मी मुसलमान कसा झालो —
समर खडस
अजिबात धर्म वगैरे न मानणारा मी मुसलमान आहे असं सांगतो तेव्हा त्यामागे बरंच काही असतं. हे बरंच काही म्हणजे काय? गेल्या वर्षीच्या पालकनीतीच्या दिवाळी अंकातील पापुद्रे निखळताना हा श्री. प्रमोद मुजुमदारांचा लेख आपल्याला आठवत असेलच. उजातीय हिंदू म्हणून मानल्या जाणार्या ब्राह्मणी संस्कारात, वातावरणात वाढत असताना इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाची भावना कशी रूजवली जाते, जोपासली जाते याचं मार्मिक अनुभवचित्रण श्री. मुजुमदारांनी केलेलं होतं. त्याच सुमारास अभिव्यक्ती या माध्यमविषयक नियतकालिकात श्री. समर खडस यांचा मी मुसलमान झालो हा लेख प्रसिद्ध झाला होता. हे दोन्ही लेख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच अल्पसंख्यांक गटाचे प्रातिनिधिक अनुभव, धर्म, सांस्कृतिक रुढी-परंपरा, इतिहास या सगळ्याचा दोन धर्मांमधे दुही माजवण्यासाठी केला जाणारा वापर, ते आणि आपण यातून रूजवली जाणारी विषभावना सर्व सामान्य माणूस म्हणून जगणंही किती अवघड करून सोडते या वास्तवाची प्रखर जाणीव देणारा हा लेख पुनर्मुद्रित करत आहोत.
वेळ – आजपासून 20 ते 22 वर्षांपूर्वी
तू मोठा झाल्यावर काय होणार? हा साधारणत: मध्यमवर्गात आपल्या लहान मुलाला विचारला जाणारा प्रश्न मलाही विचारला जायचा. मी तेव्हा साधारण 5 – 6 वर्षांचा असेन. प्रश्न माझे बाबा विचारत असत. माझंही उत्तर ठरलेलंच असायचं. पायलट, सैनिक किंवा थिएटरचा डोअरकीपर वगैरे. या उत्तरांवर ते हसत असत आणि मला सांगत, तू काहीही हो पण माणूस हो.क् मी त्यांना म्हणत असे माणूस तर मी आहेच …..
रोज सकाळी शाळेत जायचं, आमच्या कॉलनीत माझ्याच वयाची बरीच मुलं होती, शाळेतून आल्यावर त्यांच्याबरोबर खेळायला जायचं. संध्याकाळी आई अभ्यासाच्या आधी माझ्याकडून शुभंकरोती म्हणवून घेत असे. माझे बाबा तेव्हा समाजवादी पक्षाचं काम करत. घरात धार्मिक रुढी, परंपरा अशा काहीच नव्हत्या. आमच्या गावाकडची मंडळी म्हणजे माझे नातेवाईक हेदेखील अगदी साधे. त्यांनीसुद्धा माझ्यावर धार्मिक संस्कार वगैरे करण्याचा प्रयत्न केला नाही. मध्यमवर्गीय लहानपण सहसा मजेत जातं. माझंही तसंच होतं.
एकदा खाली खेळत असताना माझ्या एका मित्राकडून मला अचानक माझा धर्म कळला. खेळावरूनच आमच्यात काहीतरी भांडणं झाली होती बहुतेक. तो माझ्याकडे पाहत सगळ्यांना म्हणाला, “ए ह्याला घ्यायचा नाही आपण. हा मुसलमान आहे.”
मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. तोपर्यंत आमच्यामध्ये खेळातून काढून टाकण्याचे वा कट्टी घेण्याचे निकष हा रडी खातो, हा आईला नाव सांगतो, हा स्वत:ची बॅट आणत नाही वगैरे असत. मुसलमान आहे म्हणून मला काढून टाका हा निकष मला नवीनच होता. मी त्याला म्हणालो, “म्हणजे काय रे?”
“म्हणजे तू मुसलमान आहेस. माझी आई मला सांगत होती की आम्ही हिंदू आहोत, तू मुसलमान आहेस.” मग मी माझ्या उरलेल्या प्रत्येक मित्राकडे बोट दाखवून त्याला विचारलं की, हे कोण आहेत? तर त्यातला प्रत्येक जण हिंदू होता. मी एकटाच मुसलमान होतो.
मी एकटाच मुसलमान असल्याने आणि बाकी सगळे हिंदू असल्याने मला प्रचंडच धक्का बसला होता. मुसलमान हे नक्की काय प्रकार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. परंतु आपण या सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत आणि वेगळे म्हणजे श्रेष्ठत्वाच्या अर्थाने नाही तर आपल्यात काहीतरी कमी आहे, अशी तीव्र जाणीव मला तेव्हा झाली. ती पुढे अनेक वर्ष टिकली. मी दुसर्या दिवशीच सकाळी उठल्या उठल्या बाबांना विचारलं होतं. मला आठवतं ते दाढी करत होते. “बाबा आपण काय मुसलमान आहोत काय हो?”
त्यांनी माझ्याकडे चमकून पाहिलं आणि विचारलं, “तुला कोण म्हणालं हे?”
माझा मित्र म्हणाला, “मी एकटाच मुसलमान आहे. ते सगळेच हिंदू आहेत. बाबा मला मुसलमान नको हिंदू हवंय”, माझी विचित्र मागणी ऐकून ते संभ्रमात पडले असावेत. मग त्यांनी मला आपण सगळीच कशी माणसं आहोत वगैरे सांगितलं.
पुढे पुढे मला हिंदू आणि मुसलमान यातले फरक वाढत्या वयानुसार कळू लागले. आमच्या शेजारी मी खूप लाडका होतो. शेजारची मुलं माझ्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांनी मोठी. माझ्यासाठी ते दादा आणि ताई होते. एकदा त्या दादाने माझी खोडी काढण्यासाठी मला त्याचे टोचलेले कान दाखवले. “तुझ्याकडे कुठे आहे असे कान?”, तो म्हणाला. त्याचे कान टोचलेले आणि माझे नाहीत हे पाहून मला त्याचा हेवा वाटू लागला. मी लगेच आईकडे गेलो आणि म्हणालो, “आई, दादाच्या कानाला बघ कशी भोकं आहेत. मला पण तशीच भोकं पाडून हवीत. आई रागावली. नसते हट्ट करतोस असं म्हणाली. पण मी ऐकेचना तेव्हा तिने मला समजावलं की ते हिंदू आहेत आणि त्यांच्यात असे कान टोचण्याची पद्धत असते. मी लगेच तिला विचारलं, आपण मुसलमान आहोत ना? हो, पण आपण धर्म वगैरे मानत नाही …..” ती म्हणाली.
वेळ – आजपासून साधारण 16 ते17 वर्षांपूर्वी
मी इयत्ता पाचवी-सहावीत असेन. इतिहासाचा पीरियड होता. शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात होता. शिकवणारे सर अगदी रंगात आले होते. मुसलमानांनी किती आणि काय काय अत्याचार केले हे ते रंगवून सांगत होते. मुसलमान लोक आपल्या बायका पळवत असत, शेतांना आगी लावत असत, वगैरे वगैरे. मला शिवाजी राजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, महामूर्ख मठ्ठ मोगंलाना फसवून पेटार्यात बसून ते पळाले, वगैरे प्रत्येक वाक्यागणिक माझ्या छातीतली धडधड वाढत होती. भीती आणि लाज अशा संमिश्र भावनेने मन भरून आलं होतं. प्रत्येक मोगलाच्या ठिकाणी मला माझा चेहरा दिसत होता. मी मठ्ठ, मी अत्याचारी, मी बायका पळवणारा वगैरे. मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. माझी चुळबुळ पाहून मला शिक्षकांनी उभं केलं. मला काहीतरी प्रश्न विचारला. मी काहीच बोलू शकलो नाही. त्यांनी सगळ्या वर्गासमोर माझ्यावर शेरा मारला. बरोबर, तुला शिवाजीच्या इतिहासात कसा रस असणार? औरंगजेबाचा इतिहास असता तर तू बरोबर ऐकला असतास. सगळा वर्ग माना वळवून माझ्याकडे पाहत होता. बाजूच्या खिडकीतून शाहिस्तेखानासारखी उडी टाकून पळून जाऊ या, असे विचार माझ्या मनात आले.
या इतिहासाच्या तासानंतर वर्गातल्या अनेक मुलांनी माझ्याकडे येऊन, अरे, तू मुसलमान आहेस? म्हणून उगाचचं विचारलं होतं. एका अतिउत्साही विद्यार्थाने तर मग तुझं ते कापलेलं आहे की नाही? असं माझ्या पॅण्टकडे बोट दाखवत विचारल्यावर तर मी शरमेने खलास झालो होतो. नाही रे, काही तरी काय, असं मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो माझी सुंता झालीय याच्यावर अख्ख्या वर्गासमोर बेट लावायला तयार होता. शाळेच्या मुतारीत जाऊन माझं शिश्न तपासण्यासाठी अजून दोघं-तिघं तयार झाले होते. मी मात्र या गोष्टीला ठाम नकार दिला आणि सरांकडे तक्रार करेन असं सांगितलं.
या प्रसंगानंतर बरेच दिवसपर्यंत सार्वजनिक मुतारीत माझ्या बाजूला लघवी करण्यासाठी कोणी येऊन उभा राहिला की मला प्रचंड टेन्शन येत असे. काही केल्या लघवी होतच नसे. माझं शिश्न बघून आता हा बाजूचा माणूस गोंधळ घालणार, सगळ्या जगाला ओरडून सांगणार, असं मला वाटत असे.
वेळ – साल 1983-84
मी आठवी-नववीत असेन. एकदा मी कशाला तरी शाळेत दांडी मारली होती. तो वार नेमका शुक्रवार होता. दुसर्या दिवशी आल्यावर माझ्या एका मित्राने मला बाजूला घेऊन विचारलं, काय रे, काल आला का नव्हतास? काही खास कारण? मला काहीच समजेना. मी नाही म्हणालो. तो मला म्हणाला, काल अख्ख्या वर्गासमोर सरांनी विचारलं, तो जुम्मे के जुम्मा कुठे आहे? जुम्माजी नमाज पढायला गेला वाटतं! मला हे ऐकून भीती किंवा लाज वाटली नाही. त्या सरांचे जाऊन दात घशात घालू या, असे विचार मात्र डोक्यात आले.
वेळ – साल 1986
महाराष्ट्रातल्या एका पुरोगामी समाजवादी संघटनेचं पुण्याला शिबीर होतं. मी देखील शिबिरात होतो. तिथे पुण्यातील एका समाजवादी पार्श्वभूमी असणार्या ब्राह्यण मुलीची न् माझी चांगली मैत्री झाली होती. बहुधा तारुण्याच्या उंबरठ्यावर सर्वसामान्यत: असणारं आकर्षणसुद्धा दोघांच्याही मनात असेल. परंतु आम्ही एकमेकांशी फारच मोक़ळेपणाने वागत होतो. खरं तर आमच्याबद्दल संशय यावा, असं काहीच नव्हतं. आमचं ते वय देखील नव्हतं. परंतु शिबीर संयोजिकेला ही गोष्ट खूपच खटकत असावी. तिने आम्हाला सगळ्यांसमोर चार-पाच वेळा टोमणे मारण्याचाही प्रयत्न केला. परंतु आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं. शेवटी त्या शिबीर संयोजिकेने माझ्या मैत्रिणीला बाजूला घेतलं आणि समजावलं, काही झालं तरी त्याचं कल्चर आणि आपलं कल्चर यात फरक पडतोच. मला काही हे बरोबर वाटत नाही. तुझ्या आई-बाबांना कळलं तर त्यांना काय वाटेल?…. वगैरे.
साल 1988-89
मी जन्माने मुसलमान असलो तरीदेखील विचारांनी पुरोगामी आहे हे मी सगळ्यांना ठासून सांगत असे. त्यासाठी समान नागरी कायदा, मुल्ला-मौलवींचा धर्मांधळेपणा यावर मी खूप तावातावाने बोलत असे. आम्ही काही समविचारी मंडळीनी मिळून एक स्टडी सर्कलही सुरू केलं होतं. यात मी, माझ्या कॉलेजमधले दोघे तिघे मित्र, इकॉनॉमिकल टाईम्स चा एक पत्रकार, एक इंडियन एक्प्रेसचा फोटोग्रफर (हे दोघेही आमच्या कॉलेजचेच माजी विद्यार्थी होते.) असे लोक होते. आम्ही सत्यजित रायपासून जॉर्ज बुशपर्यंत सगळ्या विषयांवर गंभीर चर्चा करायचो. चर्चेत मुसलमानांनी फण्डामेंटलिस्ट विचार सोडले पाहिजेत, बहुसंख्यांक हिंदू कम्युनल नाहीत अशी चर्चा व्हायची. शेवट हिंदू-मुस्लिम भाई भाईने होत असे.
89 सालच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही एकत्र जमलो होतो. तेव्हा सलमान रश्दींच्या सॅटेनिक व्हर्सेसचा वाद रंगला होता. या, पुस्तकावर बंदी घालावी या मागणीसाठी मुसलमानांनी काढलेल्या मोर्चावर सरकाने गोळ्या चालवल्या होत्या. 11 जण ठार झाले होते. मी या प्रकाराने खूप अस्वस्थ झालो होतो. पुस्तक बॅन करण्याची मागणी चुकीची असली तरी गोळ्या घालून 11 लोक मारण्याचं तार्किक उत्तर मला सापडत नव्हतं. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन वर आमची चर्चा रंगली होती. बहुतेक सगळेच रश्दीवादी होते. मुसलमानांच्या मागासलेपणावर आश्चर्य व्यक्त करत होते. माझी बोलण्याची पाळी आल्यावर मी पुस्तकावर बंदीची मागणी चुकीची असली तरी 11 लोकांना ठार मारण्याचं काहीच कारण नव्हतं, असं बोललो. जो-तो माझ्याकडे आश्चर्याने, पाहू लागला. इकॉनॉमिक टाइम्स चा पत्रकार असणारा माझा मित्र मला म्हणाला, तू कधीपासून मुसलमान झालास यार? मी त्यांना समजाऊ लागलो आपल्याला रश्दी वाचणं जितकं महत्त्वाचं वाटतं, तितकचं महत्त्वाचं महम्मदाचे विचार समजाऊन घेणं मुसलमानांना वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे…..
या चर्चेनंतर शेवटी मी जातीवर गेलोच, असं म्हटल्याचं समजलं. स्टडी सर्कलच्या पुढच्या बैठकांची आमंत्रण मला आली नाहीत.
साल 1990
माझ्या ठाण्याला राहणार्या एका मित्राचं पाकीट कुर्ल्याला कोणीतरी मारलं. त्यात त्याचे दोनशे रुपये गेले. मी दुसर्या एका मित्राची ओळख काढून त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनलाही गेलो होतो. बाहेर पडल्यावर तो मला म्हणाला, तू काही बोल, हे कुठल्या तरी लांड्याचच काम असणार. साला एरिया पण त्याच लोकांचा आहे. शिवसेना बोलते ते बरोबर आहे, भडव्यांना कापूनच काढले पाहिजे.
साल 1991
स्वत:ला पोस्ट-मॉडर्निझमचा भक्त म्हणवणार्या आणि माओ-लेनिनचे विचार मानणार्या माझ्या मित्राकडे अचानक गणपती आणला आणि त्याने मला गणपतीचं आमंत्रण दिलं. मी त्या याबाबतीत छेडलं असता, हिंदू धर्मातील कोणतेच सण तुम्हाला ऑर्थोडॉक्स बनण्याची जबरदस्ती करत नाहीत. मी गणपती आणला म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे असा त्याचा अर्थ होत नाही. अरे मला तर आरत्याही धड म्हणता येत नाही. मी आरत्यांची कॅसेट लावतो. याउलट तू जोपर्यंत नमाज पढत नाहीस, अल्ला हाच सुप्रीम आहे, असं मानत नाहीस तोपर्यंत तू मुसलमान नाहीस. म्हणून तर मी गणपती अणूनसुद्धा पोस्ट-मॉडर्न सेक्युलर विचारांचा राहू शकतो. मुस्लिम धर्माचं तसं नाही …. वगैरे त्याचे विचार, तर्कशास्त्र ऐकून गप्प बसण्यापलीकडे मला काहीच करता आलं नाही. काय करणार?
साल 1992
बाबरी मशीद पाडायला सुरुवात झालेय. तू घरातून बाहेर पडू नकोस. असा फोनवरून निरोप बाबांच्या महाराष्ट्र टाइम्स मधल्या एका मित्राने मला दिला. आता काहीतरी भयानक घडणार या विचारांनी मला धस्स झालं. पुढचे काही दिवस मुंबईत दगंल झाली. लांडे माजलेत असाच सूर शेजारीपाजारी सगळे काढत होते. मी घरातून बाहेर पडलो की लगेच आई-बाबांना टेन्शन येत असे. आम्ही कॉलनीतली मुलं बिल्डींगच्या गच्चीवर पत्ते खेळत असू. एकदा एकाने एक दुर्बिण आणली होती आणि आमच्या घराजवळ कसाईवाडा ही मुस्लिम वस्ती तो सगळ्या जणांना दुर्बिणीतून दाखवत होता. दुश्मन के इलाखे पर नजर रखनी चाहीए. वगैरे भंकस चालली होती. तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधला एक जण म्हणाला, “अरे, दुश्मन का इलाखा काय फक्त तिथेच नाही. आपल्या बिल्डिंगमध्येसुद्धा आहे”, आणि माझ्याकडे बघून सगळेच हसायला लागले.
जानेवारी 1993
डिसेंबरच्या दंगलीपेक्षा महाभयानक दंगल मुंबईत उसळली. आमच्याच कॉलनीत दोन इमारती सोडून राहणार्या एका दुसर्या मुस्लिम कुटुंबाच्या घरी रात्री काही पोरं चॉपर-तलवारी घेऊन आली. त्या माणसाची बायको वाचवा, वाचवा ओरडत होती. बिल्डिंगमधले लोक खिडकीतून पाहत होते. कोणीच काही केलं नाही. त्या कुटुंबाचं नशीब चांगल होते, दरवाजा मजबूत होता. पोरं कंटाळून परत गेली. जाता जाता त्यांनी खाली उभ्या असलेल्या त्यांच्या मोटारसायकलला आग लावली…..
दुसर्या दिवशी सकाळी ही बातमी आम्हाला कॉलनीत राहणार्या बाबांच्याच एका समाजवादी मित्राने दिली आणि काही दिवस तुम्ही इथे न राहणं बर, असा सल्ला दिला. त्याच दिवशी दुपारी आम्ही जेवत असता मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज आले. पाठोपाठ काही फायरिंगचेही आवाज आले आणि मी गॅलरीत बघायला गेलो. धडाधड पंधरा-सोळा पोरं धावत कॉलनीच्या कम्पाऊंडमध्ये शिरली. आम्ही प्रचंड घाबरून शेजार्यांकडे लपायला गेलो.. संध्याकाळी आई कॉलनीच्याच गेटवर असणार्या एका दुकानात सामान आणायला गेली असता आमच्याच कॉलनीतल्या एका माणसाच्या नोकराने शेरा मारला, ती बघ लांडीण नमाज पढायला चाललीय.
टेन्शन वाढत गेलं तसतसा बाबांचा धीर सुटत गेला. तीस वर्षांचं सेक्युलर राजकारण, तू माणूस हो म्हणून मला दिलेले विचार एस. एम…… नानासाहेब, गांधी, लोहिया इत्यादी सगळं बाजूला पडलं. आपण मुसलमान म्हणूनच गणले जातोय, हे त्याच्या लक्षात आलं ते घाबरलंं. त्यांनी मला आणि आईला गावाला पाठवलं. व्यवसायामुळे तेही ठाण्याला एका मित्राकडे राहायला गेले….
नोव्हेंबर 1993
पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्त, हमालांचे नेते, जुने लोहियावादी असणारे आमचे एक स्नेही दंगलीनंतर हिंदू-मुस्लिम समाजात पडलेली दरी समजून घेण्यासाठी आले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आमच्या भावना खूप तीव्र होत्या. माझ्या वांद्य्राला राहणार्या मामाच्या मुलांवर, मामीवर हल्ला करतांना, बेहरामपाड्यातल्या मुसलमानांना पोलिस आणि गुंड एकत्र ठार मारताना बघून मोठाच मानसिक आघातही झाला होता. आम्ही हे सगळं त्यांना सांगितलं. त्यानंतर ते नागपाड्यातल्या मुस्लिम वस्तीत जाऊन आले. आता आपल्याला काय काय करता येईल, याची त्यांनी चर्चा करायला सुरवात केली. मुसलमानांमधल्या सुधारित लोकांना धर्म सुधारणेचाही प्रश्न घेतला पाहिजे, समान नागरी कायद्याचे काय, हे मुद्दे सालाबादप्रमाणे आलेच. मी त्यांना म्हणालो की, ही वेळ हे प्रश्न घेण्याची नाही. मुसलमान म्हणून जर जगण्याचा अधिकार या देशात नसेल तर हे सगळे प्रश्न गैरलागू होतात. त्यांना हे पटलं नाही. ते जाईजाईपर्यंत मला हेच समजावून सांगत होते, हे एक वादळ होतं, ते आत शमलंय. मुसलमानांचे सुधारणेचे मुख्य प्रश्न तुझ्यासारख्यांनी उचलून धरले पाहिजेत. चार-चार बायका, पाच वेळा नमाज हे कुठपर्यंत चालणार?
ही त्यांची मानसिकता हिंदू म्हणून होती की इतकी वर्ष सामाजिक सुधारणेत राहूनही ती समजण्याइतकी प्रगल्भताच त्यांच्यात नव्हती, मला कळलं नाही. अजून कळलेलं नाही.
साल 1997
या आणि अशा अनेक प्रसंगानंतर एक गोष्ट मला पक्की जाणवली ती म्हणजे, मी कितीही नाकारलं तरी या देशात जन्माने मिळालेली जात वा धर्म सुटत नाही. माझ्या एकाही ऑफिशियल रेकॉर्डवर माझा धर्म लिहिलेला नसला तरी लोकांना तो बरोबर कळतो. इथे तुम्ही चित्रकार, पत्रकार, गवंडी, मिल कामगार, दुकानदार काहीही असा, तुमची जात आणि धर्म काही सुटत नाही. तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, विचारांतून बाहेर पडतोच. माझ्या या सगळ्या अनुभवांदरम्यान मला एकही चांगला अनुभव माझ्या हिंदू मित्रांकडून तसंच आप्तेष्टांकडून आला नाही, असं म्हणणं अन्यायकारक होईल. किंबहुना चांगले अनुभव मला जास्त आले. परंतु वाईट अनुभवाच्या जखमा इतक्या खोल होत्या की, अजून तरी त्यातून वर येणं जमलेलं नाही.
हल्ली कशाच्याही निमित्ताने मला कोणी धर्म विचारला तर मी पूर्वीसारखा भारतीय सांगत नाही. मी मुसलमान आहे, असंच सांगतो. भारतीय सांगून इथल्या मुसलमानांना सुधारणेचे नि तथाकथित राष्ट्रवादाचे धडे देण्यापेक्षा मुसलमान सांगून त्यांच्यातच मिसळून तरी पाहू काय होतयं ते. नाहीतरी जन्म घेतला म्हणून मुसलमान आणि मुसलमान आहे म्हणजे फण्डामेंटलिस्ट, ही व्याख्या आता हिंदुत्ववादीच नाही तर नवी ऑक्सफर्ड डिक्शनरीही करतेच ना ! The Fundamentalism means, “adhering strictly to the fundamentals, principles & doctrine of ancient religion, especially Islam.” म्हणूनच मी सध्या स्वत:ला फण्डामेंटलिस्ट मुसलमान म्हणवतो…..
(वरील लेखात येणारे प्रसंग शंभर टक्के खरे आणि जसेच्यातसे घडलेले आहेत. ते कोणास स्व-रचित वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
साभार – अभिव्यक्ती, ऑक्टोबर-डिसेंबर 1997.