संवादकीय – जुलै २०१३
आटपाट नगर होतं, तिथं एक लग्न झालं. आटपाट नगर म्हणजे कुठल्या पुराण काळातलं नाही, अगदी एकविसाव्या शतकातलंच. आणि लग्न ही इतकी पुरातन रीत आहे की जणू ती मनुष्यनिर्मित नसून निसर्गानंच सांगितलेली आहे, असं वाटावं. ह्या लग्नाच्या दुसर्या तिसर्या इ.इ. गोष्टी तुम्ही गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात वाचल्याच आहेत. खरंम्हणजे वाचायला शिकलात तेव्हापासून वाचत आणि बघायला शिकलात तेव्हापासून बघत आलेले आहात. तर अशा आटपाट नगरात एक लग्न झालं मग काही काळानं मोडलं. बाईला पोटगीसाठी न्यायासनासमोर पदर पसरावा लागला. नवर्यानं या बाईशी संबंध असतील पण माझंतिच्याशी लग्न झालेलं नाही, असा सूर काढला. त्यावर न्यायमूर्तींनी केलेल्या विधानामधल्या त्रुटींबद्दल मानवी हक्कांसाठी लढणार्या कार्यकर्त्यांनी लगेच आवाजही उठवला. त्या त्रुटी खर्याच असतील किंवा कदाचित माध्यमांनी कळत – नकळत निर्मिल्या असतील. कदाचित आपले मुद्दे पुढे रेटण्यासाठी मिळालेल्या यासंधीचा फायदा कार्यकर्त्यांना हवा असेल. नात्यासाठी लग्न ही अत्यावश्यक बाब मानली जाऊ नये हे समाजानं स्वीकारावं यासाठी किती झगडावं लागत असताना, असे भलत्याच दिशेनं तीर मारून या न्यायासनानं ते प्रयत्न उडवून लावायला नकोत, असं वाटत असेल. मला वाटलं, कुठे बारीकसारीक मुद्दे काढता? त्यांनी त्या घटनेतली न्याय्य बाजू तरी बिनचूक ओळखली ना बास झालं !
आटपाट नगरात आणखी एक लग्न मोडलं. हे नवर्यानं नाही, तर बाईनं मोडलं. तीही बातमी मला वर्तमानपत्रातूनच समजलेली आहे. मात्रतिच्यावर फारशी चर्चा कुठं झाली नाही. ती होती, वरच्या मानल्या गेलेल्या जातीतली, तो मात्र होता दलित. अर्थात प्रेमाला जातीचं बंधन नसतं, अशी त्या दोघांची मोठ्ठी गैरसमजूत होती. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, तर एकत्र राहू, सुखानं जगू असा काहीतरी विचार करून त्यांनी लग्न केलं. न्यायालयाच्या दृष्टीनं यात काहीच गुन्हा नसला तरी जात-पंचायतीनं त्यांना छळायला सुरवात केली. काही दिवस या नवपरिणित जोडप्यानंत्यांना समजावून बघितलं. पण विरोधाची धार मिटेना. एक दिवस ती सरळ परत माहेरी निघून गेली. बातमी इथपर्यंत आली आणि मी मनातल्या मनात तिला रागे भरायलाच सुरवात केली. ‘‘हे हे असं करता बघा तुम्ही, हल्लीची मुलं ! त्यामुळेच या जातवाल्यांचं फावतं. त्यांनी विरोध केला. तुम्ही लगेच मागे आलात, अशानं प्रगती कशी होणार?’’ मी पुढे वाचू लागले- तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायालयानंतिला अर्जामागचं कारण विचारलं – नवरा त्रास देतो का, त्यानं तिची फसवणूक केली आहे का. तिला नवर्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्याच्या घराबद्दल, तिथल्या कष्ट, हालअपेष्टांबद्दल तिला हरकत नव्हती. त्याच्यावर मनापासून प्रेमच होतं, आणि त्याचंही प्रेम तिच्यावर आहे याबद्दल विश्वासही होता. मग काय?
ती म्हणाली, ‘‘जातपंचायतीच्या विरोधाला मी घाबरत नाही, न्यायासन माझ्या बाजूनं आहे हेही मला माहीत आहे, पण त्याच्यासोबत सुखानं जगायच्या इच्छेनं मी त्याच्याशी लग्न केलं होतं; ह्या सगळ्या भांडणांमध्ये आम्ही दोघं एकत्र असलो तरी दोघांनाही त्याचा अतिशय त्रास होत राहतो. तो जरा कुठे घराबाहेर गेला, की याला कुणी काही करणार तर नाहीना अशी मला चिंता, मी कुठे गेले की त्याला चिंता. घरच्यांना त्रास, सारखा तोच विषय मनात, या ताणात,एक साधं
प्रिय व्यक्तीसोबत राहण्याचं सुख आमच्या दोघांच्याही वाट्याला नीटपणे येईना. मी ठरवलं की ह्या त्रासातून दोघांचीही सुटका करावी. गेल्या दोन वर्षातलीच आमची ओळख, प्रेम आहे. आणि ते मनात राहणारच. पण त्या प्रेमाकरता दिवसेंदिवस ह्याच कटकटीत गुंतून रहायचं, इतकं की, इतर काही करायला सुचू नये; हे काही मला आणि त्यालाही शहाणपणाचं वाटत नाही. शेवटी आपल्याला जगायचं असतं ते सगळ्यांच्या समवेत. ते इतकं त्रासाचं! म्हणजे काहीही करा, कुठला ना कुठला त्रास वाट्याला आहेच. शिवाय कोर्टकचेर्या, वकिलांच्या फेर्या… नकोच ना.’’
लग्न या कृतीमधून मनापासून सुखाची अपेक्षा करणार्या आणि ती पूर्ण न होण्याशी तडजोड न करणार्या त्या मुलीला मी (मनातच) म्हणाले, ‘‘खरंच तू शहाणी आहेस, नव्या पिढीतली आहेस!’’ हे शहाणपणच आहे, नाहीपेक्षा जीव गमवावा लागता.
दुसर्या एका आटपाट नगरात त्याच वेळी मुलगी पळून गेली म्हणून जातीबाहेर काढल्या गेलेल्या एका बापानं जात पंचायतीनं आपल्याला परत स्वीकारावं, म्हणून आपल्याच मुलीचा सरळ खून केला.
आटपाट नगरं अनेक आणि तिथल्या कहाण्याही अनेक. बाईच्या जिवावर बेतणारी एक बाब तिच्यापासून लग्नाआधीपासूनच किमान दहा-पंधरा वर्षं लपवून ठेवणार्या माणसाला ‘असं का केलंस बाबा’ असंविचारावं तर त्याचं उत्तर, ‘खरं बोललो असतो तर, दुस्वासानं कधीच मेलो असतो’ असं येतं. ‘अरे, पण तिच्या जिवाचं काय?’ विचारावं तर तो लाचारीनं हसतो आणि निघून जातो.
‘नकोत ही असली लग्नं !’ त्याच्या पाठीकडं पाहत मी म्हणते. तेवढ्यात मला समोरच्या वर्तमानपत्रात आणखी एका आटपाट नगरातल्या लग्नांची एक गोष्ट दिसते. गोष्ट अतिशय आनंदाची आहे. लग्न मोडण्याची आहे. पंधरा-सोळा वर्षांच्या तब्बल ९५ किशोरींच्या लग्नाचा घाट त्यांच्या आईवडलांनी घातलेला असताना त्यांनी तो हाणून पाडला. गावांतल्या स्त्रियांची समज आणि मनोबल उंचावण्याचा प्रकल्प करणार्या एका संस्थेची त्यांना फूस होतीच. कायदाही पाठीशी होता हे खरंच, पण एवढं असूनही या लग्नांच्या गोष्टी पाचा उत्तरी सुफळ होत नाहीत. ही हितकारी फूस आहे हे या मुलींनी ओळखलं, ती लावून घेतली, हे त्यांचं श्रेय आहे. वर्तमानपत्रातल्या या बातमीकडे पाहताना मला एकदम उत्साहच येतो. अगदीच काही सगळं संपलं नाही, कुठेतरी चिंगार्या आहेत. आसमंत उजळत आहेत, अशी आशा वाटते.
आटपाट नगर होतं, तिथं एक लग्न झालं.. मी पुन्हा मूळ वाक्य म्हणायच्या आत त्या सगळ्या किशोरी माझ्या मनात जमा होतात. ‘‘शहाण्या आहात खरोखर, नव्या काळातल्या, नव्या दमाच्या आहात. ही ठिणगी विझू नका दे कधी आणि आनंदात रहा, लग्न करून किंवा न करता देखील.’’ मी त्यांना म्हणते. त्या हसतात, एका सुरात होऽऽ म्हणतात.