एक आठवण
ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ प्रयोग परिवारचे कै. प्रा. श्री. अ. दाभोळकर यांच्यासह काम करण्याची मला संधी मिळाली, तेव्हा एक पालक म्हणून आपल्या मुलांसाठी त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या.
घरात ते व वृंदाताई दोघेही मिळवते असूनही त्यांनी सोफासेट घेतलेला नव्हता. त्याविषयी मी त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की फर्निचरमुळे घरातील मुलांची खेळण्याची स्पेस कमी होते. मुलांना मोकळेपणाने घरात खेळता आले पाहिजे.
गरीब लोक कसे राहतात, ते काय खातात-पितात, याचे मुलांना ज्ञान व्हावे म्हणून ते आपल्या मुलांना त्यांच्या गरीब मित्रांच्या घरी दोन-तीन दिवस राहावयास पाठवत.
स्वावलंबन तर मुलांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येई. दुपारी आमचे पुस्तकाचे काम चालू असे. मधल्या सुट्टीत मुले शाळेतून घरी येत, किचनमध्ये जात, ताट वाढून घेऊन जेवत व हळूच निघून जात.
एकूणच मुलांचे कुतूहल न मारता त्यांच्या मनातील शंकांचे निरसन कसे होईल व तेही त्यांना समजेल अशा पद्धतीने, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ते सुजाण पालक होते यात शंकाच नाही!
श्रीकांत जोशी, गारगोटी