शब्दकोश वाढतोय…

लिंगभाव हा विषय संवेदनशील गंभीरपणानं बघण्याजोगा आहे, याची सार्वत्रिक जाणीव आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये वाढत जाते आहे. अश्यावेळी काही संकल्पना नव्यानं समजावून घेताना आपल्या भाषेत कधीकधी शब्दांची कमतरता भासते. कष्टानं निर्माण केलेल्या मराठी शब्दांपेक्षा इंग्रजीतले शब्द तुलनेनं सोपे वाटू लागतात. भाषांमध्ये असं आदानप्रदान आवश्यकतेनुसार घडत असतं. आज मराठी संवादातही वापरात आलेले लैंगिकता विषयातले काही इंग्रजी शब्द त्याच्या अभिप्रेत अर्थासह … 27 फेब्रुअरी या मराठी दिनाच्या निमित्तानं….

जेंडर आयडेंटिटी: वैयक्तिक लिंगभावना (किंवा लिंगभाव): म्हणजे आपण मनातून स्वतःला स्त्री समजतो की पुरुष. बरेचदा जन्माने दिलेल्या शारीरिक लिंगानुसार आपल्या मानसिक लिंगविषयक भावना असतात. पण काही वेळा याहून वेगळेही घडते. मानसिकदृष्ट्या आपण कोणत्या लिंगाचे आहोत, ती आपल्या मनातली आपल्या लैंगिक अस्तित्वाची ओळख म्हणजेच आपली वैयक्तिक लिंगभावना.

ट्रान्सजेन्डर: ज्या व्यक्तींची (वर उल्लेखलेली) वैयक्तिक लिंगभावना शारीरिक लिंगाहून वेगळी असते  त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात.

सिसजेन्डर: ज्या व्यक्तींची वैयक्तिक लिंगभावना आणि शारीरिक लिंग  यात फरक नसतो त्यांना सिसजेन्डर म्हणतात.

जेन्डरफ्लुईड: ज्या व्यक्तींची वैयक्तिक लिंगभावना जन्मभरासाठी एकच नसते, ती बदलती असते,  त्यांना जेन्डरफ्लुइड म्हणतात.

जेन्डरक्विअर: काही व्यक्तींची वैयक्तिक लिंगभावना स्त्रीचीही नसते आणि पुरुषाचीही नसते. ह्यांच्या मधली  किंवा या दोन्हीच्याही पलीकडची असते किंवा अनेक लिंगभावनांचं मिश्रण असते, अश्या व्यक्तींना जेन्डरक्विअर म्हणतात.

इंटरसेक्स: शारीरिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष या दोन्हीही गटांमधील काही वैशिष्ठ्ये असलेल्या व्यक्ती. काहींमध्ये ही असामान्यता जनुकीय स्तरावर असते आणि त्याचा परिणाम शरीरातील अवयवांवर दिसतो, तर काहींमध्ये जनुकीय स्तरावर सामान्य असूनही अवयवांमध्ये दोन्ही गटातील काही वैशिष्ठ्ये दिसतात. अनुवांशिकता, संप्रेरकं, जनुकीय असाधारण संरचना अशी बरीच कारणे यामागे असू शकतात.

सेक्शुअल ओरीएंटेशन: लैंगिक कल: लैंगिक कल म्हणजे इतर व्यक्तींबद्दल वाटणारे  लैंगिक आकर्षण. लैंगिक कल भिन्नलिंगी असू शकतो, समलिंगी असू शकतो, तसेच उभयलिंगी म्हणजे सम व भिन्न दोन्ही प्रकारचा असू शकतो. लिंगनिरपेक्ष सुद्धा असू शकतो. काही व्यक्ती अलैंगिकही असतात- त्यांना कुठल्याही गटाबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही. लैंगिक कल हा दुसऱ्या व्यक्तींबद्दलचा असतो. लिंगभावना मात्र आंतरिक असते.

एलजीबी: यामध्ये तीन गटांचा समावेश आहे. लेस्बियन (समलिंगी लैंगिक कल असलेल्या स्त्रिया), गे (समलिंगी लैंगिक कल असलेले पुरूष) आणि बायसेक्शुअल (उभयलिंगी म्हणजे समलिंगी व भिन्नलिंगी असे दोन्हीही कल असणारे स्त्री-पुरुष).

जेन्डर एक्स्प्रेशन: लैंगिक अभिव्यक्ती: आपण स्वत:ला लैंगिक स्तरावर जे काही मानतो, त्याची अभिव्यक्ती आपल्या बोलण्याचालण्यातून, हावभावांमधून, कपड्यांच्या निवडीतून इ. अनेकप्रकारे होत असते. ती प्रत्येकवेळी वैयक्तिक लिंगभावनेशी सुसंगत असेलच असेही नाही. सामाजिक अपेक्षांनुसारही ती असू शकते.

जेन्डर कन्फॉर्मिंग: लैंगिकतेबद्दलच्या सांस्कृतिक-सामाजिक अपेक्षांनुसार वागणारे: आपल्या भोवतालचा समाज लैंगिक अभिव्यक्तीबद्दलच्या काही ठोस कल्पना बाळगत असतो. उदाहरणार्थ,  मुलांनी  दणकट असणे अपेक्षित असते तर मुलींनी नाजूक इ. ज्या व्यक्तींची लैंगिक अभिव्यक्ती सांस्कृतिक अपेक्षांना धरून असते त्यांना जेन्डर कन्फॉर्मिंग म्हणतात. सगळे सिसजेन्डर लोक जेन्डर कन्फॉर्मिंग असतीलच असे नाही.

जेन्डर नॉनकन्फॉर्मिंग: ज्या व्यक्तींची लैंगिक अभिव्यक्ती सांस्कृतिक अपेक्षांनुसार नसते, त्यांना जेन्डर नॉनकन्फॉर्मिंग म्हणतात. उदाहरणार्थ, नाजूक पुरुष आणि मर्दानी स्त्रिया. सगळे जेन्डर नॉनकन्फॉर्मिंग लोक ट्रान्सजेन्डर असतील असे नाही. सिसजेन्डर लोकसुद्धा जेन्डर नॉनकन्फॉर्मिंग असू शकतात.

सर्वनामे: आपल्याला परिचित ‘he’, ‘she’, आणि ‘they’ च्या जोडीला आता ‘zie’, ‘per’ अशी जेन्डर नसलेली सर्वनामे इंग्रजी भाषेत तयार होत आहेत.