वाचक लिहितात…

‘पालकनीती’चा अंक हातात आला, की एकाच बैठकीत वाचायचा… पण यावेळचा (मार्च २०२५) अंक एकदा वाचून मनच नाही भरलं. खूपच मस्त झालाय. खूप भावनिक. पालक म्हणून, त्याहीपेक्षा एक आई म्हणून, खूपच भावला. ‘पालकत्वाबरोबर अपराधीपण फुकट मिळतं!’… सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य. किती खरं आहे हे. आणि बाहेर काम करणारी आई असेल, काहीतरी शिकत असेल, तर तिच्यासाठी तर हा भाव अगदी थोड्या थोड्या दिवसांनी ठाणच मांडून बसलेला! मग भीती, चिडचिड, राग ह्या गोष्टी ओघाने आल्याच… पण मुलांसोबत आपणपण वाढतोय, शिकतोय. पालक आणि शिक्षक मुलांचे आरसे होऊ शकतात तसंच मुलंही आपला आरसा होतात. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचं इतरांशी वागणं आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रश्नाला ती कशी सामोरी जातात… हे म्हणजे आपलं प्रतिबिंब. ते बघताना कधी छान वाटतं तर कधी आश्चर्याचा धक्का. बापरे! आपण असे वागतो याची जाणीव, कधी आनंद, कधी दुःख, तर कधी सुधारण्याला वाव आहे याची आशा. सगळेच लेख खूप मस्त… खूप तरल आणि जाणिवेच्या पातळीवर मनाला भावणारे. खूप ठिकाणी आपलाच प्रश्न आणि आपलीच प्रतिक्रिया मांडली असं वाटलं. आयुष्यात उद्दिष्ट असेल किंवा नसेलही, पण पालक झाल्यावर मुलांबरोबर परत आयुष्याचा अर्थ शोधणं, स्वतःला नव्यानं शोधणं आणि नवीन उद्दिष्ट शोधणं ही खरंच खूप छान संधी आहे आपल्याकडे.
सोनाली पाटील
६ वर्षांची आई आणि शासकीय अधिकारी, जलसंपदा विभाग.