खजिना

समुद्राच्या किनाऱ्यावर तिचं घर होतं. आणि त्याचंसुद्धा.

दोघांच्याही घरात कायम समुद्राची गाज ऐकू यायची.

खिडकीतून पाहिलं की तिला लाटा दिसत.

आणि त्याला होड्या.

त्यांना एकमेकांची ओळख नव्हती. मुळीसुद्धा.

रोज संध्याकाळी ती आईबरोबर समुद्रावर जायची. कुणीकुणी भेटायचं, गप्पा व्हायच्या.

हिचा वाळूत खेळ चालू असायचा.

एक दिवस तिनं खूऽऽऽप खोल खड्डा खणला. त्यात तिला काहीतरी हाताला लागलं… छोटीशी डबी!!

डबीत एक पेन्सिलीचा तुकडा! काय गंमत! ती गंमत तिनं जपून ठेवली, आणि आपली पेन्सिल डबीत ठेवून दिली. डबी परत होती तिथेच… तशीच वाळूखाली…

त्याला काही शाळेची झंझट नव्हती. मन मानेल तेव्हा समुद्रावर जावे, नि भटकावे. त्या दिवशी सकाळी त्याला वाळूखालच्या डबीत नवी पेन्सिल मिळाली! भारी! मग त्यानं डबीत समुद्रफेस ठेवला, नि डबी पुन्हा पुरून टाकली.

संध्याकाळी तिला डबीत समुद्रफेस मिळाला… किती आवडला तो तिला! तिनं यावेळी मणी आणले होते डबीत ठेवायला.

दुसऱ्या दिवशी सकाळी डबीतला खजिना बघायची त्याला अगदी उत्सुकता लागली होती. सूर्य उगवतो कधी, सकाळ होते कधी आणि मी डबी उघडतो कधी… त्यानं रंगीत मणी घेतले आणि तिथे कागदाची होडी ठेवली… स्वतः केलेली.

मग एक सिलसिलाच सुरू झाला… कधी चित्र, कधी रंग, कधी बिस्कीट, कधी चॉकलेट, वेचलेली फुले, वेचलेले काजू, नुकताच पडलेला दात, सापडलेला खडू, भगवा झेंडा, हिरवा झेंडा, पिसं, पंख, बटणं, कविता, कल्पना, शब्द, शपथा, स्वप्नं, ढग, लाटा…

हे चालूच राहिलं. सकाळींमागून संध्याकाळी, संध्याकाळींमागून सकाळी. दिवस, महिने, वर्षं…

केलेले उपास, चढलेले ताप यांनीही कधी खाडा झाला नाही. वर्षानुवर्षं.

ते चित्र, ती होडी, तो दात, तो खडू, तो झेंडा, त्या कविता, ती पिसं, त्या लाटा असेच दडून राहतील.

शिंपल्यात मिटून राहतील. कधीही न उघडलेल्या इतिहासासारखे.

Swetha

श्वेता नांबियार  | summeryellowleaf@gmail.com

लेखिका सर्व वयोगटातील मुलांबरोबर काम करतात तसेच लेखन, चित्रकला हे त्यांचे आवडीचे प्रांत आहेत.

चित्र : रमाकांत धनोकार