मुलांच्या विभागाबद्दल
मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी असं लिहीत नाहीत, स्वत:साठीच लिहितात. सगळ्याच मुलांना आपणहून लिहायची बुद्धी होत नाही; पण लिहितं केलं, की लिहिता येणारे बहुधा सगळे लिहितात. मुलांना लिहितं करणाऱ्या शिक्षकांना त्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. मुलांनी लिहिलेल्या कथा वाचताना आम्हालाही सर्वात जास्त मजा आली.
चंद्रपूरमधील प्रयोगशील शिक्षिका कृतिका बुरघाटे यांनी मुलांच्या अभिव्यक्तीला चालना देऊन लिहून घेतलेल्या कथांमध्ये मुलांचा प्रतिकूल परिस्थितीचा सहज स्वीकार, त्याकडे बघण्याचा अलिप्तपणा, आनंद शोधण्याची वृत्ती, प्रांजळपणा हे सगळं मन हेलावून टाकणारं होतं. या मुलांच्या लिखाणात शुद्धलेखनाच्या दुरुस्त्या आम्ही केल्या नाहीत. त्या भाषेतून त्यांचा साधेपणा, मोकळेपणा पोचत होता. त्यांच्या शिक्षकांनी जशा पाठवल्या होत्या तशाच आम्हीही छापल्यात.
फलटणच्या कमला निंबकरच्या मुलांमुलींनी तर खरोखर वैशिष्ट्यपूर्ण लेखन केलंय. मधुरा राजवंशी इंग्रजीच्या तासाला वेगवेगळ्या विषयांवर कथा-चित्रकथा लिहिण्याचा उपक्रम सातत्याने घेत असतात. चित्रातून मांडलेल्या या कथा शब्दांच्या पलीकडचं सांगून जातात. त्याशिवाय आनंदनिकेतन, नाशिक या आमच्या मैत्रीणशाळेतल्या काही मुलांचं लिखाण आहे. चेन्नईजवळची तुलीर शाळा, भोपाळजवळची अरण्यवास संस्था आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील पेंडोनी ह्या छोट्याश्या गावातील मुलीची गोष्टही आमच्यापर्यंत आली आणि मोह न आवरून तुम्हाला दाखवावीशी वाटली. पुण्यातल्या अक्षरनंदन शाळेतल्या मुलामुलींनीही आपलं लेखन पाठवलं; पण ते अंक पूर्ण झाल्यावर आल्यानं या अंकात घेता आलं नाही.
लातूरजवळच्या बोरगाव काळे जि.प.च्या शाळेची ओळख माधुरी पुरंदरेंनी करून दिली होती. इथल्या मुलांनी ‘चंद्र चालता-चालता ढगाला अडखळून पडला…’ या माधुरीताईंनीच सुचवलेल्या विषयावर लिहिलं. आम्ही तोच विषय पालकनीतीच्या खेळघरच्या मुलांकडेही पाठवला. खेळघरातल्या मुलांनी लिहिलेल्या कथेतील स्वैर कल्पनाविलास, तरीही वर्तमानाशी जोडलेपण खूप आल्हाददायक वाटलं. त्या सगळ्यांचं कल्पनाविश्व तुमच्यासमोर ठेवलं आहे.
या कथा वाचून अनेक शिक्षकांना हा उपक्रम आपल्या शाळेत करून बघण्याचा मोह होईल. पुढच्या वर्षांत आपण अशा शिक्षकांना मदत करणारं आणि त्यांनी केलेल्या उपक्रमातून उमललेलं बालसाहित्य, म्हणजे बालकांनी लिहिलेलं साहित्य, पालकांना सादर करू.