चिऊताईचं शेतकरीदादाला पत्र

प्रिय शेतकरीदादा,

आपल्याला दोघांनाही ज्या गोष्टीबद्दल कळकळ वाटते तेच आज बोलूया.

शेतावरून उडत जाणाऱ्या विमानाला अपूर्वाईनं निरखताना मी तुला पाहिलंय. बसणार काय कप्पाळ म्हणा तू त्यात, सगळा दिवस इथे शेतातच तर घुटमळत असतोस. अर्थात, हे विमानच आपल्याला जोडणारा समान दुवा वाटतो मला. म्हणजे बघ, तुला विमान आवडतं, आणि ते तयार करण्याचं तुम्हा माणसांना आमच्याच कुणा पूर्वजाला पाहून सुचलं असणार, हो नं?

मला तुझ्याशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुझे आभार; दुसरीत मात्र तक्रार आहे बरं का!

आधी आभाराचं कारण सांगते.

‘थँक्यू,’ शेतात बुजगावणं लावण्याबद्द्ल! कसली ‘भारी’ गोष्ट आहे बुजगावणं. बसण्यासाठी शेतात ह्याहून चांगली दुसरी जागा नाही. मी तुझ्या त्या बुजगावण्याच्या डोक्यावर बरेचदा बसते. तिथे बसलं, की कसं शेतात चहूबाजूंना नजर टाकता येते.

आता माझी तक्रार ऐक हं. काल मी तुझ्या शेतातल्या हरभऱ्यातली अळी खाल्ली. खाताच माझं पोट दुखू लागलं. डोळ्यासमोर अंधारी आली. पंख गळून गेल्यासारखे झाले. कशीबशी झऱ्याशी पोचले. पाणी पिऊन गळपटल्यासारखी बसून राहिले. बऱ्याच वेळानं कुठे माझ्या जिवात जीव आला. अळी तर किती चविष्ट असते, मग हे काय?

त्याच कारणानं तर आमची संख्या झपाट्यानं कमी होत नाहीय नं?

तूपण तर हे हरभरे खातोस नं? जरा जपून रे बाबा!

धडधाकट राहिलास तर एक दिवस विमानात जरूर बसू शकशील.

– तुझ्या शेतातली एक चिमणी

मूळ कथा: एक चिडियाकी चिठ्ठी

 

चंदन यादव

साइकिल’ ह्या लहान मुलांसाठी असलेल्या हिंदी द्वैमासिकातून साभार