संवादकीय – जुलै २०२४

माणूस आणि निसर्गाच्या नातेसंबंधांवर बोलताना आपण सहजच परस्परावलंबित्व हा शब्द वापरतो. एका काळी त्यात सत्य असेलही; पण आत्ताच्या घडीला माणूस जेवढा निसर्गावर अवलंबून आहे त्या प्रमाणात निसर्ग खचितच माणसावर अवलंबून नाही. त्यामुळे माणसासाठी तरी ते फक्त परावलंबित्वच आहे असं दिसतं. निसर्गातली एखादी प्रजात नामशेष झाली, तर त्यावर अवलंबून असलेल्या अनेक लहान-मोठ्या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येतं, असा विचार विज्ञान मांडतं. मात्र माणसाच्या नामशेष होण्यानं निसर्गावर कुठलंही संकट येणार नाही.  उलटपक्षी माणसामुळे झालेला पर्यावरणाचा र्‍हासच काहीसा भरून निघेल,  हे कोविडच्या काळात आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. तेव्हा आपण पर्यावरण-रक्षण करतोय ते आपला हा निळा-हिरवा घनगोल वाचवायला नव्हे, तर स्वतःला वाचवायला, हे आपल्याला नीटच माहीत असावं.           

आज पुढे आ वासून उभ्या असलेल्या पर्यावरणाच्या समस्यांचं भान येत्या पिढीला असावं लागणार आहेच; पण या समस्या संपतच नाहीत, वाढतच जात आहेत, याचा त्यांना ताणही येता कामा नये. प्रत्येक गोष्टीसाठी ‘कॅच देम यंग’ करत त्यांच्यावर जबाबदार्‍यांचा भडिमार तर होत नाही ना याचं भान आपल्यालाच ठेवावं लागेल. नाही तर आज तरुणांपुढे वाढून ठेवलेलं ‘क्लायमेट अँग्झायटी’चं ताट कधी हळूच लहानांपुढे सरकेल हे आपल्याला कळणारही नाही.

क्लायमेट अँग्झायटी (लश्रळारींश रपुळशीूं) म्हणजे पर्यावरणाच्या होणार्‍या र्‍हासामुळे भविष्याबद्दल वाटणारी प्रचंड भीती. हवामानबदलाच्या उंबरठ्यावरच निसर्गातील घटनांमध्ये आपण इतकी अनिश्चितता अनुभवतो आहोत. काळ आणखी पुढे जाईल, पृथ्वीचं तापमान वाढत जाईल, तेव्हा काय परिस्थिती असेल, ह्याचा अंदाज वर्तवणं अशक्यच होऊन बसेल. प्रत्यक्ष त्या परिणामांना सामोरं जाणं तर दूरचीच गोष्ट! अर्थात, हा अंक तुमच्या हाती सोपवताना कोणाला क्लायमेट अँग्झायटी द्यायची नाहीय, उलट या अंकातले लेख आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणविषयक सकारात्मक कृतिशीलतेकडे नेणारेच आहेत.      

ही कृतिशीलता बर्‍याचदा पर्यावरणाविषयी सजग असलेल्या एकेका व्यक्तीपाशी सुरू होते आणि तिथेच राहते. स्वतः कृती करणं आपल्या हातात असतं; पण इतरांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून बदल घडवून आणणं अवघड तर असतंच पण आपल्या हातातही नसतं. इथे बहुतांश जनता मॉलमध्ये जाऊन ‘सगळं कसं चकचकीत आलबेलच आहे’ असं स्वतःला आणि समाजमाध्यमांवरून इतरांनाही सांगत असताना ‘आपण एकेकट्यांनी लढून काही उपयोग आहे का’ असा निराशेचा सूर मनात घुमू लागतो. अशा वेळी निसर्गच आपल्या मदतीला येतो आणि पावसाच्या काही थेंबांवर तरारून आलेली आणि पावसाच्या अपेक्षेनं हवेतल्या आर्द्रतेवर तगून राहिलेली सृष्टी पाहिली, की मनामनांना आशेचे धुमारे फुटू लागतात.

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला।

यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत्।

प्रत्येकाच्या मनात असलेली ही आशा एक अजब बेडी आहे. यानं बांधला गेलेला धावतोय आणि यापासून मुक्त असलेला मात्र पांगळ्यासारखा तिष्ठून राहतोय. या बेडीनं आणि बदनाम झालेल्या समाजमाध्यमांनी एकत्र येत एकांड्या शिलेदारांची नदी तयार व्हावी आणि वाटेत येणारे अडथळे पार करत आणि शक्य ते सगळं धुऊन काढत आशादायी भविष्याच्या दिशेनं धाव घ्यावी.

हा भविष्यकाळ आपल्या मुलांचा वर्तमान असणार आहे. तो आत्मविश्वासाचा आणि आशादायीच असायला हवा. हो ना?