परीघ विस्तारण्यासाठी…

निवेदिता भालेराव

आनंद निकेतन शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापक.

1998 साली आमची शाळा सुरू झाली. सुरवातीला चाचपडत, तोत्तोचान, सृजनआनंद, अक्षरनंदन, समरहिल यांनी दाखवलेल्या वाटेवरून धडपड करत पुढे जात होतो. या धडपडीत आम्हाला जे सापडत होते, हाती लागत होते ते सगळ्यांपर्यत पोहोचवावे या दृष्टीने स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आम्ही लिहू लागलो. कधी एखाद्या उपक्रमाबद्दल एखादा लेख लिहावा. कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत ओरिगामी किंवा तत्सम कलाकृती शिकवणारे सदर लिहावे, वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांसाठी तीन-तीन दिवसांच्या गंमतजत्रा घ्याव्यात, कुठे कसले प्रशिक्षण असेल तर ते आपल्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यासाठी धडपड करावी, असे प्रयत्न  करून आम्ही आमचा आत्मविश्वास वाढवत तर होतोच आणि ‘जे आपणांसी ठावे, ते इतरांसी सांगावे, शहाणे करोनि सोडावे, सकळ जन!’ या उक्तीप्रमाणे लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्नही करत होतो. जसाजसा आमचा अनुभव वाढत गेला तसतशी तो वाटून घेण्याची गरजही अधिकाधिक जाणवत गेली. 

‘प्रयोगशील शाळा’ म्हणजे नेमके काय, असा प्रश्न खूप जणांना पडतो. इतर शाळांपेक्षा इथे वेगळे काय घडते, त्याचे महत्त्व काय, अशा अनेक शंका सगळ्यांच्या मनात असतात. आमचे ‘शाळा एक मजा’, हे पुस्तक या प्रश्नांची उत्तरे देते. जानेवारी 2010 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती शाळेनेच प्रकाशित केली. बऱ्याच पालकांच्या मनात शाळा कशी निवडावी याबद्दल स्पष्टता नसते. शाळा निवडताना नेमके कोणते निकष असले पाहिजेत, आजूबाजूला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा दिसत आहेत त्यातून आपल्या पाल्याला कुठली शाळा योग्य ठरेल, हे ठरवण्यासाठी हे पुस्तक खूप मदत करते. आता या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघाली आहे. 

लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत आम्ही करत असलेल्या शैक्षणिक प्रयोगांबद्दल लिहिण्याची संधी आम्हाला मिळाली. ‘प्रयोग’शाळा या सदरातून दर पंधरा दिवसांनी शाळेतील ताई आपापल्या प्रयोगांबदल, उपक्रमांबद्दल लिहीत होत्या. वर्षभरात जवळजवळ 25 लेख लिहून झाले. त्यानंतर विस्तारित स्वरूपात, नवीन विषयांवरील लेख समाविष्ट करून 2012 साली ‘सहजशिक्षणाची प्रयोगशाळा’ हे पुस्तक साकारले. त्याच्याही आता तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 2013 सालचा ‘उत्कृष्ठ शैक्षणिक पुस्तक’ हा पुरस्कार मिळाला आणि शिक्षकांचा, पालकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. आम्ही ‘प्रयोग’शाळा हे सदर लिहीत होतो, ते वाचून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक शाळा बघायला येऊ लागले. शाळेचा परीघ विस्तारण्याची, शाळेची संकल्पना आणि शिक्षणपद्धतीचा प्रसार होण्याची ही खरी सुरवात होती, असे म्हटले तरी हरकत नाही. 

आम्ही शाळा सुरू केली तेव्हा आपण हा ‘प्रयोग’ करून पाहात आहोत याची कल्पना होती. अशा प्रकारची शाळा असू शकते हे एक मॉडेल आम्हाला समाजापुढे ठेवायचे होते. आम्ही करत असलेले प्रयोग जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचे असतील तर अशा शाळा ठिकठिकाणी सुरू होणे, जास्तीत जास्त शिक्षकांनी प्रयोगशील होणे गरजेचे आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या ठिकाणचे शिक्षक शाळा बघायला येऊ इच्छितात तेव्हा शाळेच्या कामकाजात व्यत्यय आला तरी आम्ही त्यांना लगेच परवानगी देतो. आमच्या मुलांचे लेखन, प्रकल्प, त्यांनी बनवलेल्या वस्तू, आमच्या ताईंनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य, आम्ही वापरत असलेले संदर्भसाहित्य अशा सगळ्या गोष्टी दाखवतो, शाळेच्या शिक्षणपद्धतीचा एक स्लाईड शो दाखवून त्यांचे शंकानिरसन करतो. आम्ही असे मानतो की यातल्या चाळीस शिक्षकांपैकी चार शिक्षकांनी जरी ही पद्धती वापरली तरी हरकत नाही. कारण हळूहळू का होईना पण परीघ विस्तारत आहे. 

शाळांप्रमाणेच, नाशिक परिसरातील शिक्षण महाविद्यालयांतील (बी.एड. कॉलेजेस) विद्यार्थी प्रकल्प म्हणून शाळेच्या एखाद्या वैशिष्ट्याचा अभ्यास करण्यासाठी शाळेत येतात. शाळेच्या पालकांसाठी नियमित पालकसभा शाळेत असतातच, त्याशिवाय 1998 सालापासून आम्ही दरवर्षी एका खुल्या पालकसभेचे आयोजन करत आहोत. या सभेत शिक्षणाशी, मुलांशी आणि पालकत्वाशी, आरोग्य, स्नेही पर्यावरण, जीवनशैलीशी संबंधित अनेक विषय आम्ही हाताळले आहेत. मिथिला दळवींच्या अध्ययन-शैली ( Learning Styles) या विषयावरील पालकसभेतून पालकांना आणि शिक्षकांना अध्ययन-शैलींच्या विविधतेबद्दल समजले. प्रत्येकाच्या अध्ययन शैलीनुसार अध्यापन असले पाहिजे हा महत्त्वाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचला. Kinesthetic (प्रत्यक्ष कृती करून शिकणारे), Auditory (श्रवण आणि संभाषणाद्वारे शिकणारे), Visual (डोळ्यासमोर चित्र, वस्तू, प्रत्यक्ष ठिकाण या गोष्टी आणून शिकणारे) अशा प्रकारच्या शैलींबद्दल समजल्यावर पालकांना आपल्या पाल्याकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. 

– अशीच एक पालकसभा डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. सुखदा चिमोटे यांची. या सभेचा विषय होता मुलांच्या वर्तनविषयक समस्या. अतिशय सोप्या भाषेत डॉक्टरांनी पालकांशी संवाद साधला- आजच्या स्मार्ट, टेक्नोसॅव्ही मुलांसाठी पालक म्हणून आपणही तयार असले पाहिजे, मुलांचे फक्त पालक असण्यापेक्षा त्यांचे मित्र झालो तर समस्यांपेक्षा संवाद वाढायला मदत होईल. 

मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी भाषा कशी शिकवायची या विषयावर मुंबईच्या डॉ. मीनल परांजपे यांनी एका पालकसभेत मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा चांगली येण्यासाठी इंग्रजी माध्यमाची आवश्यकता नाही, भाषाशिक्षण वैज्ञानिक पद्धतीने दिले गेले तर कोणतीही भाषा मुलांना सहजतेने आत्मसात करता येते… असे सांगून त्यांनी मराठी पालकांचा आत्मविश्वास वाढवला.  

अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा नसतात, असल्या तरी मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करायला कधीच मिळत नाहीत हे वास्तव आहे आणि यासाठी आपण काहीतरी करायला हवे हा विचार सुरवातीपासूनच होता. त्यामुळे सुरुवातीला सुट्ट्यांमध्ये विज्ञानशिबिरे घेऊन थोडा प्रयत्न करून पाहिला. पण हा प्रयत्न फारच मर्यादित होता. आमची प्रयोगशाळा बघताना शिक्षक अगदी हरखून जात असत. प्रयोगशाळेतील साहित्य बघताना, वेगवेगळी मॉडेल्स खेळताना शिक्षकांनाच मजा येत असे. काही काही शिक्षकांनी तर पहिल्यांदाच प्रयोगशाळा पाहिली आहे असेही जाणवे. तेव्हा आम्हाला वाटले की शिक्षकांची ही अवस्था असेल तर मुलांचे काय, तेव्हा एखादे विज्ञान-केंद्र आपल्या शाळेत असावे, जिथे इतर शाळांमधील मुले येऊन किमान अभ्यासक्रमातील प्रयोग करून बघतील, काही अ‍ॅक्टिव्हिटीज घेता येतील. या विचारातून ‘डॉ. कमला सोहोनी विज्ञानकेंद्रा’ची निर्मिती झाली. या केंद्रातर्फे आता ‘खेळातून विज्ञान’, ‘कुतूहल’, यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीज, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी असे उपक्रम घेतले जातात. विज्ञानकेंद्राचे काम हळूहळू गती घेत आहे.

बालवाडीचे प्रशिक्षण, इंग्रजी, गणिताचे प्रशिक्षण असेही काही कार्यक्रम आम्ही करत असतो. शाळांच्या मागणीप्रमाणे आम्ही प्रशिक्षणाचा आराखडा तयार करतो आणि त्याप्रमाणे कधी त्या त्या ठिकाणी जाऊन किंवा शाळेत प्रशिक्षणे होत असतात. 

शिक्षणविषयक नवा विचार सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही अशा पुस्तकांची भाषांतरेही केली. सिल्व्हिया अ‍ॅश्टन वॉर्नर लिखित, न्युझिलंडच्या माओरी या आदिवासी मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी अतोनात झटणाऱ्या, वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या आणि आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण करणाऱ्या शिक्षिकेची कहाणी असणाऱ्या ‘टीचर’ या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर अरूण ठाकूर यांनी केले. हे पुस्तक महराष्ट्रात खूप लोकप्रिय झाले. अनेक शिक्षक यापासून प्रेरणा घेतात. अरूणदादांना आपल्या शाळेत बोलावतात आणि आमच्या शिक्षणपद्धतीविषयी जाणून घेतात. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. कृष्णकुमार यांच्या  “What is worth Teaching’ या पुस्तकाचेही भाषांतर अरूणदादांनी ‘शिकवण्यायोग्य काय आहे’, या नावाने केले आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षणकेंद्र, मुंबई यांनी निर्माण केलेल्या ‘हलके फुलके विज्ञान’ या इयत्ता पहिली, चौथी आणि पाचवी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर दीपाताईंनी केले आहे. खरे विज्ञान शिकणे म्हणजे प्रश्न पडणे, प्रश्न विचारणे, उत्तरांचा शोध घेण्यासाठी निरीक्षणे करणे, नोंदी ठेवणे, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण करणे अशा अनेक गोष्टी असतात. अशा विज्ञानशिक्षणाला वाव देणारी ही पुस्तके खरे तर सर्व शाळांनी वापरायला हवीत. 

शाळेचा परीघ विस्तारण्याची आणखी एक संधी दोन वर्षांपूर्वी आमच्याकडे चालून आली, CEQUE (Centre for Equity and Quality in Universal Education ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था ढशरलहशी झरसशी नावाचे यु ट्युब चॅनल चालवते. या चॅनलवर वेगवेगळ्या प्रयोगशील शिक्षकांचे वर्गात शिकवतानाचे व्हिडिओज बघायला मिळतात. आनंदनिकेतनमधील चार शिक्षकांच्या तासिकांच्या चित्रीकरणाचा त्यात समावेश आहे. हे व्हिडिओज अनेक शिक्षक बघतात आणि आपापल्या स्तरावर यातील तंत्रे वापरून बघतात.

याचबरोबर शाळेचे संकेतस्थळ (www.anandniketan.ac.in) आणि फेसबुक पेजही (Anand-Niketan-Nashik-Maharashtra) आहे. शाळेच्या फेसबुक पेजवर शाळेत होणाऱ्या उपक्रमांचे, प्रदर्शनांचे, मुलांच्या व ताईंच्या उल्लेखनीय लिखाणांचे, सहलींचे, शाळेच्या कार्यक्रमांचे, मुलांनी निर्मिलेल्या कलाकृतींचे फोटो वेळोवेळी बघायला मिळतात. 

आनंदशिक्षणाचा परीघ विस्तारण्यासाठी ही काही छोटीछोटी पावले आम्ही टाकत आहोत. येणाऱ्या संधींचा पुरेपूर वापर करत, नवीन संधीच्या शक्यता शोधत पुढे जात आहोत. 

niveditabhalerao296@gmail.com