कविता

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे गेल्या महिन्यात एक संतापजनक घटना घडली. आर्यन खडसे नावाचा आठ वर्षांचा मुलगा गावातील जोगन माता मंदिरात खेळण्यासाठी आला. तो दलित असल्याने त्याच्या मंदिर प्रवेशावरून संतापून एका सवर्ण तरुणाने त्याला मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्यावर चोरीचा आळ घेत त्याचे कपडे काढून, हात बांधून त्याला तप्त फरशीवर बसण्यास सांगितले. त्यामुळे आर्यनच्या दोन्ही कुल्ल्यांवरील कातडी जळली. त्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत. जाती- धर्माची किल्मिषं निरागस लहानग्यांना क्रूरपणे होरपळून काढत असताना पालक म्हणून आपण याकडे कसे बघणार?

 

आर्यनचे पोळलेले कोवळे पार्श्वभाग पाहून

मला माझ्या गावातली पोरं आठवतात

वेदांत, जान्हवी, ऋषी, आरुषी, सुधर्म, ओंकार, वेद नावाची

सालदार, कामगार, मांग-महाराची पोरं!

बेचाळीस डिग्रीवर आग ओकणाऱ्या सूर्याला

भीक न घालता टळटळीत दुपारी

बालपण उधळत गावभर बोंबलत हिंडणारी…

आकाश कवेत घेऊ पाहणारी

कुतूहलाने ओतप्रोत भरलेली…

त्यांच्या आयांच्या भाषेत ‘इचक कार्टी!’

बालसुलभ उत्सुकतेनं जग बघायला निघालेली

भीती वाटते, उद्या बेसावध क्षणी त्यांनाही खिंडीत गाठून

जातीचे सदातप्त निखारे क्षणात चर्रकन त्यांचं बालपण करपवतील

हात बांधून, द्वेषाचे कडू जहर बळजबरी ओतलं जाईल त्यांच्या घशात

त्यांच्या बोलक्या डोळ्यात भरलं जाईल भीतीचं काजळ

माझ्या पोरांना एकट्यानं मंदिरात जायचं ‘लई भेव वाटंन’

कारण तिथल्या घंटानादात ऐकू येतं

गाभाऱ्यात धर्मांध बलात्कार भोगलेल्या अशीफाचं विव्हळणं आणि

चौथऱ्यावर जातीचे चटके खाल्लेल्या आर्यनचं बोंबलणं

त्या मंदिरांतील देवतांची प्राणज्योत कधीचीच मालवलेली आहे…

 

null

ओजस सुनीती विनय | meetojas@gmail.com