवश्यक वाटेल तिथे स्केचपेननी रेघा, पोत, रचना काढून प्राणी, पक्षी, मासा, फूल तयार करायचं. बर्याोच कागदांवर बोटांची वेगवेगळी रचना करून रंगीबेरंगी ठसे काढून त्यातून चित्रं तयार करता येतात. माशापासून सुरुवात केली, कारण मासा अगदीच सोपा आहे. पण छोट्या मुलांना करून दाखवलं तरी प्रत्येकाला नेमकं आपण म्हणतोय तेच समजेल, पटेल असं नसतं. एका मुलीनं हाताच्या तळव्याच्या मधल्या खोलगट भागाचा, कल्ल्याच्या जागी डोळा केला. तीन-चार जणांना मासा असा दिसतो, हेच पटेना मग त्यांनी फक्त रंगात हात बुडवून ठसा घेण्यातली मौज लुटली. माझ्या मनात आलं, जर कोणीही मोठी माणसं आजूबाजूला नसती तर मुलांनी केवढी मोकळीक घेतली असती ! म्हणूनच रंगलेली जमीन आणि रंगलेली मोरी, बेसिन, रंगलेले कपडे अशा सगळ्यांकडे मी कानाडोळा करू शकले.
015_aarasachitra.jpg

एकदा आम्ही अरविंद गुप्ताजींकडे गेलेलो असताना, मुलांना खाऊ म्हणून त्यांनी चिवडा आणि नाचणीचे लाडू दिले होते. तुहिन तेव्हा एक वर्षाचा होता. त्यानं चिवडा लाडूमध्ये घातला. ओजसनं लाडूचा चिकण मातीसारखा डोंगर केला. माझ्या मनात आलं, काय आपली पोरं अन्नाची नासाडी करून लाज आणतायत. पण गुप्ताजींना मुलं बरोबर कळतात. ते मुलांजवळ आले आणि म्हणाले, ‘‘हे बघ, आपण नाचणीचे छोटे छोटे डोंगर करू.’’ हे जे, त्या क्षणी मुलांचा चाललेला प्रयोग समजून त्यांना मोकळीक देणं असतं आणि त्यातूनही मुलं काहीतरी स्वतःहून शिकत आहेत यावर विश्वास ठेवणं असतं, ते जमवायला मोठ्या माणसांना मनाची मोठी तयारी करावी लागते.
हाताच्या आणि पायाच्या बाह्यरेखा काढून त्यातूनही चित्रं काढता येतात. एरवी चितारायला अवघड वाटणारे प्राणी, पक्षीही अशा प्रकारे सोप्पे वाटतात आणि आकारातून आकृत्या शोधायचा छंदच लागतो. स्वतःचा पाय कागदावर ठेवून, त्याची बाह्यरेखा काढून त्यापासून पाच वर्षाची मुलंही जिराफ अगदी मस्त काढतात.

बोटांभोवती घालता येतील अशी अंगठीसारखी छोटीशी कागदाची पपेट्स करायला मुलांना खूपच गंमत येते. चिमुकलं चित्र काढून, कापून कागदाच्या अंगठीवर चिकटवायचं आणि दहाही बोटांमध्ये वेगवेगळी चित्रं वेगवेगळ्या अंगठ्यांवर चिकटवून गोष्टच तयार करायची. छोट्या मुलांना सोपं जावं म्हणून दोन बोटांत मिळून एकेकच अंगठी एकेका हातासाठी आणि त्यावर एका आयताकृती कागदावर तीन किंवा चार चित्रं काढता येतात. ही चिमुकली पपेट्स हातात घालून नाचवत गोष्ट ऐकायला आणि सांगायलाही मुलांना आवडतं. ‘अग्ली डकलिंग’चीही गोष्ट मुलं छानच सांगू शकतात. बदकाची तीन पिल्लं आणि एक आई-बदक एका हातात आणि एक हंसाचं पिल्लू / कुरूप पिल्लू आणि दोन किंवा तीन मोठे हंस दुसर्याू हातात. पुढच्या बाजूला चित्र आणि मागच्या बाजूला निळा रंग रंगवला तर पाणी दाखवताना निळी बाजू प्रेक्षकांकडे करून पाण्यावरचे तरंग, हात लाटांप्रमाणे हलवून दाखवता येतात. ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ हे गाणं म्हणत हा पपेट शो फारच रंगात येतो. मुलांनी स्वतः चित्र काढणं, गोष्ट समजून घेणं, ती पपेट शो सारखी सादर करणं हे महत्त्वाचं. मोठ्यांनी फक्त लागली तर कातरकाम, चिकटकाम आणि गाणं शिकवण्यात मदत करायची. छोटीशी, हातात मावणारी पपेटस मुलांना जवळची वाटतात आणि गोष्ट सांगण्यासाठी अजून एक माध्यम हाताळता येतं.

अजून एक रंगात मनसोक्त हात घालायची आणि जमिनीवर रंग लावायची संधी आम्ही घेतली, ती कोलाजच्या निमित्तानं. वर्तमानपत्राचे कागद घेऊन एका पानाचे चार भाग करायचे. एकेका भागाला फक्त एकाच बाजूनी हव्या त्या रंगानी रंगवायचं. उदाहरणार्थ हिरवा रंग एका कागदाला आणि लाल रंग दुसर्याा कागदाला. मोठ्या चपट्या ब्रशनं पोस्टर कलर वर्तमानपत्राला लावायला मुलांना फारच धम्माल येते. त्यांच्या हाताएवढ्या लांबीचा आणि हाताएवढ्याच रुंदीचाही ब्रश वापरायला मुलं फारच उत्सुक होती. न रंगवलेली बाजू डिंक लावून चिकटवायची. रंगावर डिंक नीट राहत नाही म्हणून एकाच बाजूला रंगवायचं. कागदावरचे रंग पूर्ण वाळले की हिरव्या रंगाच्या कागदाचे मोठे मोठे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे हातांनीच फाडायचे. लाल कागदाचे छोटे छोटे तुकडे फाडायचे. हिरव्या तुकड्यांनी पांढर्या कागदावर झाडाच्या पानांसारखं कोलाज करायचं. प्रत्येक तुकड्याला मागे डिंक लावून अगदी जवळजवळ तुकडे चिकटवायचे. त्याच्यावर छोटे कापलेले लाल तुकडे फुलांसारखे चिकटवायचे. तेली खडूंनी खोड आणि फांद्या काढायच्या. तयार आकारांमध्ये कोलाज करायला देऊ नये. मनात झाडाचा आकार आठवन
प्रत्यक्षात कोलाज करताना तो कसा कसा बदलत जाऊ शकतो, हे मुलांनी अनुभवणं आवश्यक आहे. स्वतःच्या मनातलं झाड मुक्तपणे मुलांनी कागदावर तयार करणं, ही अतिशय सर्जनशील प्रक्रिया यातून घडते.

चिकटकाम सुरू करण्याआधी मुलांना दोनच रंग निवडायला सांगून त्या रंगसंगतीचं काय काय असतं, काय काय करता येईल असा विचार करायला सांगायचा. त्यातून त्यांना जे कोलाज करावसं वाटेल ते करायची मोकळीक द्यायची.

शीतपेयांच्या बाटल्यांचाही आम्ही शिबिरात कल्पकरित्या वापर केला. जाडसर आणि मोठे गडद राखाडी, हिरवा, निळा किंवा मरून रंगाचे कागद घेऊन त्याचे साधारण एक फूट रुंद आणि तीन फूट लांब आकाराचे आयत कापायचे. त्याच्यावर बाटलीच्या बुडाचे ठसे घेऊन चित्र तयार करायचं. शीतपेयांच्या काही बाटल्यांच्या बुडाला पाच पाकळ्यांचं फूल वाटावं असे पाय असतात. ही बाटलीची बुडं पांढर्या , फिक्या गुलाबी, अबोली अशा, भरपूर ओल्या रंगात बुडवायची आणि निथळून त्याचे कापलेल्या गडद कागदावर ठसे घ्यायचे. ही झाली फुलं. ती वाळली की त्यांना तेली खडूनीं हिरवी देठं, पानं, तुरे, कळ्या काढायच्या. काळ्या किंवा गडद निळ्या रंगाच्या तेली खडूचा दोन सेंटीमीटरचा तुकडा तोडायचा आणि कागदाच्या कडेवरून तो आडवा जोरात दाबून फिरवत गडद किनार काढायची म्हणजे फ्रेम केल्यासारखं चित्र उठून दिसतं.
005_baatali2.jpg

मोठ्या चित्रकारांची आपल्याला फार उशिरा ओळख होते. ती मुलांना अगदी लहानपणापासून व्हायला हवी असं वाटतं. त्यासाठी आम्ही एक कृती घेतली. व्हॅन गॉग, मोने, मिरो, पोलॉक किंवा कोणताही जगद्विख्यात चित्रकार निवडायचा. त्याची वीस तीस चित्रं वेबवरून डाऊनलोड करून मुलांना सलग चार ते पाच दिवस रोज पाच ते दहा मिनिटं दाखवायची. मुलं त्यातली विशिष्ट शैली, रंगांची निवड, वापरलेले आकार, इतर घटक बरोबर टिपतात. आम्ही व्हॅन गॉगची चित्रं चार दिवस पाहिली. सर्वात लहान मूल होतं पाच वर्षांचं आणि सर्वात मोठं अकरा. सगळ्यांनी मन लावून चित्रं पाहिली आणि त्यामागच्या काही गोष्टीही समजून घेतल्या. प्रत्येक चित्रामागं गोष्ट असते, अभ्यास असतो, तो शोधून, वाचून मुलांना सांगता येतो.

या उपक्रमाचा क्रम असा होता की पहिल्या दिवशी फक्त व्हॅन गॉग हे नाव ऐकणं, म्हणणं, त्याची चित्रं फक्त पाहणं, ढोबळ मानानं चित्राचा विषय ओळखणं – जसं चित्रात शेतकरी आहेत, सूर्यफुलं आहेत, बूट आहेत इत्यादी. दुसर्याी दिवशी काही चित्रांमागच्या गोष्टी सांगणं. गोष्टी ऐकल्या की तो चित्रकार मुलांच्या मनात घर करतो. व्हॅन गॉगच्या एका सेल्फ पोटर्रेटमध्ये कानावर आणि चेहेर्यामभोवती पट्टी आहे. त्यानं स्वतःचा कान कापून घेतला होता आणि बँडेज बांधलेलं असताना सेल्फ पोटर्रेटस केली, हे ऐकून कान का कापला? दुखलं नाही का? असं खरं तर करू नये ना? अशा गप्पा झाल्या. यात प्रश्नोत्तरं करत अजूनही खोल जाता येईल.

व्हॅन गॉगचं पोटॅटो इटर्स हे चित्र वेगळं आहे ! राखाडीच्या छटा आणि थोडा पिवळा रंग असेलेलं. हेही मुलं फार छान समजून घेत होती. ‘ते गरीब कष्टकरी आहेत, स्वतःच्या हातांनी काढलेले शेतातले बटाटे एवढंच त्यांचं अन्न आहे, त्यांचे कष्ट, दु:ख व्हॅन गॉगनं यातून दाखवलं आहे. तुम्हाला वाटतो का राखाडी हा दु:खाचा रंग? दु:खाचा रंग कुठला असतो? कष्टाचा रंग कुठला असतो?’ एवढंच बोलणं झालं. मुलं खोल विचारात गढली. आता व्हॅन गॉग पाहिला की कायमच त्यांना या सगळ्या गोष्टी आठवतील, असं वाटतं. एकेक करून असे सगळेच मोठे चित्रकार मुलांपर्यंत पोहचवले पाहिजेत, असं मनात आलं.

शेवटच्या दिवशी व्हॅन गॉगची चार चित्रं निवडून त्याचे प्रिंट्स काढले. एकेका प्रिंटचे ५ ते ६ तुकडे केले. काळ्या रंगाच्या ए-A४ आकाराच्या कागदावर प्रत्येकी एक तुकडा योग्य वाटेल तिथे चिकटवला. प्रत्येक मुलाला चित्रातला कुठलातरी एकच भाग आला. काहींनी कुठल्या चित्रातला भाग आहे ते ओळखलं, तर काहींनी नाही. मुलांनी करायची गंमत याही पुढे होती. प्रत्येकानं कागद भरून ते चित्र पूर्ण करायचं, पण व्हॅन गॉगच्या मूळ चित्रासारखं नाही. त्या तुकड्यातलं चित्र, त्यातले ब्रशचे फटकारे, रंगाचा पोत पाहून तो तुकडा त्याच चित्राचा भाग वाटेल असं चित्र रिकाम्या कागदावर काढायचं. यात त्या मोठ्या चित्रकाराच्या जवळ जाण्याची प्रक्रिया अगदी सहज घडते. ‘हे चित्र किती अवघड आहे, मला नाही असं जमणार’, असं म्हणत मोठी होणारी मुलं त्या चित्रकाराशी नकळत समरस होऊन जातात. गडद कागदावर काढलेली चित्रं आणि पांढर्या कागदावर काढलेली चित्रं यातही खूप मोठं अंतर असतं. त्यामुळे गडद किंवा रंगीत पार्श्वभूमीवर चित्रं काढायची गंमतही मुलांनी अनुभवली पाहिजे, असा प्रयत्न आम्ही केला.
006_VanGogh.jpg

चित्रकार समजून घ्यायचा हा अनोखा मार्ग मला समजला चौदा वर्षांपूर्वी, जेव्हा मी फ्रान्समध्ये फ्रेंच कुटुंबाच्या घरी राहिले होते तेव्हा. मी जिच्या घरी राहिले ती मारी रेमानी नावाची बाई एका शाळेत चित्रकला शिक्षिका होती. मोने हा सर्व फ्रेंच लोकांचा लाडका चित्रकार. त्याच्या चित्रातले भाग मुलांना देऊन मुलांनी ती चित्रं पूर्ण केली होती. केवढं प्रेम करतात ही माणसं त्यांच्या चित्रकारांवर ! ते पाहून मी थक्क झाले होते. मोनेचं अजूनही जपून ठेवलेलं घर दाखवायला छोट्या छोट्या मुलांना नेलं जातं. त्याच्या चित्रात जे तळं आणि पाणकमळं आहेत, ती फार छान पद्धतीनं अजूनही तशीच जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पॅरीसच्या बाजारात गेलं की या मोठ्या चित्रकारांची चित्रं छापलेले टी शर्टस्, छत्र्या, रुमाल, कप अशा अनेक वस्तू विकत घेता येतात. कलाकारांचं महत्त्व ज्या संस्कृतीला समजलं आहे तिनं लहानपणापासूनच मुलांना चित्रं आणि कला समजून घेण्याच्या केवढ्या संधी दिल्या असतील, याची कल्पना करता येते.

चित्रातून अक्षरांशी आणि शब्दांशी मैत्री करता येते. अक्षरांची चित्रं करतानाही मुलांना खूप मजा येते. चित्र काढता काढता अक्षर कुठच्या कुठे लपून जातं आणि अक्षर आलं की सगळं चित्रातलं दृश्यच समोर उभं राहतं. वेगवेगळी अक्षरं आणि आकडे घेऊन त्यातून चित्र तयार करायचा खेळ मुलं सहज खेळू लागतात.

कागदाची स्टेन्सिल्स आणि ठसे काढण्यासाठी आकार कापूनही सुरेख चित्रं तयार करता येतात. थोडा जाडसर कागद घेऊन त्यात फुलांचे आकार कटरनी कोरून किंवा कागद दुमडून कात्रीनी कापायचे. आणि दुसर्याय एका जाडसर कागदावर पानांचे आकार काढून ते कापून घ्यायचे. हिरव्या ओल्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा घेऊन पानाच्या आकाराच्या एका बाजूनी हवे तसे ते रंग लावून पटकन त्याचे ठसे घ्यायचे. पाच सहा वेळा असा रंग लावून वेगवेगळ्या आकाराच्या बारा पंधरा ठशांची रचना करायची. त्या भोवती खडूनं किंवा ओल्या रंगानं वेलीची देठ काढायची. मग ज्या रंगाची फुलं हवी आहेत त्या रंगाच्या दोन छटा तयार करून स्टेन्सिल्सवरून त्या रंगांचा ब्रश फिरवायचा. सुंदर फुलं उमटतील. अनपेक्षित अशी रंगांची सरमिसळ आणि आपोआप तयार झालेल्या आकारांमुळे हे चित्र फारच आकर्षक होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं चित्र काढण्याच्या अनुभवातून मुलांची कल्पकता वाढीला लागते. प्रत्यक्ष हातांनी करून बघण्यातून आलेला अनुभव आणि आत्मविश्वास मुलांना नक्कीच उपयोगी पडतो.

ही सगळी हातांनी करायचीकलाकुसर आणि सोबतीला पाच-सहा दिवस रोज एखादी छोटी सुंदर कविता, प्रार्थना मुलांबरोबर म्हटली तर तीही छान पाठ होऊन जाते. ‘आम्ही आकाश बघू, आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू…’ ही रवींद्रनाथ टागोरांची प्रार्थना आम्ही शिबिरात घेतली. मुलं सतत ही प्रार्थना गुणगुणत असत. लहानपणी पाठ केलेल्या अशा सुंदर, सोप्या कवितांचा आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगळाच अर्थ कसा समजत जातो, याचा अनुभव आमच्या शिबिरातल्या मुलांनाही येईल कदाचित.

भिंतीवर चित्रं काढायला तर मुलांना फार आवडतं. पण सगळ्यांनाच घरी तशी परवनागी मिळते असं नाही. मग मोठ्ठे कोरे न्यूजप्रिंट्स किंवा ब्राऊन पेपर्स आणून योग्य उंचीवर ते भिंतीवर सेलोटेपनी लावायचे. रोज १०-१५ मिनिटं त्यावर मुलांनी चित्र काढायची. पाच-सहा दिवस एकाच चित्रावर काम करायची, त्यात भर घालायची ही सुंदर संधी असते. एरवी मुलं चित्र काढतात आणि ते बाजूला ठेवून विसरून जातात. त्याहून हा एकच चित्र पुढे न्यायचा हा अनुभव त्याहून खूप वेगळा असतो. उभं राहून मोठ्या आकाराच्या कागदावर चित्र काढणं हे जमिनीवर आडव्या ठेवलेल्या छोट्याश्या कागदावर चित्र काढण्यापेक्षा खूप वेगळं असतं. ही चित्रं एकाच वेळी दोन्ही हातांनी काढायला सांगायची. कारण त्यात वेगळं कसब लागतं. दोन्ही हात वापरताना मेंदूचा उजवा आणि डावा दोन्ही भाग वापरले जातात, त्यामुळे मुलांचा तल्लखपणा वाढीला लागतो. दहा मिनिटं काहीही न बोलता, एकमेकांचं न पाहता आपल्याला जे हवं ते कागदावर काढायचं. त्यातली प्रक्रिया महत्त्वाची. काय काढलंय, कसं दिसतंय, त्याची गोष्ट काय, हे सगळं बाजूला ठेवून चित्रं काढू द्यायची. आर्ट थेरपीमध्ये-कलोपचारामध्ये प्रक्रियेला गाभा मानणारं हे तत्त्व फार महत्त्वाचं असतं. ‘कला हाच उपचार असतो.’

रंगाच्या ठशातून आकार शोधायचा खेळही फार छान आहे. कागद मधोमध दुमडून उलगडायचा. घडीच्या रेघेच्या एकाच बाजूला वेगवेगळे ओले रंग मुक्तपणे लावायचे. आकार वगैरे न ठरवता नुसतेच शिंतोडे, थेंब, कुठे मोठ्ठा रंगाचा डाग उमटवायचा. रंग वाळू न देता लगेच कागदाचा दुसरा भाग त्यावर दुमडायचा. त्यावरून हात फिरवायचा. पुन्हा ही घडी उलगडली की आरशातल्या प्रतिमेसारखं दोन्ही बाजूंना सारखं चित्रं तयार झालेलं दिसेल. ते वाळल्यावर स्केचपेननी त्यातल्या काही आकारांना उठाव द्यायचा. यातून फार सुंदर चित्रं तयार होतात.
008_Stencil.jpg
आर्ट थेरपीमध्ये मनःस्वास्थ्य वाढवण्यासाठी हा उपक्रम रोज पाच मिनिटं करायला प्रोत्साहन देतात. त्यासाठी काही कागदांवर अशी चित्रं करून ठेवायची आणि रोज त्यातल्या एका चित्रावर स्केचपेननी रेघा काढून त्यातून आकार शोधायचे असा हा उपक्रम असतो.

बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल सर्जनाच्या प्रक्रियेविषयी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहितात, ‘‘मुलं कल्पक व्हावीत असं वाटत असेल तर मुलांना प्रयोग करायच्या भरपूर संधी व वेळ मिळाला पाहिजे. प्रयोगांबद्दल मोकळेपणानं बोलण्याची, प्रश्न विचारण्याची संधी देणारं अचिकित्सक वातावरण आणि कृतीस्वातंत्र्य मुलांना दिलं पाहिजे. हे करत असतानाची ‘प्रक्रिया’ महत्त्वाची आहे ‘रिझल्ट’ नाही. यातून तत्काळ दिसणारे परिणाम म्हणजे एकाग्रता वाढलेलं, जिज्ञासू, विचलित न होणारं, उत्साही, आनंदी मूल आणि कल्पक ऊर्जा वापरण्याची त्याची घालमेल, अस्वस्थता. अखंड मानसिक चैतन्य आणि क्रियाशील मेंदू, त्यामुळे सारं जग अद्भुत वाटू लागेल आणि आयुष्यातले साधे साधे अनुभव रोमांचकारी वाटू लागतील. जटिल कोडी सहज सोडवता येतील, सगळं आयुष्य नाविन्यपूर्ण होऊन जाईल, नैराश्याचा स्पर्श होऊ शकणार नाही, कुठल्याही उथळ करमणुकीची, उत्तेजनेची गरजच भासणार नाही, असे याचे दीर्घकालीन परिणामही असतील.’’

आम्ही या शिबीरात काही खेळही खेळलो. दोन बाजूंना दोघांना पाठमोरं उभं करायचं आणि डोळे मिटून मागं मागं सरळ रेषेत चालत यायला सांगायचं. मुलांना वाटतं, आपण धडकू एकमेकांवर. पण डोळे मिटून मुलं एवढी तिरकी जातात की भलत्याच दिशेला जाऊन पोहोचतात. तसंच डोळे मिटून एके ठिकाणी उड्या मारायला सांगितल्या तर केव्हा स्वतःची जागा सोडून भलतीकडे उड्या मारत जातात, हे त्यांनाही कळत नाही. डोळे मिटल्यावर खूप वेगळ्या प्रकारे अंदाज बांधले जातात आणि त्याप्रमाणे शरीराचे आणि मेंदूचे अनपेक्षित वेगळेच प्रतिसाद येतात. हे खेळ खरं तर डायबेटीस झालेल्या रोग्यांच्या विविध संवेदना जागरूक आहेत ना, हे तपासण्यासाठी आणि त्या संवेदना चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी घेतले जातात.

ह्या सगळ्या उपक्रमांचा हेतू मुलांना निर्भेळ आनंद मिळू देणं असाच आहे. आपल्याला समजणारही नाहीत आणि विश्लेषणही करता येणार नाहीत इतके विविध पैलू अशा मुक्त खेळांमध्ये, कलाप्रयोगांमध्ये आहेत.

‘आकृती’ नावाचं पुस्तक ‘कजा कजा मरू प्रकाशन’तर्फे नुकतंच प्रकाशित झालं आहे. याचं प्रकाशन चित्रकार ल. म. कडू सरांच्या हस्ते झालं, तेव्हा सरांनी एक किस्सा सांगितला. ‘‘चित्र म्हणजे फक्त कागदावर काहीतरी काढलेलं, एवढंच मर्यादित नसतं. एका शिबिरात एक मुलगा बराच वेळ हौदाजवळ जाऊन काहीतरी करत होता आणि खूप वेळ झाला तरी त्याला दिलेल्या कागदावर काहीच उमटलं नव्हतं. तेव्हा त्यांनी, ‘तू काय करतोयस मलाही सांग ना’ म्हटल्यावर एका चिक्कूच्या झाडाजवळ जाऊन त्यांना दाखवलं. बर्यााचशा चिक्कूंना त्यांनं काळे डोळे काढले होते, तोंडाच्या जागी सिगरेट वाटावी अशी एक काडी खुपसली होती. आणि तो फांद्या हलवून दाखवत होता, की हे बघा इकडे फांदी हलवली की ही सगळी चिक्कूची माणसं अशी हलतात, तिकडे केली की तशी दिसतात. ही काहीतरी नवीन शोधायची वृत्ती मुलांमध्ये फुलत ठेवली पाहिजे.’’

‘‘ज्या समाजात कला अभिव्यक्तीला मोठं स्थान आहे आणि प्रतिकात्मक चित्रांना वास्तववादी चित्रांपेक्षा महत्त्व आहे; जसं वारली, मधुबनीसारखी लोककला; त्या समाजातल्या मुलांना केवळ वास्तववादी चित्रं काढण्याच्या बंधनात न अडकण्याची मोकळीक मिळू शकेल आणि हीच मुलांची गरज आहे. अक्षरचित्रे अशाच प्रकारचा मुक्त कलानुभव देतात.’’ देवी प्रसाद (Art the Basis of Education, नॅशनल बुक ट्रस्ट)

ऍनिमेशन्स बघणे हा मुलांचा अतिशय आवडता उद्योग असतो. नेहेमीच्या कार्टून्सखेरीज इंटरनेटवर चांगल्या ऍनिमेशन्सचा अक्षरशः खजिनाच आहे. त्यात aniboom.com नं संकलित केलेली youtube वरची ऍनिमेशन्स चांगली आहेत. यात १. Out to play (magic box). २. Bananas – funny animation. ३. The Switch (Big Red Button on Cube). ४. Trouble in Paradise. ५. Lifted. ६. Kiwi. ७. Help ! ८. Papiroflexia. ९. Pocoyo. १०. Pingu. हे शब्द youtube वर शोधून अनेक वेगवेगळ्या ऍनिमेशन्सपर्यंत पोहोचताही येईल.
मुलांसाठी केलेले काही चांगले चित्रपट आहेत. हयाओ मियाझाकी या जपानी ऍनिमेटरचे किंवा माजिद माजिदी या इराणी दिग्दर्शकाचे चित्रपट मुलांना ते आवर्जून दाखवले पाहिजेत. अशा फिल्मस शोधून, मिळवून आपापल्या घरी आपण खास मुलांसाठी फिल्म फेस्टिव्हल आयोजित करू शकतो.

abha.bhagwat@gmail.com