प्रतिसाद – जून २००३

फेब्रुवारीच्या अंकातील मूल्यशिक्षणावरील लेख वाचला. आजच्या काळात मूल्यशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हे शिक्षण प्राथमिक शाळेपासूनच दिले पाहिजे. कारण लहानपणी लागलेल्या सवयी कायम रहातात. मूल्यं शिकविताना नुसतं एखादं वाक्य न शिकवता, त्याला अनुसरून एखादी गोष्ट सांगितली पहिजे, जेणेकरून मुलांना ती गोष्ट पटकन समजेल किंवा त्यांच्यावर त्याचा परिणाम होईल.

‘नेहमी खरे बोलावे.’ हे नेहमीच मुलांना सांगितलं जातं. पण दुर्दैवाने घरीच त्यांच्यासमोर असे प्रसंग घडतात की खुद्द वडीलधारी मंडळीच धादांत खोटं बोलताना आढळतात. मग अशावेळी मुलांना प्रश्न पडतो, नेमकं आपण काय करावं? म्हणून हे मूल्य सांगताना लाकूडतोड्याची गोष्ट त्यांना सांगावी. त्याची कुर्‍हाड नदीत पडली, पण तो जलदेवतेशी खरं बोलल्यामुळे त्याचा कसा फायदा झाला, हे सांगता येईल.

‘श्रमप्रतिष्ठा’ या मूल्याचं ही अक्षरश: अवमूल्यन झालं आहे. या ना त्या रूपाने झटपट श्रीमंती मिळविण्याची वृत्ती वाढली आहे. दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रमातून ते मनावर ठसविलं जातं आणि मुलंही झटकन आपण सगळी सुखं कशी मिळवू शकू याचा विचार करतात. तेव्हा हा मार्ग चांगला नसून, श्रम करूनच प्रत्येक गोष्ट मिळविली पाहिजे, त्याचे समाधान काही और असते. त्यातून मिळालेला मोठेपणा, प्रतिष्ठा ही शाश्‍वत असते, हे त्यांना सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या उद्योजकांच्या कथा मुलांना समजतील, अशा स्वरूपात सांगितल्या पाहिजेत.

‘सामाजिक शिस्त’ याचं भानही ही कोणाला राहिलेलं नाही. नुसतं नागरिकशास्त्र शिकवून मुलांना त्यातलं काही कळत नाही. अभ्यास या दृष्टीने मुलं ते वाचतात आणि परीक्षा देतात. प्रत्यक्षात कृती शून्य. सामाजिक शिस्त यात अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा समावेश होतो – उदा. कुठेही आपण रांगेची शिस्त पाळली पाहिजे. रेल्वेचं तिकीट काढताना, बसकरिता आपण थांबतो, तेव्हा रांगेत उभं रहाणं कसं आवश्यक आहे, हे मुलांना दाखवून दिलं पाहिजे. एखादा पदार्थ बाहेर खाा तरी त्याचा कागद तिथेच रस्त्यावर न टाकता कचर्‍याच्या डब्यातच टाकला पाहिजे. तो जर उपलब्ध नसेल तर तो घरी येऊन टाकला पाहिजे.या सर्व गोष्टी आपण पालकांनी करून दाखविल्या पाहिजेत. घरात वावरताना एका खोलीतून दुसर्‍या खोलीत गेलो तर दिवा, पंखा बंद करणे, हे मुलांना सांगावयाचं. म्हणजे त्यांच्या मनावर ते ठसेल. दात घासताना, आंघोळीच्या वेळी, कपडे धुताना उगीचच पाण्याचा नळ चालू ठेऊन देऊ नये, तसा तो आढळल्यास लगेच बंद केला पाहिजे. या सर्व गोष्टी मुलांकडूनच 2-4 वेळा करून घेतल्या की आपोआपच ते त्यांच्या अंगवळणी पडेल. पण सुरुवातीला त्यांना त्याचं महत्त्वही सांगावं.                                   नंदा हरम, मुंबई.

एखादं मूल्य शिकवण्यासाठी गोष्टी सांगणं कितपत परिणाम घडवतं यावर विचारच करायला लागतो. लाकूडतोड्याच्या गोष्टीमुळे ‘खरं बोलल्यामुळे फायदा होतो’ हे आणि हेच समजतं असं वाटत नाही. एकतर ‘फायद्यासाठी’ खरं बोलायचं असतं असं वाटू शकतं आणि प्रत्यक्षात ‘फायद्यासाठी’ खोटं बोललं जातं हे दिसतं. त्यामुळे गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष परिसरात जे पाहायला लागतं त्यामुळे पुसला जातो. त्याशिवाय जलदेवतांना खरं बोलणं आवडतं, माणसाचा त्याच्याशी काय संबंध इ. इ. प्रश्न पडू शकतात.

पण या सर्वांच्या पलीकडे खरं बोलणं हे नैतिक असल्यानं आवश्यक असतं हे समजावून घ्यावं लागतं. मूल्य ही शिकवण्यापेक्षा अनुकरणातून, संवादातून पोहोचण्याची शक्यता जास्त. गोष्ट हा त्यातला लहानसा भाग.