संवादी संगोपन

अपर्णा दीक्षित

आपल्या जडणघडणीतले महत्त्वाचे क्षण कोणते, असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. शिक्षण, पदवी, पहिला पगार, लग्न, मुलांचा जन्म, जवळच्या कुणाचा मृत्यू अशा अनेक घटना मनात तरळतील. घटना घडत होती हेच महत्त्वाचं होतं, की त्यामागे अजून काही होतं? त्या घटनेला प्रतिसाद म्हणून अवतीभोवतीच्यांचं वागणं, त्या घटनेच्या आधी-नंतर झालेले संवाद, चर्चा, मनातल्या आतल्या कप्प्यातल्या भावना या सगळ्यांचं मिश्रण अनेकदा त्या घटनेला महत्त्वाचं बनवत असतं. या अति-महत्त्वाच्या ‘घटनांच्या’ पल्याड जाऊन आणखी बारीक, सूक्ष्म पातळीवर हाच प्रश्न पुनःपुन्हा स्वत:ला विचारून पाहा.

मला खात्री आहे, की या क्षणी, या प्रश्नाची वैविध्यपूर्ण उत्तरं अनेक मनांमध्ये आकार घेत आहेत. शिक्षकांच्या गटांबरोबर चर्चा करताना, १२-२५ वयाच्या तरुण मुलामुलींची शिक्षिका म्हणून काम करताना, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासोबतच्या गप्पा यामध्ये अनेक वेळा हा प्रश्न मी (वेगवेगळ्या रूपात) मांडला आहे. आणि यातून पुनःपुन्हा समोर येणारी उत्तरं म्हणजे, जेव्हा माझे बाबा मला म्हणाले…, आमच्या सरांनी मला सगळ्यात आधी सांगितलं की…, मी शेवटी तिला सांगितलं…, एकदा आमच्या बाईंनी मला चिडून म्हटलं की… 

मी स्वत:सुद्धा जेव्हा या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर देऊ पाहते, तेव्हा माझ्या मनात काही संवाद, काही वाक्यं पुनःपुन्हा येत राहतात. अनेकदा आयुष्यात आपण ज्या दिशेनं मार्गक्रमण करत असतो त्यामागे असे कुठलेसे संवाद असतात असं एक सर्वसामान्य निरीक्षण आहे. कदाचित असा संवाद ज्यात आपल्या शिक्षकांनी आपल्यातले गुण हेरले आणि तू पुढे जाऊन अमुक एक शिक्षण घे असं सुचवलं. किंवा अनेकदा पालकांच्या कठोर शब्दाला विरोध म्हणून आपण नकळत काही निर्णय घेतले, किंवा कुणी मित्रानी / मैत्रिणीनी ‘काही लागलं तर सांग, मी आहे’, म्हणून बळ पुरवलं आणि आपण अगदी कठीण प्रसंगही तारून नेले. किंवा कुठल्या हळव्या क्षणी आपण कुणाला दिलेला शब्द पुरा करण्यासाठी अनेक निर्णयांची दिशा बदलली. आपल्यातल्या कितीतरी जणांच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण कुठलातरी ‘संवाद’ आहे. हेच महत्त्वाचे संवाद आपलं भावनिक पोषण करत असतात. 

चांगला संवाद कसा दिसतो?

वरती म्हटलेल्यातले अनेक संवाद जडणघडणीच्या काळातलेही असतात. महत्त्वाच्या ठरलेल्या या संवादांमध्ये काही समान धागे बघायला मिळतात. एक म्हणजे, उत्तम श्रोतेपण. चांगल्या संवादामध्ये व्यक्ती केवळ ऐकण्यासाठी ऐकत असतात. म्हणजे असं, की ऐकणारी व्यक्ती सतत मनात उत्तर, किंवा पुढचे प्रश्न जुळवत नसते. या ऐकण्यात नैसर्गिक कुतूहल असतं. समोरच्या व्यक्तीशी कितीही जुनी ओळख असली, आपल्याच पोटचं मूल असलं, तरी ती व्यक्ती काहीतरी नवीन, अनपेक्षित सांगते आहे का हे जाणून घेण्याची प्रामाणिक उत्सुकता असते. ऐकणाऱ्याच्या मनात प्रश्न, शंका किंवा स्पष्टीकरण आपसूक येत असतात. अशा वेळी त्यानं संयम बाळगणं फार महत्त्वाचं असतं. आयुष्याचा अनुभव घेता घेता आपण सतत घडत असतो, बदलत असतो. हा बदल कुठे दिसतो आहे का, ही एक ओढ त्या संवादात असते. सतत आपला पुढचा मुद्दा तयार ठेवून तो रेटण्यासाठी बोलणं नसतं. एकूणच संवादातल्या दोन्ही बाजूंकडे माझं बोलणं कुणीतरी प्रामाणिक उत्साहानं ऐकतं आहे ही आपुलकीची भावना असते. 

काही वेळाकरता का होईना, पण कुणीतरी आपल्याकडे लक्ष देतं आहे, आपली काळजी करतं आहे ही भावना कुणाला आवडत नाही? अगदी मोठ्यांनासुद्धा ती हवीहवीशी वाटते. लहानांची तर ती वाढीच्या काळातली मुख्य भावनिक, मानसिक गरज असते. त्यामुळे रोजच्या बोलण्यापेक्षा मूल काहीतरी वेगळं सांगू पाहतं आहे का, आपण नेहमीपेक्षा जरा जास्त लक्षपूर्वक ऐकायला हवं आहे का, याचा साधासा विचार अनेकदा मुलांसाठी खूप दिलासादायक ठरतो. यासाठी खूप काही करावं लागत नाही. आपली व्यवधानं बाजूला ठेवून आपण ऐकतो आहोत, बोलतो आहोत हे आपल्या देहबोलीतून मुलं जाणत असतात. मुलांना जशी आपण चौरस आहार पुरवण्याची धडपड करत असतो, त्यांना शिक्षणातल्या उत्तम संधी मिळाव्यात म्हणून सतत प्रयत्नशील असतो, त्याचप्रमाणे असे मनापासून केलेले मोकळे संवादही मुलांचं संगोपन अधिक दृढ करतात. त्यांना व्यक्ती म्हणून आत्मविश्वास आणि बळ देऊन जातात.

संवाद विरुद्ध हिंसक संभाषण 

‘एss ऐकू येत नाही का?’, ‘काय रे, एकदा सांगितलेलं कळत नाही का?’, ‘परत सांगायला लावलंस ना तर बघच…’, अशी वाक्यं तुम्हाला ऐकायला मिळाली आहेत का? लहान मुलं आणि मोठी माणसं यांच्यात नेहमी एक अदृश्य आणि असमान वर्चस्व असतं. म्हणजे वर्चस्व अर्थातच मोठ्यांकडे असतं. आणि ते प्रस्थापित करण्याची मोठ्या माणसांना वेळोवेळी खुमखुमी येताना दिसते. आपण उठसूट मुलांशी चढ्या आवाजात बोलत असू, फटकारून बोललं म्हणजे शिस्त, आदर टिकेल अशा तोऱ्यात राहत असू, तर मुलांची व्यक्त व्हायची शक्यता तर कमी होतेच, शिवाय तीही पुढल्या आयुष्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाषिक हिंसेकडे वळू शकतील. आपली अपेक्षा असते, चूक झाली की मुलांनी ते लगेच मान्य करावं, सॉरी म्हणावं. मात्र आपली चूक झाली आहे हे लक्षात आल्यावर नमतं घेणाऱ्या, माघार घेणाऱ्या मोठ्या माणसांचे आदर्श मुलांसमोर असायला हवेत ना? त्यामुळे आपली काही गल्लत, चूक झाली असेल आणि त्यामुळे पड घ्यायला लागली, तर आपल्या वर्चस्वाला धक्का लागत नाही हे आपल्या वागण्यातून, शब्दांतून मुलांपर्यंत पोचलं पाहिजे.  

म्हणूनच, ऐकण्याबरोबर आपलं बोलणंही विचारपूर्वक व्हायला हवं. तथ्यं (फॅक्ट्स) आणि आपली मतं यात आधी मोठ्यांना फरक करता आला पाहिजे. शाळेत जायला लागल्यानंतर मुलं वेगळ्या वातावरणात, वेगळ्या लोकांसोबत वावरायला शिकतात, तेव्हा तीही बोलण्या-वागण्याचे वेगवेगळे प्रयत्न करून पाहत असतात. मुलं सतत घडत असतात. त्याप्रमाणे आपला त्यांच्याबरोबरचा संवादही घडला पाहिजे. मुलाचा स्वभाव असाच आहे, त्याच्या सवयी तशाच आहेत, अशा गृहीतकांतून संवादांची सुरुवात / शेवट करणं आपण टाळलं पाहिजे. 

मोठ्यांना मोठी शाबासकी 

शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण मुलांशी संवाद साधतो, तेव्हा संवादाच्या या स्पेसचं, अवकाशाचं भान असण्यानं खूप फरक पडतो. इथे मला मुलांशी संवादाचे दोन गट करावेसे वाटतात, आणि त्या अनुषंगानं संवादाचा अवकाश हाताळता येऊ शकतो हेपण पाहता येईल.  

१. आपण ज्यांचे मुख्य पालक आहोत अशी मुलंमुली – यात स्वत:ची मुलं तर आहेतच, आणि अनेकदा भाचे-पुतणे, इतर कुणी जवळचं यांचं आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पालकत्वही आहे. आपल्या वर्गात येणारं एखादं मूल असतं ज्याच्या घरी खूप ताणतणाव असतात, हिंसा असते; अशा मुलांना ममत्व मिळावं म्हणूनही आपण काही काळाकरता नकळत त्यांचं पालकत्व स्वीकारत असतो. 

ज्यांच्याबरोबर आपला नेहमी संवाद होत असतो तिथे रोजच्या घडामोडींसंबंधी वारंवार बोलणं, गप्पा, चेष्टा-मस्करी, शिस्तीच्या मुद्दयांवरून होणारे विसंवाद हे तर असणारच. मात्र जाणीवपूर्वक केलेला संवाद कसा असू शकतो याचा वस्तुपाठ घालून देण्याची एक जास्तीची जबाबदारी पण आपल्यावर असते. 

‘काय विचारतेय / विचारतोय मी? बोल ना पटपट.’ किंवा ‘काय झालं विचारलं तर काही सांगत नाही, आणि मग नंतर भोकाड पसरून रडतो / रडते.’ असे संवाद कितीतरी वेळा आपल्या कानी पडत असतात. पुढे येऊन बोलणाऱ्यांचं, विचारलेल्या प्रश्नांना उत्साहानं सविस्तर उत्तर देणाऱ्यांचं आपल्या समाजात कौतुक होतं. त्यामानानं अबोल मुलांची फार कुचंबणा होते. अनेकदा उत्तम विचार, अर्थपूर्ण मतं असणारी मुलंमुली ते शब्दात सुसंगतपणे मांडायला जरा जास्त वेळ घेतात. अशा वेळेस बोलायची केलेली घाई, पटकन सगळं सांगता आलं पाहिजे ही अपेक्षा योग्य नाही हेही मुलांना सांगता येत नाही. म्हणूनच बोलताना समोरच्याच्या डोळ्यात सौम्य नजरेनं पाहणं, समोरच्याचं बोलणं मध्येच न तोडता पूर्ण बोलून संपेपर्यंत संयमानं वाट पाहणंही महत्त्वाचं असतं. अनेकदा हे सारं आपण कामाच्या ठिकाणी, जास्त औपचारिक ठिकाणी नकळत करत असूही; मात्र, मुलांनाही तितकाच मान द्यायला हवा.   

नुसतं बोलणं म्हणजे संवाद नाही, हे प्रत्यक्षात करून दाखवण्याची संधी असते. वर म्हटल्याप्रमाणे चांगलं ऐकावं कसं, विचलित न होता समोरच्याच्या बोलण्याचा भाग कसं व्हावं हे सगळं जरूर करावं. यातून संवादाकडे मतभेद सोडवण्याचं माध्यम म्हणून पाहणारे, बोलण्याआधी ऐकणारे, विचार करणारे प्रौढ तयार होतील.

 २. सामाजिक पालकत्व – वेगवेगळ्या संदर्भात, कारणांनी, शिक्षक म्हणून आपण अनेक मुलांमुलींच्या संपर्कात येत असतोच. आपण त्यांचे मुख्य पालक नसलो, तरी त्यांचं भलंबुरं होण्यात कधी नकळत आपला हातभार लागत असतो. पालकत्व नसलं तरी त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्याकडे असतेच. शिक्षिका म्हणून काम करताना सर्वच वर्गांना मी नियमित शिकवायला जात नव्हते, तरी इतरही विद्यार्थ्यांशी माझी चांगली ओळख होती. अशी मुलंमुली गप्पा मारताना अनेकदा असे प्रयोग माझ्यावर करत असत. एकदा आठवीतल्या एका विद्यार्थ्यानं त्याला गॅदरिंगमध्ये खरं तर कसा भाग घ्यायचा नाहीये, पण मनाविरुद्ध तो तसं करतोय हे सांगितलं. मला वाटलं, यातून बाहेर कसं पडायचं यावर उत्तर शोधण्यासाठी तो माझ्याशी बोलतो आहे. म्हणून मी त्याला म्हटलं, “तू सरांना एकदा सांगून बघितलंस का की तुला नाही भाग घ्यायचाय? एकदा ते काय म्हणतात बघ.” त्यावर तो म्हणाला, “नाही इतकं काही नाहीये, मी सहज बोललो तुम्हाला.” आणि त्याच्या सांगण्यावरून तो खरंच फक्त शेअर करतो आहे हे माझ्या लक्षात आलं. मी काही सल्ला द्यावा, त्याचा प्रॉब्लेम सोडवावा असं त्याच्या अजिबात मनात नव्हतं.

मोजकीच संभाषणं होणार असतील तरीही ती कुणासाठी तरी महत्त्वाची ठरू शकतात हे लक्षात असायला हवं. एकूणच संवादातून मुलाला काय अपेक्षित आहे, याचाही विचार व्हायला हवा. कधीकधी मुलांना फक्त मोठ्यांनी ऐकून घ्यायला हवं असतं. तर कधीतरीच भेटणारी मोठी माणसं आपला प्रॉब्लेम सोडवू शकतील का असंही मुलं अजमावत असतात. त्यांना कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचा संवाद हवा आहे याचं भान असणारी मोठी माणसं लहान मुलांना नक्की आवडतात. आणि अशी मोठी माणसं मुलांना समंजस बनवण्यातली महत्त्वाची वाटेकरी असतात.  

‘ते काका / त्या मावशी माझं नेहमी ऐकून घेतात’, ‘मला आमच्या मॅडमशी बोलायला फार आवडतं’, ‘आमच्या आजोबांना मी कायपण सांगू शकतो’… मुलांनी असं म्हणणं याच्या इतकी मोठी शाबासकी मोठ्यांसाठी दुसरी नाही. 

अपर्णा दीक्षित 

aparna.a.dixit@gmail.com

भाषा आणि शिक्षणशास्त्र विषयांच्या अभ्यासक. सेंटर फॉर लर्निंग रिसॉर्सेस, पुणे येथे इंग्रजी भाषाशिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख.