संवादकीय – फेब्रुवारी २००२

डिसेंबर 2001 च्या संवादकीयावर आमच्याकडे दोन प्रदीर्घ लिखित प्रतिक्रिया आलेल्या आहेत. याशिवाय काही तोंडी प्रतिक्रियाही आहेत. या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा प्रमुख आक्षेप श्री. अब्दुल कलाम यांच्याबद्दल केलेल्या विधानांबाबत आहे.

एक गोष्ट प्रथम स्पष्ट करायला हवी, की आम्हाला श्री. कलाम यांच्या कष्टांबद्दल, बुद्धिमत्तेबद्दल आदरच आहे, त्यांच्या काही मुलाखतींमध्ये व्यक्त झालेल्या मतांबद्दल आक्षेप वाटल्यानं हा आदर कमीही होत नाही. मात्र हा आदर एक माणूस म्हणून आहे. आपल्याकडे सामान्यत: थोर नेते, शास्त्रज्ञ, संत वगैरेंना जवळजवळ देवपण देऊन देव्हार्‍यात बसवण्याची जी पद्धत आहे, त्यानुसार त्यांनी केलं, म्हटलं ते सर्वच योग्य असा अनाठायी नाही. या संवादकीयात श्री. कलामांबद्दल 3 विधाने आहेत.

(1) ‘‘अधिक लांब पल्ल्याची ‘क्षेपणास्त्रं’ विकसित करणं हेच माझं ध्येय आहे….’’ केवळ संहारक शस्त्रास्त्रांची स्वप्न पहाणारे हे ‘शास्त्रज्ञ’ आहेत की केवळ ‘शस्त्रज्ञ?’

(2) ‘ज्यावेळी भारत इतरांवर निर्बंध लादेल त्यावेळी मला खरा आनंद होईल.’ असं लिहिणारी मुलगी माझी प्रेरणा आहे – असे  श्री. कलाम म्हणाले.

(3) ‘शेकडो अब्दुल कलाम निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा आहे’, असंही ते म्हणाले.

श्री. कलाम यांनी केलेली विधानं त्यांनी वारंवार केलेली आहेत आणि जबाबदार वृत्तमाध्यमांनी ती प्रसिद्ध केली आहेत, त्यामुळे ती खरी आहेत असं मानलं गेलं आहे. 

तोंडी आक्षेप ज्यांनी नोंदवले, त्यांनी म्हटलं, ‘पालकनीतीची भूमिका आदर्शवादी आहे परंतु वस्तुनिष्ठ पातळीवर येऊन विचार केला तर 

श्री. कलामांचाच दृष्टिकोण पटतो.’

आपल्याला काय पटावं किंवा नाही हा एकाअर्थी वैयक्तिक प्रश्न असतोही पण पालकनीती हे चर्चेचं व्यासपीठ आहे आणि त्यामुळे ह्या प्रतिक्रिया आणि आमची भूमिका आम्ही आपणा सर्वांसमोर ठेवणं अगत्याचं मानत आहोत.

लिखित प्रतिक्रियांपैकी श्री. कैलास घनदाट यांनी नोंदवलेले मुद्दे असे आहेत,

1) शस्त्रांच्या निर्मितीमागची प्रेरणा ही प्रामुख्याने हिंसा असते तरी ‘स्व’ व इतरांचे संरक्षण हा त्यातील प्रमुख भाग असतो.

2) शस्त्रांची मानवाला गरज होतीच.. जसजसे धोके वाढत गेले तसतशी अधिकाधिक प्रगत शस्त्रं निर्माण झाली.

3) शस्त्रास्त्र स्पर्धेच्या चक्रात अडकणे ही अपरिहार्यता आहे.

4) दुर्बलांच्या अहिंसेला काहीही किंमत नसते.

5) स्वातंत्र्य – सबलता असेल तरच कल्याणकारी राज्य स्थापता येईल.

6) आपल्या देशातील 40% जनता दारिद्य्र रेषेखाली आहे म्हणून संरक्षणावरील खर्च कमी करा असे म्हणणे योग्य नाही. (तसे मूळ लेखातही म्हटलेले नाही…. तरीही)

श्री. गोपाळ परांजपे यांनी मांडलेले मुद्दे –

1) शस्त्रज्ञ हा शास्त्रज्ञ असावाच लागतो!

2) शास्त्रज्ञ म्हणजे कोण? जंगलातील वेत वाकवून तिरकमठा बनवणारा आदिवासी हाही शास्त्रज्ञच.

3) बनवलेली क्षेपणास्त्रं फक्त संहारासाठीच वापरली जातील असं आपण का गृहीत धरतोय? त्यातून मानवकल्याणार्थही काही करता येईल.

4) देशासमोरील मूलभूत समस्या सोडवण्यासाठीच शास्त्राचा उपयोग व्हावा असा आग्रह धरून मानवतावादी भूमिका आपण घेतो. पण आपल्या देशापुढील प्रश्न हे विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध नसण्याचे नसून आपल्या मानसिकतेचे आहेत. त्यामुळे श्री. कलामच काय जगातले सगळे शास्त्रज्ञ एकत्र आले तरी आपल्या देशासमोरील प्रश्न सोडवू शकणार नाहीत.

5) प्रगत राष्टातील प्रगती ही मानवजात तसेच प्राणीजन याबद्दलच्या कणवेतून साधली गेली.

या सर्व आक्षेपांबाबत आमची भूमिका पुढीलप्रमाणे आहे – 

एखादी गोष्ट माणूस का करतो? ह्याचं कारण केवळ वैयक्तिक असत नाही. ते अनेक बाह्य संदर्भांवर अवलंबून असतं आणि हे संदर्भ मानवी प्रवृत्तींशी जोडलेले आहेत. त्यामुळे शस्त्रज्ञ की शास्त्रज्ञ हा प्रश्न त्या व्यक्तीला नसून वृत्तीला उद्देशून विचारलेला आहे.

शास्त्र आणि तंत्रज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रातील संशोधन ही निरपेक्ष गोष्ट असते. ते करायलाच हवं. पुढे ते व्यवहारात वापरण्यासाठी तंत्र विकसित करणं ही तंत्रवैज्ञानिक प्रगती आहे. ए = ाल2 हे शोधून काढणं हे शास्त्र झालं – ते चांगलं की वाईट हा प्रश्नच येत नाही. पुढे याचा उपयोग करून अणुभट्टी उभारून वीज निर्माण करणे किंवा अणुबाँब तयार करून (युद्धात) संहार करणे यासाठी तंत्रज्ञान वापरलं जातं. इथे उद्देशांचा प्रश्न येतो. कोणत्याही उद्देशासाठी उत्तम तंत्रज्ञ लागतातच आणि त्यांना दरवेळी शास्त्रज्ञ असावंच लागतं असं नाही.

स्वसंरक्षण व इतरांचे रक्षण ही प्रमुख प्रेरणा असली तरी आक्रमण वा आक्रमणाची भीती हाच त्याचा मूलाधार आहे. मुख्य म्हणजे अधिकाधिक प्रगत शस्त्रास्त्रं आहेत म्हणून सुरक्षितता वाढते असंही नाही. किंबहुना त्यातून फक्त शस्त्रस्पर्धा वाढते असाच अनुभव आहे. कितीही अत्याधुनिक शस्त्रं असूनही अब्जावधी डॉलर्स संरक्षणावर खर्च करूनही अमेरिका किती असुरक्षित आहे ते 11 सप्टेंबरला सिद्ध झाले नाही का? शस्त्रांची गरज होतीच आणि ती कशामुळे वाढत गेली? त्यामागे दुसर्‍याबद्दल सतत संशय व दुसर्‍यावर कुरघोडी करण्याची तीव्र ओढ यापेक्षा कोणती भावना होती? आणि या भावना निश्चितच मानवी असल्या तरी चांगल्या माणूसपणाचे लक्षण नाहीत. या चक्रात अडकणे अपरिहार्य आहे हे खरेच पण त्यातून सुटण्याचा मार्गही माणसाच्याच हातात आहे हे कसं विसरून चालेल?

‘दुर्बलांच्या अहिंसेला काहीही अर्थ नसतो’ हेही असंच वारंवार सांगून पटवलेलं सत्य आहे. नैतिक भूमिका आणि नेभळटपणा या दोन गोष्टी जणू एकच आहेत असं त्यातून भासवलं जातं. सबल असायलाच हवं यात शंकाच नाही. पण त्याचा उन्माद नको, इतकं साधं सरळ म्हणणं आहे. शेजार्‍याकडे अण्वस्त्र आहेत म्हणून आम्हालाही दुर्दैवानं बनवायला लागताहेत. पण खरेतर सर्व जग अण्वस्त्र मुक्त असावं.. अणुउर्जेचा शक्य तेवढा सुरक्षित उपयोग मानव कल्याणसाठी करता यावा अशीच आमची इच्छा आहे – असं तर निश्चित म्हणता येतं. मग अणुस्फोटानंतर शक्तीयात्रांचा उन्माद घडत नाही…. उन्मादी अवस्थेत हातून चुका घडायची जास्त शक्यता असते. मुख्य म्हणजे शस्त्रास्त्रं म्हणजेच प्रगती, ती बनवणार्‍या व्यक्ती म्हणजेच शास्त्रज्ञ हे जे ‘दैवतीकरण’ आपण करतो ते अयोग्य आहे. श्री. परांजपे आपल्या पत्रात जो मुद्दा मांडतात तोच इथे महत्त्वाचा आहे. शास्त्र फक्त प्रयोगशाळात घडत नाही. रानातील वेत वाकवून कमान बनवणारा आदिवासी शास्त्रज्ञच असतो. त्याचा वेध जोपर्यंत झाडावरचं फळ किंवा अन्नासाठीची शिकार यापुरता असतो तोपर्यंत ठीक. जेव्हा तो ते धनुष्य दुसर्‍याच्या छातीवर रोखू लागतो तेथून शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होते. आणि मग अधिकाधिक संहारक धनुष्य बाण बनवणारा शास्त्रज्ञ प्रकाशझोतात आणि शेतातील उत्पन्न वाढवणारा मात्र अंधारात – हे जे विपरीत चित्र समोर येतं, ह्याबद्दल खेद वाटतो.

स्वातंत्र्य-सबलता असेल तरच कल्याणकारी राज्य निर्माण करता येईल हे सत्यच आहे पण अर्धसत्य आहे. असुरक्षितता आणि शस्त्रस्पर्धा यांच्या भरीला पडून आपण या देशातील गरिबी दूर करण्यात मागे पडतो आहोत ही वस्तुस्थिती आहे. याचे तरी भान आपण ठेवणार की नाही, हाही प्रश्न त्यामध्ये गृहीत आहे.

श्री. परांजपे आणखी एक वेगळाच मुद्दा उपस्थित करतात. आपल्यासमोरील मूलभूत प्रश्न काय आहेत या बद्दल ते म्हणतात की त्याचं मूळ ‘ठेविले अनंते…. ’ या मूळ भारतीय वृत्तीत आहे. आणि पुढे जाऊन ते असंही म्हणतात की त्यामुळे ‘जगातील सर्व संशोधक एकत्र आले तरी भारतासमोरील प्रश्न सोडवू शकणार नाहीत… एकट्या कलामांचं काय घेऊन बसलात?’ प्रश्न कोणी सोडवू शकेल की नाही याआधी विचार करायला हवा आहे तो आपल्या अन्न, शिक्षण, आरोग्य, इ.. इ.. प्रश्न सोडवण्याच्या इच्छेचा. ती इच्छा आहे का? ह्याकडे आपण वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहू या. आत्ता आठवणारं एक उदाहरण घेऊ –

गेल्या 26 जानेवारीला प्रदर्शित केल्या गेलेल्या, जगातील सर्वात जास्त लांबीच्या, एका टकवरून घेऊन जाऊ शकू अशा, अडचणीच्या ठिकाणीही पटकन उभारता येईल अशा पुलाचे फोटो आपण पाहिले. युद्धात रणगाडे वगैरेही झटपट घेऊन जाता यावेत म्हणून हा पूल बनवण्यात तंत्रज्ञांना यश मिळालं. आता हा पूल तयार करण्यामागची इच्छाही आपल्याला स्पष्ट दिसतेय. नंतर हा पूल कदाचित दुर्गम भागात जीवनावश्यक सुविधा पोचवायलाही वापरता येईल. नाही असं नाही. पण अगदी आपल्या तुलनेनं प्रगत राज्यातही दरवर्षी 2 लाखांहून अधिक बालमृत्यू होतात. मेळघाटसारख्या भागात पावसाळ्यात रस्ते बंद झाल्याने वेळेवारी दवाखान्यापर्यंत पोचू न शकल्यामुळे अनेक मुलं मरतात. याअशा अडचणींच्या ठिकाणी वापरता यावेत म्हणूनच का बरं पूल निर्माण होऊ नयेत?

पूल निर्माण करण्यामागची इच्छा ही सामान्य जीवनाच्या कल्याणाची असावी, नंतर तो पूल युद्धासाठीही वापरला जाऊ शकतोच.

आपण तंत्रविज्ञानाकडे पहाल तर असं दिसतं की बहुसंख्य नव्या सुविधा प्रथम युद्धाच्या सोयीसाठी निर्माण होतात, नंतर त्यांचा वापर जनजीवनातही होताना दिसू शकतो.

ह्यातल्या अडचणीचा भाग आहे तो इच्छेचा! त्यामुळे जनजीवनातील प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ म्हणवलेही जात नाहीत, फारतर ते समाजकार्यकर्ते असतात.

खरं तर श्री. परांजपे यांनी शेवटी आमच्याच मुद्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, ‘देश बलवान होणं म्हणजे इतर देशांवर कुरघोडी करण्याचा अनिर्बंध, मुक्त परवाना बाळगणं हे समीकरण सर्वथा अतार्किक आहे.’

पण ही आजची वस्तुस्थिती आहे का – हे पहायला हवं. त्यातून ही भावना कुणी अपरिपक्व व्यक्ती म्हणत असती तर आपण तिकडे दुर्लक्षच केलं असतं. ही भावना श्री. कलामच उचलून धरताहेत, माझी प्रेरणा तीच म्हणताहेत म्हणून तर त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही आम्ही ती प्रश्नांकित करत आहोत.

भारत आमचाही प्रिय देश आहे, आमचंही त्याच्यावर सर्वांएवढंच प्रेम आहे. हे असतानाच आम्ही हाही इतिहास विसरू शकत नाही की आत्यंतिक राष्टवादाच्या प्रभावामुळेच या जगात दोन महायुद्धं झाली. कदाचित त्यातून धडा घेऊन आज युरोप राष्टवाद बाजूला सारून एकत्र येऊ पहातो आहे आणि त्यामुळे आत्यंतिक भारतीय राष्टवाद आम्हाला धोकादायकच वाटतो आहे.

‘राष्ट’ही प्रिय पण अखिल मानवसमूहाचा विचार करता ती एक मानवनिर्मित आणि संकुचितच संकल्पना आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं असं आमचं नम्र म्हणणं आहे.

विनय महाजनांची एक कविता आहे – ‘आओ लकीरें मिटा दें’. ही अखिल मानवसमूहाची मांगल्याची कल्पना ज्ञानेडरांपासून गांधी आणि सावरकरांनीही मनात बाळगली आहे. ती प्रत्यक्षात यावी हे स्वप्न आपण बाळगलं तर ते चूक कसं ठरेल?

लकीरें मिटा दे

इन लकीरों ने हमको सताया बहुत

इन लकीरों ने हमको ल9डाया बहुत

इन लकीरों ने हमको जलाया बहुत

इन लकीरों ने हमको रुलाया बहुत

आओ लकीरें मिटा दें, 

आओ लकीरें मिटा दें

ये लकीरें जों मिट जायें इक बार भी

फिर ना देशी विदेशी की बातें कहीं

ना फौजों का डर हो, ना गोली, ना बम

फूलों के दरिया में खेलेंगे हम

बढ के सबको गले से लगायेंगे हम

सारी दुनिया में झूमेंगे गायेंगे हम

मासूम सपने सजायें, 

आओ लकीरें मिटा दें

हमने बर्लिन की दीवार तो9डी ही थी,

फिर लकीरें मिटाना मुश्किल नहीं

आओ अपने ही घर से शुरु हम करें,

इन लकीरों में प्यारे से रंग भरें

पाक, भारत, बंगला में गा दें, 

आओ लकीरें मिटा दें

(‘विनय महाजन’ यांच्या कवितेचा काही भाग)