आनंदी हेर्लेकर

कंच्यायचा डाव रंगात आलता. इतक्यात धन्या बोंबलला, ‘‘इष्ण्या, मामा आला रे!’’ माया राजूमामा म्हंजे गल्लीतल्या सगळ्यायचाच मामा. येताना सगळ्यायसाटी बिस्किटं, चिप्स आनते. आमच्या गावच्या फुडच्या बाभळी गावात थो रायते. कामासाठी येताजाता आमच्याकडे येते. लय नाय शिकला पर आमाले म्हंते, ‘‘पोरायनो, लय अब्यास करा. बाबासायबांनी सांगून ठिवलंय, शिक्षेणानीच आपल्याले यशाचा मार्ग भेटल.’’ म्हंजी काय थे मले कळत नाई, पर काईतरी ब्येस सांगते असंच लागे. गावच्या कार्यक्रमात थो नेमी फुडं रायते. आमी त्याच्यासंगं मोहरममध्ये ढोल आन ताशा वाजवितो तवा लय मज्जा येती. बावाच्या अंगात येते तसं आमच्याबिन अंगात चढते. रात्रभर मोहरमच्या मिरवणुकीत वाजविलं, की दुसर्‍या दिशी साळंला बुट्टी! नंतर मयनाभर आमचा मोहरमचा खेळ चालते. समदे आजूबाजूचे कावतात कल्ला करतो म्हून. पर राजूमामा आला, की तोबी आमच्या खेळात येतो. मग आमी ढोलताशावर लय नाचतो.

आज आतेही म्हणे, ‘‘इष्णूशेट, मुंबईले चलणार का?’’ म्हनूनच मामा मले लय आवडतो. बहोत सई कल्पना रायतेत तेच्या! बहोत मजा येते त्याच्यासंगं. मम्मीला म्हनला, ‘‘आक्के, यंदा तू आन इष्णूबिन चाला मायासंग मुंबईला. चैत्यभूमीचं दर्शन घिऊ. इष्णूले समुंदर दाखवू.’’

‘‘नगं बा इतक्या लांब. इष्ण्याची शाळा बुडल. आन पैसे किती लागतील…’’ मम्मी म्हनली.

‘‘दोन दिसाचा तर प्रश्न हाय. आन पैसे काऊन लागतील? बाबांच्या दर्शनाला चाललोय. कोनी तिकिटासाठी अडवत नाय. राजावानी जाऊ आन राजावानी यिऊ!’’

मी आन मम्मीनं जायचं ठरविलं.

हे यशला सांगायची मले लय घाई झालती. यश माया शाळेतला मित्र. तेच्याच बंगल्यावर मम्मी कामाले जाते. तो मले पुस्तकं वाचाय देतो. कदीमदी आमच्यासोबत कंचे खेळायपन येतो. मले अब्यासात मदतबिन करतो. त्याच्या घरी काम्प्युटरवर खेळायले लय मज्जा येती. त्याचे काका मुंबईले रायतेत. तो बरेचदा मुंबईले जातो. थितल्या गमती सांगतो. मी मुंबईला चाल्लो म्हून त्याच्या मम्मीनं मले खाऊचा डबा दिला. आन यश म्हने, ‘‘खिडकीत बसून बाहेरची मज्जा बघत खा. छान वाटतं.’’ त्याची भाषा कानाले लै गोड लागते. 

जायच्या दिशी सकाळहूनच मम्मीची गावाले जायची घाई सुरू झाली. मीबिन सकाळहूनच मामाची वाट पाहू लागलो. शाळेची पुस्तकं बाहेर काढून त्याच दप्तरात माये कपडे, खाऊचा डबा आन पाण्याची बाटली ठिवली. गाडीत खायसाटी मम्मीनी माया आवडीची खारी बुंदी केली. तीबिन मायाच बॅगेत ठेवाव आसं मले खूप वाटे. पर जागा नाई होती. भाकरी, ठेचा, चटणी असं समदं पिशवीत भरलं. आमचं गाव मोठ्या स्टेशनापासून एक तासावर. एका पाठोपाठ एक असे छे-सात टेम्पो गावाकडे  येताना दिसले. एका टेम्पोत बाया आन पोरंच होती. त्यात आमाले बसवून मामा मित्रायसोबत दुसर्‍या टेम्पोत गेला.

टेम्पोत मम्मीच्या बाकी बायांसोबत गप्पा सुरू झाल्या. मी मागे पडणार्‍या रस्त्याकडे पायत रायलो. हिरव्या शेतांच्या पल्याड बराच येळ आमचं गाव दिसत रायलं. यशचा बंगला, शाळा, गावचं मंदिर समदं मागे पडलं. टेम्पोतली गर्दी, कलकल यानी थोडं उदास वाटाय लागलं.   

स्टेशनवर तर हीऽऽऽ गर्दी होती. आमची गाडी फलाटावर लागलेलीच हुती. किती सारी मानसं बाबांच्या फोटोवाले निळे झेंडे हातात घिऊन हिंडत होती. मम्मीचा हात घट्ट धरून आन लोकायले ढकलत मी रस्ता काडत होतो. आन तेवड्यात माणसायचा एक लोंढा आला. ‘जय भीम’ अशा आरोळ्या ठोकत मले धक्का दिऊन लोंढा पळत पुढच्या डब्याकडे गेला, आन माया हात मम्मीच्या हातातून निसटला. मीबिन त्या लोंढ्यासोबत ढकलला गेलो. ती मानसं एका डब्यात चढली. मले कायबी कळंना काय करावं आन काय नाय. मम्मी मले सोडून मुंबईला गेली तं? मी या लोकायसोबत गेलो आन मम्मी इथं मले शोधत रायली तं? मी हारपलो तं? मायी अशी टर्रर्र फाटली. तोंडातून शब्द फुटंना. मले जिथंतिथं लोकायचे चालणारे, रुकणारे पायच दिसे. अचानक कोणीतरी मले मागून उचललं. मी लय लय भिलो. थो मामाच व्हय हे समजेतवर त्यानं मले एका मोठ्या खिडकीतून गाडीत मम्मीकडे ढकललं. खूप वर्षांनी मम्मीला भेटल्यासारखा मी मम्मीला चिपकलो. पर तिनं मले पाठीत दाणकन धपाटा दिला आन म्हनली, ‘‘जाशीला हात सोडून?’’ जोरात भोकाड पसरून रडूशा लागे. ‘मी का केलं?’ असं बोंबलू वाटे. पर आजूबाजूच्या गर्दीनं मनीच रडू दाबलं. तसाच गुपचाप बसून रायलो. गाडी सुरू झाली.

या लोकायच्या गर्दीत कसं खिडकीत बसीन आन कसा खाऊ खाईन? खिडकीत बसून मागे धावणारी झाडंझुडं, नद्यानाले, शेतं पायणं तर दूरची गोष्ट, हिथं सादं बूड टेकायलेबिन जागा नवती. जायच्या यायच्या रस्त्यातच खाली बसलो. येणारे जाणारे, चायवाले, भेळवाले, पाणीवाले, वडेवाले, खेळणीवाले सारखं सरकाव लागे. खिडकीजवळ सीटवर बसलेला एकजण दुसर्‍याले म्हने, ‘‘एरवी गाडीत एवढी गर्दी नसते. आज चैत्यभूमीला जाणार्‍यांची गर्दी आहे. आज यांना कोणी तिकीट विचारणार नाही. फुकट जातात.’’ त्यायच्या भाषेनी मले यशची याद आली. आन स्वताची लय लाज वाटू लागली. आन खिडकी नाई म्हून बेकारबिन वाटे. घरी पळून जाऊशा लागे. यशची आन त्यानी दिलेल्या खाऊची याद यिऊन माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मम्मीनी प्रेमानी जवळ घेतलं आन पाठीवर हात फिरवत इचारलं, ‘‘लय जोरात हाणला मी. दुकून रायलं का?’’ नेमकं कुटे दुकतंय मले कळत नवतं. मी राजूमामाकडे पायलं, तर त्यो गर्दीतबिन कोपर्‍यात बसून पेंगून रायला होता!

आनंदी हेर्लेकर

h.anandi@gmail.com

लेखक समुपदेशक आहेत. वर्ध्याच्या आनंद निकेतन शाळेत फेलोशिपवर काम करतात. मुलांचे आणि एकूणच समाजाचे मानसिक आरोग्य व शिक्षण

हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.