निसर्गसान्निध्यातून शांती

रोशनी रवी

कशी दिसते शांती? कशी जाणवते शांती? कोणी शांती हा शब्द उच्चारला, की तुमच्या डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं? कुठल्या आठवणी जाग्या होतात? त्यातल्या काही निसर्गाशी जोडलेल्या आहेत का?

पक्ष्यांची किलबिल ऐकत एखाद्या तळ्याच्या काठानं निवांत चालण्याचा अनुभव घेऊन बघा. बागेत गवतावर आरामात पहुडण्याचा आनंद घ्या. निसर्गाचं हे सान्निध्य शब्दांत मांडून तर बघा.

हे प्रश्न स्वतःला, भेटणाऱ्या मुलांना विचारा. त्यांच्याशी ह्याबद्दल जरूर बोला. मी तर म्हणेन, की ह्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करा किंवा नाटकातून त्यांचं सादरीकरण करून बघा.

हा निसर्ग-अनुभव बहुतेकांना आनंददायी, तरल, शांती देणारा आणि त्याच वेळी सजग करणारा वाटत असेल. प्रत्येकाच्या आत आणि बाहेर शांती निर्माण करण्याच्या अनेक संधी निसर्गात आहेत. तिथे वयाची अट नाही.

मुलांनी निसर्ग सान्निध्यातून आनंद मिळवावा, निसर्गाशी त्यांचं नातं जुळावं असं वाटत असेल, तर आपण मोठ्यांनी दोन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

–    मुलांना निसर्गाचं सान्निध्य मिळेल, अशा संधी निर्माण करणं.

–    मुलांसोबत रमणार्‍या, निसर्गाच्या नव्या वाटा धुंडाळणार्‍या, त्याच्याशी नातं जोडणार्‍या मोठ्या माणसांचा मुलांना सहवास लाभेल असं बघणं.

शांतीचे क्षण

आपल्यातले कितीतरी जण दिवसाचा बराचसा वेळ चार भिंतींच्या आतच घालवतात. साधं यातून बाहेर पडलं तरीही किती बरं वाटतं, आपला ‘मूड’ कसा पालटतो, हे आपण कधी ना कधी अनुभवलेलं आहे. 

मी शाळेत शिक्षक होते, ते दिवस मला लख्ख आठवतात. फक्त मुलंच नाही, तर सगळे शिक्षकही वर्गाबाहेर चक्कर मारून यायला अगदी आतूर असायचे. आमचीच शरीरं; पण वर्गाबाहेर पडलं की काही वेगळीच वागायची. खांदे शिथिल व्हायचे, पाय जणू स्प्रिंग बसवल्याप्रमाणे हालचाली करायचे, आवाजात चैतन्य यायचं. सगळे भरभरून श्वास घ्यायचे. आणि खाली वाकून एखादा किडा-कीटक बघताना किंवा आकाशातले ढग किंवा झाडांनी धरलेली छत्री बघताना तेच श्वास आपोआप रोखले जायचे.

आम्ही आमच्या शाळेच्या बागेत आणि एका छोट्या शेतावर काम करायचो. झाडांची निगा राखायचो. शांती अनुभवायची म्हणून काही वेगळं नियोजन केलेलं नसायचं. पक्षी, फुलपाखरं बघताना, शेतात झाडीत बसून चित्र काढताना, झाडाखाली बसून कविता लिहिताना, झाडांना पाणी घालताना, त्यांना रोज वाढताना बघताना, अशा कुठल्याही रूपात शांती अनुभवायला मिळायची. 

निसर्ग : मार्गदर्शक, मित्र आणि आरसा

मुलांचं निसर्गाशी घट्ट नातं जुळलं, की त्यातून सुंदर अभिव्यक्ती जन्म घेते. निसर्ग तटस्थ, बिनशर्त मित्र आणि श्रोत्याची भूमिका घेतो. 8-9 वर्षांच्या मुलांना मी पर्यावरण हा विषय शिकवायचे. तेव्हा मुलांशी बोलायला अनेकदा मी निसर्गमित्रांना बोलवत असे. झाडांबद्दल शिकत असताना प्रत्येक मुलानं शाळेच्या आवारातलं एक झाड मित्र म्हणून निवडलं होतं. काहींनी वेली निवडल्या तर काहींनी वृक्ष. त्या मुलांनी या वृक्ष-वेलींना पत्र लिहिली. त्यांची गाऱ्हाणी मांडली, भावना व्यक्त केल्या, स्वप्नं सांगितली, कडूगोड अनुभव सांगितले.   

निसर्ग आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहे; आपले अनुभव कवेत घेण्यासाठी उत्सुक असा! आणि मुलांसाठी तर तो नेहमी उपलब्ध असलेला श्रोता आणि मित्र होऊ शकतो.

शांतिपूर्ण कृती : स्वतःसाठी, इतरांसाठी आणि जगासाठी

निसर्गाचं सान्निध्य आपल्याला विसाव्याचे क्षण देतं. काळजी घेणं आणि करुणा शिकवतं. जगण्याचा वेग कमी केला, की आपण आपसूकच स्वतःकडे लक्ष देऊ लागतो, स्वतःची काळजी घेऊ लागतो. निसर्गातलं परस्परावलंबन आणि जोडलेपण ह्यांच्याकडे लक्ष दिलं, की खूप काही कळायला लागतं. प्राणी त्यांच्या लहानग्यांची कशी काळजी घेतात किंवा झाडं फुला-फळांचा कसा सांभाळ करतात, हे बघून मन भरून येतं. 

पुढे ही मुलं स्वतःही निसर्गाची काळजी घेऊ लागतात, झाडांवर माया करू लागतात, पिलांची काळजी घेतात. अशी मुलं मग आपोआपच स्वतःची आणि आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घेऊ लागतात.

नवी क्षितिजं

निसर्गाशी नातं जोडण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या लहानग्यांना करता येतील अशा काही कृती सांगते –

भ्रमंती

झाडं, कीटक, पक्षी बघत निवांतपणे केलेली भ्रमंती मुलांना निसर्गाच्या जवळ आणते. आपला जगण्याचा वेग कमी करायलाही ह्याचा उपयोग होतो. आपल्या परिसरावर प्रेम करायला, त्याच्याशी मैत्र जोडायला जिज्ञासूपणे केलेलं निसर्गाचं निरीक्षण कामी येतं.   

निसर्गकट्टा

आयुष्यात अनेक बाबतीत जे तत्त्व लागू होतं तेच याही बाबतीत लागू आहे. सराव आणि नियमितपणा. निसर्गाशी नातं जोडायचं असेल तर त्याला नियमितपणे भेटलं पाहिजे, नाही का? तुमच्या परिसरात, घराजवळ, शाळेजवळ अशी एखादी जागा शोधा जिथे तुम्हाला नेहमी जाऊन बसता येईल. हा असेल तुमचा निसर्गकट्टा. ही एखादी खिडकी, गच्ची, किंवा बागेतला बाक; काहीही असू शकतं. तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा या ठिकाणी जाऊन बसा. 15-20 मिनिटं तरी तिथे थांबा. तेवढ्यात जे जीव दिसतील, त्यांची टिपणं ठेवा. अगदीच काही नाही तर मन लावून बघा. प्रत्येक वेळी तुम्हाला नवंच काही तरी गवसेल. तुमच्या ह्या कट्ट्यावर दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी जाऊन बघा. वेगवेगळ्या ऋतूंत जाऊन बघा. मजा येईल.

पंच ज्ञानेंद्रिये

भटकताना, कट्ट्यावर बसलेलं असताना आपला परिसर आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांनी अनुभवण्याचा प्रयत्न करा. मुलांशी ‘ट्रेझर हंट’ खेळा. इथे शोध घ्यायचा असेल एका वेगळ्याच खजिन्याचा. तुम्ही पाहत असलेलं, वास घेतलेलं, स्पर्श केलेलं, ऐकलेलं आणि चव घेतलेलं काही तरी वेगळं मुलांना दाखवा आणि त्यांना सापडलेला संवेदनांचा खजिना तुम्हीही अनुभवा. एका वेळेला एकाच संवेदनेचा अनुभव असंही करता येईल.    उदाहरणार्थ, तुमच्या निसर्गाकट्ट्यावर बसून 10 मिनिटं फक्त सभोवतालच्या निसर्गातले आवाज ऐका. प्रत्येक आवाज कुठून येतोय याचा अंदाज करा. एका कागदावर प्रत्येक आवाज आणि त्याचा स्रोत लिहून आवाजाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करा. हा खेळ खेळताना तुम्हाला काय वाटले बघा. (चव घेताना मात्र जरा जपून! फक्त ओळखीच्या आणि निर्धोक गोष्टींचीच चव घ्या.)  

नोंदवही

प्रत्येक वेळी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आल्यावर काही तरी चितारण्यासाठी, सापडलेलं चिकटवण्यासाठी, लिहिण्यासाठी एक छानशी नोंदवही करा. निसर्गनिरीक्षणातून प्रेरणा घेऊन कविता लिहून  बघा, कधी कुंडीतलं रोपटं न्याहाळा.

पहिल्यांदाच अशी नोंदवही लिहिणार्‍यांना सुरुवात करून देण्यासाठी काही शब्दप्रयोग सुचवते –

–    भटकंतीला गेल्यावर मला ….. आवडतं.

–    माझ्या मनात घर केलेली निसर्गातली आठवण

–    माझ्या लाडक्या झाडा…

–    मला पक्ष्यासोबत आकाशात उडता आले तर

–    मला शांतवणारे निसर्गातले आवाज

प्रश्नांनी भरलेल्या या जगात, खास करून नैसर्गिक अधिवास आणि हवामान बदल यासारख्या पर्यावरणाची काळजी वाढवणार्‍या प्रश्नांचा डोंगर उभा ठाकलेला असताना, मानवाने पर्यावरणावर घातलेले घाव आणि पर्यावरणातली शांतता ह्यांचा प्राधान्यानं विचार व्हायला हवा. 

या सगळ्याचा अर्थ लावण्यासाठी आणि आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपल्या धरणीमातेसाठी आपण नेमकं काय करणार आहोत? मला नेहमी प्रश्न पडतो, की ‘बियाँड इकोफोबिया – रिक्लेमिंग द हार्ट इन नेचर एज्युकेशन’ (Beyond Ecophobia-Reclaiming the Heart in Nature Education) ह्या पुस्तकात लेखक-शिक्षणतज्ज्ञ डेव्हिड सोबेल म्हणतो तसं आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायला हवी आहे का?

निसर्गाच्या भळभळत्या जखमांची मलमपट्टी करायला सांगण्याआधी मुलांना निसर्गाशी नातं निर्माण करण्याची संधी मिळाली पाहिजे. प्रेम करायला शिकणं. जरा थांबायला शिकणं. शांतीचे / विसाव्याचे क्षण शोधायला शिकणं. मोठी माणसं म्हणून मुलांना आपण ह्या गोष्टी संकटाला, हिंसाचाराला द्यायचा प्रतिसाद आणि प्रतिकार म्हणून शिकवू या. तुम्ही माझ्याशी सहमत असाल, अशी मला अशा वाटते. 

संदर्भ: Peace Begins with You by Katherine Scholes

Beyond Ecophobia: Reclaiming the Heart in Nature Education by David Sobel

­lfonso, S. (2014). Peace education in early childhood education. Journal of Peace Education and Social Justice, 8(2), 167-188.

(S., 2014) (Scholes, 1989)

रोशनी रवी

ravi.roshni90@gmail.com

लेखक शालेय शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश