वाया नाही वायू

प्रियदर्शन सहस्रबुद्धे

पर्यावरणाच्या प्रश्नानं अस्वस्थ झालेल्या अवस्थेत असताना योगायोगानं माझी भेट डॉ. आनंद कर्वे यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बायोगॅस बनवला. मी याच विषयात काम करेन किंवा हे व्यवसायाच्या माध्यमातून पुढे नेईन याचा कुठलाही गंध मला तेव्हा नव्हता. यात सुधारणा करत गेलो आणि प्रगती होत राहिली. माझ्या घरातला सगळा स्वयंपाक 2019 सालापासून बायोगॅसवर होऊ लागला. आता माझ्यासारखी अनेक कुटुंबं आहेत जी विविध प्रमाणात बायोगॅसचा उपयोग करत आहेत. अनेक कंपन्यांची कँटीन आणि काही सोसायट्यांमध्ये कचरा जिरवण्यासाठीही याचा वापर केला जात आहे.

पर्यावरणीय बदल, कचरा, हवामानबदल हे प्रश्न खूप मोठे आहेत. त्यामुळे हतबल व्हायला होतं. स्वतःच्या अस्वस्थतेतून मार्ग काढण्यासाठी मी हे केलं. उपायांवर काम करायला लागलं, की आपण उत्साह आणि सकारात्मकतेनं भरून जातो. उपायाभोवती माणसं जोडली जातात. कृती करायला लागलो, की मार्ग सापडत जातो, असा माझा अनुभव आहे.

ओला कचरा ही समस्या नसून आपल्या ऊर्जेच्या प्रश्नाचं उत्तर आहे असा विश्वास मला बायोगॅसच्या कामातून आला. आणि ‘चक्राकार लाईफस्टाईल सोल्युशन्स प्रा. लि.’ ही कंपनी सुरू केली. केलेल्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी व्यवसाय हे माध्यम खूप ताकदीचं आहे असं जाणवलं. त्यामुळे काही मर्यादा येतात; पण त्यापेक्षा खूप जास्त शक्यता निर्माण होतात.  ‘चक्राकार’नं तयार केलेल्या बायोगॅस संयंत्राला आम्ही ‘वायू’ म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे आमच्या टीममधले बहुतांश लोक ‘वायू’ वापरतात. त्यामुळे वापरादरम्यान येत असणार्‍या अडचणी आम्ही अनुभवतो. त्यातल्या बर्‍याच अडचणींवर आम्ही उपायही शोधले आहेत. ‘वायू’ची टॅगलाईन आहे ‘वाया नाही वायू!’ कारण इथे काहीच वाया जात नाही. ‘वायू’ त्याचं वायूत रूपांतर करतो आणि तो वायू स्वयंपाकाला वापरता येतो. हा वापर अगदी सोयीचा केलेला आहे.

एक किलो फळांची सालं जर रोज ‘वायू’मध्ये जिरवली, तर त्यातून एका वर्षात आपण दीड सिलिंडर इतक्या गॅसची बचत करू शकतो. आणि रोज त्यात एक किलो पीठ घातलंत (गिरणीत जमिनीवर गोळा झालेलं पीठही ह्यासाठी वापरता येईल), तर एका वर्षात 15 सिलिंडरची बचत होते. हे तंत्र ‘वायू’मुळे सामान्य माणसाला जमू शकतं. यात ऊर्जा-निर्मितीचं लोकशाहीकरण आहे. पुढील प्रवास या शक्यतेला प्रत्यक्षात उतरवण्याचा आहे.

यातली एक मेख अशी आहे, की एक कुटंब रोज जेवढा ओला कचरा तयार करतं तेवढ्या कचर्‍याचा गॅस त्या कुटंबाला पूर्ण स्वयंपाकासाठी पुरत नाही. त्यासाठी त्याच्या जवळपास 6 ते 10 पट अधिक कचरा लागतो. तेवढा कचरा आपल्या आजूबाजूला निश्चितच तयार होत असतो; पण मग आता कचरा मागत कुठे हिंडायचं! पुण्यात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार्‍या सफाईकामगारांची ‘स्वच्छ’ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या सदस्यांची एक जोडी रोज साधारण 150-400 घरांमधून कचरा गोळा करते. त्यात अंदाजे 100 किलो ओला कचरा असतो. या कचर्‍याचा उपयोग त्याच परिसरातल्या लोकांना गॅस पुरवण्यासाठी करता येईल आणि त्यातून गॅस-पुरवठ्याचा एक छोटा व्यवसाय (मायक्रो एंटरप्राईझ) करता येईल अशी कल्पना पुढे आली. आज आपल्याला एलपीजीमुक्त व्हायचं असेल, तर आपण ‘वायू’ हे बायोगॅसचं संयंत्र बसवू शकतो. ते चालवण्याचं काम सफाईकर्मचारी करतील. ज्यांच्या घरात ‘वायू’ बसवलेला आहे, त्यात रोजच्या रोज अधिकचा ओला कचरा आणून घालण्याचं काम हे सफाई कामगार करू लागले. असा कचर्‍याचा रतीब घालण्याची सेवा रोजच्या रोज पुरवणार्‍या कामगारांचं मासिक उत्पन्नही वाढलं. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी द्यायची रक्कम त्यांना मिळू लागली.

बायोगॅस ही एक जिवंत प्रणाली असली, तरी काही दिवस बंद राहिल्यानं विशेष फरक पडत नाही. सुट्टीवरून परत आल्यावर रोजच्या कामांना लागायला आपल्याला जेवढ्या ‘उचक्या’ लागतील तेवढ्याच त्या जिवाणूंनाही लागतात. रोजचा कचरा आत पडू लागला की सुप्तावस्थेत गेलेले हे जिवाणूही जोमानं काम करू लागतात आणि पुन्हा एकदा गॅस तयार होऊ लागतो. त्यातूनही काही अडचणी आल्याच, तर आमची ‘ट्रबल शूटिंग’ची टीम मदतीला असतेच. ती अधिक दर्जेदार करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. कुठल्याही सर्वसामान्य व्यवसायात विक्रीनंतरची सेवा पुरवणं जसं महत्त्वाचं असतं तितकंच, किंबहुना त्याहूनही अधिक, बायोगॅसमध्ये त्याची आवश्यकता असते कारण ती एक चालतीबोलती ‘सिस्टिम’ आहे. ‘वायू’त आम्हाला हे भान ठेवावंच लागतं.     

चार माणसांच्या एका कुटुंबातून सामान्यपणे रोज बाहेर पडणारा ओला कचरा; फळांच्या साली, भाजीची देठं, चहापत्ती, अंड्यांची टरफलं, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणातलं उरलंसुरलं, उष्टं खरकटं, असं सगळं रोजच्या रोज गट्टम करून पचवू शकणारा आणि तरीही शहरी घरांमधल्या जागेत मावणारा बायोगॅस तयार करणं हा पहिला टप्पा होता. तो जास्तीतजास्त लोकांना परवडेल आणि वापरायला सोयीचा वाटेल इथपर्यंत पोचणं हा पुढचा टप्पा; त्यावर काम चालू आहे. दाराबाहेर ठेवलेला कचरा रोज सकाळी जादूनं नाहीसा होणार्‍या आर्थिक वर्गात कचरा आणि स्वयंपाकासाठी लागणारी ऊर्जा आणि त्यांचे आजच्या घडीला असलेले प्रश्न याबाबत जागरूकता निर्माण करणं, या प्रश्नांची उत्तरं आपल्याच हातात आहेत आणि ती आपल्यालाच अमलात आणायची आहेत, हा विश्वास आणि नेतृत्व निर्माण करणं हा तिसरा टप्पा. ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना’, असं प्रत्येक ग्राहकाला वाटू लागणं आणि तसं त्यानं कुठल्याही औपचारिकतेशिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगायला लागणं, शब्दशः सांगत सुटणं आणि ऐकणार्‍यांनीही ती कृती करणं यातूनच दर महिन्याला घरी येणार्‍या गॅसच्या सिलिंडरपासून मुक्तीची लोकचळवळ निर्माण होणं हा त्यापुढचा स्वप्नवत टप्पा.

आपलाच कचरा, आपलंच संयंत्र, आपलाच गॅस आणि आपलाच स्वयंपाक… त्यातून सुटलेली आपलीच समस्या… ओल्या कचर्‍याची आणि स्वयंपाकाला लागणार्‍या ऊर्जेची… आहे की नाही गंमत!

उत्सुक वाचकांसाठी:

https://www.youtube.com/watch?v=pW­D9b0DHuc
https://thebetterindia.com/138128/anand-karve-maharashtra-rural-innovation-technology/

प्रियदर्शन सहस्रबुद्धे

priyadarshan@vaayu-mitra.com

जगण्याचे पर्यावरण-समावेशक उपाय जीवनशैली आणि व्यवसायाच्या माध्यमातून शोधतात.