संवादकीय – फेब्रुवारी २०२१
कोविड अजून पार नाहीसा झालेला नाही, कदाचित इतक्यात होणारही नाही; पण बर्याच अंशी नियंत्रणाखाली आलाय येवढे खरे. अर्थात, त्याने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून मास्क, सहा फूट अंतर आणि हात वारंवार धुणे यात सैलपणा येऊ देऊ नका. कोविडच्या निमित्ताने मध्यमवयीन सुखवस्तू लोकांच्या आयुष्यात मजेशीर बदल घडले. त्यांच्या रोजमर्रा धकाधकीच्या जीवनाचा वेगच कमी झाला. शिस्तीची बंधने गेली म्हणून काहींना या शांतपणातच सुख लागू लागले. थोड्या गरजा कमी केल्या तरी चालू शकतेय आणि मग उगाच तंगडतोड किंवा वाहनावरून जातानाची माथेफोड करावी लागत नाही असे ध्यानात आलेले लोक त्या मार्गाचाही अवलंब करताना दिसत आहेत. सुखवस्तूंच्या बाबतीत ठीक आहे, त्यांच्या नोकर्या काही ठिकाणी तरी घरबसल्या करता येण्यासारख्या असतात. काही कामे घरी आणून करता येतात. पण शिक्षणाचे काय? शिक्षकलोकांनी काही काळ ऑनलाईन शिकवले; पण ते काही नेहमी शिकवतात त्या दर्जाचे झालेले नाही हे शिक्षकही मान्य करतात. शिवाय ते सर्वांपर्यंत पोचले नाही. क्यू आर कोड्सबद्दल मागील अंकात आपण बोललो आहोत. ह्या मोकळ्या वेळात त्यात काही बदल होऊ शकला असता, तोही अजून तरी केलेला दिसत नाही. आता प्रश्न आहे तो दहावी-बारावीच्या परीक्षांचा. ह्या परीक्षा मात्र नेहमीसारख्याच घ्यायच्या असे चाललेले आहे. सुखवस्तू शहरी मुलांना निदान मोबाईल-संगणकावर नाममात्र तरी शिक्षण उपलब्ध झाले; पण ग्रामीण मुलांना तेही नाही. परिणाम अपेक्षित आहे तोच होणार. शहरी आणि ग्रामीण यांच्यातला फरक आता जास्तच उठून दिसणार आहे. पण निर्णय घेणार्यांना त्याचे काही नाही.
शेतकर्यांच्या आंदोलनाबद्दलही तेच. सामान्य सुशिक्षित सुखवस्तू आणि सरकार यांना शेतकर्यांचा मुद्दा दिसतच नाही, किंवा दिसला तरी समजावून घेता येत नाही. हे अगदी पालक आणि मुले यांच्यातल्या संघर्षासारखे आहे असे काही जण म्हणतात; पण आम्हाला तसे वाटत नाही. हे सरकार मायबाप सरकार नाही. पालकांना निदान मुलांच्या जीवाबद्दल तरी आपुलकी असते. सरकारला जर ती असती, तर शेतकर्यांचे प्राण जात आहेत याबद्दल किमान कणव तरी त्यांना वाटती, आणि त्यांच्या मार्गावर काटे पसरण्याआधी त्यांचे अश्रू पुसायला सरकार धावले असते. इथे फक्त शेतकर्यांचे हित कशात आहे, भले त्यांना तसे वाटो अगर न वाटो, ते आम्हाला चांगले कळते; हा हट्टच वर येतो आहे! ‘त्यांच्या भविष्याची आम्हाला काळजी वाटते म्हणून शिक्षा करावी लागते, प्रसंगी ओरडावे-मारावेही लागते,’ असे म्हणत अश्रुधुराचा, पेलेट गनचा वापर असो, पोलिसी बळाचा वापर असो किंवा कडाक्याच्या थंडीत गारठत ठेवणे असो. तेव्हा उगाच भलती तुलना न करता, शेतकरी जराही न हलता ‘रद्द करा ते कायदे’ या एकाच सीमेवर का अडून बसलेत, ह्यामागचा हेतू एकदा खराखुरा समजावून तर घ्यावा.