मनातला शिमगा
सनत गानू
नुकताच युट्यूबवर आमचा ‘शिमगा’ नावाचा लघुपट प्रदर्शित झाला. अनेक परिचित-अपरिचित लोकांनी तो पाहिला. त्यातल्या काहींनी त्यांचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवले. आपली कलाकृती(?) लोक पाहताहेत, त्यावर व्यक्तही होताहेत ही खूपच आनंद देणारी गोष्ट होती. तरीदेखील, एकंदर अभिप्रायांचा ल. सा. वि. पाहता माझ्यातला चिकित्सक जरा विचारात पडला.
तो विचार ऐकण्याआधी तुम्ही तो लघुपट पाहून येता का चटकन? 17 मिनिटांचाच आहे! खाली दिलेला QR कोडे स्कॅन करून किंवा खालील लिंकवरती जाऊन तुम्ही तो पाहू शकता.
आलात का पाहून? कसा वाटला? जी वाचक मंडळी माझ्या ‘क्लिक बेट’ (click bait) ला भुलली नसतील आणि लघुपट न पाहता लेख वाचत असतील त्यांच्या निग्रहाला दाद देत मी लघुपटातल्या घडामोडींचा थोडक्यात सारांश सांगतो. (ज्यांनी लघुपट पाहिला ते पुढचा परिच्छेद गाळून पुढे जाऊ शकतात.)
***
लघुपट सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मध्यम-उच्च मध्यमवर्गीय कुटुंबं राहत असतील अशी सोसायटी दिसते. होळीची तयारी चाललीये. गोवर्या रचणं, रांगोळी काढणं सुरू आहे. मस्त मोठी होळी पेटवतात, पूजा करतात, सगळे मिळून उत्साहात एक गाणं म्हणतात एकंदर खेळीमेळीच्या वातावरणात होळी साजरी होते.
नंतर तिथेच, सोसायटीच्या प्रांगणात घोळक्यांमध्ये लोक गप्पा मारायला लागतात. ऑरगॅनिक अन्न, डाएटपासून ते मुलांच्या शाळा, वर्गात असणारी ‘आरटीइ’ची मुलं, त्यांचा ‘आपल्या’ मुलांवर होणारा परिणाम, आपण मध्यमवर्गातले कसे मध्येच अडकलो आहोत, ना सवलती ना श्रीमंती, इत्यादी नित्य-नियमित विषय आणि मतं ऐकू येतात. पोरं होळीच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करतायत. मिळेल तो कचरा शोधून होळी मोठी करायचा प्रयत्न करताहेत. त्यातच एक खटपट्या मुलगा आपल्या आजोबांची काठीच जाळायला आणतो आणि मग सगळ्यांनाच आटोपतं घ्यावं लागतं.
पुढचा दिवस उजाडतो. सोसायटीचा कचरा गोळा करणारी बाई, सुशीला, आपल्याला दिसते. तिच्यासोबत तिचा 10-12 वर्षांचा मुलगाही आहे. सुशीला घराघरातला कचरा एका मोठ्या बादलीत गोळा करतेय आणि तिचा मुलगा तिच्या मागून जिना आणि लॉबी पुसत खाली येतोय. कचरा ठेवण्याच्या विविध पद्धती, ओला-सुका कचरा वेगळा असणं-नसणं, नसल्याबद्दल सुशीलानं नाराजी व्यक्त करणं, बांधकामाचा राडारोडा उचलण्यास तिनं नकार देणं, वगैरे गोष्टी दिसतात. कालच्या होळीनिमित्त केलेल्या पुरणपोळ्या एक काकू आवर्जून सुशीलाला देतात, शिवाय तिच्या नवर्याच्या व्यसनाविषयी सल्ला देतात, हेही दिसतं. ओला कचरा बिल्डिंगच्या मागच्या पिट्समध्ये टाकताना सुशीला त्यातून नारळाच्या शेंड्या वेगळ्या काढतेय हे दिसतं. सगळं आटोपून ती डक्टसारख्या एका चिंचोळ्या जागेत थोडी विसावलेली दिसते. तेवढ्यात तिच्या मुलाच्या लक्षात येतं, की त्यांनी अनेक दिवसांपासून वेगळ्या केलेल्या नारळाच्या शेंड्यांचं पोतं नाहीसं झालंय. ते सगळीकडे शोधायला लागतात. त्यांची धावपळ सोसायटीतले लोक पाहत असतात. तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी तिकडे येतात आणि वाग्युद्धाला सुरुवात होते. त्या शेंड्या आदल्या रात्री पोरांनी होळीत ‘वाहिल्या’ असं लक्षात येतं. सुशीलाला काय बोलावं तेच कळत नाही. ‘‘मला लागत होत्या, सरपनाला आन् बंबासाठी’’, ‘‘मी सोत्ताच्या हातानं वेगळ्या केल्या व्हत्या शेंड्या’’, हे ती सांगत राहते. सोसायटी मेम्बरं तिला समजावत राहतात, ‘‘आता आपण त्या परत आणू शकणार आहोत का?’’ किंवा ‘‘मुलांनी उत्साहाच्या भरात जाळल्या, मुद्दाम नाही केलं कोणी’’, ‘‘शेंड्याच होत्या ना फक्त’’, इत्यादी. सुशीला अजून अजून अस्वस्थ होत जाते. तिचा आवाज चढतो. ‘‘तू सभ्य माणसांसारखं बोल, ओरडू नकोस’’, सेक्रेटरी तिला सांगतात. पुन्हापुन्हा ती तेच तेच बोलते आहे, ‘मला इचारायचं तरी एकदा’ असा जाब विचारते आहे. हे पाहून सेक्रेटरी शेवटी निर्वाणीचं बोलतात, ‘‘तुमचा होता का तो कचरा? सोसायटीचा होता ना? मग आम्ही काय वाट्टेल ते करू त्याचं!’’ इथे सुशीला अवाक होऊन फक्त पाहत राहते. तिचा मेंदू बंद पडतो. जमलेले लोक पांगतात आणि आपापल्या कामाला लागतात. शेवटी सुशीला विमनस्कपणे आदल्या रात्रीच्या होळीची राख आणि जळके अवशेष झाडते आहे हे एका संथ ट्रॅक बॅक शॉटमध्ये आपल्याला दिसत राहतं.
***
लघुपट पाहिल्यावर जे अभिप्राय आमच्यापर्यंत पोचले त्यातल्या बहुतेकांना सुशीलाविषयी वाईट वाटत होतं. एकंदर चतुर्थश्रेणी कामगारांना सहन करावा लागणारा अपमान आणि त्रास, मध्यमवर्गाची कोती मनोवृत्ती इत्यादींविषयी लोक मनापासून सांगत होते. काही लोकांना सोसायटी मेम्बर्सची बाजू बरोबर आहे असंदेखील वाटत होतं. लोक मनापासून व्यक्त होत होते ह्याचं अप्रूप वाटत होतं. परंतु सिनेमा ह्या माध्यमाचा, त्याच्या ताकदीचा विचार केला तर प्रेक्षक म्हणून आपण ह्याच्याही बराच पुढचा प्रवास करू शकतो असंदेखील जाणवत होतं. तो कसा, हे मांडण्यासाठी हा लेखप्रपंच. (लेखातील मुद्दे कदाचित खूपच क्षुल्लक किंवा अतिशहाणपणाचे वाटण्याची शक्यता आहे, तसे वाटल्यास क्षमस्व.)
लघुपटातील बारीक तपशील लोकांना जाणवत होते हे त्यांच्या अभिप्रायातून कळत होतं. मात्र लोक खूप पटकन चूक-बरोबर ह्या द्वैतात अडकत आहेत हेही प्रकर्षानं दिसत होतं. हा निवाडा करायला घेतला की दोन गोष्टी घडतात. एकतर आपण लघुपटातील पात्रांपासून वेगळे आणि कदाचित जास्त ‘उत्क्रांत’ आहोत असा समज करणं सोपं होतं. शिवाय तो निवाडा केला, की आपण मोकळे होतो. म्हणजे प्रेक्षकांना सुशीलाविषयी वाटणारं दुःख खोटं होतं, किंवा पुरेसं खोलवर नव्हतं, असं मला मुळीच म्हणायचं नाहीये; परंतु चूक-बरोबरचा निवाडा करून ते त्या दुःखाच्या परिणामांपासून मोकळे होत होते.
दुसरा मुद्दा आहे सह-अनुभूतीचा. इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत : पिटी (pity कीव) आणि एम्पथी (empathy – सह-अनुभूती). पिटीमध्ये आपण समोरच्याचं दुःख, त्याला झालेला त्रास पाहतो आणि त्याविषयी आपल्याला वाईट वाटतं. एम्पथीचा अर्थ त्या माणसाच्या विचार – भावनांना आपल्या मेंदू आणि संवेदनांच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी प्रयत्न करणं. पिटी अक्रिय आहे; मात्र एम्पथी सक्रिय आहे. सुशीलाला झालेला त्रास / अन्याय पाहून आपल्याला तिची कीव आली, तिच्याविषयी किंवा एकंदरच तिच्या समाजबांधवांविषयी वाईट वाटलं. पण तिच्या मनात काय चाललं होतं ते आपण समजून घेतलं का? तिला नक्की कशाचं वाईट वाटत होतं? झालेल्या आर्थिक नुकसानाचं? वाया गेलेल्या मेहनतीचं? आपल्या मेहनतीची कोणालाच किंमत नाही ह्याचं? आपण जमा केलेल्या शेंड्या जाळण्याविषयी आपल्याला विचारावं किंवा सांगावंसंही वाटलं नाही इतके आपण ह्यांच्या लेखी क्षुल्लक आहोत ह्याचं? लघुपट ह्या सगळ्याच शक्यता मांडतो, कुठलंच ठाम मत मांडत नाही. हा विचार करण्यासाठी उद्युक्त करणं इथेच लघुपट थांबतो. त्यामुळे, सुशीलाच्या मनात नेमकं काय चाललं आहे, तिला भावनांच्या पातळीवर काय वाटतंय आणि ती काय विचार करते आहे ह्यांपर्यंत पोहोचायची तयारी प्रेक्षक म्हणून आपल्याला दाखवावी लागते. ही तयारी दाखवली तर आपण सुशीलाला थोडंफार तरी समजून घेऊ शकू, थोडी तरी सह-अनुभूती आपल्याला झालीये असं आपण म्हणू शकू. नुसतं वाईट वाटणं, कीव येणं ह्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे टाकलेलं असेल.
आता जो न्याय सुशीलाला लागू होतो, तोच सोसायटी-मेम्बर्सनाही व्हायला हवा. त्यांना व्हिलन ठरवणं बरंच सोपं आहे. पण तीदेखील माणसं आहेत; सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक अर्थांनी आपल्या खूपच जवळची. ती जशी वागली तशी का वागली? त्यांच्या मनात काय सुरू होतं? सुशीलाला पैसे देऊ करावेत असं त्यातल्या काहींना वाटत असेल का? होळीत शेंड्या जाळणार्या मुलांना आपण बोललं पाहिजे असं कोणाला वाटलं असेल? ‘आपल्या’ लोकांविरुद्ध बाजू घ्यायला ते घाबरले असतील का? का खरंच सगळ्यांना सेक्रेटरी जोशींचं म्हणणं पटलं असेल? आपण तिथे असतो तर काय केलं असतं? इथे मी एक गोष्ट नमूद करतो, की हा शेवटचा प्रसंग आम्ही आधी राहत असलेल्या सोसायटीत तंतोतंत असाच घडला होता. आणि मी आणि माझी बायको त्या प्रसंगी काहीच बोलू शकलो नव्हतो. त्यानंतर अनेक दिवस तो प्रसंग आमच्या डोक्यात ‘रीप्ले’ होत होता. स्वतःला संवेदनशील म्हणवणारे आपण काहीच न बोलता, काहीच न करता घरी कसे निघून आलो हा प्रश्न अजूनही त्रास देतो.
लहानपणापासूनच बहुधा, कथा-गोष्टी वाचताना, त्याचं सार काय आहे हे समजण्याचा, सांगण्याचा आपला बराच आग्रह असतो. आपल्या शिक्षणाचा, संस्कारांचा आणि ‘कळणं’ ह्या शब्दाच्या अर्थाचा ह्या आग्रहामागे बराच महत्त्वाचा वाटा आहे असं वाटतं. गोष्टींना चाळण्या (filter) लावून त्यांचं काळ्या – पांढर्यात वर्गीकरण करणं हे मेंदूसाठी कमी त्रासाचं आणि वर वर पाहता जास्त फलदायी असू शकतं. पण खरी माणसं, प्रसंग अशी सरळ-सोपी काळी-पांढरी नसतात. तद्वत, गोष्टीचं सार काढणं आणि सुटसुटीत द्वैतांपर्यंत पोहोचण्याच्या घाईमुळे आपण आपल्या आजूबाजूची माणसं, समाज, व्यवहार समजून घेण्यात कमी पडतो. तसं न करता गोष्टींकडे अधिक खुलेपणानं पाहिलं आणि पूर्वग्रह आड येऊ न देता सर्वच शक्यतांना वाव ठेवला, तर हळूहळू आपल्या भवतालाच्या अधिक जवळ पोहोचता येऊ शकतं
आणि लहान वयातच तशी सवय आणि त्याची गोडी लागली तर किती मौज, नाही का? सिनेमामधून मुलांना आपल्यापेक्षा खूप वेगळी पात्रं अनुभवता येतात. त्याविषयी बोलून, प्रश्न विचारून, त्या अनुभवाला हळूहळू सह-अनुभूतीपर्यंत नेता येऊ शकतं. विशेषतः लहान मुलांसाठी बनवण्यात येणारे चित्रपट बर्याच वेळा काळं-पांढरं वास्तव आणि काळी-पांढरी पात्ररचना योजून सुटसुटीत केलेले असतात. त्यातल्या काळ्यामधलं पांढरं आणि पांढर्यामधलं काळं शोधण्यास प्रवृत्त करून मुलांना हळूहळू राखाडी वास्तवाकडे नेता येऊ शकतं. एक उदार, अ-छिद्रान्वेषी, नॉन-जजमेंटल आणि समावेशक व्यक्ती बनण्याच्या दृष्टीनं सिनेमा ह्या माध्यमाचा विचार निश्चितच करता येईल. शिवाय अशा प्रकारे सिनेमाकडे पाहायला लागले, तर मुलांची सिनेमामधली रुची वृद्धिंगत होईल ती वेगळीच!
सनत गानू
sanat.ganu@gmail.com
ओनायरिक्स लॅब्समध्ये मुख्य अभियंतापदी अर्धवेळ काम करतात. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर व उमेश कुलकर्णी ह्यांच्या चित्रपटनिर्माणात त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘अरेबियन नाईट्स’ आणि ‘शिमगा’ हे दोन लघुपट त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केले आहेत.