वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा प्रसंग. यात म्हटल्याप्रमाणे यासाठी काही मोठं कारणही लागत नाही.कोणतंही छोटंसं कारण पुरतं.मला दोन मुली आहेत. थोरली पाच वर्षांची आणि धाकटी अडीच वर्षांची.खेळताना दोघींची सतत भांडणं चाललेली असतात. आज सकाळचीच गोष्ट. काही कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो.परत आलो तेव्हा दार उघडायला दोघीही धावल्या आणि भांडण सुरू झालं.दोघीही एकमेकींना ढकलत होत्या आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होत्या.इतक्यात धाकटीनं लॅच उघडलं आणि मग थोरलीनं भोकाड पसरलं.त्यांच्या आईनं पुढाकार घेऊन पुन्हा दार बंद केलं आणि थोरलीला उघडायला दिलं, तर धाकटीनं भोकाड पसरलं.मग आईनं तिला दुसरी कडी उघडायला दिली.मग दोघीही शांत झाल्या.या सगळ्यात मी मात्र पाच मिनिटं घराबाहेर ताटकळत उभा होतो.

माझ्या मते, मुलांची अशी भांडणं झाल्यावर त्यांचं इतर गोष्टींकडे मन वळवणं आवश्यक आहे. मुलांना इतर कोणत्याही गोष्टीत गुंतवलं, तर ती भांडण पटकन विसरून जातात आणि थोड्या वेळात पुन्हा एकत्र खेळायला लागतात. तसेच पालक म्हणून आपण अशा वेळेला तटस्थ राहणं खूप गरजेचं आहे.

फेब्रुवारीच्या अंकातील ‘अशी ही बनवाबनवी’ हा लेख मराठी भाषेच्या अर्थच्छटा व शब्दच्छटांबद्दल आपल्याला माहिती देतो.दैनंदिन जीवनात नेमक्या आणि चपखल शब्दांचा आपण कटाक्षानं वापर केला पाहिजे.इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या आपल्या पाल्यांसाठी मराठी भाषेचा हा गोडवा पोचवणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे व आपण ती नक्कीच पार पाडू.

या अंकातील इतरही सुंदर लेखांबद्दल धन्यवाद!

विजय पालांडे 

vijay.palande@hotmail.com