लिंगभावाच्या कलाकलाने

जमीर कांबळे

‘पालकनीती’च्या ह्या अंकात बहुधा पहिल्यांदाच लैंगिक अल्पसंख्याक व्यक्तींवर लेख येत असावा. हा विषय पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि शिक्षणाबद्दल विचार करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजून हा लेख प्रकाशित होत आहे, त्यासाठी ‘पालकनीतीचे’ अभिनंदन. ह्या लेखाच्या निमित्ताने आपण ‘पालकनीती’ ह्या शब्दाचा नव्याने विचार करूया. लैंगिक अल्पसंख्याक व्यक्तींवर होणारे अन्याय आणि ‘पालकनीती’ ह्या दोन्ही विषयांमधील दुवा शोधूया. ‘नीती’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहता, ह्या शब्दाचा माणसाच्या ‘नित्य’ आचरणाशी असलेला संबंध मला इथे अधोरेखित करावासा वाटतो. म्हणून समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, तृतीयपंथी इत्यादी  लोकांचे आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समाजातील इतर लोकांचे ‘नित्यक्रम’ पाहावे असे मनात आले.

अगदी काल-परवाची गोष्ट. इन्स्टाग्रामवर एक किशोरवयीन मुलगा लावणी नृत्याचे छान छान रील्स बनवून टाकत होता. त्याचे असंख्य ‘फॉलोअर्स’ तयार झाले होते, त्याच्या कलेची खूप वाहवा होत होती. मग एकदा त्याने नऊवारी नेसून लावणीचा व्हिडिओ टाकला. तेव्हा मात्र लोक त्याच्यावर चिडले. कुणी त्याला ‘बायल्या’ म्हणून चिडवू लागले, काही जणांनी त्याच्यावर अश्लील कमेंट्स केले, काहींनी त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली. होणारी अवहेलना सहन न होऊन त्याने आत्महत्या केली. त्यावरही एकाने लिहिले, ‘चला बरे झाले, समाजातील घाण साफ झाली!’

एक मुलगी लैंगिक अल्पसंख्याक लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी माझ्याकडे आली होती. तिला घर सोडून पळून जायचे होते. ती लेस्बियन असल्याने तिचे आईवडील, नातेवाईक तिच्यावर पहारा ठेवून असत. तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचे अनेक प्रयत्न केले; पण ती तिच्या लैंगिक ओळखीवर ठाम राहिली. एकदा चिडून बापाने नात्यातील एकाला तिच्यावर बलात्कार करायला सांगितला. त्याला वाटत होते, की असे केल्याने तिला पुरुष आवडू लागतील. ह्या विषयाचा अभ्यास केल्यावर कळले, की भारतात अशा बलात्काराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.  

माझ्या एका तृतीयपंथी मैत्रिणीने आपल्या समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करणारा एक किस्सा सांगितला. एकदा ही मैत्रीण, तिचे रोजचे भीक मागण्याचे काम करण्यासाठी शेअर ऑटोने बाजाराला चालली होती. ती रिक्षेत बसली तसे रिक्षातले इतर लोक अस्वस्थ झाले. रिक्षात एक बाईही आपल्या लहान मुलासह बसलेली होती. हिजड्याला रिक्षात पाहून ती फारच निराश झाली होती. तो मुलगाही हिजड्याकडे भीतीयुक्त कुतूहलाने पाहत होता. थोड्या वेळाने रिक्षा बाजारापाशी येऊन थांबली. लोकांच्या काटेरी नजरा झेलत हिजडा रिक्षेतून उतरला. तो रिक्षावाल्याशी बोलत असलेला बघून रिक्षात बसलेला मुलगा म्हणाला, ‘‘मम्मी बघ. तो ‘भूत’ बोलतोय!’’ हे ऐकून रिक्षातले प्रवासी अचंबित झाले. रिक्षाचालकाला वाईट वाटले, रागही आला. सगळ्यांसमोर आपली नाचक्की झाल्याचे बघून आई शरमली. ती तिच्या मुलाला हिजड्यांबद्दल काय सांगत होती ते उघड झाले होते. शेवटी तो हिजडाच मोठमोठ्याने हसू लागला. झालेल्या घटनेला विनोदाचा बाज देऊन त्यानेच सारवासारव केली. रिक्षातली मंडळीही हसू लागली. त्यांच्या गुन्ह्याला हिजड्यानेच झाकले म्हणून त्यांनाही हायसे वाटले.

हा ‘गुन्हा’ म्हणायचा का? हो! एका जिवंत माणसाला ‘भूत’ म्हणून त्याचे माणूसपण नाकारणे हा निर्दयी, अमानवी सामाजिक गुन्हाच आहे. पुराणकाळापासून त्यांचा उल्लेख सापडत असताना आपल्या तथाकथित ‘समाजात’ त्यांना साधी माणूस म्हणूनही ओळख मिळत नाही. जन्माला आलेले मूल द्विलिंगी (इंटरसेक्स) असले, तर अनेक पालक ते रस्त्यावर सोडून देतात. वयात आलेला आपला मुलगा मुलीसारखा वागतो म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना घरातून हाकलून देतात. एखादा विद्यार्थी मुलींसारखा वागत असला, तर वर्गातली मुले, त्यांचे पालक, शिक्षक, कर्मचारी कुणीच त्याला शाळेत टिकू देत नाहीत. अनेक तृतीयपंथी शिकलेले नसतात याचे कारण हेच आहे. शिक्षण नाही तर नोकरीही नाहीच आणि शिक्षण असलेही, तरी हिजड्यांना कोण नोकरी देणार? मग पोटापाण्यासाठी त्यांनी काय करायचे? कोणी राहायला देत नाही म्हटल्यावर हिजड्यांनी एकत्रच कुटुंब प्रस्थापित केले. कोणी काम देत नसल्याने भीक मागायला सुरुवात केली. नाचगाण्यातून तर कधी शरीरविक्रयातून पैसे कमवू लागले. अनेको वर्षांपासून हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग झाला. समाजाने त्यांना केवळ भौतिक पातळीवर नाकारले नाही. समाजात सगळीकडे हिजड्यांची अवहेलना होते. लोक त्यांच्याकडे कधी कुतूहलाने तर कधी वाईट नजरेने पाहत राहतात. कोणी त्यांना जवळ येऊ देत नाही, त्यांच्याशी बोलणे टाळतात, त्यांना शिव्या देतात, चिडवतात, मारपीट करतात, तर कोणी त्यांच्यावर बलात्कारही करतात.

समलिंगी, द्विलिंगी, पारलिंगी, तृतीयपंथी व्यक्तींचे हे शोषण पाहता आपल्याला ‘माणूस’, ‘समाज’, ‘नीती’, ‘न्याय’, ‘लोकशाही’, ‘शिक्षण’, ‘समता’ ह्या आपल्या लाडक्या मूल्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. माणूस हा ‘सामाजिक प्राणी’ आहे असे आपण अभिमानाने म्हणतो. माणूस प्राण्यांपेक्षा निराळा आहे. तो केवळ कळपात राहत नाही, तर त्या कळपात स्वतःची बुद्धी, नैतिकता, सामाजिकता आणि संस्कृती यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य, एकता, मैत्री, न्याय, समता अशी मूल्ये रुजवतो, आणि कळपाचा खऱ्या अर्थाने ‘समाज’ होतो. म्हणून समाजाचा संबंध आपल्या ‘नित्य आचरणाशी’ आहे. ‘समाज’ म्हणजे माणसांना एकत्र जोडणारे मैत्रीपूर्ण, सामुदायिक, न्याय्य परस्परसंबंधांचे जाळे. आज समाजात समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, तृतीयपंथी लोकांना मिळणारी वागणूक समाजातील बिघडलेल्या, हिंसक, अन्यायकारी आणि शोषक परस्परसंबंधांचा प्रत्यय देते. लैंगिक अल्पसंख्याकांचा नित्य संघर्ष पाहता ‘समाज’ नावाची संकल्पना अजून तरी पूर्णत्वास गेलेली नाही. समता, न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही या मूल्यांचीदेखील हीच शोकांतिका आहे. ह्या मूल्यांचा र्‍हास थांबवायचा असेल, तर आपल्याला इतर वंचित समूहांचे तसेच लैंगिक अल्पसंख्याकांचे शोषण संपवावे लागेल. ह्या शोषणाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी आधी त्याची मुळे कशात आहेत हे शोधले पाहिजे.

1. पितृसत्ता

मानव आधी शिकारीवर अवलंबून होता. शेतीचा शोध लागला तसा तो एका ठिकाणी स्थायिक होऊ लागला. समाजबांधणीच्या सुरुवातीला सुपीक जमीन आणि स्त्रीच्या पुनरुत्पादन क्षमतेमध्ये साम्य दिसल्यामुळे मातृसत्ताक जीवनशैली आत्मसात केली गेली. परंतु पुढे, सुमारे 6000 वर्षांपूर्वी, फाळ असणाऱ्या नांगराचा शोध लागला आणि स्त्रियांकडून हाताने खणून केल्या जाणाऱ्या शेतीपद्धतीचा अस्त झाला. नांगर चालवण्यासाठी पशूंना जुंपून पुरुषाने जमीन कसण्याची नवी परंपरा सुरू झाली. नांगरामुळे कमी वेळात, कमी कष्टात भरपूर धान्य पिकू लागले. इतर गृहउद्योगांच्या तुलनेत शेती-उद्योग भरभराटीला आला आणि त्याची मालकी आपसूकच शेती करणाऱ्या पुरुषांकडे आली. अन्नधान्याच्या साठ्यातून मालमत्ता निर्माण झाली. या मालमत्तेला वारस हवा अशी कल्पना निर्माण झाली. तोपर्यंत चालणाऱ्या मुक्त लैंगिक संबंधांतून स्त्रीला होणाऱ्या अपत्यांमधून नेमके आपले मूल पुरुषाला कळावे म्हणून विवाहाची परंपरा रूढ झाली. विवाहामुळे पुरुषाला पितृत्व बहाल केले गेले. पुरुषाच्या पितृत्वाची हमी मिळण्यासाठी स्त्रीने मातृकुलाचा त्याग करून पतीच्या घरी जाण्याची नवी परंपरा रुजू झाली. त्यातून आजी – आई – मुली – बहिणी ह्या मातृकेंद्री व्यवस्थेवर आघात झाला. खाजगी मालमत्ता आणि पितृसत्ता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायकारक पद्धती व बंधनांनी स्त्री-जीवन जखडून राहील अशी व्यवस्था लावली गेली. तिला चार भिंतींच्या आत नियंत्रित करण्यासाठी कुटुंब नावाची संस्था उदयास आली. स्त्रीचे भौतिक आणि प्रतीकात्मक पातळीवर शोषण सुरू झाले. 

कुटुंबसंस्था जिवंत ठेवायची म्हणजे तिचे सांस्कृतिक उदात्तीकरण करणे गरजेचे आहे. म्हणून स्त्रीच्या प्रतिमेचेही नियंत्रण करणे गरजेचे असते. तिच्यावर लादल्या गेलेल्या मर्यादांचे उदात्तीकरण करण्यासाठी तिच्या वाटेला येणाऱ्या भूमिकांचे

आणि तिच्या लैंगिक पारतंत्र्याचे दैवीकरण केले जाते. स्त्रीला ज्ञान-विज्ञानाचे भांडार खुले झाल्यास ती जागृत होऊन तिला

या स्थितीतून मुक्त होण्याची इच्छा होईल, हे लक्षात येऊन

त्यात पुरुषाला श्रेष्ठ मानणारी कलमे आहेत, पुरुषाला सोयीचे, फायद्याचे कायदे-नियम आहेत, म्हणजे फक्त पुरुषाचीच प्रगती होईल अशी स्त्रियांना मागे खेचणारी धार्मिक वचने आणि सांस्कृतिक प्रतीके हुशारीने लिहिली गेलेली आहेत. स्त्री म्हणजे एक आज्ञाधारक मुलगी / बहीण, प्रेमळ आणि निष्ठावान पत्नी, कर्तव्यतत्पर माता / सून अशा तिच्या प्रतिमा धार्मिक आणि सांस्कृतिक माध्यमांतून प्रस्थापित केल्या गेल्या. मुलगी किंवा बहीण म्हणून तिने पित्याची व भावाची आज्ञा पाळायची,

पुढे तिची दुसऱ्या घरात वाहतूक होणार आहे हे लक्षात घेऊन तिची योनी इतर पुरुषांपासून जपली पाहिजे, म्हणून तिच्या योनीवर इज्जतीचा अर्थ लादला गेला. तिच्या योनिशुचितेवर पुरुषांचे परस्परसंबंध अवलंबून असल्यामुळे स्त्रीवर बलात्काराची शक्यता निर्माण होते. बलात्कार झाला की स्त्रीची इज्जत लुटली गेली असे म्हणतात. ही इज्जत म्हणजे कुटुंबाची इज्जत असते. कुटुंबाच्या चौकटीत योनी जपली म्हणजे इज्जत राहते. इथे ‘माझ्यावर बलात्कार झाला म्हणून माझी इज्जत गेली नाही’ हे म्हणण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना नसते. कारण इज्जत ही पुरुषांच्या समाजाने तयार केलेली संकल्पना आहे. म्हणून पित्याची आज्ञा पाळणे आणि पतीशी एकनिष्ठ असणे स्त्रीकडून अपेक्षित असते.

पुरुष एकमेकांना आई-बहीण-पत्नीवरून शिव्या देतात तेव्हा ही इज्जत जाते. मी स्वतः पुरुष म्हणून आईला, बहिणीला, पत्नीला शिव्या देऊ शकतो. तेव्हा माझी इज्जत जात नाही, पण कुटुंबाच्या बाहेरील पुरुषाने शिवी दिली की मात्र माझा अपमान होतो. थोडक्यात कुटुंबाच्या आत इज्जत जात नाही तर कुटुंबाच्या बाहेर इज्जत जाते.

2. लिंगभाव राजकारण

माणसाचा जन्म होताच त्याच्या जैविक गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्याचे लिंग ठरवले जाते. त्याच्या शरीराला ‘शिश्न’ (penis) असेल तर त्याचे लिंग ‘पुरुष’ आणि शरीराला ‘योनी’ (vagina) असेल तर त्याचे लिंग ‘स्त्री’ असे ठरवले जाते.

मोठे झाल्यावर लक्षात येते, की ‘लिंग’ हे केवळ माणसाला दिलेले जैविक किंवा शास्त्रीय नाव नसून ते एक सामाजिक रचितसुद्धा (social construct) आहे. एक पुरुष किंवा स्त्री म्हणून मी कसे वागायचे, बोलायचे, चालायचे, कोणते कपडे – दागिने घालायचे, किती केस वाढवायचे इथपासून ते मी कोणते काम करायचे, माझ्या जबाबदाऱ्या कोणत्या, मी कोणाच्या प्रेमात पडायचे, कोणाशी लग्न करायचे, कोणासोबत संभोग करायचा, माझी घरात, समाजात, कामाच्या ठिकाणी किती सत्ता असेल इथपर्यंत सगळे लहानपणापासून ठरवले जाते. थोडक्यात ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे केवळ जैविक किंवा शास्त्रीय वर्गीकरण नसून ते दोन साचे आहेत. प्रत्येकाला या साच्यांमध्ये फिट्ट बसवले जाते. ह्या चौकटीला काही सीमारेषा आखून दिलेल्या असतात. त्याच्या आत राहण्याचे नियम असतात आणि पितृसत्ताक समाजामध्ये आपले आयुष्य सुरळीत जगण्यासाठी हे नियम पाळावे लागतात.

हे अदृश्य साचे, नियम, सीमारेषांना आपण लिंगभाव राजकारण (gender politics)म्हणतो. ह्या राजकारणामुळे स्त्रियांचे जास्त शोषण होत असले, तरी त्याचे स्त्री आणि पुरुष दोघेही बळी ठरतात. स्त्रीने सोशिक, सोज्वळ, प्रेमळ, भावनाशील, संवेदनशील, अबला, आज्ञाधारक असावे, तिने कुटुंब सांभाळावे, तर पुरुषाने बलवान, कर्तव्यकठोर, तर्कशुद्ध, व्यवहारी असावे, त्याने जबाबदारी उचलावी, नेतृत्व करावे, सत्ता चालवावी, कुटुंब निर्माण करावे, अशा सामाजिक अपेक्षा असतात. मोठे होताना आपले सामाजिकीकरण (socialisation) होत असते, तेव्हा आपल्या नेणिवेत पितृसत्ताक मानसिकता कोरली जाते. ही प्रक्रिया इतकी खोल असते, की स्त्री आणि पुरुष नावाच्या समाजाने निर्माण केलेल्या प्रतिमा आपल्याला ‘नैसर्गिक’ वाटायला लागतात. म्हणून स्त्रिया जन्मतःच स्त्रीवादी असतील असे मानणे चुकीचे ठरेल. अनेकदा आपण पाहतो, की स्त्रियासुद्धा पितृसत्ताक मानसिकता आत्मसात करतात, आनंदाने आपल्या नवऱ्याला देवस्थानी ठेवतात, त्याला पूजतात, त्याच्यासाठी व्रत करतात, त्याची सत्ता मानतात, त्याचे निर्णय मानतात, त्याची आज्ञा पाळतात आणि तो करतो ते शोषणही नैसर्गिक म्हणून स्वीकारतात. 

पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांचा जन्मसुद्धा पाप मानला जातो. भारतात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण भयानक आहे. मुलगी जन्मल्यावर तिला मोठे करायचे, तिच्या शिक्षणावर खर्च करायचा, तिची इज्जत जपायची आणि शेवटी तिचे लग्न लावून द्यायचे, हुंडा द्यायचा, तिला परक्या घरी द्यायचे – स्त्रियांच्या आयुष्यातील एवढ्याच शक्यता डोक्यात असल्यामुळे स्त्री म्हणजे ओझे वाटणे साहजिक आहे. मुलगा मात्र शिकणार, मोठा होणार, कुटुंब विस्तारणार, वंश चालवणार, घराची आर्थिक जबाबदारी उचलणार म्हणून मुलाचा जन्म अधिक फायद्याचा अशी समजूत असते. आजही घरात गरिबी असेल, मुलगा किंवा मुलगी यापैकी एकालाच शिकवता येणार असेल, तर मुलाला शिकवण्याचा निर्णय घेतला जातो. मुलगी मोठी होते तसे तिच्या चालण्या, बोलण्या, वागण्यावर आणि तिने कसे कपडे घालावेत यावर निर्बंध लावले जातात. 

कामाच्या ठिकाणी स्त्रियांना अनेक समस्या असतात. संख्येने कमी असल्यामुळे संस्थात्मक निर्णयांच्या वेळी तिच्या गरजांचा बरेचदा विचार होत नाही. उदाहरणार्थ कामाच्या वेळा, श्रमाचे वाटप इत्यादी. समजा एखादा कार्यक्रम होणार असेल तर सगळ्या तांत्रिक जबाबदाऱ्या नैसर्गिक बाब असल्यासारख्या पुरुषांच्या वाट्याला येतात तर पुष्पगुच्छ आणणे, सभागृहातील सजावट, आभारप्रदर्शन, पाहुण्यांचे स्वागत इत्यादी ‘सॉफ्ट’ कामे स्त्रियांच्या वाट्याला येतात. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा आवाजही दाबला जातो, तिचे मत फारसे विचारात घेतले जात नाही आणि पुरुषांच्या स्पर्धेत तिच्या प्रगतीच्या शक्यताही कमी असतात. पुढे जायचे असेल तर अनेकदा तिला तिच्या वरच्या पुरुषांची मर्जी सांभाळावी लागते. कामाच्या ठिकाणी तिचे मानसिक आणि लैंगिक शोषण होते.

बाहेर काम करणाऱ्या, कमावत्या स्त्रीची घरकामातून सुटका झालेली नसते. बहुतेक स्त्रिया नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत त्यांची सर्व मानसिक आणि शारीरिक ऊर्जा पणाला लावतात. स्त्री जास्त कर्तृत्ववान असेल, जास्त कमवत असेल, तर अनेक पुरुषांचा अहं दुखावला जातो. त्यांची मर्दानगी धोक्यात आली असे त्यांना वाटते. अशा स्त्रियांचा पदोपदी अपमान करून, त्यांना तुच्छतेची वागणूक देऊन पुरुष बदला घेतात आणि स्त्रियांना त्यांची ‘जागा’ दाखवून देतात. 

पूर्वी स्त्रियांना पित्याच्या आणि नवऱ्याच्या खाजगी मालमत्तेत हक्क नव्हता. आता तो आहे; परंतु अनेक वेळा याची अंमलबजावणी होत नाही. भावनिक पातळीवर निर्णय घेतले जातात किंवा मग थेट कायद्याचा आधार घ्यावा लागतो. त्यातून समाजाची हेटाळणी वाट्याला येते.

3. लैंगिकतेचे राजकारण

सेक्स आपल्या निरोगी मनासाठी गरजेचा असला तरी तो चारचौघात चर्चेचा विषय नसतो. अनेक माणसांना गंभीर स्वरूपाच्या लैंगिक समस्या उद्भवतात, पण तरीही कुणी त्याबद्दल उघडपणे बोलत नाही. हेच मौन मानसिक आजारांना जन्म देते. फ्रॉइडपासून अनेक मानसोपचारतज्ज्ञ मानवी नातेसंबंधांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे मूळ सेक्समध्ये आहे हे वर्षानुवर्षे सांगत आलेले आहेत. हा विरोधाभास मानवी समाजात तयार झालेल्या लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता यांच्या एकत्रित राजकारणाचेच फलित आहे.

जन्म झाला की लगेच आपल्या जैविक गुणकांच्या (शिश्न, योनी) आधारे आपल्या अस्तित्वावर ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ असा लिंगाचा शिक्का मारला जातो. त्यामुळे एखाद्या बाळामध्ये शिश्न आणि योनी या दोन्ही अवयवांची लक्षणे दिसली, की अशा बाळांना ‘अपवाद’ / ‘वैद्यकीय समस्या’ समजून ‘द्विलिंगी’ असे नाव दिले जाते. ‘स्त्री-पुरुष’ हा नियम आणि ‘इतर’ हा ‘अपवाद’ असे म्हणून लैंगिक ओळखींची समाजामधली ‘जागा’ ठरते.

का करतो समाज आपल्यावर असे संस्कार? का लादले जाते ‘लिंगभाव’ नावाचे हे सामाजिक, सांस्कृतिक रचित? या प्रश्नांची उत्तरे लैंगिकतेच्या राजकारणात सापडतात. याचा इतिहास शोधणे अवघड असले, तरी आपल्याला काही अनुमान लावता येतील. अगदी सुरुवातीला मानवाने लैंगिक इच्छेचा स्वीकार त्यातून मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक सुखाच्या अनुभवामुळे केला असणार. अनेक लैंगिक क्रियांचा अनुभव घेत असताना विशिष्ट क्रियेतून प्रजनन होते हे लक्षात आल्यावर लैंगिक क्रियेतून होणारा ‘फायदा’ जाणवला असणार. हळूहळू प्रजनन ह्या निकषावर मानव त्याच्या असंख्य लैंगिक क्रियांमध्ये फरक करू लागला असणार. त्यातून विरुद्धलिंगी संभोग हे, त्यातील फायद्यामुळे, गरजेचे आणि इतर लैंगिक क्रिया ऐच्छिक असे मूल्य तयार झाले असणार. आता हे मूल्य रुजवायचे असेल, तर त्यासाठी संस्कृतीचा, धर्माचा आधार घेऊन या मूल्याचा गौरव केला पाहिजे. अनेक धर्मांचा, बाजारपेठांचा, प्रसारमाध्यमांचा अभ्यास करून पाहा. फार चलाखीने ‘इच्छा’ आणि ‘गरज’, ‘वैयक्तिक सुख’ आणि ‘समाजहित’, ‘संभोग’ आणि ‘प्रेम’, ‘लग्न’ आणि ‘व्यभिचार’ अशा असंख्य द्वैतांच्या आधारे मानवी लैंगिकतेवर नैतिकतेचे ‘पितृसत्ताक’ आणि ‘विरुद्धलिंगी’ मूल्य थोपवले जाते.       

या द्वैतांमुळे लैंगिक इच्छेभोवती कुंपण लागून लैंगिकता ही एक सामाजिक समस्या होऊन बसते. तिचे निवारण प्रजनन हे प्रयोजन देऊन बिंबवले जाते. म्हणून आपल्या लिंगाने त्याला नेमून दिलेला लिंगभाव जगला पाहिजे आणि लिंगभावाने ‘संभोग कोणाशी, कसा आणि कशासाठी करावा’ हे त्याला नेमून दिलेले लैंगिकतेचे नियम पाळले पाहिजेत अशी समाजाची अपेक्षा असते. परंतु माणसाची लैंगिकता त्याच्यापेक्षाही चलाख असते. ती मुक्त आहे, स्वतंत्र आहे, तिच्यावर नियंत्रण करणे सोपे नाही. लैंगिक इच्छा लैंगिक समाधान मागत असते आणि हे समाधान तिला वारंवार हवे असते. तिच्या समाधानाला काहीच मर्यादा नाहीत म्हणून ओशोंनी सुचवलेला स्वच्छंद सेक्सचा मार्ग समाधीकडे नेऊ शकणार नाही. लैंगिक इच्छा कशानेही आणि कोणामुळेही चाळवली जाऊ शकते. यालाही काही नियम नाही. तिचे दमन आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवते. तिच्यामुळेच आपण प्रेमात पडतो किंवा प्रसंगी अनैतिक कृत्य करायलाही प्रवृत्त होतो. म्हणून सेक्स ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे नियंत्रण केले पाहिजे असे समाजाला वाटणे साहजिक आहे. परंतु मुळात सेक्सवर नैतिकता थोपवता येते का आणि ही नैतिकता ‘समतेची’ आहे का हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत.

सेक्सच्या नियंत्रणाचा इतिहास पाहिला, तर समाजाने वापरलेल्या अनेक क्रूर क्लृप्त्या सापडतील. स्त्रियांच्या लैंगिकतेचे नियंत्रण, समलिंगी लोकांचे शोषण आणि विरुद्धलिंगी कामजीवनाचा नियम यातून तयार झालेल्या राजकारणातूनच मानवी लैंगिक स्वातंत्र्याचा, लैंगिक चळवळींचा जन्म होतो. थोडक्यात, लैंगिकतेतूनच शोषण आणि स्वातंत्र्य या दोन्ही शक्यता तयार होतात.

आता आपण समलिंगी आणि तृतीयपंथी यांचे ‘ओळखींचे राजकारण’ (identity politics) पाहूया. घरामध्ये इंटरसेक्स बाळाचा जन्म झाल्यावर हे मूल लगेच किंवा काही काळाने घराबाहेर फेकले जाते. हिजडा हा शब्द ‘हिज्र’ या फारसी शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थच मुळी ‘घरातून बाहेर पडलेली व्यक्ती’ असा आहे. आज बहुसंख्य तृतीयपंथी व्यक्ती आपल्या आईवडिलांपासून दूर जमातीतल्या घरात राहतात. का नको असतो आपल्याला आपलाच तृतीयपंथी मुलगा घरात? कारण तो ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे साचे नाकारतो, वरवर ‘पुरुष’ वाटत असताना बायकांसारखा वागतो, बोलतो, बायकांचे कपडे घालतो आणि कधीकधी तर स्वतःचे पुरुषी लिंगही नको म्हणतो. पुनरुत्पादनाच्या दुकानांमध्ये अशा ‘पुरुषाचे’ काय काम? त्याच्यामुळे समाजात कुटुंबाची ‘इज्जत’ जाते असे सगळ्यांना वाटते. समलिंगी स्त्री-पुरुषांचेही तसेच आहे. आपले मूल समलिंगी लैंगिक इच्छा बाळगते हे घरात कळले, की ह्या ‘विकृती’ला मानसोपचाराने किंवा एखाद्या धर्मगुरूच्या मदतीने ‘दुरुस्त’ करण्याचे प्रयत्न सुरू होतात. काही समलिंगी व्यक्तींचे बळजबरीने लग्न लावले जाते. आणि काही भीतीपोटी किंवा भिन्नलिंगी आयुष्यात मिळणार असलेल्या सुखसोयींसाठी स्वतःहून लग्न करून मोकळे होतात. अर्थात, त्यांची समलिंगी प्रेमाची वा संभोगाची इच्छा संपत नाही. म्हणून ते विवाहबाह्य समलिंगी संबंध ठेवतात. काही शिक्षित, उच्चवर्गीय कुटुंबातले समलिंगी स्त्री-पुरुष घरच्यांना आपली लैंगिक ओळख सांगून टाकतात (ह्याला ’लेाळपस र्ेीीं’ म्हणतात). काहींना समाजाच्या साच्यांच्या विरोधात जाण्यासाठी घरच्यांची साथही मिळते. अनेक तृतीयपंथी व्यक्ती घराबाहेर पडून हिजड्यांच्या व्यवस्थेचा भाग बनतात आणि त्या व्यवस्थेतल्या नवीन पितृसत्ताक साच्यांना आपलेसे करतात. ह्या व्यवस्थेतही सत्तेची एक उतरंड असते, त्यात सर्वात वर नायक असतो, त्याच्या खाली गुरू असतात आणि गुरूंचे चेले असतात. ही उतरंड केवळ नावांची नसून आर्थिक सत्ताकारणाचीही असते. चेल्यांनी पैसे कमवायचे. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक मान्यता नसल्यामुळे रस्त्यावर भीक (मंगती) मागायची, लग्नसमारंभात नाचायचे-गायचे, वेश्याव्यवसाय करायचा. हे कमावलेले पैसे, त्यातला हिस्सा गुरूला द्यायचा, ह्या हिश्श्यातून नंतर काही पैसे नायकाला मिळतात. शेवटी उतरंडीची ही व्यवस्थाही पितृसत्तेचेच अनुकरण करणारी असते.   

समलिंगी, तृतीयपंथी लोकांनी आपली एक राजकीय चळवळ उभी केली. मात्र तिची व्याप्ती कायदेशीर आणि सामाजिक मान्यता, आत्मसन्मान, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण, लग्न आणि मूल दत्तक घेण्याचे हक्क इथपर्यंतच मर्यादित राहिली. ह्या लैंगिक ओळखींना कायदेशीर मान्यता देण्याने व्यवस्थेला काही इजा होणार नाहीये हे व्यवस्थेच्याही लक्षात आलेले आहे. उलटपक्षी ही व्यवस्था किती आधुनिक आणि प्रगतिशील आहे असाच तिचा बोलबाला होणार आहे. आणि खरेच आज एलजीबीटी व्यक्तींना अनेक मंचांवर बोलायला उभे केले जाते, राजकीय पक्षही तृतीयपंथी व्यक्तींना पक्षामध्ये एखादे पद देऊन आपले प्रगतिशील असणे दाखवतात. परंतु ह्या सगळ्याचा चळवळीसाठी काही फायदा होतो का?

इथे आपल्याला चळवळीचा, क्रांतीचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. एखादा क्रांतिकारी आवाज उठतो, एखादी चळवळ उभी राहते, तेव्हा हा आवाज नेमके काय करत असतो? हा आवाज व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह व्यक्त करतो, बंड पुकारतो. व्यवस्थेमुळे अस्तित्वात आलेल्या असमानतेशी लढा देतो. व्यवस्थेने तयार केलेल्या साच्यांना आव्हान देतो. साच्यांना दिलेले आव्हान आणि त्यांच्याविरोधात केलेला विद्रोह यातून दोन शक्यता तयार होतात. एक म्हणजे व्यवस्थेतली असमानता मिटवणे, व्यवस्थेतले प्रस्थापित साचे मोकळे करणे आणि दुसरी, ह्या साच्यांना नष्ट करून विषमता आणि असमानता नसणाऱ्या समाजाची मांडणी करणे. काहींना चळवळीतून व्यवस्थेबरोबर केवळ एक तडजोड हवी असते. आम्हालाही व्यवस्थेची भाषा, संस्कृती, धर्म, कायदा, लग्न, कुटुंबामध्ये जागा मिळावी ही चळवळीची एक दिशा. हिला मी मवाळ दिशा म्हणतो. आणि मालक-गुलामाची ही व्यवस्थाच नको; गुलामगिरीची ही भाषा, संस्कृती, कायदे, साचे, हा समाजच नको, ही चळवळीची जहाल दिशा. मवाळ दिशा ही व्यवस्थेशी केवळ तडजोड करते आणि व्यवस्था तशीच टिकून राहते. याचा परिणाम म्हणजे आता भाषा, संस्कृती, माध्यमांमध्ये एलजीबीटी ओळखींचा उत्सव दिसू लागेल, आरक्षणही मिळेल, धोरणात्मक बदल घडून काही सवलतीही मिळतील. परंतु या व्यवस्थेची पितृसत्ता, भांडवलशाही आणि जातव्यवस्था तशीच टिकून राहील. नुकतेच वृत्तपत्रामध्ये एका ब्राह्मण मुलाच्या आईने आपल्या मुलासाठी वर पाहिजे अशी जाहिरात दिली होती, त्या जाहिरातीत ‘मुलगा जातीने ब्राह्मण पाहिजे’ असे नमूद केलेले होते. 

एलजीबीटी चळवळीची दिशा ठरवताना आपल्याला मार्क्सवाद आणि स्त्रीवादाचा इतिहास समजावून घेणेही महत्त्वाचे आहे. समाज ही एक भांडवलशाही व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्वतःच्या स्थापनेसाठी आणि व्यवस्थापनासाठी धर्म, पितृसत्ता, जातव्यवस्था, संस्कृती अशा इतर अनेक व्यवस्थांशी हातमिळवणी करते. कुटुंबव्यवस्थेच्या माध्यमातून भांडवलशाही गुलामांना वैयक्तिक मालमत्तेच्या आमिषाखाली थोडीफार सत्ता, थोड्याफार सुखसोयी, थोडेफार विशेषाधिकार देत राहते, म्हणून भांडवलशाहीशी हातमिळवणी केलेली पितृसत्ताही टिकून राहते. ह्यामुळेच आपण स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रियांच्या शोषणाबद्दल बोलतो किंवा मार्क्सवादी भूमिकेतून कामगारांच्या शोषणाबद्दल बोलतो, तेव्हा ह्या दोन्ही व्यवस्था एकत्र कार्यरत असतात हे विसरून चालणार नाही. परंतु मार्क्सवादी चळवळीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते, की या चळवळीतून स्त्रिया बाहेर पडल्या. मार्क्सवादी विचार केवळ दोन वर्गांचे विभाजन मानत आला होता, परंतु चळवळीतल्या स्त्रिया लैंगिक वर्गीकरणाकडे, पितृसत्तेकडे लक्ष वेधत होत्या. पुढे स्त्रीवादी चळवळीतूनही काळ्या स्त्रिया बाहेर पडल्या कारण स्त्रीवादी विचारामध्ये पितृसत्ता ही वर्णव्यवस्थेचेही व्यवस्थापन करत असते. भारतातही दलित स्त्रीवाद असाच स्त्रीवादापासून वेगळा झाला. तो सवर्ण स्त्रियांना पितृसत्ता ही जातव्यवस्थेचेही व्यवस्थापन करत असते हे दाखवत होता. चळवळीमध्ये पडलेली ही फूट एलजीबीटी चळवळीची दिशा ठरवताना लक्षात घेतली पाहिजे.

एलजीबीटी चळवळीच्या विचारामध्ये स्त्री-पुरुष साचे मोडण्याची एक जहाल शक्यता असली, तरी ती साच्यांशिवायचा एक नवीन समाज तयार करण्याच्या दिशेने अजून तरी विचार करताना दिसत नाही. नव्या समाजाचा विचार आपण मार्क्स आणि आंबेडकर यांच्या विचारांतून घेऊ शकतो. मार्क्सलाही भांडवलशाही व्यवस्थेच्या विपरीत एक नवा समाज अस्तित्वात यावा असे अभिप्रेत होते. त्यामध्ये कोणतेही वर्ग नसतील. मार्क्सच्या कल्पनेतल्या आदर्श समाजाची व्याख्या आपण अजून पुढे न्यावी आणि म्हणावे की ह्या नव्या समाजात वर्ण, धर्म, जात, वर्ग, लिंगभाव आणि लैंगिकतेचे कोणतेही साचे नसतील. तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने ‘समाज’ असेल. तेव्हाच आपल्या समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव ही मूल्ये अस्तित्वात येतील.

जमीर कांबळे

zameerkamble@gmail.com

लैंगिकता आणि लिंगभाव ह्या विषयावर संशोधन आणि जाणीव-जागृती. जर्मन भाषेचे अध्यापक. नाट्यकारणी.