खेळघराच्या खिडकीतून 2024

जून २०२३ ते जुलै २०२४

“कैसे आकाश में सुराख नहीं होता, कोई पत्थर तो तबियत से उछालो यारो!”

दुष्यंत कुमार या प्रसिध्द कवींच्या या ओळी  ज्या काळात खेळघराचं नवीन नवीन काम सुरू झालं होतं तेव्हा वाचल्या होत्या.अतिशय प्रेरणा देणा-या ओळी आहेत या!. आपल्याला जे साध्य व्हावं असं वाटतं ना, त्यासाठी अतिशय मनापासून आणि लावून धरून, दीर्घकाळ काम केलं की यश नक्की मिळतं असा काहीसा आशावाद यातून पोचत होता. पण कालांतरानं असं लक्षात आलं की सामाजिक बदल असे एका दुस-याच्या प्रयत्नांनी होत नसतात. त्यासाठी अनेकांनी एकत्र येऊन एकदिलानं आणि चिकाटीनं काम करायला लागतं.

गेल्या २७ वर्षांत खेळघराच्या माध्यमातून आम्ही अनेक समविचारी कार्यकर्त्यांनी  एकत्र येऊन वंचित गटातील मुलांसमवेत ‘आनंदानं शिकण्याच्या दिशेनं’ काम केलं. आपल्यापैकी देखील अनेकांनी स्वतःचा पैसा, वेळ आणि कौशल्य या कामासाठी दिले आहेत. सर्व काही साधलं असा आमचा दावा नाही पण काही बदल निश्चित झाले आहेत. लक्ष्मीनगर वस्तीतील सुमारे दीडशे मुलं-मुली चांगलं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी आहेत. सन्मानानं जगत आहेत. दोनशे मुलांसमवेत आम्ही आता काम करत आहोत. विशेषतः मुलींचा उच्चशिक्षण घेण्यातला आत्मविश्वास वाढलेला जाणवतो आहे. प्रशिक्षणांच्या माध्यमातून भारतभरातील सुमारे आठशे शिक्षक / कार्यकर्त्यांच्या मनांपर्यंत हा विचार आणि पद्धती पोचवू शकलो आहोत.

गेलं वर्ष खेळघरासाठी मोठं बहारीचं होतं! त्यातील काही महत्वाच्या गोष्टी सांगायला आवडतील

  • दहावीचा रिझल्ट

या वर्षी खेळघराची अठरा मुलं दहावी पास झाली. त्यातील ५ मुलं सत्तर टक्कांच्या वर मार्क मिळवून पास झाली. पास झालेल्या सर्व मुलांना मे महिन्यामध्ये MSCIT कोर्स करण्यासाठी खेळघरानं आर्थिक मदत केली.

 युवक गटामधील मुलांना पुढील शिक्षणाच्या दिशेची निवड करण्यासाठी सल्ला देणे आणि ३०,०००/- रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे हे काम सध्या चालू आहे. खेळघराच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीच्या आधारावरच ही मदत देणं शक्य होतं आहे.

  • वस्तीतील जागांचे नूतनीकरण

मुले जिथे शिकतात ती जागा देखील फार महत्वाची आहे. मुलांना आमंत्रित करेल, शिकण्यासाठी प्रोत्साहित करेल अशी ती जागा असावी, असं आम्हाला वाटतं.  त्यासाठी वस्तीतील तीनही केंद्राना नवं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच संध्याकाळच्या वेळात प्राथमिकचा नवीन वर्ग सुरू करण्यासाठी एक जागा भाड्याने घेतली आहे. ह्या जागा आणि तेथील काम आपल्याला बघायला मिळावं म्हणून या वर्षीचा आपल्या ‘थेट भेट’ चा एक कार्यक्रम वस्तीत ठेवला आहे. 

  • पालकांबरोबरचे काम

गेल्या वर्षभरात खेळघराच्या कामात पालकांना जोडून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, या कामाच्या बाबतीतील आमच्या दृष्टीकोनात झालेला बदल! पूर्वी पालकांसमवेतचं काम म्हणजे त्यांच्या जाणीवजागृतीचं काम असं आम्हाला वाटत असे. मात्र आता पालक देखील खेळघराच्या कामात चांगला सहभाग घेऊ शकतात हा विश्वास वाटत आहे. कोविडच्या काळामध्ये पालकांना स्वतःच्या आणि सभोवतालच्या मुलांचा अभ्यास घेता यावा म्हणून प्रशिक्षणं घेऊन आम्ही प्रोत्साहन दिलं होतं. शाळा सुरू झाल्यावर हे वर्ग बंद झाले तरीही काही पालकांना शिकण्याशिकवण्यात रस निर्माण झाला. ‘खेळघर मित्र’ या नावाचा गट तयार झाला. त्यांचे आठवडी वर्ग सुरू झाले. गटात सातवी-आठवी  पर्यंतचं शिक्षण घेतलेले काही पालक आहेत. त्यातील तीन महिला प्राथमिकच्या वर्गांबरोबर सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यातल्या दहा  पालकांनी स्वतःच्या घरी छोटं वाचनालय चालवण्याची कल्पना पुढं नेण्यात रस दाखवला. अशी सहा पेटी वाचनालयं नियमित सुरू झाली आहेत. आपल्या प्रकल्पातून वस्ती पातळीवरचे कार्यकर्ते तयार व्हावेत ह्या दिशेनं काम पुढं जात आहे याचं समाधान मनात आहे.

  • नवे आयाम

गेल्या वर्षभरात आम्ही कार्यकर्ते खूप काही नवीन शिकलो आणि त्यामुळे मुलांबरोबरच्या कामात नव्या आयामांची भर पडली आहे. विप्रो फौंडेशनच्या माध्यमातून ‘आर्ट स्पार्क’ या बेंगलोरच्या संस्थेकडून आम्ही जीवन कौशल्यांच्या शिक्षणात कलेचा कसा उपयोग होऊ शकतो हे शिकलो. ‘विरीडस’ या बेंगलोरच्या संस्थेच्याकडून मानसिक आरोग्य आणि गटातील हार्मनी या संदर्भात शिकलो. गट बांधणीच्या प्रक्रियेत हे शिक्षण फार उपयोगाचे आहे. ‘ओ.ई.एल.पी.’ या राजस्थानमधील संस्थेकडून भाषा शिक्षणासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकलो तसंच ‘जोडोग्यान’ या दिल्लीच्या संस्थेकडून गणित शिक्षणाच्या पद्धतीत देखील काही नव्या गोष्टींची भर पडली. नवीन शिकणं हे पंख लाभण्यासारखं मनोहर असतं. त्यामुळं कामाचा उल्हास वाढतो. या वर्षी खेळघरातील कामात या सा-या

प्रशिक्षणांचं प्रतिबिंब दिसावं असा प्रयत्न आहे. 

  • खेळघरातील उपक्रम

गणित, भाषा आणि इंग्रजीच्या अभ्यासवर्गांबरोबरच जीवनकौशल्यांच्या कामासाठी पुस्तक प्रदर्शन, दुकान जत्रा, सहली, आरोग्य महिना असे विविध उपक्रम केले गेले. या धमाल उपक्रमांची आखणी आणि कार्यवाही मुलांच्या सहकार्यानं केली जाते. त्यातून विचारपूर्वक निर्णय घेणं, जबाबदारी घेणं, गटबांधणी अशा अनेक जीवनकौशल्यांची रुजवात होते.

युवक गटाची काही मुलं-मुली दरवर्षी नर्मदा बालमेळ्यामध्ये मदत करण्यासाठी जातात. एका महत्वाच्या सामाजिक कामातील हा सहभाग या मुलांसाठी फार शिकवून जाणारा असतो.   

  • शिक्षक प्रशिक्षण

मानसी महाजन (भाषा), ज्योती कुदळे (जीवन कौशल्यं), राधा जोशी (मानसिक आरोग्य),  अमृता ढगे (कला) आणि वंदना कुलकर्णी (वाचन) या विषय तज्ञांची कामातील दर्जा वाढवण्यासाठी खूपच मदत होते.

या बरोबरच सुमित्रा मराठे, संध्या फडके, विपुल अभ्यंकर आणि सुषमा यार्दी गणित शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करतात. अपर्णा क्षीरसागर भाषा विषयासंदर्भात आणि जिथं गरज असेल तिथं शुभदा जोशी याही शिक्षक प्रशिक्षणात सहभागी असतात.

  • खेळघराचा विस्तार प्रकल्प

 आनंदानं शिकण्याच्या दिशेनं हा विचार, त्यासाठी आवश्यक असलेली  नीती आणि पद्धती ही अनेकांपर्यंत पोचावी म्हणून गेली १५ वर्षे अनेक शिक्षक कार्यकर्त्यांबरोबर आम्ही काम करत आलो. त्यासाठीची साधन व्यक्तींची सक्षम टीम देखील आता तयार झाली आहे. विप्रोच्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून भारतभरातील शिक्षक या प्रशिक्षणांमध्ये सहभागी होऊ शकतात. सी.एस.ए. (महाराष्ट्र), ग्रामऊर्जा (आंबेजोगाई), विद्योदय (इचलकरंजी), नवजीवन (कल्याण) अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार मदत करत आहोत.

  • नवदुर्गा पुरस्कार

गेल्या ऑक्टोबर मध्ये पालकनीती खेळघराच्या कामासाठी शुभदा जोशी यांना लोकसत्ताच्या माध्यमातून ‘नवदुर्गा पुरस्कार’ मिळाला. समाजाकडून आपल्या

कामाला मिळालेली अशी दाद कार्यकर्त्यांना उभारी देते.

खेळघराच्या कामासमोरची आव्हानं

  • मुलांचं वार्षिक मूल्यमापन

मुलांच्या मूल्यमापनातून आमच्या असं लक्षात आलं की पहिली ते पाचवी या वयोगटातील मुलं भाषा आणि गणितात त्यांच्या इयत्तेला अपेक्षित एवढ्या पातळीपर्यंत चांगली पोचू शकत आहेत. मात्र कुमारवयीन मुलांतील (५-७ वी) काही मुलं मागं पडत आहेत. मुलगे अतिशय व्रात्य, बंडखोरीनं वागत आहेत. घरातून प्रेम आणि सुरक्षितता मिळाली नाही की मुलं बाहेर त्याचा शोध घेऊ लागतात. त्यातून अनेक नकारात्मक प्रभावांच्या विळख्यात सापडतात. अशा मुलांना समजून घेणं शिक्षकांनादेखील अवघड जातं. मुलीदेखील अधिक आक्रमक बनल्या आहेत. या लहान वयात लैंगिकतेसंदर्भातल्या अनेक गोष्टी मुलांमुलींना अस्वस्थ बनवत आहेत. लहान वयात हातात आलेल्या मोबाईलचाही यात मोठा रोल आहे. 

या बाबतीत आम्ही  प्रयास संस्थेच्या मैत्रेयी कुलकर्णी आणि शिरीष दरक यांचा सल्ला आणि मदत घेत आहोत. 

  • संख्येचा प्रश्न

विशेषतः दुपारच्या बॅचेस मधील मुलांची संख्या कमी होते आहे असे लक्षात येत आहे.

मुलांना क्लास लावणं, इंग्लिश मिडीयममध्ये घालणं अशा विविध कारणांमधून नेमका शोध घेण्यासाठी आम्ही मे मध्ये एक संपूर्ण वस्तीपातळीवरचा सर्व्हे केला आहे. त्याच्या विश्लेषणाचं काम चालू आहे. त्यातून  काही कारणांचा उलगडा होईल.

  • हिंसेचा आत्मघातकी मार्ग

वस्तीपातळीवरचं काम म्हटलं की हरघडी नवनवीन आव्हानं समोर उभी राहत असतात. त्यातली काही मात्र अगदी हलवून टाकणारी असतात. गेल्याच महिन्यात वस्तीत एका तरुणाचा खून झाला. या खुनात पूर्वी खेळघराच्या  संपर्कात असलेला आणि नंतर संपर्क तुटलेला एक मुलगा देखील सहभागी होता. या घटनेनं आम्हाला खूप अस्वस्थ बनवलं.

मूल सकारात्मक मार्गावर राहावं यासाठी खेळघराशी जोडलेलं रहाणं अतिशय महत्वाचं आहे. दहावीनंतर युवकगटात मुलं आठवड्यातून एकदाच आमच्या संपर्कात येतात. प्रत्येक मुलाशी संवाद ठेवणं अवघड बनतं. या प्रसंगामुळे पुन्हा एकदा आमच्या कामाचा वेळ कमी पडण्याच्या मर्यादा लक्षात आल्या. वस्तीतील नकारात्मक गोष्टींच्या प्रभावांमुळे मुलं वाईट मार्गांकडे वळत तर नाहीत ना याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यासाठी आम्ही अधिक सजगपणे काम करायचं ठरवलं आहे.

  • इंग्रजीचे वर्ग

 गेली दोन वर्षे दीपाली पोतदार यांनी खेळघरातील इंग्रजी शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. गेल्या वर्षी मात्र त्यांना तब्येतीच्या कारणामुळे ही जबाबदारी अर्ध्यातून सोडावी लागली. या वर्षी खेळघराच्या शिक्षिकांनीच ही जबाबदारी घ्यायची असं ठरवलं आहे. इंग्रजी विषय मुलांना आवडेल आणि समजेल अशा सर्जनशील पद्धतींची ओळख मानसी महाजन शिक्षकांना करून देत आहेत.

  • पुढची फळी तयार होणं गरजेचं

खेळघराच्या पहिल्या फळीतले आम्ही सगळे कार्यकर्ते आता साठीच्या पलीकडे गेलो आहोत. त्यामुळे आता स्वयंसेवी कार्यकर्ते आणि पगार घेऊन काम करणारे कार्यकर्ते अशी पुढची फळी तयार होणं अत्यंत आवश्यक आहे. जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची ताकद आणि सर्जनशीलता अशा दोन्हीतून कार्यकर्ते घडतील.

सध्या प्रियांका पाटील आणि अनुराधा चव्हाण यांनी खेळघराच्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी घेतली आहे. त्यांना नवीन स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत मिळावी आणि काम अधिक समृद्ध व्हावं यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहोत. ‘थेट भेट’ कार्यक्रम आणि हे वार्तापत्र हे नवीन लोकांपर्यंत पोचण्यासाठीचाच एक उपक्रम आहे. 

  • सर्वात मोठं आवाहन आहे निधी संकलनाचं!

या वर्षी आमचे दोनही मोठे फंडर्स म्हणजे विप्रो आणि यार्दी  फौंडेशन यांनी हे वर्ष त्यांचं शेवटचं वर्ष असेल असं सांगितलं आहे. दोन्ही मिळून जवळपास ३० लाख इतकी रक्कम उभी करण्याचे आव्हान समोर आहे. पैशांची विवंचना नसली म्हणजे कामावर चांगले लक्ष केंद्रित करता येतं. पण प्राप्त परिस्थितीमध्ये ते शक्य होणार नाही असं दिसतं. युवक गटातील मुलांची संख्या देखील ४५ पर्यंत गेली आहे, शैक्षणिक मदतीचे बजेट सात लाखांवर गेले आहे. आपल्यासारख्या मित्र  आणि सुहृदांच्या मदतीवरच आता कामाचा व्याप पुढं न्यायचा आहे.

पुढील वर्षातील योजना

मे महिन्यात झालेल्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेमधून काही ठोस उपयांपर्यंत आम्ही पोचलो आहोत त्याबद्दल –

  •  वस्तीत चौथी भाड्याची जागा घेऊन सायंकाळचा प्राथमिकचा वर्ग सुरू करणं.
  • वस्तीतील सर्व कुटुंबांतील ३-१८ या वयोगटातील मुला- मुलींचा सर्व्हे करून त्यावरून वस्तीचं बदललेलं प्रारूप जाणून घेणं.
  • वस्तीतील जी मुलं खेळघरात येत नाहीत त्यांच्यासाठी  वर्कशाँप्स घेणं.
  • लक्ष्मीनगर वस्तीमध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांबरोबर  कॉन्फरन्स घेणं, एकमेकांच्या कामाबद्दल जाणून घेणं आणि एकमेकांना काही मदत करता येते का याचा शोध घेणं.
  • जीवन कौशल्यांचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन कसं करायचं याची आखणी करणं.  
  • स्वतःच्या भावना समजून घेणं आणि त्यांचं समायोजन करू शकणं  यासाठीच्या उपक्रमांची आखणी राधा जोशी करत आहेत. 
  • सर्व मुलांसमवेत समजुतीसह वाचन, भावना आणी विचार व्यक्त करणारं   नेमकं लेखन,  या मुद्द्यांवर काम व्हावं यासाठी मानसी महाजन काम करत आहेत.  
  • भूमिती आणि शाब्दिक गणित जीवन व्यवहाराशी जोडून मुलांना कशी शिकवता येतील यावर काम.

        आवाहन

  • खेळघराचं काम समजून घ्या. सहभागी व्हा. शक्य आहे तेवढा हातभार लावा.
  •  खेळघराच्या कामाला वेळ, पैसे आणि कौशल्यं यातील कोणत्याही मार्गानं खेळघराशी जोडून घेण्याची आपली इच्छा असेल तर जरूर संपर्क साधा.
  • आपल्या ओळखीची एखादी आर्थिक मदत करणारी संस्था असेल किंवा CSR असेल तर आम्हाला संदर्भ कळवा.

(आपण दिलेली देणगी ही आयकर कायद्याच्या कलम (80G) नुसार कर सवलतीस पात्र आहे.)

आपल्या मनात खेळघरासाठी एक विशेष जागा आहे,  आमच्यासाठी हे  फार महत्त्वाचं आहे.  मनापासून धन्यवाद !    

     संपर्क –  खेळघर

गुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर,पुणे-  ४११०५२.

                फोन – ९८२२८७८०९६, ९८२२०९४०९५, ९७६३७०४९३०.

E-mail: khelghar@gmail.com

Website-www.palakneeti.in

               Khelghar YouTube channel: https://www.youtube.com/khelghar

   Bank details

Account Name – Palakniti Pariwar Bank Name: State Bank Of India

Account No: 35689944253, Type of Account: Current account

IFSC Code: SBIN0001110, Branch Code: Deccan Gymkhana 01110