खेळघरातील एक युवक सांगत होता, “आम्ही पहिल्यांदाच आमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडलो. या निमित्ताने, आपल्या पेक्षा देखील कठीण परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघून आम्हाला आपल्या समाजाचे भान आले.”
नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून नर्मदेच्या काठच्या ७ धरणग्रस्त गावांमधील मुलांसाठी जीवन शाळा चालवल्या जातात. जीवनशाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो आदिवासी बालकांच्या, पालकांच्या, शिक्षकांचा आणि ग्रामसाथींचा आनंदोत्सव म्हणजेच बालमेळा!
बालमेळाव्यात रॅली, प्रदर्शन, विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात चांगली कामगिरी केलेल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जातात.
नंदुरबार इथे १९ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित या वर्षीच्या तिसाव्या बालमेळात पालकनीती खेळघरमधील युवक गटातील एकूण 12 मुले स्वयंसेवक म्हणून सहभागी झाली होती. ही मुले एका वेळी १८ तासांचा प्रवास करून तिथे गेली. खेळघराचे ताई – दादा यांच्यासोबत नव्हते. याच मुलांपैकी काही मुलांनी ह्या सफरीची जबाबदारी घेतली होती. काही मुले पहिल्यांदाच आपल्या कुटुंबाला सोडून येवढया लांब गेली होती. बालमेळ्यासाठी मुलांनी आधी तयारी गेली होती. आंदोलन आणि जीवन शाळांची माहिती घेतली होती.
खेळघरातील युवकांनी बालमेळ्यामधील मुलांना ओरिगामी, विविध खेळ शिकवले. तसेच मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. तिथे ते गावातल्या लोकांच्या घरातच राहत होते. त्यांनी तयार केलेले जेवण जेवत होते. गावातल्या लोकांच्या प्रेमळ वागणुकीने ही मुलं भारावून गेली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधाताई पाटकर यांचा या काळात लाभलेला सहवास त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला.
मुलांनी घेतलेला हा वेगळा, नवीन अनुभव खेळघरातील इतर मुलांनाही सांगण्यासाठी मुले खूप उस्तुक होती. यावर किती बोलू आणि किती नाही, असे मुलांना झाले होते. आपले अनुभव मुलांनी हायस्कूल गट मधील ७ वी, ८ वी च्या मुलांना ppt, चित्रे याच्या मदतीने सांगितले. हायस्कूल गटातील मुले या अनुभवात अगदी रमून गेली होती. वर्गातील 4-5 मुलींनी आम्हीही मोठे झाल्यावर तिकडे जाऊ असं सांगितलं.
सुषमा भुजबळ

