(पुस्तक परिचय)
डॉ. राजश्री देशपांडे
आपण आपल्या रोजच्या जगण्यात गुंतलेले असतो. घर-संसार, नोकरी-व्यवसाय, मुलेबाळे या सगळ्यासाठी करावी लागणारी यातायात, त्यातल्या अडचणी, नात्यांमधले तणाव, आजारपणे, आर्थिक ताण या सगळ्यासकट आपल्या दैनंदिन आयुष्याची चाकोरी सुरळीत चालू असते. स्वतःला आपण संवेदनक्षम, पुरोगामी वगैरे समजत असतो. जमेल तसा, आपल्या सोयीने विचारात, वागण्यात खुलेपणा आणण्याचा आपला प्रयत्न असतो. पण काही पूर्वग्रह आपल्या मनात निरगाठीसारखे घट्ट रुतून बसलेले असतात. अस्मितांचे, अभिनिवेशांचे चष्मे डोळ्यावरून निघता निघत नाहीत. अशा वेळी ‘सोलो कोरस’सारखे पुस्तक आपल्या हातात पडते किंवा ‘सोलो कोरस’चा मंचीय प्रयोग बघण्यात येतो, तेव्हा मेंदूला झिणझिण्या येतात. परिघावरच्या मानवी जीवनाचे दर्शन होऊन पोटात खड्डा पडतो, गळा दाटून येतो. स्वतःच्या आणि समाजाच्या मनात खोल डोकावून बघावेसे वाटते.
साहिल कबीर ह्या नव्या दमाच्या तरुण लेखकाचे ‘सोलो-कोरस’ हे पुस्तक. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका आडबाजूच्या गावखेड्यातला शिकला-सवरलेला अब्दुल्ला नावाचा एक निम्न मध्यमवर्गीय तरुण – त्याची काही स्वगते – असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. राहुल लामखडे ह्या तरुण मित्राच्या वाचनात हे पुस्तक आले आणि तत्क्षणी त्याने ठरवले, की या पुस्तकाचा मंचीय प्रयोग झाला पाहिजे. हे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजे. काही स्वगतांच्या एकपात्री अभिवाचनापासून ते आज घडीला दृक्श्राव्य नाट्यप्रयोगापर्यंत ‘सोलो कोरस’चा प्रवास झाला. पुणे, सातारा, सोलापूर, पिंपरी-चिंचवड अशा अनेक शहरांमध्ये एकापाठोपाठ एक यशस्वी प्रयोग होत ‘सोलो कोरस’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचत आहे. काही ठिकाणी प्रयोग होऊ न देण्याचा चंगही हितसंबंध गुंतलेल्या काही लोकांनी बांधला होता. ह्या विरोधाला पुरून उरत बहुसंख्येने लोक हा प्रयोग बघत आहेत.
असे काय आहे या पुस्तकात आणि प्रयोगात?
हा अब्दुल्ला नावाचा, कृष्णेकाठच्या खेड्यातला सुशिक्षित तरुण आजूबाजूला घडणार्या घटनांच्या संदर्भात त्याची निरीक्षणे नोंदवतो. त्या निमित्ताने त्याला आलेले अनुभव, त्याचे त्या घटनांवरचे विचार, चिंतन मांडतो. हे अनुभव सुटे सुटे नाहीत, तर त्या त्या वेळच्या परिस्थितीनुरूप सामाजिक, राजकीय आणि मानवी वर्तनाच्या अनुषंगाने अनुभवांची मांडणी होत राहते. करोनाकाळाची आणि कृष्णेला आलेल्या महापुराच्या वेळची पार्श्वभूमी या अनुभवांना आहे. महापुराच्या वेळी झालेली भयचकित कोंडी, सर्वस्व वाहून जाण्याचा अनुभव, अगतिकता, या संकटांना तोंड देताना माणसाने माणसाला दिलेली साथ, सरकारी मदत मिळताना दिसणारा उघडावाघडा स्वार्थ, याही परिस्थितीत व्यवस्थेने सामान्य माणसाचे आरंभलेले शोषण असे सारे काही अब्दुल्लाची नजर टिपत राहते. त्यातला करुण आक्रोश, सामान्य माणसाचे अजूनच हलाखीचे होणारे जिणे मांडत राहते. उद्ध्वस्त झालेल्या एकेका व्यक्तीबद्दल सांगत राहते. त्यातच या वेदनेला अस्तर आहे ते गावागावात उसवत असलेल्या धार्मिक सलोख्याचे! तसेही गरीब, वंचित, परिघावर असणार्या माणसांना कुणाचा आधार असतो? त्यातच त्यांचा जन्म अल्पसंख्य समुदायात झालेला असला, तर विद्वेषी राजकारणाचे फासे त्याच्या विरुद्धच पडत राहतात. कुठेतरी लांब सीएए / एनआरसीचा फतवा निघतो आणि पिढ्यान्पिढ्या इथेच पाळेमुळे रुजलेल्या अडाणी, अशिक्षित, कागदपत्रांचा पत्ता नसलेल्या व्यक्तीला एका फटक्यात बेघर करतो. कुणीतरी कुठेतरी अतिरेकी वर्तन केले म्हणून इथला जिवाभावाचा शेजारी एखाद्याला ‘पाकिस्तानात निघून जा’ म्हणून बजावतो. या सगळ्यातून आलेली अनिकेत अगतिकता, हताशा, काळजातली खोलवर कळ ‘सोलो कोरस’मधून आपल्या आतवर पोचत राहते. विशिष्ट वर्गाला सतत देशप्रेमाचे पुरावे देत राहावे लागण्याची निकड त्यांना विद्ध करतेच; पण आपल्याही काळजावर खोलवर ओरखडा उमटवते.
साहिल कबीर म्हणतो –
‘ये वक्त के हाथो में चमकते है खंजर
एक साथ कलेजे में उतर क्यूं नही जाते’
राजकीय व्यवस्था, शासनयंत्रणा यावर कुठे भरवसा ठेवतो सामान्य माणूस? परस्परांच्या, माणुसकीच्या आधारे, सहभावाच्या, सहयोगाच्या आधारे तर तरून जाते ही आयुष्याची लढाई; पण आपले गाव, आपली जमीन, आपली माणसेच आपल्याकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहू लागली, तर जगण्याला आधार कुणाचा?
जागतिकीकरणाच्या भांडवली बाजारात सामान्य माणसाची ‘माणूस’ म्हणून किंमत कुठे उरली आहे? शेती तोट्यात. दुष्काळ-पूर यांच्या तावडीत. शेतमालाला भावाची हमी नाही, गाव-खेडी शहरात विस्थापित, छोट्या उद्योगधंद्यांना पाठबळ नाही, अशा अवस्थेत सामान्य माणूस देशोधडीला लागताना दिसतोय. शिक्षणाचे खाजगीकरण होते आहे. उच्च शिक्षण परवडण्यापलीकडे गेलेय. शिक्षण घेऊनही नोकरीधंद्याची शाश्वती नाही. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जीवन कधीच मागे पडले आहे. आवाजी, उन्मादी उत्सवांनी सार्वजनिक जीवनाचा ताबा घेतलाय. स्वस्त समाजमाध्यमे, माहितीचा महापूर, आभासी वास्तव यामुळे तरुणाईची वास्तवापासून फारकत झालेली आहे. तुटत गेलेला भूतकाळ, तीव्र स्पर्धेचे वर्तमान आणि बेभरवशाचे भविष्य यामुळे नवीन पिढी अधांतरी, अस्थिर मनोवस्थेत आहे. त्याचा पुरेपूर फायदा राजकीय पक्ष करून घेत आहेत. अस्मितांचे काटेरी ओझे त्यांच्या खांद्यांवर लादून त्यांना गुंगवत झुंजवत ठेवले जाते आहे. या सगळ्याचा एकूण समाजस्वास्थ्यावर खोलवर परिणाम होतो आहे. ह्या सांस्कृतिक, आर्थिक बकालीची दखल लेखक ‘सोलो कोरस’मध्ये घेत राहतो. तो प्रमाणभाषेला सहज वळवतो, वाकवतो, घडवतो. कधी तरल काव्यमय प्रतिमा, कधी रोखठोक साधे सहज प्रश्न, कधी जीवघेण्या शंका तर कधी शब्दांचे जाळे. वाचक गुरफटत जातो या अनुभवांत. जीव कोंडतो. एखाद्या भुयारात अडकल्यासारखी तगमग होत राहते आपली.
बरे पुस्तकात ना कोणावर आरोप, ना व्यक्तिगत टीका. वस्तुस्थितीतल्या विसंगती विशद करता करता आपल्या मनात डोकावायला लावणारी, आपले इमान जागे असेल तर आपल्याला प्रश्न विचारणारी, आपल्या मनातल्या गृहीतकांशी- पूर्वग्रहांशी नजर भिडवायला लावणारी प्रांजळ कथनशैली. पुस्तकाची भाषा कधीकधी अवघड वाटत असली, तरी त्यातले कथन अजिबात अवघड नाही. संयत भाषा किती दाहक होऊ शकते याचा अनुभव आपल्याला ‘सोलो कोरस’मध्ये सतत येत राहतो .
संत ज्ञानेश्वर, तुकोबांपासून आमीर खुसरो, रवींद्रनाथ टागोर, साहिर लुधियानवी, फैज अहमद फैजपर्यंतचे संदर्भ पुस्तकात जागोजागी विखुरलेले आहेत. ठिकठिकाणी संविधानाचा हवाला दिलेला आहे. शेर आहेत. कवितांचे तुकडे आहेत. मात्र लेखकालाही जाणीव आहे, की भुकेल्याला कविता- सौंदर्यशास्त्र असले काही कळत नाही. लेखक म्हणतो, ‘रोटी पे लिख के गझल हमने उन्हे भेजी है. देखते है गरीब उसे पढते है या खाते है.’ अशी लाचार गरिबी, हे नागवलेपण, परकेपण, खोलवर डसणार्या व्यवस्थेच्या इंगळ्या, जिव्हारी लागणार्या जिवलग दोस्तांच्या संशयी नजरा या सगळ्यापलीकडे जाऊन तेव्हा साहिल कबीर म्हणतो, ‘या पडझडीच्या, मोडतोडीच्या काळात संवादच महत्त्वाचा आहे. तेव्हा दोस्ता, आपण बोलत राहू या’. या नोटवर ‘सोलो कोरस’चा प्रयोग संपतो. (पुस्तकापेक्षा थोडासा वेगळा क्रम प्रयोगात आहे, शिवाय काही भरही आहे प्रयोगात).
हीच नोट पुढे नेत मी म्हणते, की आपणही सगळ्यांनीच बोलत राहू या. स्वतःशी, इतरांशी! या नाटकाच्या, पुस्तकाच्या निमित्ताने मला काही प्रश्न पडले. कुठल्याही जातीधर्माच्या समूहाबद्दल आपण ठासून विधाने करत असतो. ती ठाम विधाने आपण स्वतः किती वेळा पडताळून पाहिलेली असतात? एखाद्या समूहालाच देशद्रोही ठरवताना त्या समूहाची अशी किती देशद्रोही माणसे आपल्या संपर्कात आलेली असतात? भूतकाळाच्या मोडतोडीतून उद्भवलेल्या, पसरवलेल्या समज-गैरसमजांना पोसताना त्याच्या बरोबर उलट असलेले सौहार्दाचे अनुभव आपण नजरेआड का करतो? स्वतःच्या सुखसुविधांच्या दुनियेत जगताना वंचित तळागाळाच्या माणसांची स्थिती दयनीय, हलाखीची का झाली आहे, याचा विचार किती वेळा करतो? मुर्दाड बेफिकीर यंत्रणेला, व्यवस्थेला जाब विचारू शकतो का? आपण ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. समाजातल्या प्रत्येक जीवासाठी, मानवाच्या अस्तित्वासाठी, सृष्टीच्या असण्यासाठी सहिष्णुतेची, समंजसपणाची, प्रामाणिकपणाची, विवेकाची अतोनात गरज आहे. ‘सोलो कोरस’च्या निमित्ताने हे सारे प्रश्न ठसठशीतपणे समोर आले, रुतले. मला वाटते, यातच या पुस्तकाचे / नाट्यप्रयोगाचे यश आहे.
डॉ. राजश्री देशपांडे

rajshrimaitri@gmail.com
लेखक मनोविकारतज्ज्ञ म्हणून 25 वर्षे काम करत आहेत. मनोविकारांचा सामाजिक अंगाने विचार व्हायला हवा, ह्या दृष्टीने प्रयत्न करतात. साहित्याची आवड. कवितासंग्रह प्रकाशित.
