“लहान आहे ना ती!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण ह्या पानावर वाचत आहोत…

बेकीची एक मैत्रीण बेकीला सांगत होती –

मला आता तिसरी मुलगी होणार आहे. आम्हाला समजलं तेव्हा आम्ही चौघं खूश होऊन उड्याच मारायला लागलो!

पण त्याच रात्री माझी मोठी येऊन मला म्हणाली, “आणखीन एक छोटा राक्षस येणार???”

लहान बहिणीबद्दल हिला असं वाटतं? बापरे!

छोटी बरेचदा मधे मधे करते, कधीकधी हिला ते अजिबात आवडत नाही, ही आरडाओरडा करते… वगैरे रोजचं आहे.

पण तरी थेट राक्षस!

छोटी तिला त्रास देते तेव्हा बरेचदा मी समजावते, “अग लहान आहे ती! प्रेमानं खेळायला जवळ येतेय तुझ्या! तिलापण सोबत घेऊन खेळायचं!”

पण कधीकधी वैतागून मी असंही म्हणालेय – “भावंडं असणं खूप चांगली गोष्ट आहे! तुला एक बहीण आहे; नशीबवान आहेस तू!”

बेकीनी ह्यावर स्वतःची एक गोष्ट सांगितली –

मला दुसरी मुलगी होणार होती तेव्हा मुलाला जवळ बोलावून, माझ्या अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी हात ठेवत मी म्हणत असे, “माझा हा भाग खूप खूश आहे… नवीन बाळ येणार म्हणून! पण बापरे! माझा हा भाग एकदम टेन्शनमध्ये आहे… आता काय होईल म्हणून! पण माझा हा भाग पुन्हा खुशीत आहे… नवीन बाळासोबत खेळायला मिळेल म्हणून! आणि हा भाग अगदी दुःखी आहे… आता नवीन बाळ सारखं जागं ठेवेल म्हणून!”

 त्याच्या मनात त्याच्या बहिणीबद्दल अनेक परस्परविरोधी भावना येऊ शकतात, आणि ते ठीक आहे, नॉर्मल आहे, हे मला ह्यातून सांगायचं होतं.

बहीण आल्यानंतर पुढे एक दिवस तो मला सांगायला आला, “आई माझा हा भाग ‘हेट’ करतो हिला!”

हे त्याला मला सांगता येणं ही पहिली पायरी आहे. हिच्यावर माझं प्रेम आहे आणि आत्ता मला हिचा संताप येतोय हे दोन्ही खरं आहे, हे समजलं तर पुढच्या पायरीवर जाता येईल. तिनं येऊन त्याचं चित्र बिघडवल्याबद्दल तो रागावलेला असताना ‘लहान आहे ना ती! प्रेमानं खेळायला येतेय ना जवळ!’ किंवा अगदी ‘नशीब समज तुला बहीण आहे!’ वगैरे मधून आपण त्याला सांगतो, की त्याचा संताप योग्य नाही. त्याला नेहमी प्रेमच किंवा कधीकधी तर अगदी भाग्यवान वगैरे वाटलं पाहिजे! एखाद्या भावनेचं अस्तित्वच अमान्य केलं, तर तिच्यावर नियंत्रण मिळवायला कसं शिकणार?

‘मला राग येतोय, आतून शरीर सांगतंय तसं; पण असं वाटलंच नाही पाहिजे खरं तर! माझं शरीर माझ्या विरुद्ध जातंय. व्हॉट्स रॉन्ग विथ मी!!!’ हे वाटणं शिकण्यासाठी उपयुक्त नाही. माझ्या मुलांच्या मनात एकमेकांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी असाव्यात असं नाही मला वाटत. वाईट भावना समजून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं त्यांनी जावं, असं वाटतं. त्यातूनच पुढे त्या भावनेचा वागणुकीतून होणारा उद्रेक कमी होईल.

रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com

पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.