सांगोवांगीच्या सत्यकथा – प्रेम

एका कॉलेजातील प्रोफेसरांनी आपल्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना बाल्टिमोर झोपडपट्टीत जाऊन 200 तरुण मुलांची माहिती आणायला सांगितली. प्रत्येक मुलगा भविष्यांत काय करू शकेल याबद्दल अंदाजही करायला सांगितला होता. प्रत्येकाबाबत विद्यार्थ्यांनी लिहिले होते – फार काही आशा नाही.

25 वर्षांनंतर दुसऱ्या एका समाजशास्त्राच्या प्रोफेसरांच्या हातात वरील रिपोर्ट पडला. त्या मुलांचे पुढे काय झाले ते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शोधून काढायला सांगितले. वरील 200 मुलांमधील 20 मुले सोडली – काही दुसरीकडे गेली होती किंवा मृत्यू पावली होती. तर उरलेल्या 180 मुलांपैकी 176 मुलांनी वकील, डॉक्टर वा व्यावसायिक म्हणून चांगले यश मिळवले होते.

प्रोफेसरांना आश्चर्य वाटले व त्यांनी जास्त चौकशी करायची ठरवली. एक गोष्ट चांगली म्हणजे बहुतेक जण त्याच भागात होते. त्यामुळे प्रोफेसरांनी जेव्हा विचारले की तुमच्या यशाचे रहस्य काय? तेव्हा प्रत्येकाने अभिमानाने उत्तर दिले, ‘एक शिक्षिका होत्या.’

शिक्षिका अजून जिवंत होत्या, खूप वयस्कर पण बुद्धी चांगली तरतरीत. प्रोफेसरांनी त्या बांईना विचारले की या झोपडपट्टीतल्या मुलांना आयुष्यात यशस्वी करण्यासाठी त्यांनी कोणती जादूची कांडी वापरली होती?

बाईंच्या डोळ्यांत तेज आले. प्रेमळ हंसून त्या म्हणाल्या, ‘अगदी सोपे आहे. मी त्या मुलांवर प्रेम केले.’

अनुवाद : श्रीमती शशी जोशी