माझा बाबा

माझा सगळ्यात आवडता दोस्त

माझी सगळी गुपितं त्याची

माझे शब्द सगळ्यात आधी उमगतात त्यालाच

जगात फक्त त्यालाच सांगू शकेन अशा गोष्टी असतात माझ्याकडे

मनाच्या खूप आतली गाठ आधी त्याच्याच समोर उलगडते

कधीकधी तर त्याचीच पोळी आईपेक्षा मऊ होते

आईचापण सगळ्यात आवडता दोस्त बाबाच!

आणि दादासुद्धा त्याच्या सगळ्या गंमतीजंमतीत मला सामील करून घ्यायला बाबाकडूनच शिकलाय!

असं सगळं असताना,

परवा,

फक्त माझं आणि आईचं एक गुपित निर्माण झालं.

का?

आता, दर महिन्यात काही दिवस,

आमचं दोघींचंच पोट दुखणारे म्हणून?

पण सगळ्यात भारी मालिश तर बाबाला करता येते.

काही दुखलंखुपलं की त्याच्यापाशीच तर जाते मी.

माझ्या शरीराबद्दलची इतकी धक्कादायक गोष्ट मला बाबाशिवाय, एकटीनेच, कशी काय सांगितलीस तू आई?!

ही अशी इतकी विचित्र घालमेल एकटीने नाही सहन करायचीए मला.

माझ्या सगळ्या अडचणी परवापर्यंत आपल्या चौघांच्या होत्या ना!

मला ह्यावर राग, चिडचिड, विनोद, कविता, गप्पा करायच्यात.

बाहेरच्या खोलीत बसून.

नेहमीसारख्या.

बाबू आणि दादू, आणि आई तूसुद्धा,

तयार व्हा लवकर!

– एक कन्या