दीपस्तंभ – जून २०२४
अफगाणिस्तानातील बामियान ह्या ठिकाणाची आजवर आपल्याला एकच ओळख ठाऊक आहे. तिथे असलेले अंदाजे सहाव्या शतकातले बुद्धाचे दोन पुतळे तालिबानी सत्तेने 2001 साली इस्लामविरोधी असल्याचे कारण देत उद्ध्वस्त केले. एक मोठा सांस्कृतिक वारसा त्यामुळे जगाने गमावला. ह्याच बामियानची आशेचा किरण दाखवणारी ही गोष्ट.
2021 साली तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्याबरोबर अफगाणी जनतेला जगभरातून होत असलेला निधीचा पुरवठा थांबला. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याच्या गरजा भागणेच जिथे कठीण होऊन बसले, तिथे शिक्षण, त्यावरील खर्च, ह्या गोष्टी चैनीच्या वाटणारच.
अशीच परिस्थिती काबुलपासून साधारण 130 किमी असलेल्या दुर्गम बामियानच्या खोर्यातही उद्भवली. तिथे प्रामुख्याने शिया हाजरा पंथाचे लोक राहतात. तैबुती प्रदेशात डोंगरांमध्ये असलेल्या गुहांमध्ये ते राहतात. अंगमेहनत करून गुजराण करणार्या ह्या लोकांना सद्यपरिस्थितीमध्ये पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने आला दिवस निभावणे कठीण झाले आहे. स्त्रिया आणि मुलांची परिस्थिती आणखीनच भीषण झाली आहे. एकंदरच अफगाणिस्तानात लाखो मुले शिक्षणापासून वंचित आहेत. दप्तर, वह्या-पुस्तके, पेन-पेन्सिल… कशाचाच खर्च करण्याची लोकांची ऐपत उरलेली नाही.
रुया सरफराज आणि तिची वर्गमैत्रीण बेसबेगम हावरी ह्या साधारण 18-19 वर्षांच्या दोन अफगाणी मुली. तालिबानी गदारोळात इयत्ता अकरावीत त्यांचे शिक्षण सुटले. पण म्हणून शिक्षणाशी असलेला संबंध त्यांनी सुटू दिला नाही. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता त्या दररोज दोन तासांचा प्रवास करून तैबुती भागात येतात. तिथल्या मुलांना पर्शियन, इंग्रजी, गणित, भूगोल, चित्रकला शिकवतात. मुलांच्या मदतीने त्यांनी एका गुहेचे वर्गखोलीत रूपांतर केले आहे. मुलांच्या मनावरचे उदासीचे मळभ कमी होऊन त्यांना शिकण्यात रस वाटावा म्हणून वर्ग आतून चित्रे, कागद लावून सजवला आहे. वय वर्षे चार ते पंधराची 80 मुले-मुली तिथे शिकायला येतात. त्यासाठी कुणाकडून काहीही शुल्क आकारले जात नाही. सरफराज म्हणते, ‘‘इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्याकडे काही नाहीच आहे आम्हाला द्यायला. आम्ही कुठल्या तोंडाने त्यांना काही मागणार? पण ही मुले खूप हुशार आहेत. चित्रकला, कॅलिग्राफी ह्यांत त्यांना चांगली गती आहे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा त्यांच्या चित्रांतून व्यक्त होतात. इथे कुणाला शिक्षक व्हायचे आहे, तर कुणाला पायलट, डॉक्टर.’’ मुलांना आपल्या भावना व्यक्त करता यायला हव्यात, म्हणून ह्या मुलींचा भर आहे तो त्यांना सुशिक्षित करण्यावर.
‘‘मुलांना जगण्याचे ध्येय सापडले आहे, ह्याचा मला विशेष आनंद आहे. कारण महालात राहणारी असोत की गुहेत, मुले सगळी सारखीच असतात. येणारा काळ हा ह्या मुलांचा असणार आहे.’’ बोलताना सरफराजच्या चेहर्यावर उमेद दिसते. त्याचवेळी ती स्वतःचे अर्ध्यात सुटलेले शिक्षण पूर्ण होण्याचीही आस बाळगून आहे.
सौजन्य : मिडल इस्ट मॉनिटर