१७ जूनचा खेळघरातला ‘थेट भेट’ कार्यक्रम-

योगायोगाने त्याच दिवशी दहावीचा रिझल्ट लागला होता. शिकण्यातले प्रश्न असलेली दोन मुले सोडून बाकी सर्व मुले चांगल्या मार्कानी पास झाली होती. या मुलांच्या यशाचे कौतुक करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या मुलांच्या कालचा थेट भेट कार्यक्रम सुरेख झाला. खेलघराच्या ४ सिनियर मुलांची निवड केली होती.

झोपडवस्तीतील जगण्याच्या/ शिकण्याच्या वाटेवरचे विविध अडथळे ओलांडून या मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर एक संवेदनक्षम माणूस म्हणून ही मुले छान विकसित होत आहेत. या मुलांमध्ये स्पष्टपणे विचार करून निर्णय घेणे, जबाबदारी घेणे – निभावणे, इतरांना आणि परिस्थितीला समजावून घेऊ शकणे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे अशी जीवन कौशल्ये विकसित होत आहेत.

या मुलांची मुलाखत घेण्यामागे दोन हेतू होते. यातून युवक गटातल्या इतर मुलांना देखील ‘हे शक्य आहे’ अशी प्रेरणा मिळावी आणि खेळघराला मदत करणाऱ्या मित्र मंडळींना देखील कामाचा अंदाज यावा, आपली मदत सतकारणी लागते आहे हा विश्वास मिळावा.

मुलांच्या मुलाखती खूप रंगल्या. मुलांनी त्यांच्या आयुष्यातले बदल, टर्निंग पॉइंटस्, खेळघरातील काही प्रसंग मोकळेपणाने सांगितले. पुस्तकांचे त्यांच्या आयुष्यातले योगदान व्यक्त केले. तेव्हा आम्हा सगळ्यांना भरून येत होते.

मुले आणि मोठी माणसे देखील मुलाखत औपचारिक रीतीने संपली तरी उठायला राजी नव्हते.

८वी ते १०वी च्या मुलांनी मे महिन्याच्या सुट्टीत ‘संस्था प्रकल्प’ केला होता. वंचित मुलांबरोबर काम करणाऱ्या तीन संस्थांमध्ये जाऊन त्यांचे काम समजावून घेऊन त्या मुलांना आमच्या मुलांना येत असलेल्या काही गोष्टी शिकवणे असे प्रकल्पाचे स्वरूप होते. या कार्यक्रमात मुलांनी त्यांच्या या कामाचे सादरीकरण देखील केले.

२ वर्षानी असा ऑफलाईन कार्यक्रम करता आला… अनेक मित्रमैत्रिणींना भेटून फार छान वाटले… काम पुढे करत राहण्याची उमेद वाढली.