लोकशिक्षण : कसे आणि कुणासाठी?
लोकशिक्षण आणि मराठी भाषा या लेखात शिक्षणाचे कार्य आणि शिक्षणामधील संज्ञापनाचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर, प्रत्यक्षात लोकशिक्षण कशा तर्हेने घडते हे, पुढील उतार्यात मांडलेले आहे.
प्रत्येक समाजात शिक्षणाबद्दलच्या ज्या तरतुदी असतात, त्यांची व्यवस्था साधारपणे तीन पातळ्यांवर कल्पित येईल.
(क) संपूर्णत: अनौपचारिक : उदाहरणार्थ, आईने मुलीला स्वयंपाक शिकवणे, बापाने मुलाला चांभारकी शिकवणे, आईबापांनी मुलामुलींना वळण लावणे, नाटक इत्यादिकांतून वळण लावणे. कॉफीहाऊसमधील तरुणांची गप्पाष्टके.
(ख) निम-औपचारिक : हरिकथा, कीर्तन, मशिदीला जोडून असलेली मदरसा, अशोकाचे शिलालेख यांसारख्या जुन्या तरतुदी; वृत्तपत्र, रेडिओ, इत्यादी व्यापक प्रसारमाध्यमांचा प्रसार; पाठ्यक्रम, वसंत व्याख्यानमाला, प्रौढशिक्षण व निरंतरशिक्षण, भित्तिपत्रके, शैक्षणिक प्रदर्शन आणि संग्रहालये, अभ्यासगट आणि चर्चागट यांसारख्या नव्या तरतुदी.
(ग) औपचारिक : या मूलत: दोन प्रकारच्या आहेत.
(ग 1) मान्य, प्रस्थापित आशयाचा प्रसार : शिकवणी, गंडाबंद शिष्याला तालीम, सामूहिक शिकवणी (उदाहरणार्थ, विविध प्रकारचे यलास), शाळा, महाविद्यालये, इत्यादी.
(ग 2) नवनव्या प्रसारयोग्य आशयाचा संचय आणि वितरण : चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदा, विद्वत्सभांच्या बैठकी, इत्यादी.
ज्याला आपण लोकशिक्षण म्हणतो, ते मुख्यत: निम-औपचारिक वर्गात पडते. त्यात पूर्वीपासून मान्य झालेल्या आशयाचा जसा प्रसार होईल, तसा नव्याने मान्य झालेल्या आशयाचाही प्रसार होईल. बालसंगोपनाचे शिक्षण एकत्र कुटुंब पद्धतीत अनौपचारिक रीतीने मिळत होते, ते आता मिळत नाही, किंवा अनौपचारिक रीतीने मिळाले, तरी नव्याने मान्य झालेल्या बालसंगोपनपद्धतीचे मिळत नाही. ह्या ना त्या कारणामुळे बालसंगोपनाचे शिक्षण आता निम-औपचारिक किंवा औपचारिक शिक्षणव्यवस्थेमधून द्यावे लागत आहे. औपचारिक शिक्षण लहान वयोगटातल्या भावी मातापित्यांसाठी, तर निम-औपचारिक शिक्षण मोठ्या वयोगटातल्या भावी किंवा नूतन मातापित्यांसाठी अशी वाटणी सध्याच्या सामाजिक चौकटीत करावी लागेल. अशी आशा आहे, की भावी काळात बालसंगोपन हा विषय लोकशिक्षणाच्या कक्षेत घ्यावा लागणार नाही. लोकशिक्षणाचा आशय त्या त्या काळाच्या गरजांना अनुरूप अशा प्रकारचा आणि म्हणून बदलता राहील, हे स्पष्ट आहे.
महाराष्ट्रात लोकशिक्षणाची प्रेरणा तशी जुनी आहे. खरे म्हणजे, लोकशिक्षणाच्या दोन काहीशा वेगवेगळ्या प्रेरणा पूर्वीपासून दिसून येतात. एक प्रेरणा रामदासांच्या ‘‘जें जें आपणांसि ठावें, तें तें दुसर्यासि शिकवावें, शहाणे करून सोडावे सकळजन’’ ह्या उक्तीमधून प्रकट होते; तीच पुढे अव्वल इंग्रजीत व नंतर ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’, ‘बाळबोध’, ‘विविधज्ञानविस्तार’, ‘लोकशिक्षण’ यांसारख्या शीर्षकांमधून व्यक्त होते. दुसरी प्रेरणा कळवळ्याची आहे, ‘‘बुडती हे जन देखवे ना डोळां’’ या तुकारामाच्या उद्गारात तो उमाळा जसा प्रकट होतो, तसाच तो पुढे ‘लोकहितवादी’ हे टोपणनाव, ‘शेतकर्यांचा असूड’, ‘लोकभ्रम’, ‘आमच्या देशाची स्थिती’, ‘सुधारक’, ‘समाजस्वास्थ’ यासारखी शीर्षके यामधून व्यक्त होतो. इंग्रजी अंमल आल्यानंतर या दोन प्रेरणा कायम राहिल्या; पण त्यांचा आविष्कार बदलला, ऐहिक कल्याण आणि त्याला आवश्यक ते ज्ञान यांचा विचार महत्त्वाचा ठरला, लोकजागृतीच्या विचारात राष्ट्र, राष्टीय स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुषसमता, रंजल्यागांजल्यांना नुसता आपलेपणाचा आधार न देता झगडायला शिकवणे, इत्यादी भारतीय प्रबोधनातले नवे विचार प्रभावी ठरले. समाजातल्या करत्या लोकांत जे वाद चालू झाले, ते म्हणजे सामाजिक घडी देशी की विदेशी; आधी राजकीय की सामाजिक; धर्मश्रद्धा की वैज्ञानिक दृष्टी; जातिनिर्मूलन की जातिसंघटन; प्रारब्ध की प्रयत्न अशा प्रकारचे वाद लोकांपर्यंत पोचवून त्यांना आपल्या बाजूला वळवणे ही एक नवी तिसरी प्रेरणाही लोकशिक्षणाच्या उद्योगाच्या मागे उभी राहिली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ पस्तीस वर्षे झाल्यानंतरही लोकशिक्षणाच्या निकडीच्या गरजा आणि प्रेरणा यांमध्ये महत्त्वाचा फरक पडला नाही. करत्या लोकांतल्या वादांमध्ये आणखी काही वादांची भर पडली. आधी आर्थिक की राजकीय; आधी उत्पादन की समवितरण; सामाजिक समता की आर्थिक समता; पाश्चात्यीकरण की सांस्कृतिक अस्मिता; धर्माचे नूतनीकरण ही दुर्बलीकरण यांसारख्या वादांची ती भर आहे. भारताबाहेर एक मोठे जग आहे आणि त्या जगात भारताला काय स्थान मिळणार आहे, हे बर्याच अंशी भारतातल्या अंतर्गत घडामोडींवर अवलंबून आहे… याची कालदर्शनात्मक जाणीव तीव्र झाली. भारतीयांची परदेशांत जावक आणि परदेशीयांची भारतात आवक वाढली.
जे बदल पाश्चात्य देशांत काही शतके होत होते, ते बदल आपल्याला काही दशकांत घडवायला पाहिजेत, मूळचा कृषिप्रधान, धर्मकेंद्री, स्थितीप्रिय, रूढिनियत, स्तरीभूत, निरक्षर, आणि मंदगती प्रकृती असलेला भारतीय समाज उद्योगप्रधान, विज्ञानसंमुख, नावीन्योन्मुख, करार व कायदा यांनी बंदिस्त, समताप्रवण, साक्षर, आणि गतिमान कसा बनेल… हे आजच्या लोकशिक्षणाचे ध्येय आहे.
लोकशिक्षण जरी निम-औपचारिक असले, तरी त्याचीही काही व्यवस्था असते, काही पातळीवर विभागणी असते. जो एका पातळीवर लोकशिक्षक असतो, उदाहरणार्थ, सामाजिक कार्यकर्ता किंवा गटविकास अधिकारी, तो दुसर्या पातळीवर शिक्षार्थी ठरतो. मकॉलीच्या झिरपा – सिद्धांताचा हा खरा अर्थ आहे. शिक्षण आपोआप झिरपेल, अशी वाट पाहत बसायचे नाही, तर वरच्या पातळीवरच्या शिक्षार्थ्याने खालच्या पातळीवर लोकशिक्षक बनायचे असते. त्या त्या पातळीवर लोकशिक्षणाचा आशय, शिक्षकवर्ग, शिक्षार्थिवर्ग, शिक्षणमाध्यम, शिक्षणाची भाषा बदलत जाईल, यांचे भान आपण ठेवायला पाहिजे. लोकशिक्षण देता-देता लोकशिक्षकही त्यातून काही शिकत असतो, तो बदलत असतो, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, हे तर खरेच; पण त्याचबरोबर त्याचेही शिक्षण व्हायला पाहिजे, त्याची बौद्धिक वाढ खुंटता कामा नये, त्याला शिकवणार्या तज्ज्ञांनाही आपल्या अनुभवाचा फायदा आपण करून देऊ शकतो हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागवला पाहिजे.
(…)
(लोकशिक्षण आणि मराठी भाषा या लेखातून घेतलेला भाग, मध्यमा)