इंग्रजी कोणत्या वयापासून
1. जैविक-तंत्रशास्त्राच्या अभ्यासानुसार बालवयातच भाषा शिकण्याची क्षमता सर्वांत जास्त असते. वय वाढतं तशी ही क्षमता कमी कमी होत जाते, आणि प्रौढवयात तर ती जवळजवळ संपतेच. या दृष्टीने 10 वर्षांच्या आधीचा काळ हा भाषा-शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वात योग्य आहे, त्यामुळे प्राथमिक शिक्षणातच इंग्रजी भाषेचा अंतर्भाव करणं योग्य आहे.
2. जितकं लवकर शिकवावं तेवढा जास्त वेळ मुलाला शिक्षणकाळात ही नवी भाषा शिकण्यासाठी मिळेल. उच्चशिक्षणासाठी इंग्रजीची चांगली जाण येणं आवश्यक असतं, या दृष्टीनं प्राथमिक शिक्षणातच इंग्रजी शिकवायला सुरवात होणं आवश्यक आहे.
3. चौथीनंतर शाळा गळतीचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळे रोजच्या जीवनात जेवढं कामचलाऊ इंग्रज़ी लागतं, जरा उदाहरणार्थ बसचा नंबर, रेल्वेच्या वेळापत्रकांतील ठिकाणांची नावं, तिकीटांचे पैसे, दुकानांची नावं, इत्यादी वाचण्यासाठी इंग्रजी यावं लागतं, तेवढं इंग्रजी प्राथमिक पातळीवरच शिकवलं गेलं तर अधिक बरं.
4. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या मुलांच्या तुलनेत 5वी पासून इंग्रजी शिकणारी मुले मागे पडतात. आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुलं आणि इंग्रजी माध्यमातली मुलं यांच्यात अंतर पडत जातं.
5. इंग्रजीला आज विश्वभाषेचं स्थान तर आहेच, शिवाय ते विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापक संवादाचं माध्यमही आहे यासाठी परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जाण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं अत्यावश्यक आहे, त्यासाठी सुरवातीपासूनच इंग्रजी शिकण्याला आता पर्याय नाही.
6. सर्वसामान्य जनतेचा कौल लक्षात घेता, प्राथमिक पातळीवरच इंग्रजीही शिकवायला हवं, हाच जनमताचा कौल आहे.
प्राथमिक स्तरावर दुसरी भाषा-इंग्रजी शिकवली जाण्याच्या विरोधातील तार्किक विचार:
1. आजवरच्या जगातला अनुभव लक्षात घेता जैविक-तंत्रशास्त्राचा निष्कर्ष प्रत्येक वेळी वास्तवाशी जुळणाराच निघतो असं दिसत नाही. वय वाढतं तशी भाषा शिकण्याची क्षमता कमी कमी होते आणि पुढे संपून जाते ही गोष्ट उदाहरणांनी सहज खोटी ठरवता येईल.
प्रौढांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता जर नसती किंवा नगण्य असती, तर, देशभरातील प्रौढ साक्षरता अभियान निरर्थकच ठरलं असतं.
याशिवाय अनेक प्रयोगांच्या आधारे दुसरी भाषा वयाच्या 11व्या वर्षी शिकायला सुरवात करून त्यांत प्रावीण्य मिळवता येतं हे सिद्ध झालेलं आहे. स्वीडन मध्ये 1958 साली झालेल्या प्रयोगाबद्दल युनेस्कोच्या अहवालात1 म्हटलं आहे, ‘‘प्रयोगाच्या शेवटी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अगदी काटेकोरपणे केलं गेलं, आणि काही अनपेक्षित निष्कर्ष निघाले. मुलांचं वय जितकं जास्त तेवढी ती मुलं नेमके शब्दोच्चार आणि विचारपूर्वक शब्दांचा वापर करताना आढळली. 11 वर्षांच्या मुलांचा नवी भाषा शिकण्यातला वेग 7 वर्षांच्या मुलांच्या तुलनेत निश्चितच जास्त होता.
अशा आणखीही काही प्रयोगांचं उदाहरण देता येईल.
द एज फॅक्टर इन सेंकंड लॅग्वेज अॅक्विझिशन2: दुसरी भाषा आत्मसात करण्यातला ‘वया’चा मुद्दा. या पुस्तकातल्या शेवटच्या प्रकरणात ‘संपादकां’नी अनेक अभ्यासांच्या विश्लेषणाचा एकत्र विचार करताना म्हटलंय, ‘‘भाषा शिक्षणात वयामुळं काही आडकाठी येते असं फारसं दिसत नाही.’’
आणखी एका लेखात किशोरवयानंतर इंग्रजी शिकू लागणार्या डच विद्यार्थ्यांचं इंग्रजी इतकं चांगलं होतं की व्यक्ती समोर नसताना नुसता आवाज ऐकून वाटे, की ह्यांची मातृभाषा इंग्रजीच असावी.
यासंदर्भात श्रीमती फुएन टेविला यांचं मत आहे की, केव्हाही सुरू केलं तरी 5 ते 7 वर्षात नवीन भाषा शिकता येतेच.
2. भाषा शिकण्यासाठी कमीत कमी व जास्तीत जास्त वय किती असावं याबद्दलही मतभेद आहेत. जितकं लवकर तितकं बरं या मताचे जनक विल्डर पेनफिल्ड यांच्या पुस्तकाबद्दलच्या समीक्षेत म्हटलं आहे, की संशोधनातून सापडलेले निष्कर्ष मूळ अपेक्षेशी जुळताना दिसत नाहीत. काहीनी पेनफिल्ड यांच्या मताचं समर्थन केलंय, तर काहींनी त्याचं खण्डनही केलेलं आहे. याचा अर्थ अजून यामध्ये निश्चित काय हे स्पष्ट झालेलं नाही. हा वादाचाच मुद्दा अजून तरी आहे.
3. प्रत्यक्षात बालवयात भाषा शिकणं आणि प्रौढवयात भाषा शिकणं यात फरक आहे. बालवयात ऐकण्यावर अनेकदा म्हणण्यावर, पाठांतरावर जोर देऊन शिकता येतं. तर 11व्या वर्षानंतर, नुसतं लक्षात ठेवून पाठांतर करून भाषा शिक्षण होत नाही, तर विचार करून, स्वतःची कल्पना, समज यांचा वापर करून भाषा शिकता येते. शाळेत भाषा शिकवताना दुसर्या पद्धतीनंच शिकवायला हवी. या प्रकारानंच भाषाशिक्षणातून दृष्टिकोन विस्तारण्याची शक्यता निर्माण होते. हे भाषाशिक्षण माणसात
चिंतनाची, स्वतःला पारखण्याची क्षमता आणू शकतं आणि समाजाच्या संदर्भातली स्वतःची भूमिका आणि जबाबदारीचा सजग विचार करू शकतं.
4. बालवयात दोनदोन भाषांत शिक्षण होऊनही प्रत्यक्षांत एकाच भाषेत रोजचे व्यवहार करू शकणारे, उदाहरण हवं असेल तर अमेरिकाभर भरपूर आहेत.
अगदी आपल्याकडेही इंग्रजी माध्यमात शिकलेल्या अनेकांना दुसरी भाषा म्हणून शिकलेली मातृभाषा येईनाशी होते. यावर आपण करायचं काय? इंग्रजीची ही दादागिरीच योग्य मानून आपली भाषा दुय्यम ठरवून टाकणं स्वीकारायचं? की भारतीय भाषांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करायचे, सर्व प्रकारच्या व्यवहारात त्यांचा वापर कसा करता येईल हे पहायचं? हा निर्णय निश्चितपणे शासनपातळीवरही व्हायलाच हवा. 1992 साली न्यूयॉर्क टाईम्स मध्ये रेजिस डेब्रे आणि युजिन आयनेस्को यांच्या समवेत फ्रांसच्या 300 उच्चशिक्षितांनी जगभर पसरलेल्या इंग्रजीच्या कचाट्यातून फ्रेंच भाषेला वाचवण्याचं आवाहन केलेलं होतं. आपण यातून काही शिकणार का?
5. लौकरात लौकर सुरवात केली की भाषाशिक्षण उत्तम होतं आणि उशीरा सुरवात केली की तेवढं चांगलं साधत नाही, हे काही पुरेसं सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे तो मुद्दा तूर्त थोडा बाजूला ठेवला तर अयोग्य शिक्षकांच्या सोबत अत्यंत प्रतिकूल शैक्षणिक वातावरणात परभाषा शिकण्याची जबरदस्ती मुलांवर केली गेली तर त्याचे तोटेच होण्याची शक्यता जास्त. सुरवातीचीच बैठक कच्ची राहिली तर पुढे आणखी अडचण होते. आजच्या परिस्थितीत प्राथमिक शाळेत मुलांच्या मनात इंग्रजीची प्राथमिक बैठक चांगल्या तर्हेनं तयार होणं सर्वथा अशक्य आहे.
आज जगातील विकसित देशातही प्राथमिक पातळीवर दुसरी भाषा शिकवली जात नाही, याचं कारण ‘त्यासाठी लागणार्या सुविधांचा अभाव आणि आदर्श व्यवस्था तयार होण्यातल्या अडचणी असं’ आहे तर भारतासारख्या पैशांनी गरीब असलेल्या देशात काय होणार? परिणामतः प्राथमिक पातळीवरचं हे इंग्रजी शिक्षण म्हणजे आधीच अडखळत जाणार्या सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाच्या वाटेवर अणकुचीदार काटे पसरणेच ठरेल.
चांगल्या पद्धतीनं शिकवलं तर 4-5 वर्षांच्यात उच्चशिक्षणासाठी, विज्ञान-तंत्रशास्त्रासाठी हवं तेवढं इंग्रजी सहज शिकवता येतंच. समाज विज्ञान किंवा साहित्याच्या अभ्यासासाठी थोड्या अधिक प्रावीण्याची आणि त्यासाठी अधिक वेळाची गरज आहे. 5 वी ते 12 वी 8 वर्षामध्ये आवश्यक तेवढं इंग्रजी शिकवता यायलाच हवं, ते जर आपल्याला साधत नसेल तर 12 वर्ष शिकवूनही जमेल असं कशावरून?
याशिवायही, काही एक समजूत आल्यावर, इंग्रजी शिकण्याची गरज ज्या त्या माणसाला जाणवल्यावर आवश्यक तेवढं इंग्रजी शिकता येईलच हो, त्याच्यासाठी शिकण्याजोगं वातावरण आणि संधी मिळण्याची मात्र निश्चितच गरज आहे.
आपल्या देशातल्या अनेक विद्वानांनी 10व्या वर्षानंतरच इंग्रजी शिकायला सुरवात केली आणि तरीही त्यांचं इंग्रजी कमी दर्जाचं होतं असं कुणालाही म्हणता येणार नाही, असं आजही दिसतं.
7. भाषा शिक्षणा मागचा उद्देश आणि पद्धत ही कशी आहे, हीही त्या भाषेच्या शिक्षणाचा दर्जा ठरवणारी बाब आहे. कुठल्याही इयत्तेपासून सुरू केलं तरी ज्याप्रकारे हे शिक्षण पोहोचवलं जातं, ती पद्धत आणि लर्निंग इंग्लीश किंवा त्या प्रकारची पुस्तकं प्रथम दूर सारायला हवीत. त्याशिवाय इंग्रजीशिक्षण साधणं जवळजवळ अशक्य आहे. जुन्या पद्धतीनं म्हणजे साहित्य व्याकरण, अनुवाद अशा मार्गानं माध्यमिक पातळीवर सुरूवात करूनही, ही दुसरी भाषा शिकणंही शक्य आहे. प्राथमिक पातळीवर नाही शिकवलं, तर पुढे जमणारच नाही, हे म्हणणं शिक्षण-व्यवस्थेच्या बेजबाबदार वृत्तीचं निदर्शक आहे.
8. प्राथमिक पातळीवर प्रतिकूल परिस्थितीत, अयोग्य शिक्षकांकडून (ही विशेषणे शिक्षकांबद्दलची असली, तरी मुळांत इंग्रजी शिकवण्याच्या क्षमते संदर्भातून ती येतात) कामचलाऊ दर्जाचं(?) इंग्रजी तरी शिकता येईल याची काय शाश्वती आहे? बरं या सगळ्या उठाठेवीसाठी जो, पैसा, वेळ जाणार, शिवाय विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताणातून जावं लागणार त्यापेक्षा, त्यांच्या सोयीसाठी रस्त्यावरच्या पाट्या, तिकीटाचे, गाड्यांचे नाव-नंबर मातृभाषेत ठेवणं फार सोपं ठरेल.
9. समानतेच्या नावाखाली प्राथमिक पातळीवर इंग्रजी शिकवावी म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून येणार्या मुलांइतकी समान संधी मिळेल, असा जो मुद्दा केला जातो, तो तर भयंकर फसवा आहे, त्यातून असमानतेलाच अधिक चालना मिळते. पहिली पासून इंग्रजी (दुसरी भाषा म्हणून) शिकूनही, इंग्रजी माध्यमाच्या मुलांशी बरोबरी होणारच नाही. इंग्रजी संवादाच्या संधी आणि त्यासाठीचा पाठपुरावा इंग्रजी माध्यम शाळेत जास्त होणार. आर्थिक स्तरांचा वास्तविक विचार पहाता, सर्व सुविधाही त्यांना सहज मिळणार. आणि त्यानंतर इंग्रजी संवादाची आत्मविश्वासपूर्ण हातोटी असणारी ही मुलं इंग्रजी द्वितीय भाषा म्हणून शिकणार्या आमच्या मुलांपेक्षा वरचढ ठरणार.
10. ज्यांना मातृभाषाच बरी बोलता येत नाही, त्यांना दुसरी भाषाही येणं अवघडच असतं. त्यामुळे त्यांना स्वतःची अशी कुठलीही भाषा मिळणार नाही. विकसित देशांमध्ये प्राथमिक स्तरावर, सामान्यत एक तृतियांश वेळ भाषाशिक्षणासाठी दिला जातो. तर आपल्याकडे केवळ एक पंचमांश वेळ त्यासाठी उपलब्ध आहे. प्राथमिक शाळेत वर्षभराकाठी, आपल्याकडे 400 तास शिक्षणाचं काम चालतं, तर, विकसित देशांमध्ये हा काळ 800 तासांचा आहे. एकच भाषा शिकवण्यासाठी तिथे वर्षाकाठी 300 तास दिले जातात. आपण सुमारे 80 तासांत दोन भाषा शिकवायला बघणार? त्यामुळे काहीच धड नाही अशी अवस्था येण्याची शक्यता जास्त.
11. यातून एक फायदा मात्र नक्की होईल, समान संधी मिळाली तरीसुद्धा हे लोक शिकू शकले नाहीत, असं म्हणता येईल.
विषमतेनं व्यापलेल्या या समाजाला शिक्षणाच्या संधींमध्ये समान पातळीवर आणता येणं अशक्य आहे. मुद्दा नुसत्या भाषाशिक्षणाचा नाही, त्यासोबत एक सांस्कृतिक पदरही आहे. खालच्या वर्गाच्या लोकांसाठी या अशा असमान स्पर्धेत उतरताना अवघड करून ठेवलेल्या पद्धतीनं परकी संस्कृती समजावून घेण्याचा पर्याय तरी असतो आणि ते जमलं नाही तर मालक वर्गाच्या शोषणाला गुमान सामोरं तरी जावं लागतं. खरं पाहू गेल्यास ज्या देशांत आज सर्वांपर्यंत किमान दर्जाची साक्षरता पोहोचवण्यातही आपण कमी पडत आहेत, तिथं आणखी एक भाषा शिकण्याची जबरदस्ती करणं म्हणजे, सार्वत्रिक शिक्षणाच्या वाटेत मोठाच अडथळा निर्माण करणं आहे. जगातला एकही देश आजवर अशा दोनदोन भाषा शिकवत सर्वांना शिक्षणाची संधी आणि साक्षरता आणू शकलेला नाही. अचानकपणे भारतातच हे काय नवीन खूळ आलंय कळत नाही. यामध्ये विशषतः सुशिक्षित बुद्धिजीवी लोक काय भूमिका बजावतात ते खरोखरच बघायला हवं.
12. दुसरी भाषा कोणत्या वर्गापासून शिकवायला लागावं, हा निर्णय त्या समाजातल्या लोकांच्या मतावर ठेवावा, असं म्हटलं जातं. प्राथमिक स्तरावर इंग्रजी शिकवलं जाण्याचा निर्णय सामान्य माणसाला योग्यच वाटतोय, असं म्हटलं गेलं. इथे सहाजिकच एक प्रश्न पडतो, की सामान्य माणूस म्हणजे कोण? या प्रकारची इंग्रजी शिकवण्याची मागणी आमच्या खेड्यापाड्यातल्या भूमिहीन शेतकर्यांनी तर काही केलेली नसणार. हे फक्त शहरी मध्यमवर्गीय लोकांचं म्हणणं आहे, आणि प्रसार माध्यमांच्या मदतीनं हा फसवा प्रचार केला गेला आहेे.
खरोखरच जर खेडोपाडीची जनता, प्राथमिक पातळीवर इंग्रजी हवं अशी मागणी करत असती, तर सार्वत्रिक शिक्षणाचं उद्दिष्ट हातात येणं मुळीच कठीण नव्हतं. त्यासाठी कोणा कायद्याची, धोरणातल्या बदलांचीही गरज नव्हती. प्राथमिक स्तरावर इंग्रजी हवं ही जर खरोखरच सार्वजनिक मागणी असती, तर सार्वत्रिक शिक्षण साध्य करणं म्हणजे अधिक शाळा उघडणं येवढंच राहिलं असतं. तेवढं केलं की काम भागलं.
शिक्षणासाठी इच्छा, उर्मी असणं हीच किती मोठी अडचण आहे, अशात इंग्रजी शिक्षणासाठी मात्र सर्वांची एकमतानं तयारी असणं कसं काय शक्य आहे?
13. एरीक फ्रॉम नावाच्या विचारवंतानं असं म्हटलंय की भाषण स्वातंत्र्य ही गोष्ट जरा फसवीच आहे, कारण सामान्यपणे आसपास जो विचार केला जातो, तोच विचार लोक करतात, तेच बोलतात. म्हणजे, सामान्यपणे जनमताच्या परिघाबाहेर कुणी जात नाही, स्वतःच्या पद्धतीनं वेगळा विचार केला जात नाही. स्वतःच्या मतांच्या, विचाराच्या मागच्या भूमिका, तार्किक आधार शोधणं, त्यांना तपासणं यासाठी लोकांना मदत करणं हेच सर्वात कठीण काम असतं.
चांगलं शिक्षण नेहमी हेच काम करतं, हीच मदत देतं.