सांगोवांगीच्या सत्यकथा – कुत्र्याची पिल्ले विकणे आहे

शशि जोशी

एक दुकानदार आपल्या दुकानावर ‘कुत्र्याची पिल्ले विकणे आहे’ अशी पाटी लावत होता. अशी पाटी म्हणजे मुले नक्कीच आकर्षिली जाणार. अन् खरंचच थोड्याच वेळांत एक लहान मुलगा तिथे आला. ‘‘पिलू केवढ्याला देणार?’’ त्याने विचारले. दुकानदाराने उत्तर दिले, ‘‘साधारण 30 ते 50 डॉलरला’’ त्या मुलाने आपल्या खिशांत हात घातला अन् काही सुटे पैसे बाहेर काढले. ‘‘माझ्याकडे फक्त 3 डॉलर्स आहेत.’’ तो म्हणाला, ‘‘मी त्यांच्याकडे बघू कां?’’

दुकानदार हंसला आणि त्याने शीळ घातली. त्याबरोबर लेडी बाहेर आली अन् तिच्या बरोबर पाच छोटे कापसाचे गोळे. एक पिलू बाकीच्यांच्या पेक्षा बरेच मागे होते. त्या मुलाने त्या अडखळणार्‍या पिलाकडे बोट दाखवून विचारले, ‘‘त्याला काय झालंय?’’

दुकानदाराने सांगितले की कुत्र्यांच्या डॉक्टरानी त्या पिल्लेला तपासलय व सांगितलय की एक पाय आखूड असल्याने ते नेहमीच लंगडत चालेल. थोडे पांगळेच रहाणार ते कायम! तो मुलगा उद्गरला, ‘‘मला ते पिलू विकत घ्यायचेय.’’

दुकानदार म्हणाला, ‘‘नाही. तुला ते विकत घ्यायचे नाहीये. तुला खरंच ते हवे असेल तर मी तुला मोफत देतो.’’

तो लहान मुलगा एकदम उदास झाला. त्याने त्या दुकानदाराकडे रोखून पाहिले आणि बोट दाखवून म्हणाला, ‘‘तुम्ही ते मला देऊन टाकायला नको आहे. त्या बाकीच्या एवढीच त्याची किंमत आहे आणि मी तुम्हाला त्याचे पैसे देईन. मी तुम्हाला आता पहिला हप्ता 3 डॉलर्स देतो आणि नंतर उरलेले देईन.’’

तो दुकानदार म्हणाला, ‘‘तुला ते पिल्ले खरंच हवंय कां? तुला माहिती आहे का ते कधीच इतर पिल्लेसारखे पळणार, उड्या मारणार नाही?’’

हे ऐकल्यावर तो मुलगा खाली वाकला, आपल्या एका पायावरील पँट वर सरकवली आणि लोखंडी सळ्या लावलेला वेडावाकडा, अपंग पाय दाखवला. त्याने दुकानदाराकडे पाहिले अन् हळूवारपणे म्हणाला, ‘‘मीही चांगला पळू शकत नाही अन् त्या पिल्लेला माझ्यासारखा कुणीतरी हे जाणून घेणारा हवा आहे.’’