संवादकीय – जुलै १९९९

दहावीच्या निकालाचा एक माहौल असतो. ‘गुण’वान विद्यार्थ्यांचं कौतुक, पुढील शिक्षणाची प्रवेश प्रकि‘या आणि नापासांची निराशा यांचे साद-पडसाद वातावरणात भरून रहातात. प्रत्यक्ष जात्यातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हा अनन्यसाधारण महत्त्वाचा मुद्दा तर असतोच आणि सुपातले इतरही त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीनं पहात असतात. 

मुलाच्या बालवर्गाच्या प्रवेशापासूनच सुरू झालेली ही चिंता-काळजी आता गळ्याशी येऊन ठेपलेली असते. शिक्षणाचं परीक्षाभिमुख होत जाणं, स्पर्धेचा अतिरेक याबद्दल आपण अनेकदा पालकनीतीतून बोललो आहोत. पण सबंध शिक्षणाची दिशा आणि पद्धतीही वेगानं परीक्षेच्या चाकोरीत बद्ध होते आहे. शाळांसाठी गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आणि शाळेचा 100% निकाल लागणं ह्या बाबी प्रत्यक्ष शिक्षणाच्या दर्जापेक्षा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यानुसार खास हुषार विद्यार्थ्यांवर विशेष परिश्रम आणि उरलेल्यांनी फक्त पास व्हावं यासाठी प्रयत्न होतांना दिसतात.

या सगळ्या भानगडीत मुळात ‘शिकायचं कशासाठी?’ हा प्रश्न मागे पडत आहे. जगण्यासाठीच्या क्षमता मिळवण्यामध्ये शिक्षणाचा काही वाटा आहे असं जर वाटत असेल तर ह्या सगळ्याचाच प्राधान्यानं विचार व्हायला हवा असं एकवार पुन्हा नोंदवावंसं वाटतं.

या अंकात अंध मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न व त्याकडे बघण्याची योग्य भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शारीरिक दृष्ट्या अपंग मुला-मुलींना जणू ते समाजाचा भागच नाहीत असं वेगळं काढलं जातं. त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढल्या जातात. मग समाजाला त्यांची आणि त्यांना समाजाची ओळख कशी होणार? समाजात मिसळण्याच्या संधींपासून ही मुलं वंचित रहाणार आणि अनाठायी दया, कीव किंवा घृणा यापलिकडे एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहू शकण्याची संधी समाजासाठी बंद होणार.

छअइचे श्री. मधुकर चौधरी म्हणतात त्या प्रमाणे शाळांमधून अनेक प्रकारची मुलं असतात. गरीब-श्रीमंत, अभ्यासात चमकणारी आणि मागे पडणारी, दांडगी आणि काडीपैलवान, या सर्वांना शिकवताना प्रत्येकाला समजेल याचे भान शिक्षकाला ठेवावे लागते. याच मुलांमधे अंध, अपंगांनाही सामावून घेणं अशक्य नाही.

श्री. चौधरींनी अंधांसाठी म्हणून सांगितलेल्या काही सूचना या अंकात नोंदवल्या आहेत त्या ऐकल्यावर सतत वाटत राहतं की याच सूचना आपल्यालाही तितक्याच आवश्यक नाहीत का? ‘मित्र-सहकारी जोडता आले पाहिजेत’ हे प्रत्येकासाठी गरजेचंच आहे. कुणावरही अवलंबून नसलेलं आयुष्य माणसाला जगता येतं का? आणि कुणाचीच गरज नसेल असं ‘आत्मनिर्भर’ जगणं चांगलं म्हणायचं का? एकमेकांना सामावून घेणाराच मार्ग योग्य नव्हे का?

अंध-अपंग मुलांना सामान्य शाळांमध्ये सामावून घेण्याचे धोरण 1987 मध्ये महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहे. अर्थात कागदोपत्री नियम बनवण्याच्या पलीकडे विशेष सहाय्य, प्रशिक्षण, किंवा आर्थिक मदत देण्याइतके या मुद्याला सरकारदरबारी प्राधान्य नाही. शाळांमधे, समाजामधे त्यांना सामावून घेण्यासाठी अनेकांनी  प्रशिक्षण घेऊन स्थानिक पातळीवर आवश्यक तो आधार आणि साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थाही पुढे यायला हव्यात. अन्यथा पूरक कौटुंबिक परिस्थिती नसलेल्या मुलांसाठी, एकात्मिक शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेणे आज अवघडच आहे.                

अंध-शिक्षणाचा प्रश्न आणि त्याकडे बघण्याची योग्य भूमिका समजावून घ्यायची असेल तर नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेचे शिक्षणसंचालक श्री. मधुकर चौधरी यांना भेटायला हवं असं या क्षेत्रातल्या अनेकांनी सुचवलं.

त्यांच्याशी बोलताना याचा प्रत्यय आलाच. अंध शिक्षणासंदर्भात एकात्मिक शिक्षणविचार ते जोरदारपणे मांडतात. आपापल्या घरात-गावात राहूनच आवश्यक तो आधार अंध मुलांना मिळावा हा मार्ग छअइला योग्य वाटतो. तो आधार देण्याचं काम फिरते शिक्षक करतात. एक शिक्षक 7-8 जणांसाठी काम करू शकतो.

एकेका विद्यार्थ्यासाठी अंधशाळेला वर्षाला रु.15000/ खर्च होतो. पण फिरत्या शिक्षकाच्या मदतीनं एका विद्यार्थ्याला रु. 5000/ मधे वर्षभर मदत करता येते. शिवाय अंधांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचं कामही वेगळ्या अंधशाळांमुळे होत नाही.

अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना देताना ते म्हणत होते. ‘‘आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असेल तर भाषेवर अधिकार हवा. उच्चार योग्य आणि सुस्पष्ट हवेत. याच मार्गानं आपल्याला इतरांपर्यंत पोचायचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्र-सहकारी जोडता आले पाहिजेत. आपल्याला समाजात वावरताना इतरांच्या सहकार्यानं कामं करता आली पाहिजेत.

खरं म्हणजे कुणीच कुणाला-‘मदत’ करू नये. अहंकारानं दिलेली superiority च्या भावनेनं दिलेली मदत ही मदत नव्हेच ते ‘अहं’चं समाधान आहे.’’

NAB वरही Logo म्हटलं आहे, Help म्हटलं नाही! NAB ऑफीसमधे अंध कोण ते मुद्दाम लक्ष दिल्याशिवाय कळणारही नाही असाच त्यांचा वावर होता. 18 राज्यातल्या केंद्रावर त्यांचं काम चालू आहे. त्या त्या ठिकाणच्या संस्थांच्या मदतीने अंधांच्या शिक्षणाला मदत दिली जाते. ती प्रत्यक्ष गरजवंतापर्यंत पोचते ना? खरोखरी त्याच कामासाठी वापरली जाते ना? इकडे सतत लक्ष ठेवलं जातं. त्यासाठी NAB अधिकारी, अंध देखील – भारतभर प्रवास करून भेटी देतात. स्वावलंबन, सहकार्य, शिक्षण, व्यवसाय, सहजीवन अशा अंधांच्या प्रश्नांचे अनेक पैलू चौधरींशी बोलताना उलगडत होते. एका बाजूला एकात्मिक शिक्षण महत्त्वाचं का आहे हा विचार करत असतानाच अंध शिक्षणाचा वेगळा विशेष अंक काढणं ही विसंगती नाही का? असाही मुद्दा आला. हा अंक काढून झाला की पुन्हा याचा विचार करायला नको असा उद्देश नाही, तर एरवी दुर्लक्षिल्या गेलेल्या प्रश्नाचा सांगोपांग विचार व्हावा आणि यापुढे तो होत रहावा म्हणून केलेली ही सुरूवात आहे. इथून पुढे, दिवाळी अंकातही या प्रश्नाबद्दल अधिक विचार करू या.      

– संपादक