संपादकीय – जुलै १९९८

अण्वस्त्रचाचण्यांच्या निमित्तानं ऐरणीवर आलेला जागतिक शांततेचा मुद्दा या अंकाच्या केंद्राशी आहे. 6 व 9 ऑगस्टच्या हिरोशिमा दिनापूर्वी तुमच्या हातांत हा अंक येणार आहे. एक गोष्ट स्पष्टपणे मांडत आहोत की पालकनीती हे कुठल्याही राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाही. तसंच कुठल्याही विचार-प्रणालीचं मुखपत्रही नाही. तरीही शिक्षण, बालविकास इ. विषयांच्या बरोबरीनं जागतिक शांततेचा प्रश्नही पालकनीतीला महत्वाचा वाटतो, कारण हा प्रश्न आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या अस्तित्वाशीच जोडलेला आहे.

राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रसज्जता आवश्यक मानली जाते, त्याचबरोबर आपण सर्वांनी हे ध्यानी ठेवलं पाहिजे की ही शस्त्रसज्जता आणि अण्वस्त्र ह्यांची तुलना होऊ शकत नाही. युद्धपातळीवर स्वसंरक्षण आणि क्रौर्य यांच्यातील रेषा पुसट झाली तरी त्यांच्या दोन टोकांतील अंतर कायमच रहाते.

1945 साली अमेरिकेनं केलेली चूक यानंतर कुणाही व्यक्ती अथवा राष्ट्राकडून या पृथ्वीवर घडू नये, तशी शक्यताही असू नये. केवळ क्रौर्यानेच नव्हे तर चूक, गफलत, संगणक-संदेशवहनांतील अस्पष्टतेनेही अशा प्रकारचे भयानक कृत्य आपल्या देशाकडून वा कुणाही देशाकडून कधीही घडणे इष्ट नव्हे, त्यांत सर्वांचेच अपयश आहे.

अण्वस्त्रचाचण्यांच्या निमित्तानं आपण आज बोलत असलो तरी त्याविषयांत राजकीय दूरदृष्टी असलेल्यांमध्येही मतवैविध्य आढळते. तरीही अण्वस्त्रांचा वापर करणे अयोग्य आणि अनैतिक आहे, तसे कधीही होऊ नये, याबद्दल समंजस आणि संवेदनाशील व्यक्तींच्या मनांत मतभिन्नता असणार नाही.

स्वातंत्र्य-संग्रमाच्या काळांत जसे लहान मुलांनाही त्यापासून दूर रहाणे अशक्य होते तसेच, आजच्या परिस्थितीतही हा केवळ मोठ्यांचा विषय आहे असे नसावे. एका अर्थी यातील निर्णयांच्या परिणामांना  त्यांना तोंड द्यायचे आहे, ही परिस्थिती पहाता ते योग्यही ठरणार नाही.

जरी राजकीय सामाजिक समीकरणांची सर्व अर्थवलये मुलांच्या सर्वसामान्य समजुतीहून अधिक असली तरीही जागतिक शांततेच्या आग्रहांत त्यांना सामील करून घेतले पाहिजे.

या अंकात श्रीमती सुलभा ब्रह्मे यांचा अभ्यासपूर्ण लेख आहे. तो मोठ्यांसाठी – पालक शिक्षकांसाठीच आहे. आपली समजूत अधिक व्यापक होण्यासाठी या लेखाची मदत होईल. त्यानंतर आपण मुलांशी बोलूया. हे बोलण्यासाठी मुले निदान 10 ते 12 वर्षांची तरी असावीत, त्याहून लहानांना हे सांगणेही अयोग्य ठरू शकेल. या बोलण्यानंतर मुले शांततेची मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना लिहू शकतील. 

सोयीसाठी असं एक पत्र या अंकात शेवटच्या पानावर आहे तेही वापरता येईल.

या पत्रावर मुलांच्या सह्या घेऊन 6 ऑगस्ट पूर्वी आमच्याकडे पाठवा. अशी अनेक पत्रे एकत्रपणे आपण पंतप्रधानांकडे पाठवू. तुम्हा सर्वांचा सहभाग मिळाला तरच हे साधेल. या पत्राला मोठ्यांनीही पाठिंबा द्यायला हरकत नाही.

कणा-कणानं गुंजणारा गुंजारव जागीच विरून जाण्याची शक्यता असते. पण एकत्रितपणे मांडलेलं ठाम म्हणणं नक्कीच निर्णयकर्त्यांपर्यंत पोचेल.

आणखी एक, आपणही प्रत्येकानं 6 ते 9 ऑगस्ट या दिवसांत जागतिक शांततेच्या मागणीचं प्रतीक म्हणून पांढरी फीत लावूया. वैयक्तिक पातळीवर आपलं म्हणणं अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी ही प्रतिकात्मक कृती खचितच उपयोगी ठरेल.