सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ

वंदनाकुलकर्णी

25 मे रोजी ज्येष्ठ विचारवंत श्री. वसंतराव पळशीकर यांच्या हस्ते श्री. शिवाजी कागणीकर यांना पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कामाचा परिचय मे महिन्याच्या अंकात आपण वाचलात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी व त्यांचे तरुण सहकारी बसवंत, सिद्धलिंग, भारताक्का आणि रमेश यांची भेट झाली. त्यांच्याशी बोलता आलं, त्यातून त्यांच्या कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचेही कितीतरी नवे पैलू लक्षात आले. सर्वात भुरळ घातली ती शिवाजीच्या अतिशय साध्या जीवनरहाणीनं, निरामय निगर्वी वृत्तीनं, माणसं जोडणार्‍या, नीती जपणार्‍या नितळ स्वभावदर्शनानं आणि कामाच्या झपाट्यानं.

सामाजिक पालकत्व पुरस्कार देण्यामागची कल्पना सांगताना संजीवनी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पालकनीती सुरुवातीपासूनच केवळ ‘स्वत:च्या मुलांना वाढवताना’ याबद्दल न बोलता आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीबद्दल बोलत आली आहे. मूल वाढवणं हा व्यापक विकासनीतीचा भाग आहे असं मानत आली आहे. ‘सामाजिक पालकत्व पुरस्कार’ हा वंचितांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या भल्यासाठी केलेल्या कामाची कृतज्ञ जाणीव आहे. यामधे ‘पुरस्कार देणारे’ असा डौल, अभिनिवेश नाही तर त्या व्यक्तीशी, त्यांच्या कार्याशी जोडून घेणं आहे. पुरस्काराच्या निमित्तानं हे काम अधिकांपर्यंत पोचावं, मैत्रीचे पूल अनेकांच्या बरोबरीनं बांधले जावेत, जनांमधली विश्वस्त वृत्ती जागवावी आणि अशा कामांना गती देण्यासाठी अनेको हात पुढं यावेत असं वाटतं.’’

सन्मानाला उत्तर देताना शिवाजीच्या निवेदनामधून त्यांचं खडतर बालपण, त्यातही दुसर्‍यांसाठी काही करण्याची उर्मी, सततची धडपड, शिकण्यासाठी घ्यावे लागलेले कष्ट, जातीयतेचे दाहक चटके, वेगवेगळ्या विचारप्रणालींशी झालेली ओळख, वेगवेगळ्या टप्प्यांवर करावा लागलेला संघर्ष, रिचवावे लागलेले मानहानीकारक अनुभव, दु:खद प्रसंग आणि त्यातून सर्वांना जोडून घेऊन उभं केलेलं अपूर्व काम याचा व्यापक पट उभा राहिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वसंतराव पळशीकर यांनी ‘सामाजिक पालकत्व आणि विश्वस्त वृत्ती’ या विषयावर मांडणी केली. शिवाजीचं स्वभावचित्र, कार्यशैली जीवनदृष्टी त्यांनी नेमक्या शब्दात – चपखल संकल्पनेत बांधून, सूत्रबद्ध करून समोर ठेवली. ते म्हणाले, ‘‘आज 55 व्या वर्षीही शिवाजीच्या भोवती युवकांचा सतत गराडा असतो. शिवाजी कडून शिकताना, प्रेरणा घेताना ते दिसतात. ही अशी काय जादू आहे, त्याचं कोडं उलगडत नाही. पण ही खूप आनंददायी गोष्ट आहे.’’

‘‘शिवाजीच्या जीवनातून तीन ठळक गोष्टी पुढे येतात. पहिली – साने गुरुजींकडून घेतलेल्या वारशामधून जोपासलेला सेवाभाव. ज्यांना लोकसेवक म्हणता येईल अशा दुर्मिळ लोकांमध्ये नि:शंकपणे ज्यांचा समावेश करता येईल असा हा लोकसेवक. सेवाभाव व संघर्षशीलता यांचं विलक्षण मिश्रण असणारं निर्मळ व्यक्तिमत्त्व.

प्रसंग आल्यावर त्यानं अनेकदा कठोर संघर्ष केलेला आहे. हा संघर्ष घरातल्यांशी, समाजातील वडीलधार्‍यांशी, पुढार्‍यांशी, राजकारण्यांशी, शिक्षकांशी आणि ज्यांच्याबरोबर काम करायला निघाला त्या मित्रांशीही होता. पण त्याबद्दल कटुता न बाळगता, त्यातून टिकून त्याचं पाऊल पुढं पडत राहिलं. त्याचं श्रेयही त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने आमच्यासारख्या मित्रांना दिलं. पण मित्र म्हणून मदत करण्याला मर्यादा असतात. हे सारं काम उभं करण्यासाठी लागणारे अंगभूत गुण त्याच्यापाशी आहेत म्हणूनच हे कार्य होऊ शकलं. तिसरं म्हणजे त्याची विश्वस्तवृत्ती. जे आपल्यापाशी आहे, मग ते ज्ञान असेल, पैसा असेल, क्षमता असेल, त्याचा उपयोग मी फक्त स्वत:साठी करणार नाही. समाजातल्या दडपलेल्या, संधीवंचित, ‘नाही रें’ पर्यंत पोचवलं पाहिजे. त्यांच्यासाठी वापरलं पाहिजे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते मी निरपेक्षवृत्तीनं केलं पाहिजे ही तळमळ, ही विश्वस्तवृत्ती हे त्याच्या आयुष्याचं गाभातत्त्व, सारसर्वस्व आहे.

हे करत असताना त्याला लोकांचं उदंड प्रेम मिळालं. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्याबरोबर फिरताना पावलापावलावर भेटणार्‍या लोकांशी होणार्‍या त्याच्या अगत्यशील बोलण्यातून आपल्याला हे जाणवतं. त्यांच्या अडीअडचणीला, संकट प्रसंगी हा त्यांच्या उपयोगी पडलेला असणार आहे हे समजून येतं.

निरनिराळ्या पद्धतीचं पालकत्व शिवाजीनं स्वीकारलं. शिवाजीच्या निवेदनातून आपल्याला जे घेता येईल आणि करता येईल ते म्हणजे आपल्याकडं जे आहे ते, जे त्यापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल हा विचार. आज समाजात ओरबाडण्याची वृत्ती दिसते आहे. समाज पुढं येण्यासाठी, टिकण्यासाठी, परस्पर विश्वासाची गरज असते. हा विश्वास न वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कोणताच समाज अविश्वासावर उभा राहू शकत नाही. या टप्प्यावर आपल्याला शिवाजीसारखं चरित्र दिसतं, तेव्हा आपल्याला कळतं – ही वाट आहे. ही वाट ज्याची त्यानं चोखाळायची वाट आहे. शिवाजीची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यासारखी एक व्यक्तीसुद्धा निर्धारानं, सातत्यानं एक मूल्य स्वीकारून एका दिशेने किती परिवर्तन घडवू शकते. कधी संस्थेचा आधार घेत, कधी सरकारी योजनांचा आधार घेत, जागरणाचं जे काही काम झालंय ते त्याच्यामुळे, त्याच्या सामाजिक पालकत्वाच्या भूमिकेच्या स्वीकारामुळे.’’

सामाजिक पालकत्व पुरस्कारासाठीची सुयोग्य निवड केल्याबद्दल पळशीकरांनी पालकनीतीचं अभिनंदन केलं.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी शिवाजी व त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर गप्पांसाठी वेळ ठेवला होता. त्यावेळी पालकनीती परिवारच्या विविध उपक्रमांमधे सहभागी असलेले कार्यकर्ते, मित्र, कोळवण खोर्‍यात काम करणार्‍या साधना व्हिलेज या संस्थेचे कार्यकर्ते, आंबेगाव तालुक्यात काम करणारे नारी समता मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सर्वांच्या प्रश्नांना संगतवार उत्तरे तर मिळालीच शिवाय आलेल्या प्रत्येकानंच आपल्या अनुभवांबद्दल बोलावं यासाठीही शिवाजीभाऊंनी प्रयत्न केले.

चौकट – १ 

भाषणाच्या सुरुवातीलाच शिवाजीभाऊ म्हणाले, ‘‘पुरस्कार मिळाल्याचं समजताच मला आनंद वाटला. आपण आपल्या घरच्याच लोकांकडून पुरस्कार घेतोय असं वाटत होतं. पण कुणाच्या हस्ते पुरस्कार देणार? असा प्रश्नही पडला. कुणी राजकारणी असेल तर फारच मोठी पंचाईत, पण वसंतअण्णांच्या हस्ते पुरस्कार मिळणार हे ऐकल्यावर आनंदाला पारावार राहिला नाही.’’ 

71 साली एका शिबिरात त्यांची शिवाजीभाऊशी ओळख झाली पुढे पत्रमैत्रीतून ती वृद्धिंगत झाली. अनेक प्रश्नांमधे, अडचणींत, निराशेच्या प्रसंगी पळशीकरांची खंबीर साथ लाभली. असेच वैचारिक मार्गदर्शन लाभल्यामुळे महाराष्टातल्या आणि महाराष्टाबाहेरच्या अनेक संस्थांनाही त्यांचा आधार वाटतो. वसंतरावांसारखी व्यक्ती या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभली याचा आम्हाला विशेष आनंद झाला.

एव्हरेस्ट केवळ निमित्तमात्र –  विनय कुलकर्णी

पुणेकरांबद्दलचा एक खवचट विनोद प्रसिद्ध आहे. पहाटे फिरण्यास निघालेल्या एका आजोबांना रस्त्यात पुण्यात नवखे असणारे एक गृहस्थ विचारतात, ‘का हो… येथे चितळ्यांचे दूध कोठे मिळेल?’ त्यावर आजोबा खास अनुनासिक उत्तर देतात, ‘दूध म्हशीचे… चितळे केवळ निमित्तमात्र!’

या विनोदाची आठवण होण्याचं कारण एव्हरेस्ट (सागरमाथा किंवा चोमोलुंग्मा म्हटलं तर आपल्यालाही ओळखू येणार नाही) वरील आरोहणाच्या पन्नास वर्षपूर्तीचं.

‘एव्हरेस्ट वर का जायचं?’ याचं मोठं मार्मिक उत्तर एडमंड हिलरीनीच देऊन ठेवलंय. ते म्हणतात. ‘कारण ते तिथं आहे म्हणून!’ जे जे दिसतंय ते तिथं जाऊन बघण्याची अनिवार ऊर्मी माणसाच्या मनात असते म्हणून. त्यासाठी माणूस स्वत:च्या शारीरिक क्षमता मर्यादांपलीकडे ताणून बघायला तयार असतो. त्यातील आंतरिक इच्छा त्या निसर्गाला जाणून घेण्याची असते… असावी. बर्‍याचदा अशा घटनांचं वर्णन ‘निसर्गावर मात’ अशा सदरात केलं जातं. किती चुकीचं आहे ते! एव्हरेस्टवर पाऊल ठेवल्यावर तेनझिंग नोर्गेंनी तिथं थोडासा खाऊ आणि मुलीने दिलेला पेन्सिलीचा तुकडा ठेवला. निसर्गासमोर नतमस्तक होणं होतं ते. आणि इतरेजन त्याचं वर्णन मनुष्याच्या विजिगीषेच्या चष्म्यातून करतात. असे लोक मग तिथे पोचूनसुद्धा ‘झेंडे रोवतात.’

अशाच अत्यंत स्पर्धाळू… संकुचित दृष्टीचं वर्णनही तुम्ही वाचलं असेल. पुण्यातीलच एका महोदयांनी 50 वर्षांनंतर आपल्या आठवणी डोकं खाजवून बाहेर काढल्या. एव्हरेस्टवरून परतल्यावर 20 किलोमीटर अंतरावरील एक शिबिरात या महोदयांची एव्हरेस्टवीरांबरोबर गाठ झाली. आणि वर पोहोचणार्‍यांत तेनसिंग ‘प’ होता हे त्याने कसे सांगितले…. याचे खुमासदार वर्णन त्यांनी केले. तेनझिंग व एडमंड हिलरी या दोघांनी हे सत्य (गुपित नव्हे) सातत्याने मांडले की गिर्यारोहणात जेव्हा दोन किंवा अधिक गिर्यारोहक एका दोराला धरून आळीपाळीने वर चढत असतात तेव्हा त्यांत पहिला दुसरा असं काही नसतं. ते दोघं एकत्रच असतात – एकच असतात. एकाची जीवनडोर दुसर्‍याच्या हातात असते. शेवटच्या क्षणी दुसर्‍याला मागे टाकून आपण पुढे जाण्याची जीवघेणी स्पर्धात्मकता तेथे नसते. हे सगळं एक आदर्श म्हणून खरं तर आजच्या स्पर्धात्मक जगासमोर मांडायला हवं…. पण तेवढा धीर कुठला असायला?

एव्हरेस्टरोहणाच्या (एव्हरेस्टवरील माणसाच्या विजयाच्या नव्हे) 50 व्या स्मृतीदिनानिमित्ताने आणखीही एक बाब समोर आली. एव्हरेस्टवर प्राणवायूशिवाय आणि कालांतराने फक्त एकट्याने पोचण्याचा ‘विक्रम’ करणारे श्री. रेनहोल्ड मेसनर म्हणाले, ‘एव्हरेस्टवर जाण्यासाठी आज येतात त्याच पद्धतीने लोक येत रहाणार असतील तर आता त्यावर पूर्णपणे बंदीच आणावी.’  यावर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने (आणि नेपाळच्या मोडकळीला आलेल्या अर्थव्यवस्थेला थोडीतरी चालना मिळावी म्हणून) नेपाळ सरकारने सुमारे 1500 जणांना एव्हरेस्टवर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथल्या तळशिबिरापाशी एक छोटं खेडंच जणू वसलं आहे आणि त्या पाठोपाठ प्रचंड मानवी कचरा. (एव्हरेस्टवरील मानवनिर्मित कचरा दूर करण्यासाठी देखील एकदा मोहीम काढावी लागली होती.) सध्याची परिस्थिती जवळजवळ अशी आहे की पुरेसे पैसे भरून तिथे पोचलं आणि निसर्गाची लहर फिरली नाही तर पुरेशी शारीरिक क्षमता असणार्‍या कोणालाही एव्हरेस्टवर नेऊन आणण्यात येऊ शकेल. त्यातील अतिशयोक्ती सोडली तरी अक्षरश: शेकडो लोकांची ये-जा होऊन एव्हरेस्ट शिखराचा मार्ग जणू आत्तापर्यंत राजमार्गच झाला असावा…. अवघड जागांवर दोरखंड लावून…. उघड्या हिमभेगांवर – शिड्या लावून तयार!) खरं तर पृथ्वीवरचा एव्हरेस्टसारखा अमोल ठेवा फक्त नेपाळ सरकारनेच नव्हे… आपण सर्वांनीसुद्धा मोडून खाता कामा नये.

हे सगळं का वाटलं तर सध्या साहसी क्रीडा प्रकाराचीसुद्धा चलती आहे. आपण पालकांनी आपल्या मुलांमध्ये साहसाबरोबर काही मूल्यं रुजताहेतना हे पाहण्याची देखील जरूर आहे. बाकी एव्हरेस्ट केवळ निमित्तमात्र.