एक मैं और एक तू!

आई-बाबांची नोकरी आणि लैंगिक समानतेची व्यावहारिकता… 

हल्लीच युट्यूबवर लहान मुलांची गाणी ‘ब्राऊझ’ करताना एका जुन्या, हिंदी बडबडगीताची अ‍ॅनिमेटेड  आवृत्ती पाहिली. मुलांना चौकोन, त्रिकोण, गोल अश्या विविध आकारांची ओळख करून देणाऱ्या ह्या गाण्यात सुरुवातीचीच ओळ होती: ‘मम्मी की रोटी गोल गोल, पापा का पैसा गोल गोल…’ आकर्षक ठेका, उडती चाल आणि आधुनिक अ‍ॅनिमेशन असणारं हे गाणं मला जरा खटकलं, कारण त्या गाण्यातले शब्द मात्र मागच्या शतकाला साजेसे  होते!

जेव्हा हे गाणं तयार झालं तेव्हा कालसुसंगत असेलही कारण पूर्वी सहसा बायका अर्थार्जन करीत नसत. स्त्रियांनी घरातलं बघायचं आणि पुरुषांनी बाहेरचं काम सांभाळायचं अशी सरधोपट विभागणी असे. ही विभागणी काही कौशल्यं किंवा क्षमतांवर आधारलेली नव्हती. सोयीसाठी केली गेली होती.

आज मात्र वस्तुस्थिती फार वेगळी आहे. मला अचूक आकडेवारी सांगता येणार नाही; पण ग्रामीण असोत किंवा शहरातल्या, उच्चशिक्षित किंवा अशिक्षित आणि अगदी गरीब ते गर्भश्रीमंत – सर्व स्तरांतल्या अनेक  स्त्रिया गेले अनेक वर्षांपासून गरजेपोटी म्हणा किंवा इच्छेखातर; नोकरी-धंदा करतात. पैसे कमावतात. दिवसाचा बराच काळ घराबाहेर असतात. अशा प्रकारे एकंदरीत राहणीमान बदलल्यामुळे मुलांना घरी आल्या-आल्या “आई, भूक लागलीये, खायला दे!” असं म्हणता येईल की नाही हे काही सांगता येत नाही. आई घरात नसू शकते. तिनं घरी येताना बाहेरचं काम आटपून येणं खूप सामान्य झालं आहे. त्यामुळं घराबाहेरची कामं बाबानीच करायची, असंही गणित राहिलं नाहीये.

अश्यावेळी एकंदर (घरातल्याच नाही) कामांची विभागणी ‘स्त्रियांनी करायची कामं’ आणि ‘पुरुषांनी करायची कामं’ अशा दोन गटांमध्ये घाऊकपणे करून कसं चालेल? आईवडील दोघांनीही केवळ संगोपनासाठी नव्हे तर एकूणच मुलांच्या जडणघडणीसाठी म्हणूनसुद्धा खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणं ही आजच्या काळाची गरज आहे. आईलाही केवळ घरातल्या आर्थिक बाबींचीच नाही तर अर्थशास्त्रीय संदर्भांचीही माहिती असायला हवी; तशी असली की मुलांनाही ते आपोआप कळतं. तसंच बाबा फक्त बाहेरचे निर्णयच घेत नाही, तर घरसुद्धा उत्कृष्टपणे सांभाळतो हे दिसलं तरच मुलं-मुली संवेदनशील आणि खऱ्या अर्थानं स्वावलंबी होतील. या संदर्भात मी नुकताच एक ब्लॉग* वाचला – स्टे अ‍ॅट होम डॅड्स, म्हणजे नोकरी सोडून ‘पूर्ण वेळ घर-बाबा’ बनणाऱ्या पुरुषांबद्दल.

त्यातले एक होते गौतम जॉन. शैक्षणिक क्षेत्रात  कार्यरत असणार्‍या जॉन यांनी त्यांच्या बायकोची सहा महिन्यांची प्रसूतीरजा संपल्यावर स्वतः नोकरी सोडली. आता लेकीला फिरायला घेऊन जाणं, कधीकधी तिला तिच्या आजीआजोबांकडे नेणं, तिला अंघोळ घालणं, तिचं खाणंपिणं, झोप आणि दिवसभरात तिच्याशी भरपूर खेळणं असा जॉनचा दिनक्रम असतो. अर्थात वेळ मिळाला की स्वत:ला कामाबाबत अद्ययावत ठेवणं आणि वाचन करणंही असतंच.

‘काही लोकांना आपल्या करियरवरच लक्ष केंद्रित करावंसं वाटणं अगदी साहजिक आहे. मात्र त्याच वेळी पूर्णवेळ घरी राहून बाबापण निभावणार्‍या पुरुषांचं उदात्तीकरण करण्याचीही गरज नाही’ हे त्यांचं मत आहे. “शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खरं तर बर्‍याच पुरुषांना ‘घरी राहणारा बाबा’ व्हावंसं वाटतही असेल; पण तसा पर्याय उपलब्ध असेलच असं नाही. माझ्यासाठी तशी संधी चालून आली आणि मी आणि माझ्या बायकोनं तिचं सोनं केलं हे मात्र खरं. जेव्हा नोकरी सोडायची ठरवली तेव्हा एक ‘ब्रेक’ असं त्याकडे न बघता, लेकीबरोबर अर्थपूर्ण वेळ घालवता यावा म्हणून तो मनापासून घेतलेला निर्णय होता”, असं जॉन म्हणतात.

समर हळरणकर यांनीही हाच पर्याय निवडला. लेकीकडे लक्ष देता यावं म्हणून काही वर्षांपूर्वी दिल्लीस्थित हिंदुस्तान टाईम्समधील व्यवस्थापकीय संपादकाची नोकरी त्यांनी सोडली. “आमची मुलगी वर्षाचीही नव्हती, तेव्हाच आम्ही तिला सांभाळायला दुसर्‍यांच्या ताब्यात ठेवायला नको असं ठरवलं.  मग निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं झालं. मी घरी राहून मुलीचं पालनपोषण करायचं ठरवलं.”

हळरणकर हे सध्या  हिंदुस्तान टाईम्स आणि मिंटमध्ये स्तंभलेखक म्हणून घरून काम करतात. स्वयंपाक करून नंतर लेकीला शाळेत ने-आण करण्याबरोबरच तिच्या एकंदर दिवसाचं नियोजन करतात. हळूहळू  त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवली असली तरी मुख्यत्वे त्यांचा दिवस मुलीभोवतीच जातो. “पूर्वी जेव्हा मी मुलीला बागेत खेळायला न्यायचो तेव्हा इतर मुलं त्यांच्या दाईबरोबर येत. हल्ली मात्र बरेच पालक स्वतः मुलांबरोबर येऊ लागले आहेत.” ते आपलं निरीक्षण नोंदवतात.

हळरणकरांना स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि लेकीला त्यांच्या हातचं खायला! “माझ्या बाबानं केलंय” अशी तिची स्तुती चालू असते.

हळरणकरांसाठी हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. नोकरी सोडणं म्हणजे अर्थातच नियमित पगारावर पाणी सोडणं. अश्यावेळी कुणाचंतरी भक्कम पाठबळ लागतं; बायकोकडून ते मिळालं. त्यांचं आयुष्य या निर्णयानं बदललंय आणि ते व त्यांची लेक त्यावर खूष आहेत.

वर दिलेल्या, या दोघांनी निवडलेल्या भूमिका प्रातिनिधिक नाहीत, हे मान्य; पण अमुक गोष्ट करणं सर्वमान्य  किंवा तमुक गोष्ट प्रवाहाविरुद्ध अशी जी समाजधारणा आहे तिला छेद देण्याचं काम यातून साध्य होतंय. हेही नसे थोडके! समाजानं आखून दिलाय म्हणून नाही, तर स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला श्रेयस्कर असा मार्ग निवडणाऱ्या या दोन्ही बाबांचं (आणि त्यांच्या बायकांचं) मला अतिशय कौतुक वाटतं.

अर्थात सर्वांनाच असे मार्ग स्वीकारणं बऱ्याच कारणांसाठी शक्य नसतं. आर्थिक परिस्थिती, जोडीदाराची साथ, कामाचं स्वरूप यासारखे अनेक घटक असतात. पण तरी असा एक मधला मार्ग आपण शोधू शकतो. (आणि असे मार्ग बरेच असतात!)

आता युरोपचं उदाहरण पहा ना! युरोपीय देशांमध्ये पॅटर्निटी लीव्ह अर्थात पितृत्वाची रजा मिळते – थोडीथोडकी नव्हे तर वर्षभराची! आपल्या इथे आईची प्रसूती-रजा संपत आली आणि घरात आज्जीआजोबा किंवा तशी काही बाळाकडे बघणार्‍यांची व्यवस्था नसेल तर  बाळाला एखाद्या पाळणाघरात ठेवायच्या पर्यायाचा विचार व्हायला लागतो. त्याऐवजी बाळाच्या बाबाला पूर्णवेळ देता यावा अशी व्यवस्था करता आली तर अधिक चांगलं. बाबालाही  आपल्या बाळाशी जास्त अर्थपूर्ण  नातं निर्माण करण्याची संधी मिळते.

स्तनपान केवळ आईच देऊ शकत असल्यानं अनादी काळापासून बाळाच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी आईचीच मानली गेली; भलेही गेली अनेक वर्षं भारतात, विशेषकरून सुशिक्षित लोक गरज पडल्यास ब्रेस्टपंप किंवा इतर प्रकारे आईचं दूध एक्स्प्रेस करून बाटलीत भरत असतील, तरीही त्याला एक तडजोड, चैन, किंवा क्वचित अडचणीच्या वेळी करायचा उपाय असंच मानलं जातं. त्याऐवजी, जर विभक्त कुटुंबांमधील आईबाबांनी रात्री-अपरात्री रडणाऱ्या बाळाला आळीपाळीनं दूध पाजलं तर? सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या आईला केवढी मदत होईल त्यानं!

पूर्वी स्वयंपाकघरातली कामं ही बहुतांशी स्त्रियाच करायच्या. पण आता  नवरा-बायको दोघंही ६-६:३० नंतर ऑफिसमधून परत येतात, तेव्हा स्वयंपाक आणि घरातली इतर कामं  दोघांनी मिळून केली तर दोघांनाही मुलांना अधिक वेळ देता येतो. त्याहून मोठी बंपर लॉटरी काय – तर लहान मुलांनाही तेवढा अर्धा-एक तास स्वयंपाकात सामील करून घेतलं तर सर्वांना एकत्र वेळ घालवता येईल. समानता, स्वच्छता आणि टापटीप, सर्जनशीलता, वेळेचं व्यवस्थापन इत्यादी आवश्यक गोष्टी खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना शिकवण्याची संधी एकत्र स्वयंपाक करण्यानं मिळवता येते.

आपल्याला आपल्या मुलांची किती पर्वा आहे याला महत्त्व देणारे हे बाबा किंवा एक कुटुंब म्हणून एकमेकांना सहकार्य करत खर्‍या अर्थानं सहजीवन जगणारे असे लोक कौतुकास्पद आहेत. स्त्री-पुरुष समानतेबरोबरच निसर्गतः असलेलं  स्त्री-पुरुषांमधील वैविध्य हे जीवनाला अजून सुंदर बनवतं हे खरं आहे; पण आपलं सर्वांचं अंतिम ध्येय जर आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास आणि कुटुंबाचं समाधान हेच असेल तर चाकोरीबद्ध वागून स्वतःला त्रास देण्यापेक्षा मोकळ्या मनानं आपल्या जीवनशैलीत असे काही बदल केले तर? ‘मम्मी की रोटी’ आणि ‘पापा का पैसा’च्या ऐवजी दोन्ही पालकांचं प्रेम आणि इतरही बरंच काही मुलांना मिळालं तर?  हे करायला आपल्याला चार-चौघांपेक्षा थोडं वेगळं वागावं लागेल, थोडे कष्ट घ्यावे लागतील, आपल्या कक्षा रुंदावायला लागतील; पण त्यातून कदाचित आपल्या मुलांचा  दृष्टिकोन अधिक व्यापक व्हायला मदत होईल. एवढंच नाही तर आपण  जन्मलो ती सामाजिक परिस्थिती, वांशिकता, जात-धर्म यामध्ये आपण आपल्या नशिबानं कैद नसून, एक व्यक्तिविशेष म्हणून या जीवनाचा आनंद लुटायला स्वतंत्र आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.