रिचर्ड फाईनमन – या सम हा

प्रांजल कोरान्ने


मानवाने प्रयत्नपूर्वक पादाक्रांत केलेले कुठलेही क्षेत्र घ्या. काही जण बहुतांपेक्षा मोठी
भरारी घेतात. त्यांची क्षितिजेही सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यातली नसतात.
विज्ञानाच्या इतिहासात न्यूटनचे एक उद्धृत लोकप्रिय आहे. तो म्हणतो, ‘मी नेहमी
दूरवरचे पाहत आलोय, कारण मी उभाच राहिलोय भव्य खांद्यांवर.’ रिचर्ड
फाईनमन न्यूटनच्या शतकभर नंतरचा. आपण ज्या अनेक भव्य खांद्यांच्या
आधाराने उभे आहोत, त्यातला एक त्याचाही आहे. रिचर्ड फाईनमन – नोबेलविजेता
भौतिकशास्त्रज्ञ. आणि सर्वोत्तम विज्ञान-शिक्षक.
विज्ञानातील अलौकिक प्रतिभावान म्हणून सहसा आईनस्टाईन, न्यूटन आणि डार्विन
ह्यांची नावे घेतली जातात. रिचर्ड फाईनमनच्या प्रतिभेची जातकुळीच वेगळी.
त्याच्या अनेक सहकार्‍यांनी त्याला ‘अवलिया प्रतिभावान’ म्हटले आहे. त्याच्यात
लहान मुलाचा खेळकरपणा होता. तो जिज्ञासू, उत्साही, कलात्मक होता. अमूर्त
गणिताकडे त्याचा विशेष ओढा होता. आणि तो एक सच्चा अभियंताही होता. त्याला
वास्तव जगाच्या समस्या सोडवायच्या होत्या. त्याने एक क्षमता साध्य केली होती.
कुठलीही परिस्थिती, एखादी कल्पना किंवा समस्येमागचा कार्यकारणभाव त्याला
त्वरित उमगे. त्यामुळे इतर कुणाला काही कळायच्या आत त्याचा पुढचा विचार
होई. एक उदाहरण पाहा. नॅनो-टेक किंवा क्वांटम कम्प्युटिंग अशा अत्याधुनिक
तंत्रज्ञानाचा त्याने कितीतरी आधीच वेध घेतला होता.
खेळ… काम… अभ्यासही
रिचर्डचा जन्म 1918 साली अमेरिकेत झाला; ल्युसिल आणि मेल्विल फाईनमन
दांपत्याच्या पोटी. मेल्विल हा स्थलांतरित ज्यू होता. त्याला लहानपणापासून
शास्त्रज्ञ व्हायचे होते. मात्र भोवतालच्या कटू परिस्थितीमुळे ते वास्तवात येऊ शकले
नाही. तो एका संपन्न घरातल्या मुलीच्या प्रेमात पडला; तिच्या कुटुंबीयांना मात्र हा

गरीब मुलगा रुचला नाही. घराला हातभार लावावा म्हणून ल्युसिलने लग्नानंतर
लगेच प्राथमिक शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मुलाला सभोवतालच्या प्रत्येक
गोष्टीबद्दल पडणारे प्रश्न मेल्विलने विज्ञानप्रेमाकडे वळवले. ल्युसिलनेही तिच्या
मुलात उपजतच असणार्‍या जिज्ञासेला खतपाणी घातले. सगळ्याच मुलांमध्ये एक
वैज्ञानिक दडलेला असतो, हे तिच्या लक्षात आले.
लोकांनी टाकून दिलेले जुने रेडिओ, वायरी, मिळतील ते सर्व विजेचे सुटे भाग अशा
गोष्टींतून रिचर्डने घरी आपली प्रयोगशाळा उभारली. लहानपणापासूनच तो रेडिओशी
खटपट करायचा. नवव्या वर्षी तर गावातले लोक त्याला रेडिओ दुरुस्त करायला
बोलवू लागले. खिशात स्क्रू ड्रायव्हर घेऊन फिरणारा आणि विचार करून रेडिओ
दुरुस्त करणारा लहानगा, अशी त्याची ख्याती पसरली होती. आता असे
होण्यामागेही कारण होते. जेव्हा केव्हा त्याला मोडका रेडिओ दिसे, अगदी नाटकीपणे
तो तिथे थबके. मोठ्या माणसांप्रमाणे त्याभोवती एक चक्कर टाके आणि
आधीपासूनच डोक्यात आलेला उपाय करू लागे.
हा महामंदीचा काळ होता. नोकर्‍या आणि पैसा; सगळ्याचीच वानवा होती. रिचर्ड
तसा लहान असल्याने कमी मोबदल्यातही काम करायला तयार असे. त्यामुळे ह्या
चुणचुणीत मुलाला सहज काम मिळे. त्याने त्याच्या मावशीच्या हॉटेलात अगदी
भांडी घासण्यापासून ते पैश्यांचे हिशोब ठेवण्यापर्यंत पडेल ते काम केले. कुठलीही
गोष्ट जास्त चांगल्याप्रकारे करण्याच्या अनेक कल्पना त्याच्याकडे असत. खोल्या
चटकन नीटनेटक्या कशा कराव्यात किंवा घेवड्याच्या शेंगा पटापट कशा चिराव्यात,
असे काहीही. मात्र लोक बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्षच करत. गोष्टी सोप्या व्हाव्यात
किंवा अधिक कार्यक्षमतेने करता याव्यात म्हणून काही नवीन मार्ग चोखाळण्यापेक्षा
त्या पारंपरिक पद्धतीने करण्यावरच बहुतेकांचा भर असे.
शाळेत असताना फाईनमन अभ्यासात आपल्या वर्गमित्रांच्या कितीतरी पुढे होता.
शाळा संपल्यावर त्याने गणित हा मुख्य विषय निवडून मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट
ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम त्याने वर्षापेक्षाही कमी
काळात पूर्ण केला. दरम्यान त्याच्या लक्षात आले, की गणित हा विषय खूपच
अमूर्त आहे. त्याला प्रत्यक्ष उपयोजन असलेला विषय हवा होता. म्हणून मग

सुरुवातीला त्याने विद्युत अभियांत्रिकीचा विचार केला; पण शेवटी भौतिकशास्त्राकडे
आपला मोहरा वळवला. एक तर ते गणिताएवढे अमूर्तही नव्हते आणि विद्युत
अभियांत्रिकीएवढे नीरसही नव्हते. 1939 साली तो पदवीधर झाला. त्याचे दोन पेपर
प्रकाशित झाले. त्यातलाच एक पुढे हेलमन-फाईनमन सिद्धांत म्हणून ओळखला
गेला.
एमआयटीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यावर फाईनमनने प्रिन्स्टन विद्यापीठात
प्रवेश घेतला. त्या प्रवेशपरीक्षेत तो पहिला आलाच, वर आजवर कुणालाही मिळाले
नव्हते एवढे गुण मिळवून आला. प्रिन्स्टनचे स्वरूप ब्रिटिश होते. इथले वातावरण
काहीसे औपचारिक आणि पारंपरिक होते. एमआयटीत त्याला हा अनुभव नव्हता.
मोकळ्या स्वभावाच्या मध्यमवर्गीय फाईनमनच्या हे सारे अंगावर आले. त्याच्या
बाबतीतला एक किस्सा प्रसिद्ध आहे. एकदा रात्री तो एका औपचारिक सहभोजनाला
गेला होता. ‘तुला चहात दूध घालून हवंय की लिंबू?’ अशी विचारणा झाल्यावर
काहीच न सुचून तो म्हणाला, ‘दोन्ही घाला.’ त्यावर तेथील व्यवस्थापिका म्हणाली,
‘तुम्ही नक्कीच गंमत करताय फाईनमन.’ (शुअरली, यू आर जोकिंग मि.
फाईनमन). त्याच्या पुढच्या कारकिर्दीत हा वाक्प्रचार खूपच गाजला. त्याच्या
आत्मचरित्राचे शीर्षकही तेच आहे.
प्रिन्स्टनमध्ये फाईनमनने पुंज भौतिकी (क्वांटम फिजिक्स) ह्या विषयात संशोधन
केले. त्याचे काम आजही बहुतेक शास्त्रज्ञांना आव्हानात्मक वाटते. ‘क्वांटम
मेकॅनिक्स कुणालाही समजत नाही’ असे स्वतः फाईनमननेही म्हटले आहे. हे नवीन
क्षेत्र अणूच्या आतील जगाच्या अभ्यासातून आणि त्यात आढळलेल्या वैचित्र्यातून
उदयाला आले.यामध्ये काळाला गृहीत न धरता, पॉझिट्रॉन्सनी उलटा प्रवास केल्यास
ते इलेक्ट्रॉन्स असतात अशी संकल्पना मांडलेली होती. पुढील आयुष्यात तो पुन्हा
पुन्हा ह्या प्रश्नाकडे वळला. ह्या कामासाठीच त्याला नोबेल पारितोषिक मिळाले.
प्रीती, मृत्यू आणि अणुबॉम्ब
प्रिन्स्टनमध्ये फाईनमनचे संशोधनकार्य अखेरच्या टप्प्यावर असताना बाहेरच्या
जगात झपाट्याने बदल होत होते. दुसरे महायुद्ध अधिकाधिक भीषण होत चालले
होते. जर्मनी अणुबॉम्बची निर्मिती करत असल्याची बातमी अमेरिकेत येऊन

थडकली. आणि विशेषतः जपानने पर्ल हार्बर बंदरावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या
सैन्याने अणुबॉम्ब-निर्मितीचा कार्यक्रम गांभीर्याने राबवायला सुरुवात केली. ‘मॅनहॅटन
प्रोजेक्ट’ ह्या नावाने हा प्रकल्प जाणला जाऊ लागला. देशभरातल्या सगळ्या
वैज्ञानिकांना ह्या कामात ओढले गेले. ह्या प्रकल्पाचे नेतृत्व ओपनहायमर ह्या
भौतिकशास्त्रज्ञाकडे होते. त्याने सगळ्या अग्रणी भौतिकशास्त्रज्ञांची टीम बांधली;
फाईनमनही त्यांच्यात होता. त्यावेळी फाईनमनची वाग्दत्त वधू आर्लीन क्षयरोगाने
आजारी होती. त्याकाळी ह्या रोगावर इलाज नव्हता. कॉलेजात असल्यापासूनच
फाईनमन आर्लीनसोबत होता; परंतु त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीसाठी अविवाहित
असण्याची अट असल्याने तोवर त्यांचे लग्न होऊ शकलेले नव्हते. असे सांगितले
जाते, की ओपनहायमरने फाईनमनला बोलावले आणि त्याला सांगितले, की न्यू
मेक्सिकोमधील लष्करी संशोधन प्रयोगशाळेजवळ अल्बुकर्कमध्ये एक चांगले
हॉस्पिटल आहे, त्यामुळे तिथे जायला काही हरकत नसावी. आणि मार्च 1943
मध्ये, न्यू मेक्सिकोला जायला निघण्याच्या आदल्या दिवशी, त्यांचे लग्न झाले.
न्यू मेक्सिकोमध्ये फाईनमन तीन गोष्टींत वेळ घालवी – अणुबॉम्ब-निर्मितीचे काम,
आर्लीनसोबत वेळ घालवणे आणि सहकार्‍यांच्या खोड्या काढणे! अणुबॉम्ब-निर्मिती
गटामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ सिद्धांतांवर काम करीत. गणिती क्रिया करून आकडेमोड
करणे इत्यादी जबाबदारी कनिष्ठांवर होती. फाईनमन ह्या गटाचा प्रमुख होता. ते
गुंतागुंतीच्या समस्यांचे भाग पाडत आणि प्रत्येक भाग स्वतंत्रपणे सोडवून मग
सगळे एकत्र जोडत. कामाच्या ठिकाणी खोडसाळपणा करून त्याने गोपनीय
कागदपत्रे ठेवलेली कपाटे आणि तिजोर्‍यांची नंबर-लॉक असलेली कुलुपे उघडून
त्यांना हताश केले होते. त्या कामात गुप्तता राखण्याला सर्वोच्च प्राधान्य होते.
कारण बॉम्ब लवकरात लवकर तयार होण्यासाठी जर्मनीही मिळेल त्या माहितीच्या
शोधात होती. अगदी फाईनमनने आर्लीनला पाठवलेली पत्रेही लष्कराकडून वाचून
मगच पुढे जात. फाईनमनच्या हे लक्षात आल्यावर त्या दोघांनी एक सांकेतिक
भाषा तयार केली. लष्करी कर्मचार्‍यांना मग ती उलगडण्याचे काम होऊन बसले.
अर्थात, एवढ्या उद्योगानंतरही त्यांच्या हाती लागे – कायमची ताटातूट होऊ
घातलेल्या प्रेमी जीवांचा पत्र-संवाद. आर्लीन असेपर्यंत तिला भेटण्यात आणि

मोठमोठी पत्रे लिहिण्यात तो बराच वेळ घालवी; पण जून 1945 मध्ये ती मरण
पावली. त्यानंतर जुलै 1945 मध्ये अणुबॉम्बची पहिली चाचणी होईपर्यंत तो
आपल्या कामात गढून गेला.
अणुबॉम्बची पहिली चाचणी झाल्यानंतर फाईनमन त्या प्रकल्पातून बाहेर पडला.
त्याचे वरिष्ठ आणि सहकार्‍यांच्या शिफारशीवरून त्याने कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश
घेतला. मानसिकदृष्ट्या अपात्र असल्याचे निदान झाल्याने सुरू असलेल्या लष्करी
मोहिमेत त्याचा समावेश झाला नाही. बॉम्ब-निर्मिती, त्यातून झालेला विध्वंस आणि
त्याच्या पत्नीचा मृत्यू, ह्या घटनांनी तो जवळजवळ कोलमडून गेला होता. पुढील
संपूर्ण आयुष्य त्याच्याजवळ पत्नीला लिहिलेले एक पत्र असायचे. ते त्याने तिला
तिच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी लिहिले होते. त्याचा शेवट करताना
त्याने लिहिले होते, ‘तुला हे पत्र पाठवले नाही, त्याबद्दल मला क्षमा कर. पण
मला तुझा पत्ताच माहीत नाही.’ आयुष्यभर नास्तिक असलेल्या व्यक्तीसाठी ही
कबुली कठीण असणार. कारण सांत्वनासाठी का होईना, त्याला तिच्या पुनर्जन्माचा
विचार करावा लागला. त्याच वर्षी त्याचे वडीलही गेले. त्यामुळे तो आणखीच एकटा
पडला. वैयक्तिक आघाडीवर असा झगडा सुरू असल्याने तो त्याच्या आधीच्या
कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. मात्र त्याने एका निराळ्याच प्रश्नावर काम
सुरू केले. फिरणार्‍या चकतीमागचे शास्त्र (हिूीळलळी ष र ळीश्रळपस वळीज्ञ).
एकदा हॉटेलात एकाला त्याने खाण्याची ताटली गोल फिरवताना पाहिले. त्यावरून
त्याला ही कल्पना सुचली. गंमत म्हणजे ह्याचा उपयोग त्याला आपल्या पुढील
कामातही झाला. त्यातूनच पुढे त्याला नोबेल मिळाले. लवकरच त्याने क्वांटम
इलेक्ट्रोडायनामिक्सच्या सिद्धांतामुळे उपस्थित होणार्‍या प्रश्नांवर काम करायला
सुरुवात केली. हे प्रश्न प्रकाश आणि इतर विद्युतचुंबकीय लहरींमधले होते. त्यानंतर
बहुतेक शास्त्रज्ञांना ह्या सिद्धांतावर आणखी काम करण्याची गरज असल्याचे
लक्षात आले. ह्या सिद्धांतावरील कामासाठी त्याला जुलिअन श्विंजर आणि
तोमोनागा ह्यांच्याबरोबर नोबेल विभागून मिळाले. तोमोनागाने ह्या सिद्धांताबद्दल
स्वतंत्रपणे काम केले होते.

फ्रीमन डायसननेही ह्याच प्रकारचे काम केले असूनही त्याचा पुरस्कारासाठी विचार
होऊ शकला नाही कारण नोबेल तीनच लोकांमध्ये विभागले जाऊ शकते.
फाईनमनने एक तंत्र विकसित केले होते – ‘फाईनमन आकृत्या’; त्यामुळे
अभ्यासकांना समीकरणांची कल्पना करून ती अभ्यासणे, शिकवणे सोपे जाऊ
लागले. ह्या योगदानामुळे पुरस्कारासाठी त्याला प्राधान्य मिळाले. त्यावर श्विंजरचे
म्हणणे, ‘हे भौतिकशास्त्र नाही, तर अध्यापनशास्त्र आहे.’
आर्लीनच्या मृत्यूनंतर त्याने दोन लग्ने केली. मेरी बेल ही त्याची दुसरी बायको.
कार चालवण्यापासून ते रात्री अंथरुणावर पडल्यावरही फाईनमन सतत गणिती
समीकरणे सोडवत असतो, ह्या कारणाने तिने घटस्फोट घेतला. पुढे तो जिनेवाला
‘शांततेसाठी अणू’ ह्या परिषदेला गेला होता. तिथे त्याची भेट ग्वेनेथशी झाली. पुढे
त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा झाला, कार्ल. त्यांनी एक मुलगीही दत्तक
घेतली. तिचे नाव मिशेल.
वारसा
फाईनमन शिक्षक म्हणून फार प्रभावी होता. भौतिकशास्त्र आणि गणितातल्या
गुंतागुंतीच्या संकल्पना विशद करण्याची त्याची हातोटी बघायची असेल, तर त्याने
1960 साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना दिलेली
व्याख्याने ऐकावीत. त्यांचा वापर अनेक भावी शास्त्रज्ञांनी केला. त्याच्या इतर
व्याख्यानांचा संचही उपलब्ध आहे. आजही हजारो लोक त्यांचा अभ्यास करतात.
‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन’ ह्या त्याच्या आत्मचरित्राच्या आजवर
लाखो प्रती खपल्या आहेत. आजही त्याची गणना सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्ये
केली जाते. प्रयोग करणे, नवनवीन गोष्टी शोधून काढणे ह्या मुलांच्या जन्मजात
क्षमतांवर त्याचा पक्का विश्वास होता. शाळा-कॉलेजांमध्ये चालणारी घोकंपट्टी
त्याला अजिबात मान्य नव्हती. नासाचे चॅलेन्जर स्पेसक्राफ्ट अपयशी ठरण्यामागची
कारणे शोधण्यासाठी एक समिती स्थापन झाली होती. फाईनमन या समितीवर
होता. कमी तापमानाला रबरी गास्केट ठिसूळ झाल्याने मोहीम अयशस्वी झाल्याचे
फाईनमनने सर्वांच्या लक्षात आणून दिले. नॅनो तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग ह्या

तंत्रांचा त्याला आधीपासून अंदाज होताच. प्रत्यक्षात ते आत्ता आकाराला येत असलेले
दिसते आहे.
फाईनमनचे मला भुरळ पाडणारे, प्रेरणा देणारे अक्षरशः हजारो पैलू सांगता येतील.
त्याच्याकडे विनोदबुद्धी होती, खेळकरपणा होता. चिकित्सक वृत्ती, कुतूहल, एखादी
गोष्ट समजेपर्यंत पाठपुरावा करण्याचीही जोड होती. नोबेल मिळाल्यानंतर त्याचा
ठिकठिकाणी सन्मान झाला. आधुनिक जगतातील अलौकिक प्रतिभा म्हणून त्याला
गौरवण्यात आले. त्यावेळी एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या गोष्टींची
उत्तरे निश्चिततेच्या मोजपट्टीवर मोजायला गेल्यास मला ती कमी-अधिक प्रमाणात
देता येतील. कुठल्याही उत्तराबाबत मी पूर्ण खात्री देऊ शकत नाही.’’ हे त्याचे
वाक्य मला नेहमीच विलक्षण आवडते. फाईनमन म्हणा किंवा इतरही महान
शास्त्रज्ञ, त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. एखाद्या गोष्टीबाबत असलेली
अनिश्चितताही ते सहजपणे स्वीकारतात. ह्याच संदर्भात त्याचे आणखीही एक
वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणतो, ‘‘एखाद्या उत्तराबद्दल आपल्याला
खात्री नाही, हे माहीत असल्यास तसे कबूल करण्यात काहीही वावगे नाही.
सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाहीत, ह्याची जाणीव असणे खूप
महत्त्वाचे आहे.’’
प्रांजल कोरान्ने
pranjpk@gmail.com
लेखक भाषाअभ्यासक असून ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी
काम करतात. लेखन आणि वाचन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.