संवादकीय – जून २०२१

हे संवादकीय लिहितानाही हात थरथरतो आहे. या काळात पालकनीतीचे अनेक जुने मित्रमैत्रिणी हे जग, हे घर सोडून गेले आहेत. दर अंकात एका ना एकाला श्रद्धांजली असण्याचा मासिकाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासातला हा पहिलाच काळ. या अंकात गुणेश या गुणी आणि तडफदार शिक्षकाला श्रद्धांजली वाहताना मन विदीर्ण झालं आहे. चार-पाच वेळेसच गाठ पडली होती; पण त्याचा उल्हास, नव्या गोष्टी करून पाहण्याची उमेद मन मोहून टाकणारी होती, न विसरता येणारी होती. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या भविष्याविषयी पक्की माहीत असणारी गोष्ट कुठली? मृत्यू. गुणेशचं हृदय कशानं दुखलं असेल? तो इतका संवेदनशील होता, की आसपास घडणारे अनेक मृत्यू आणि त्यासारख्या दु:ख-घटनांनी त्याचं मन कातरलं असेल; एरवी पन्नाशीही न गाठलेला, आरोग्याबद्दल सजग असलेला गुणेश सकाळी चालायला गेलेला असताना का कोसळावा?

आजूबाजूला नजर टाकली, तर आज एकही घर असं नाही, ज्या घरानं मधल्या काळात कुणी प्रेमाचं – जवळिकीचं गमावलं नाही. ही भावनिक हानी कशी भरून निघणार? गेल्या वर्षभरात अडीच लाख मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली गेली. हे नोंद झालेले आकडे आहेत, खरे आकडे याहून किती तरी जास्त असण्याची शक्यता आहे. मी शिक्षण आणि जीवन यांची तुलना करत नाहीये; पण या 13-14 वर्षाच्या वयात ह्या मुलांना पोटासाठी वणवण करावी लागणार आहे. काही मुलांनी ध्यानीमनी नसताना आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अचानक त्यांच्यावर अनाथपण येऊन कोसळलं आहे. एक मोठा घटक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून तोडला जात आहे. शालेय व्यवस्थेमधून बाहेर पडलेली ही मुलं कोण आहेत?

स्थलांतरित झालेल्या मजुरांची, घरखर्चाला हातभार लावावा लागल्यामुळे शाळा सुटलेली, ऑनलाईन शाळा शिकणं शक्य नसल्यामुळे शिक्षणापासून लांब गेलेली शहरी वस्त्यांमधली आणि दुर्गम भागांमधली मुलं, या काळात लग्न स्वस्तात होत असल्यानं ते झालेल्या अल्पवयीन मुली… यातून काय होईल हे सरळ दिसतं आहे. शाळेपासून लांब राहिल्यामुळे शिक्षणाची प्रेरणा हरवून जाईल, मिळेल ते काम करत ही मुलं कमावती होतील; मात्र शिक्षण-संधी हुकल्यामुळे परिस्थिती बदलण्याची त्यांची क्षमता कमी होईल. शाळेचा, चांगल्या शिक्षकांचा प्रभाव गमावल्यामुळे ती दिशाहीन होण्याची, गैरमार्गाला लागण्याची शक्यताही आहेच. ही यादी अगदी अपुरी आहे, यात भरपूर भर आपल्या अनुभवातून तुम्ही घालू शकाल याची मला खात्री आहे.

मुद्दा असा आहे, की आपण यावर काही उपाय करणार की नाही?

पालकनीतीची आपल्याला सर्वांना विनंती आहे, की शिक्षणातून बाहेर फेकल्या जाणार्‍या, शिकू न शकणार्‍या मुलामुलींना त्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार परत मिळवून द्यायला आपण प्रत्येकानं काही ना काही प्रयत्न करावात. आपण काय केलं हे पालकनीतीला सांगावं. आम्ही आपल्याला मदत करू, मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करू. सहकारी सुचवू.

आम्ही तुमच्याकडून खूप अपेक्षा करत आहोत, खूप काही मागत आहोत. बघा, करता येईल ते करा. काय आहे, ही सगळी मुलं- मुलंच आहेत, आणि ती फार गोड आहेत!