वाचनाच्या_निमित्ताने

जानेवारी महिन्यात ‘वाचन’ ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून मुलांसोबत काम करावे असे सर्वानुमते ठरले. स्वतःचे वाचन कसे वाढवता येईल, मुलांना कुठली पुस्तके आवडतात आणि आहे त्यापातळीच्या पुढे जाण्यासाठी, मिळून कसा प्रवास करू शकू यासाठी सर्वच ताया प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने ताईंसाठी सुद्धा काही सत्र आयोजित केली गेली. शुभदा जोशी आणि मानसी महाजन यांनी यावर विस्तृत सत्र घेतले. वाचन आणि त्याद्वारे आकलन क्षमता वाढणं, पुस्तकांची गोडी लागणं, वेगवेगळी चित्रं समजून घेणं, अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होता येणं यासाठी हा सगळा खटाटोप.

#वाचनाच्या_निमित्ताने_१P ३ च्या म्हणजे प्राथमिक गटातील इयत्ता चौथी-पाचवीच्या मुलांसोबत ‘क्वेस्ट’ कडून प्रकाशित झालेल्या ‘खेळ’या पुस्तकाचे प्रकटवाचन आणि त्या अनुषंगाने संवाद व खेळ असा वर्ग घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे वर्ग ताई सुषमा यादव आणि पुस्तकाच्या प्रत्यक्ष लेखिका वंदना कुलकर्णी यांनी वस्तीतल्या ‘आनंद संकुलात’ वर्ग घेतला. वाचनाच्या आवडीबरोबरच मुलांना लिखाणातून, चित्रांमधून व्यक्त होता यावे, पुढे काय घडेल याची अटकळ बांधता यावी असे साधारण उद्देश हे करताना डोळ्यासमोर होते. मुलांना विषयात आण्यासाठी एक गाणं आणि खेळ घेतला. मग वंदनाताईंनी पुस्तकाचे प्रकट वाचन केले. एका ठिकाणी थांबून गोष्टीचा शेवट काय झाला असेल? असे विचारताच “खूप भांडणं झाली असणार”, “घरी आई जवळ भांडणं जावून दोन कुटुंबात भांडणं झाली असणार” अशीच उत्तरे मुलांकडून येत होती. एकटी ईश्वरी म्हणाली “ते दोघे मित्र झाले असतील!” ती थोडा वेगळा विचार करू शकली. मग ताईंनी गोष्टीचा शेवट वाचला. तत्पूर्वी मुखपृष्ठालाही मुद्दामच कव्हर लावले होते. पुस्तकाला काय नाव दिले असेल यावरुनही मुलांनी अनेक अंदाज केले. मग प्रत्यक्ष मुखपृष्ठ दाखवले. पुस्तकाचे नाव होते खेळ आणि लेखिका वंदना ताईच हे बघून मुलांना प्रचंड आनंद आणि आश्चर्य वाटले! “ताई तुम्ही लिहिली ही गोष्ट?!” मुलांचे डोळे चमकले. ‘श्री बा’ने काढलेल्या वेगवान चित्रांवर विशेष चर्चा झाली. कथेला तोडीस तोड अशी चित्रं आणि मांडणी पाहून मुलं खरच छान रंगून गेली होती. चित्रं पहाताना मुलांना भावभावना व्यवस्थित ओळखता येत होत्या. काय झालं असेल याचा तर्कही चित्राधारे मुलं छान करत होती. चित्रशैली बघून सुरूवातीला त्यांना गंमत वाटत होती. ‘आपल्याला पण येईल की काढता!’ असं वाटत होतं, पण चित्र काढायला लागल्यावर वाटलं तितकं सोपं नाही असंही काहींनी बोलून दाखवलं. मग वंदना ताई म्हणाल्या “हे श्रीबा माझे मित्र आहेत. तुम्ही त्यांना पत्र लिहाल का त्यांच्या चित्रांबद्दल? मी त्यांच्या पर्यंत पोहोचवेन”. लागलीच सर्व मुलांनी चार ते पाच ओळींची पत्रे लिहिली. चित्र आठवून त्याबद्दल लिहिताना परत एकदा रंगून गेली. वर्गाच्या शेवटपर्यंत मुलांचा सहभाग उत्तम होता.