कोविडपश्चात शिक्षणाचे वास्तव
रेश्मा शेंडे
जून 2022 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या काळातली ही निरीक्षणे आहेत. पुढील
काळात परिस्थितीत काय बदल झाले, हे जाणून घेणे उद्बोधक ठरावे…
आपल्या शिक्षणव्यवस्थेत ‘शाळा’ हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले गेले आहे.
कोविडकाळात लॉकडाऊनमुळे प्रथमच बराच काळ, म्हणजे तब्बल दोन वर्षे,
देशभरातल्या शाळा बंद होत्या. सामाजिक बंध निर्माण होणे, विविध गोष्टींचा
अनुभव मिळणे, वयानुरूप मित्रमैत्रिणी भेटणे हे सगळे शाळा बंद असताना काही
प्रमाणात घडत होते; पण शाळेमुळे मिळणार्या विस्तारित अनुभवांपासून मात्र मुले
वंचित राहिली.
या काळात मुलांपर्यंत शिक्षण पोचावे म्हणून विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात
आले. अर्थात, मूल शिकते राहावे हा यामागचा उद्देश होता. मुले कुठेही असली तरी
त्यांचे कृतिशील स्वयंशिक्षण चालूच असते. मात्र कोविडकाळात केले गेलेले प्रयत्न
पुरेसे नव्हते असे शाळा सुरू झाल्यावर लक्षात येते आहे. मुले शिकती राहण्याचा
विचार जाणीवपूर्वक झाला नाही. शिकण्यासाठी पूरक पर्याय त्यांच्या घराच्या
परिसरात सहज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न कमी पडल्याचे जाणवते. त्यामुळे दोन
वर्षांच्या लॉकडाऊननंतर शाळेच्या माध्यमातून मिळणार्या शिक्षणातील तूट प्रचंड
आहे. याचा दीर्घकालीन परिणाम मुलांचा काहीच दोष नसताना त्यांच्यावर झालेला
दिसून येतो आहे. हा परिणाम पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिकशाळेत
असणार्या सगळ्याच मुलांवर कमी-अधिक फरकाने झाल्याचे दिसते.
करोनाची परिस्थिती निवळली आणि हळूहळू शाळा सुरू झाल्या. मुले शाळेच्या
प्रवाहात यावीत, तिथे रमावीत, शाळेतील वातावरणात सामावून जाणे त्यांना सोपे
जावे याकरता शैक्षणिक यंत्रणा आणि शिक्षकांनी सर्व बाजूंनी प्रयत्न केले. मुलांना
त्यांच्या वयानुरूप आणि इयत्तेनुरूप क्षमतांशी जुळवून घेणे सोपे जावे यासाठी त्यांना
गरजेनुसार पूरक शिक्षण देण्यासाठी शाळांमधून वेगवेगळे उपक्रम आखले गेले.
ऊर्मी संस्थेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांबरोबर काम
करतो. कोविडनंतर पुन्हा काम सुरू करताना काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.
मुलांच्या शिक्षणावर आणि खुद्द मुलांवरही कोविडकाळाचा परिणाम झालेला दिसून
आला. याबद्दलची निरीक्षणे इथे नमूद करावीशी वाटतात.
शाळा सुरू झाल्यानंतर मुले खुलली. वातावरणात उत्साह संचारला. बर्याच
काळानंतर एकमेकांबरोबर शिकण्याचा, डबे खाण्याचा, खेळण्याचा त्यांना आनंद
मिळाला. शाळेशी संदर्भ असलेल्या कित्येक गोष्टी मुले खूप दिवसांनी करत होती.
प्रत्यक्ष भेटण्याचे समाधान काही वेगळेच असते याची प्रचीती या काळात लहान-मोठे
सर्वांनाच आली.
मुले शाळेत जायला लागली म्हणजे खर्या अर्थाने शाळेत रुळली असे म्हणता येणे
मात्र कठीण आहे. ज्या मुलांना शाळेत जाण्याचा पूर्वानुभव होता, अशा अर्थाने जी
मुले मोठी होती, त्यांनाही शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यास बराच काळ
लागला; मग ज्या मुलांनी शाळा कधीच पाहिलेली नव्हती त्यांची अवस्था किती
गोंधळल्यासारखी झाली असेल याची कल्पना करता येईल.
कोविडकाळात दोन वर्षे घरी असलेल्या बालवाडीतल्या मुलांना वयानुरूप थेट
तिसर्या इयत्तेमध्ये बसवले गेले. तीच अवस्था पहिली आणि दुसरीतल्या मुलांचीही
झाली. अर्थात, ज्या कुटुंबांतून पालकांनी मुलांची शाळेत जाण्याच्या दृष्टीने
पूर्वतयारी करून घेतली होती त्या मुलांना आणि पालकांना विशेष त्रास झाला नाही.
नवीन वातावरणात, नवीन परिसरात मूल गोंधळून जाणे साहजिकच आहे; पण
जिथे जिथे पालक, शिक्षकांचा मुलांशी संवाद होता, तिथे मुलांना इतके जड गेले
नाही.
जून 2022 च्या शैक्षणिक वर्षात शाळा विनाअडथळा नियमितपणे सुरू आहेत.
आता मुलांच्या इयत्तेनुसार अभ्यास सुरू झाला आहे. मुलांना त्यांच्या क्षमतानिहाय
शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया प्रदीर्घ काळानंतर शाळेत सुरू झाली
खरी; मात्र शाळेचे तोंड प्रथमच पाहिलेली काही मुले गांगरलेली होती. कोविडमुळे
तिसरीची मुले पहिली-दुसरीत शाळेत जाऊ शकली नाहीत. तिसरीच्या वर्गात
बसताना नवीन चेहरे, शाळेतली गजबज, गर्दी पाहून ती गोंधळून गेली. समोर काय
चालले आहे ते ती फक्त पाहत राहायची. आजूबाजूच्या गोष्टी समजावून घेण्याचा,
त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायची. समोरच्या व्यक्तीने काही विचारले, तर
काय बोलायचे, कसा प्रतिसाद द्यायचा याबाबतचा संभ्रम त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट
जाणवत होता. एकमेकांशी गप्पा मारताना काय बोलायचे ते मुलांना समजत नव्हते.
शाळा आणि घरातली भाषा याची जुळवाजुळव करताना त्यांची तारांबळ होत होती.
कोणी अगदी सक्ती केली नाही, तरी शाळेचे काही शिष्टाचार असतात हे त्यांना
समजून घ्यावे लागले. मुले 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसू
शकत नाहीत हे एरवी आपल्याला माहीत असले, तरी कोविडकाळानंतर ही गोष्ट
ठळकपणे पुढे आली. सारखे एका जागेवरून दुसर्या जागेवर जाणे ही त्यांची
सध्याची गरज आहे. त्यांच्यातील अस्वस्थपणा वाढल्याचे जाणवते आहे. लक्ष देऊन
ऐकण्याचा, एका ठिकाणी बसण्याचा कालावधी त्यांच्या वयानुरूप क्षमतेपेक्षा आणखी
कमी झालेला दिसून येतो आहे. प्राथमिक शाळेतल्या सर्वच मुलांची कमी-अधिक
फरकाने अशीच अवस्था झालेली आहे.
माध्यमिक इयत्तांमधील मुलांची परिस्थितीही फारशी वेगळी नाहीय. शाळा सुरू
झाल्यानंतर त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासाच्या क्षमतांशी जुळवून घेणे, त्या
पातळीपर्यंत पोचणे त्यांना सध्या कठीण जाते आहे. शब्द नवीन वाटत आहेत.
बर्याच मुलांना शब्द, वाक्य वाचायला खूप वेळ लागतो आहे. वाचता आले तरी
त्याचे आकलन होत नाहीये. असे दिसतेय, की मुले पाहून लिहू शकतात; पण जे
लिहिले त्याचा अर्थ त्यांना समजत नाहीये. एकंदरीत मुलांच्या लेखन-वाचनक्षमता
आणि कौशल्यांवर परिणाम झालेला जाणवतोय. हीच अवस्था संख्याज्ञानाचीही आहे.
अंकओळख, अंकांवरील मूलभूत क्रिया, त्यांचा अर्थ मुले विसरली आहेत. अभ्यासावर
लक्ष केंद्रित करणे खूप मुलांना अवघड जाते आहे. शाळेतून घरी गेल्यावर त्यांना
दप्तराकडे बघावेसे वाटत नाही. त्यामुळे सरावासाठी दिलेला गृहपाठ पूर्ण होत नाही.
आवरून वेळेत शाळेत पोचणे, शाळेचे अगदी मूलभूत नियम पाळणेही मुलांना
अजूनही कठीण जाते आहे. अभ्यासातील रस कमी होऊन वर्गातून बाहेर जाण्याकडे,
शिक्षक शिकवत असताना वर्ग विचलित करण्याकडे, एकमेकांशी गप्पा मारण्याकडे,
खेळण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. परीक्षा या विषयावर आम्ही मुलांशी गप्पा
मारल्या तेव्हा ऑफलाईन परीक्षेची भीती वाटते असे मुलांनी सांगितले.
कोविडकाळात बदललेली परीक्षा-पद्धत मुलांना अजूनही हवीशी वाटतेय असे
निरीक्षण आहे.
सोय म्हणून करोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडला गेला खरा; पण
त्याचे परिणाम आणि मर्यादा ह्यावर तेव्हा पुरेसा विचार झाला नाही. बहुतांश
मुलांपर्यंत शिक्षणाच्या इतर संधी आणि पर्याय उपलब्ध नव्हते. ऑनलाईन
माध्यमातून शिक्षणाच्या संधी मिळालेल्या मुलांच्या हातात मोबाईल पोचला.
एखाद्या साधनाचा योग्य वापर मुलांना माहीत नसेल, तर कुतूहलापोटी ती त्याचा
मुक्त वापर करू शकतात. तसेच मोबाईलचेही झाले. साधन हाती दिले गेले; पण
त्यातील धोक्यांचा विचार केला गेला नाही. परिणामी शाळा सुरू होऊन वर्ष होत
आले, तरी बहुतांश मुलांचा ‘स्क्रीन-टाईम’कमी होऊ शकलेला नाही. कोविडकाळात
टीव्ही, मोबाईल वापरलेला चालत होता; मग आता का नाही ह्या मुलांच्या प्रश्नाला
काय उत्तर द्यावे असा पालकांचा गोंधळ झाला आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना
सर्वसमावेशक, व्यापक पर्याय काय देता येतील याचा विचार करावा लागणार आहे.
त्या त्या इयत्तांमध्ये अपेक्षित असलेल्या क्षमतांचा विकास होण्याची संधीच मुलांना
शाळेच्या माध्यमातून मिळू शकलेली नाही. त्यामुळे ती कौशल्ये शिकण्यात रस
निर्माण होण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. मुलांबरोबर खूप संवेदनशीलपणे
काम करावे लागेल. मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि
भावनिक विकासाला पूरक संधी केवळ शाळेतच नव्हे, तर त्यांच्या घरांतून,
आजूबाजूच्या परिसरातून कशा मिळू शकतील याचा विचार होणे आवश्यक आहे.
शिक्षणक्षेत्रावर कोविडचे परिणाम अधिक खोलवर झाले आहेत. येत्या काळात ते
आणखी प्रकर्षाने पुढे येतील. शिक्षणातील सर्वच पातळ्यांवरील तूट भरून
निघण्यासाठी केवळ शाळा नियमित सुरू ठेवणे पुरेसे नाही, तर एक स्वतंत्र व्यक्ती
म्हणून मुलांच्या गरजांचा संवेदनशीलपणे, सर्वांगाने विचार होणे गरजेचे आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आखलेले सर्वसमावेशक आणि दूरगामी
परिणाम करणारे उपक्रम आखणे आवश्यक आहे. सगळ्या मुलांना शिक्षणाच्या
समान संधी उपलब्ध होतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजानेच
पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. तरच पुढील शिक्षण सहज, सुंदर आणि
आनंददायी होईल.
रेश्मा शेंडे
urmeengo@gmail.com
लेखक सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्या ऊर्मी ह्या शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात
काम करणार्या संस्थेच्या संस्थापक सदस्य आहेत.