वाचक लिहितात…

पालकनीती 2023 चा जोड अंक अत्यंत मौलिक असा आहे. त्यामधील विषय खूप गांभीर्याने निवडलेले आहेत; विशेषतः संजीवनी कुलकर्णी यांचा ‘शाळा आणि धर्म’ हा लेख तसेच ‘शाळा निधर्मी का असायला हव्यात?’ ही किशोर दरक यांची मुलाखत. एकूणच सर्व अंक उच्च दर्जाचा प्रकाशित करून आपण शिक्षणक्षेत्रामध्ये मोठी साक्षरता तयार करीत आहात. पालकनीतीच्या संपादक मंडळाचे अनेक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. 

शिवाजी राऊत 

सातारा

पालकनीतीमधला शिक्षण धोरणावरचा लेख वाचला, तो मला अत्यंत भावला. त्यातल्या कुठल्या पैलूचे कौतुक करावे ते समजत नाही. सध्याच्या आपल्या शिक्षण धोरणाचा लेखातून बारकाईने अभ्यास केलेला आहे. त्याचे विश्लेषण करण्यापूर्वी त्यातल्या सर्व बाजू समजावून घेत व वाचकांना समजावून देत लेखकाने स्वतःचा विचार ठामपणे मांडला आहे. लेखन प्रामाणिक व म्हणूनच प्रभावी झालेले आहे. मुख्य म्हणजे  लेखकाने पोटतिडकीने ही समस्या मांडलेली आहे. पालकनीतीचा वाचकवर्ग सर्वसाधारणपणे एकाच विचारधारेचा असणार. त्यांना हा लेख आवडेल यात शंका नाही. मला वाटते हा लेख अधिक मोठ्या वाचकवर्गापर्यंत, विशेषतः विचारी नागरिकांपर्यंत व संबंधित सरकारी मंडळींपर्यंत पोचावा. ‘त्याने काय होणार?’ असा नकारात्मक प्रश्न मनात ठेवू नये.

अभिनंदन!

नीलिमा रड्डी

पुणे