डॉ. कस्तुरी कुलकर्णी

।। १ ।।

 एका रविवारी आम्ही (‘सा’, आईबाबा आणि आजीआजोबा) ‘आपलं घर’ मध्ये मुक्कामाला गेलो होतो. ‘सा’ म्हणजे आमची मुलगी. मी तिची आई. तिच्या नावाचीही छान आणि मोठी गोष्ट आहे; पण ती परत कधीतरी. 

जाण्यापूर्वी आदल्या दिवशी बॅग भरताना, तिथल्या मुलांसाठी काही भेटवस्तू काढताना, राख्या ठेवताना ‘सा’ला वेगवेगळ्या वस्तू हाताळण्याचं, त्या मोजण्याचं, सामान इकडून तिकडे करण्याचं पक्कं ‘लायसन्स’ सहज मिळालं होतं. त्यामुळे ती उत्साहात मदत करत होती.

नऊ पर्यंत तिनं अचूक गणनादेखील केली.

एकीकडे काही ना काही बोलणं सुरू होतं.

मी : सा, उद्या तुला सुट्टीय, तर आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तिथे तुला खूप ताईदादा भेटतील. उद्या रात्री आपण तिथेच राहू. आणि परवा दिवशी राखीपौर्णिमा आहे तेव्हा राख्यापण बांधूया. त्या घराचं नाव – ‘आपलं घर’ आहे. जाऊया ना?

‘सा’: ते घर कसं आहे ग आई? म्हंजे पश्चिमरंग आणि नादब्रह्म सारखी बिल्डिंग आहे का ती? एवढ्या मुलांना ते घर कसं पुरेल?

मी : आपण साताऱ्यात कसे राहायचो माऊच्या घरी किंवा गोडोलीत, तसं बैठं घर आहे ते. उंच बिल्डिंग नाहीय ती. मी जाऊन आले आहे पूर्वी तिथे. छान आहे ते आणि भरपूर जागा आहे सगळ्यांना.

‘सा’ : आई, आपण त्यांच्याकडे चाललोय ना, तर ‘आपलं घर’ का म्हणतेस तू? ते काय ‘आपलं’ घर आहे का? ते ‘आपलं घर’ म्हणतील. आपण ‘त्यांचं घर’ म्हणूया!

।। २ ।।

तिथे पोचल्या क्षणापासून ‘सा’ रमली.

एक एक करत ताई दादा हॉलमध्ये येत होते. सगळे जमल्यावर ‘सा’च्या बाबानं मुलांना श्रीकृष्णाची गोष्ट सांगितली. आणि गोष्टसत्रच सुरू झालं. ‘दादा मीपण सांगू?’ मीपण, मीपण… करत ‘सा’सहित सगळ्यांनी एकमेकांना भरपूर गोष्टी सांगितल्या. ताई दादांशी ‘सा’ची लगेच गट्टी जमली. जादू, खेळ, झोका… काय काय गमतीजमती झाल्या. तायांबरोबर परिसर फिरून झाला.

मग चालत चालत आम्ही ओढ्याकाठी गेलो.

साताऱ्यात पूर्वी कास तलावात पाय सोडून बसण्याचा अनुभव ‘सा’च्या मनात कोरलेला. त्यामुळे पाणी दिसलं की पाण्यात पाय बुडवून बसायचं हे समीकरण तयार आहे तिचं.

खडकवासल्याला थांबलो तेव्हा अतृप्त राहिलेली इच्छा मग इथे ओढ्याच्या काठावर बसून पूर्ण झाली.

थंडगार पाण्यात निवांत पाय सोडून वाहणारं पाणी पाहत बसणं हा अतुलनीय अनुभव आम्ही प्रत्येकानं आलटून पालटून घेतला. (वय वर्ष साडेतीनचं मूल आपल्याबरोबर असलं की असंच असतं.)

।। ३ ।।

पाण्यात डुंबणाऱ्या गायी- म्हशी, प्रवाहातल्या भोवऱ्यात सापडलेली, तिथेच चक्राकार फिरत राहणारी एखादी वस्तू, पाण्यात सोडलेली हिरव्यागार पानाची होडी, एखादी लहानशी डहाळी, वाळकी काडी वाहत वाहत पाण्याबरोबर कशी पुढे जाते, लहान-मोठे दगड पाण्यात टाकल्यावर छुळुकछुळुक आवाज करत अंगावर पाणी कसे उडवतात याचं प्रात्यक्षिक झालं… आणि वेगवेगळ्या गोष्टी पुनःपुन्हा पाण्यात सोडून तरंगणं – बुडणं खेळ मनसोक्त खेळून झाला.

हट्ट करून ‘सा’नं ओढ्याच्या मधोमध उभं राहूनही पाहिलं (अर्थात, आम्ही वरून धरलेलं होतंच) आणि म्हणाली, “आई, हे पाणी माझे पायच ओढून नेतंय की काय असं वाटतंय.”

पुढे छोट्या टेकडीवर असलेलं शंकराचं मंदिर पाहिलं, आजूबाजूच्या निसर्गात फिरलो. तिथे कडेनं उगवलेली टणटणीची वेगवेगळ्या रंगांची थोडी फुलं गोळा करून ‘सा’नं पिंडीसमोर एक चिमुकली पुष्परचना तयार केली. वाटेतल्या योग-आश्रमाच्या आवारातल्या आंब्याच्या झाडांवर चढाई करून झाली. झुपकेदार शेपटीच्या, कापसासारख्या गोऱ्यापान, मऊमऊ माऊशी हितगूज झालं.

।। ४ ।।

संध्याकाळची प्रार्थना. तत्पूर्वी मुलांचा मैदानातला मुक्त खेळ. सोबतीला अंगणातला प्राजक्त, सोनचाफा. नीटनेटकं आणि साधं आवार. रिमझिम पावसाच्या सरी. मागे सतत उभी डोंगररांग… असं प्रसन्न वातावरण!

या सगळ्यात सर्वात धाकटी ‘सा’; त्यामुळे प्रत्येक ताई दादा आनंदानं, कौतुकमिश्रित जबाबदारीनं तिला खेळात सामील करून घेत होते. जपून नवीन काहीबाही गोष्टी शिकवत होते. कुणी हौसेनं प्रेमानं कडेवर घेत होते, कुणी बोट धरून फिरायला नेत होते, कुणी दोघी दोन बाजूंना उभ्या राहून तिला खेळातली स्कूटर चालवायला शिकवत होत्या, तर कुणी निव्वळ तिच्यापाशी राहायचं म्हणून आसपास थांबत होत्या, तिचं बोलणं निमूट ऐकत होत्या. ‘सा’ला तिच्या हक्काचे आणखी काही श्रोते, खेळायला नवीन सवंगडी आणि विनाकारण इकडेतिकडे उड्या मारायला, पळापळी करायला तिच्यासारखे सोबती मिळाले. एक कंटाळला तर दुसरा आहे, दुसरा नाही तर तिसरा आहे, चौथा, पाचवा…  साऱ्या लोभस बाललीला…

।। ५ ।।

रात्री झोपण्यापूर्वी ‘सा’ इकडेतिकडे बागडत होती. नवीन ठिकाणी आल्यापासून इतक्या गोष्टी एकापाठोपाठ घडत राहिल्या, की ‘सा’ नं जेवणबिवण प्रकारामध्ये अजिबातच वेळ दवडला नाही.

एका मोठ्या ताईकडून हातावर मेंदी काढून घ्यायला ती बसली होती. भोवती आणखी दोन ताया गप्पा मारायला. त्यातल्या एका ताईनं अतिशय सराईतपणे इवल्याशा पिटुकल्या हातावरची मेंदी पुरी व्हायच्या आत ‘सा ‘ला वरणभात भरवून पुढच्या महत्त्वाच्या कामगिरीपूर्वी सज्ज केलं. मग आम्हीही मनातल्या मनात हुश्श केलं.

।। ६ ।।

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून, आमच्या आधी न्हाऊन, आवरून मुलं तयार होती. ‘सा’ कधी उठणार, ती कोणता ड्रेस घालणार आहे, ती अजून का झोपलीय… हे पाहायला वेगवेगळ्या तायांच्या ‘सा’च्या खोलीकडे अनेकवार फेऱ्या झाल्या.

एका ताईला तिनं स्वतः ‘सा’ साठी बाजूला ठेवलेलं ‘गिफ्ट’ द्यायचं राहवेना. सकाळी सात वाजताच संजूआबा दिसताच ते तिनं त्यांच्याकडे सोपवलं.

पुन्हा नवीन दिवस… नव्यानं गप्पा, खेळ, फेरफटका, निसर्गातली भ्रमंती, विविध कीटक, गोगलगायी, खेकडे, विविधरंगी फुलं, वनस्पती, दगडधोंडे, ओढ्याकाठचा निवांत वेळ… 

दुपारी राखीपौर्णिमाही साजरी झाली.

आणि मग निरोप…

‘सा’ च्या लेखी इथून परतीची काय गरज आहे? इथेच राहू…

।। ७ ।।

आम्हा मोठ्या माणसांची मुलांशी मैत्री झाली, संवाद झाला; पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला त्यांच्या आयुष्यातल्या दुर्दैवी वास्तवाचा पदर, आमच्याही नकळत, सतत मनात होता.

त्यांच्याशी बोलताना तिथल्या परिस्थितीचं भान होतं.

कुणाशी मनमोकळेपणानं बोलताना आपल्या बोलण्यात आपलं घर, आईबाबा, इतर कुटुंबीय यांचा अगदी सहजी उल्लेख होतो. मात्र इथे मुलांशी बोलताना घर, आईबाबा असे संदर्भ माझ्याकडून आपोआप वगळले गेले. काही वेळा आवर्जून तसा आशय असलेलं एखादं गाणं / गोष्ट टाळली.

‘सा’चं आणि मुलांचं नातं मात्र निर्मळ, निखालस प्रांजळ आहे. त्यांच्या वास्तवाला असणाऱ्या दुर्दैवी कंगोऱ्यांची जाण नसणं ही तिच्या वयाची मर्यादा मानायची, की समोरच्याला आहे तसं स्वीकारण्याची बाल्यावस्थेमुळे तिला निसर्गतः लाभलेली देणगी मानायची?

डॉ. कस्तुरी कुलकर्णी

dr.kasturi1004@gmail.com

होमिओपॅथिक डॉक्टर, समुपदेशक, शिक्षक, योग तसेच संगीत अभ्यासक. जगजीवनातल्या सगळ्या गोष्टींबद्दल जिज्ञासा असलेली आजन्म विद्यार्थिनी.